सोमवार, २१ मे, २०१२

दुसरा दृष्टीकोन म्हणजे कोणाचा ’नजरिया’?


   एक चित्र हजार शब्द सांगते असे म्हणतात. चित्र ही खुप साधी बाब असते. व्यंगचित्र तर त्याच्याहीपेक्षा प्रभावी माध्यम आहे. ते हजार नव्हे तर लाखभर शब्द बोलणारे असते. कारण त्यात नुसते चित्र नसते तर व्यंग दाखवलेले असते. अर्थात व्यंग असतेच असे नाही. ज्याने ते व्यंगचित्र काढलेले असते, त्याला दिसलेले वा भासलेले व्यंग, त्याने चित्रित केलेले असते. थोडक्यात त्या परिस्थितीवर त्याने केलेले ते भाष्य असते. ज्या पुस्तकातील व्यंगचित्राने हा वाद उफ़ाळून आला आहे, ते बाबासाहेबांचे व्यंगचित्र आहे. त्यात बाबासाहेब गोगलगाईवर आरूढ झालेले दाखवले आहेत. त्यांच्या हाती चाबुक आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मागे नेहरूही चाबुक उगारून उभे आहेत. व्यंगचित्रकाराला त्यातून काही सुचवायचे आहे. ज्या काळात हे चित्र प्रकाशीत झाले, तो काळ राज्यघटना बनवण्याचा होता. ती बनवण्यात खुप विलंब होत असल्याची तक्रार होत असेल आणि त्यावर आधारीत असे हे चित्र असू शकते. बाबासाहेब घटना समितीचे प्रमुख होते त्यामुळे तेच तो शकट हाकत होते आणि म्हणूनच त्यांना गोगलगाईवर आरुढ केलेले दाखवलेले आहे. पण मग मागे पंडीत नेहरू चाबुक उगारून कशाला? स्वाराच्या हाती चाबुक असणे समजू शकते. पण जो स्वार झालेला नाही, तो मागून कोणावर चाबूक उगारतो आहे? कोणाला चाबुक मारून नेहरू घटननिर्मितीला वेग आणू बघत आहेत? गोगलगाईवर स्वार झालेल्या बाबासाहेबांच्या हाती चाबुक असला तरी तो मारण्याच्या आवेशात ते दिसत नाहीत. पण स्वार न होता मागून चाबुक हाणायच्या आवेशात नेहरू काय करीत आहेत? ते कोणाला चाबुक मारून पळवू बघत आहेत?

   मुलांना राज्यघटना समितीचा कालखंड समजवायचा असेल तर हरकत नाही. पण तो समजावताना हे व्यंगचित्र कशाला? त्यातून काय सुचवायचे आहे? घटना बनवण्यात बाबासाहेबांमुळे विलंब झाला, असे सुचवायचे आहे काय? की त्यांच्या संथगतीला नेहरू वेग आणू बघत होते असे सुचवायचे आहे? शेवटी ज्याने हे चित्र निवडले त्याला काही सुचित नक्कीच करायचे आहे. आज वाद झाल्यावर त्यापासून पळ काढण्याचे कारण काय? आज आपण हे पुस्तक बनवताना खुपच अभ्यास केल्याचा दावा जे लोक करतात, त्यांनी त्या कालखंडाचा खरोखरच किती अभ्यास केला आहे? तो केला असता तर घटना समितीमध्ये जे सदस्य घेण्यात आले होते त्यापैकी अनेक दिग्गज गैरहजर असायचे व बाबासाहेबांना एकट्यानेच बहुतांश मसूदा तयार करावा लागला; हे लक्षात आले असते. ज्याला घटना मसूदा समिती म्हणतात, ती गोगलगाय असेल, तर तो दोष बाबासाहेबांचा कसा असू शकतो? ती समिती वा तिचे सदस्य बाबासाहेबांनी निवडलेले नव्हते ना? मग त्यात बाबासाहेब हवेतच कशाला? समिती म्हणुन नुसती गोगलगाय दाखवली असती, तर काय बिघडले असते? ज्यांनी समिती नेमली ते म्होरके पंडीत नेहरूच होते ना? मग त्यात विलंब होत असेल तर नेहरूच गोगलगाईला चाबुक मारून पळवू बघतात, असे व्यंगचित्र का नाही? खरे तर तेव्हाही ते व्यंगचित्र हा बाबासाहेबांवरचा न्यायच होता. जो दोष नेहरू व त्यांच्या हंगामी सरकारचा होता, त्याचे खापर बाबासाहेबांवर फ़ोडण्याचा हा प्रयत्न होता. नेमके तेच व्यंगचित्र कसे निवडले जाते? जे बाबासाहेब हिंदू कोड बिलासाठी घाई करत होते, तेच घटनेसाठी विलंब कशाला करतील? आणि जे नेहरू हिंदू कोड बील संमत होण्यात विलंब करत होते, तेच चाबुक हाणून घटना लौकर होण्याचा प्रयास कशाला करतील?  

   व्यंगचित्राचा हेतू स्पष्ट आहे. त्यात बाबासाहेबांना विलंबकर्ते ठरवून नेहरूंचे उदा्त्तीकरण करायचे होते. ज्या शंकर्स विकली या तात्कालीन नियतकालिकातून हे व्यंगचित्र घेतले आहे, ते व्यंगचित्रकार शंकर हे नेहरूभक्त होते याचा कुठला पुरावा देण्याची गरज नाही. त्यामुळेच त्यांचे हे चित्रच मुळात बाबासाहेबांसाठी अन्यायकारक आणि नेहरूम्चे उदात्तीकरण होते. त्याबद्दल तेव्हा बाबासाहेबांनी तक्रार केलेली नाही. पण माध्यमे व पत्रकार यांच्यावर बाबासाहेबांनी केलेले एक भाष्य खुप बोलके आहे. त्यातूनच शंकर यांच्या या व्यंगचित्राबद्द्ल बाबासाहेबांच्या भावना स्पष्ट होऊ शकतील. बाबासाहेब म्हणाले होते, ’ माध्यमे आधी आपला हिरो निश्चित करतात, मग त्यानुसार आपले मतप्रदर्शन करतात.’ शंकर पिल्ले यांचे हे व्यंगचित्र त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यात आधीच बाबासाहेबांमुळे घटनेला विलंब होतो हे निश्चित केले होते. म्हणूनच त्यांनी आवेशात मागून चाबुक हाणणारे नेहरू दाखवले आहेत. आजचे नेहरूभक्त नेमके त्याच व्यंगचित्राची निवड पाठ्यपुस्तकासाठी करतात, याला निव्वळ योगायोग म्हणता येईल काय?

   तेवढ्यावर न थांबता यातले दोषी प्राध्यापक योगेंद्र यादव आणि डॉ. सुहास पळशीकर आपला बचाव मांडताना काय भाषा वापरतात, तेही जरा बारकाईने समजून घेतले पाहिजे. ते म्हणतात, ’इसे हम अलग नजरियेसे देखते है’. ही काय भानगड आहे? अलग नजरिया म्हणजे वेगळा दृष्टीकोन. कुठला हा दृष्टीकोन आहे? कुठल्याही बाबतीत अनेक दृष्टीकोन असू शकतात. हे नाकारता येत नाही. पण जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा त्यात ज्याला इजा पोहोचली आहे, त्याचा दृष्टीकोन नव्हे, तर त्याची वेदना व भावना अधिक निर्णायक असते. मुंबईत येऊन बेछूट गोळीबार करणारा अजमल कसाब याचाही त्या भयंकर प्रसंगाबद्दल वेगळा नजरिया आहे. त्याने फ़ार मोठे पुण्यचे काम केले आहे, म्हणुन त्याला स्वर्गच मिळणार आहे असाच त्याचा दृष्टीकोन आहे. पण त्यात जखमी झालेले वा मेलेल्यांचा तोच दृष्टीकोन असू शकतो का? त्यात योग्य अयोग्य ठरवताना कोणाच्या दृष्टीकोनाला महत्व द्यायचे असते? अजमलसाठी कुठलीही इजा झालेली नाही. त्याच्या स्वर्ग नरक याबद्दल इजा झालेल्याना कर्तव्य नाही. त्याने खुशाल त्याच्या स्वर्गात रमावे, याबद्दलही त्यांची तक्रार नाही. त्यांचे म्हणणे इतकेच असते, की कसाबच्या स्वर्गात रमण्यासाठी इतरांच्या आयुष्याचा नरक होता कामा नये. तसा कसाब नरक करणार असेल तर त्याला रोखायला हवाच. त्याने तसा इतरांच्या जीवनाचा नरक केला असेल, तर त्याला शिक्षा व्हायलाच हवी. कारण त्याच्या कल्पनेतील स्वर्गासाठी इतर निरपराध लोकांच्या जीवनाचा नरक होणे त्यांना भोगावे लागत असते. तेव्हा नजरिया किंवा दृष्टीकोन ही शुद्ध बनवेगिरी आहे.

   यापेक्षाही भयंकर उदाहरण देता येईल. बलात्कार करणार्‍याचाही वेगळा नजरिया असू शकतो. प्रसंग तोच व एकच असतो. पण त्यात एकाची मौज असते तर दुसर्‍याची विटंबना असते. एकाची मर्दुमकी असते तर दुसर्‍याची यमयातना असते. अशावेळी कुणाच्या दृष्टीकोनातून त्या प्रसंगाकडे बघायचे? ज्याला त्या घटनेच्या यातना सोसाव्या लागता असतात, त्याचा नजरिया निर्णायक मानावा लागतो. इथे नेहरूवादी जे पुरोगामी म्हणवून घेणारे आहेत, त्यांचा हा नजरिया आहे. त्यातून ते असे लंगडे समर्थन करत आहेत. टिकेचे अधिकार सर्वांनाच असतील तर हेच लोक ती संहिष्णुता इतरवेळी का विसरून जातात? पंडीत नेहरू वा सोनिया गांधी यांच्यावर कोणी वैयक्तीक टिका केली, मग यांची संहिष्णुता कुठे गायब होते? इथे सवाल आजच्या दलितांच्या भावनांचा आहे. ज्यांना हा करोडो पिछडा समाज देवासमान आपला उद्धारक मानतो. त्याचे विडंबन त्याला यातनामय वाटणे स्वाभाविक आहे. ज्या काळात हे चित्र प्रसिद्ध झाले, त्या काळात बाबासाहेबांबद्दल तशी भावना नव्हती. ते फ़क्त दलित समाजाचे एक महान नेता होते. आज त्यांची किर्ती ते सगळे जुने संदर्भ ओलांडून खुप पुढे गेली आहे. श्रद्धा ही एक मोठी ताकद असते. ती एक प्रभावी प्रेरणा असते. म्हटले तर देशा्चा तिरंगा हेसुद्धा कापडच आहे. पण त्याच तिरंग्यासाठी स्वातंत्रपुर्व काळात अनेकांनी अंगावर गोळ्या झेलल्या. आज शेकडो सैनिक त्यासाठी हौतात्म्य पत्करतात. त्या कालखंडात तो ध्वज हिसकावून सरकारी अधिकारी पायदळी तुडवत होते. आज तसे कोणी केल्यास त्याला आजच्या सरकारचे अधिकारी, पोलिस अटक करतील. कारण आज प्रतिकात्मकरित्या तोच तिरंगा देशाची प्रेरणा व अभिमान आहे. तेव्हा नजरिया हा शुद्ध भंपकपणा आहे.

   सामान्य माणसाच्या गांजलेल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी जगण्याचे आधार असतात. त्या श्रद्धांच्या बळावर ती सामान्य माणसे अनंत दु:खे सहन करू शकतात, सोसू शकतात. त्यावरून जीव ओवाळून टाकत असतात. त्यांची महती टीव्हीच्या स्टूडीओत बसून शब्दांचे बुडबुडे उडवणार्‍यांना कधीच कळणार नाही. पण जेव्हा कसोटीची वेळ येते, तेव्हा अशीच सामान्य माणसे तुकाराम ओंबळे होऊन त्याच श्रद्धेसाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात. तेव्हा लोकशाही व स्वातंत्र्याची पोपटपंची करणारे किती लोक आपल्या सुरक्षित बिळातून बाहेर पडून त्याच स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याची हिंमत दाखवत असतात? तेव्हा ओंबळेला या शहाण्याचे शब्द हिंमत देत नसतात, तर हेच शहाणे ज्याला हसतात त्या श्रद्धाच त्याला यांच्या स्वातंत्र्याच्या संरक्षणार्थ पुढे आणू शकतात. कधीतरी हे शहाणे त्या हिंमतीकडे, त्या श्रद्धेच्या दृष्टीकोनातून बघण्याचे सौजन्य दाखवू शकले आहेत काय? ज्यांच्या भावनांची बौद्धिक हेटाळणी करण्यात हे लोक धन्यता मानत असतात, त्याच श्रद्धा यांच्या पोपटपंचीचे सुरक्षाकवच असतात. अशाच एका श्रद्धेचे आजचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे आहे. आणि त्याच श्रद्धेला या पुस्तकाने इजा पोहोचवली आहे. (क्रमश:)
 भाग  ( २६६ ) १६/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा