सोमवार, २१ मे, २०१२

नागपुरकरांनी कायदा हाती का घेतला?


   गेल्याच पंधरवड्यातली गोष्ट आहे. नागपूरच्या आभा कॉलनीजवळ भारतनगर भागात एका जमावाने कायदा हाती घेऊन तीन निरपराधांना यमसदनी धाडले. वास्तविक त्यांचा काहीही गुन्हा नव्हता. केवळ संशयामुळे त्यांचा बळी घेतला गेला. भटक्या नाथजोगी समाजातले हे लोक जोगवा मागून पोट भरणारे होते. नेहमी ते मुंबई पुणे अशा महानगरात जाऊन उदरनिर्वाह करणारे. मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील हे रहिवासी, अन्य शहरात जाऊन जोगवा मागणे हा त्यांचा पिढीजात धंदा. यावेळी त्यांनी नागपूरकडे मोर्चा वळवला. तिथे सध्या काय परिस्थिती आहे याचा त्यांना थांगपत्ता नव्हता. एस्टीने नागपूरला पोहोचल्यावर त्यांनी एका रिक्षावाल्याला गरीब वस्तीत नेऊन सोडायला सांगितले. कारण अशा जोगवा मागणार्‍यांना मध्यम वा गरीब उत्पन्न गटाकडूनच आश्रय मिळत असतो. बहुरुपिया असे त्यांना म्हटले जाते. त्यामुळेच या पुरूषांनी महिलांप्रमाणे साड्या परिधान केलेल्या होत्या. परिसर माहित नसल्याने ते अनोळखी असल्याप्रमाणे तिथे घोटाळत होते. कुठे जावे अशी त्यांच्यात बातचीत चालू होती. त्यांचे वागणे व वेश यामुळे तिथल्या रहिवाश्यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांना या चौघांचे वागणे संशयास्पद वाटले. कारण ते पुरूष होते आणि त्यांनी साड्या नेसल्या होत्या. हटकले तर त्यांना नेमके काही सांगता येइना. दरम्यान महिलांच्या वेशात किंवा वेशांतर करून चोर वस्तीत येतात व दरोडे घालतात वा महिलांवर बलात्कार करतात, मुलींना पळवून नेतात, अशा बातम्या स्थानिक वृत्तपत्रातून झळकलेल्या होत्या. सहाजिकच या नाथजोग्यांना हटकणार्‍या जमावाच्या मानगुटीवर त्याच बातम्यांचे भूत होते.

   या चौघांनी आपण चोर नसल्याचे जमावाला सांगून पाहिले. पळ काढला तर संशय वाढेल म्हणुन त्यांनी तिथेच थांबून पोलिसांना बोलावण्याचे व तपास करण्याचे जमावाला आवाहन केले. त्याप्रमाणे पोलिस आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनीही त्यांना आपल्या गाडीत डांबले. पण काय झाले कुणास ठाऊक. जमावाचा संशय बळावला आणि जमावाने पोलिसांसह या नाथजोग्यांवर हल्ला चढवला. लाठ्याकाठ्या दगडांनी केलेल्या हल्ल्यात एकजण जागीच मरण पावला, तर अन्य दोघे इस्पितळात पोहोचताच गतप्राण झाले. चौथा बचावला, कारण तो पोलिसांच्या गाडीत होता आणि आतल्या पोलिसाने दरवाजा घट्ट लावून घेतला होता. पंधराविस मिनीटात तिथे अधिक पोलिसांची कुमक आली. पण तोवर कारभार उरकला होता. मग त्यावर खुप काहूर माजले. जमावाच्या अशा हिंसक कृतीवर सार्वत्रिक निषेधाचा सुर लागला आहे. पण जमाव असा पाशवी का होतो, याचा विचार करावा, कारणे शोधावी असे कोणालाही वाटलेले नाही. तो आपल्याकडला बौद्धीक दुष्काळच आहे. कुठल्याही प्रश्नाची वा समस्येची तपासणी न करता त्यावर तातडीची उत्तरे काढून लोकांच्या गळ्यात बांधली जात असतात. मग त्यात जमावावर शरसंधान केले, की चर्चा करणारे मानवातावादी विद्वान ठरत असतात. इथे तीन निरपराध मारले गेले हे खरे असले, तरी ज्यांनी त्यांना असे पाशवी प्रवृत्तीने ठार मारले, तेही तसेच परिस्थितीचे बळी नाहीत का? ही माणसे जमाव म्हणून एकत्र आली व पशूप्रमाणे वागली; तर त्यांच्यावर गुन्हेगारीचे आरोप लावणे शहाणपणा आहे का? त्यांच्या हातून गुन्हा घडला आहे. पण कुठल्या परिस्थितीत गुन्हा घडला यालाही महत्व आहे. माणसाची कृती त्याच्या मानसिकता व भोवतालची परिस्थिती यावर अबलंबून असते. ज्या जमावाने हे कृत्य केले, त्याने यापुर्वी असे काही हिंसक कृत्य केलेले नाही.

   त्या घटनेनंतर नागपुरच्या पोलिस आयुक्तांनी चारही नाथजोग्यांच्या नावे कुठे गुन्हा नोंदलेला नाही वा तसा त्यांचा इतिहास नाही, असा चौकशी करून निर्वाळा दिलेला आहे. पण दुसरीकडे ज्यांना त्या हल्लेखोर जमावातले म्हणून पोलिसांनी अटक केली आहे, त्यांच्यापैकी कितीजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, याचा तपास कोणी करायचा? ज्याने पुर्वी गुन्हा केला नाही, तोच संशयीत नव्हे तर निरपराध असतो. तसेच ती घट्ना घडेपर्यंत त्या जमावातले लोकही तेवढेच निरपराध होते ना? मग त्यांनी अशी पशूतुल्य हत्या का करावी? दुसरी बाजू अशी, की समजा मारले गेले त्यांच्यातला कोणी गुन्हेगारी पार्श्वभूमी्चा असता, म्हणुन हे हत्याकांड वैध ठरते का? नसेल तर पोलिस आयुक्तांनी मृतांपैकी कोणी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही असे सांगण्याची काय गरज होती?

   सवाल भलताच आहे. जेवढे मारले गेलेले निरपराध आहेत, तेवढेच मारणारेही निरपराधच आहेत. परिस्थितीने दोघांना त्या त्या भूमिकेत आणले हा दुर्दैवाचा भाग आहे. आपण कुठल्या म्रुत्यूगोलात जात आहोत, त्याचा त्या नाथजोग्यांना अंदाज नव्हता. कारण त्यांची वेशभूषा त्यांच्या मृत्यूचे कारण झाली. दुसरीकडे त्यांनी नागपुरच्या त्या भागात पोहोचण्याआधी तिथे घडलेल्या घटना, पुढल्या घटनाक्रमाला जबाबदार आहेत. जोवर त्या घट्ना पुढल्या प्रसंगाशी जोडून बघितल्या जात नाहीत, तोवर त्यातला खरा गुन्हेगार समोर येऊ शकत नाही. त्या जमावाला संशयाने पाशवी गुन्हेगार ठरवणारी माध्यमे व त्या नाथजोग्यांना चोरटे गुन्हेगार ठरवून थेट शिक्षा द्यायला निघालेला जमाव, यात किती फ़रक आहे? तिथे मागल्या काही आठवड्यापासून जे संशयाचे व भितीचे वातावरण तयार झाले होते, त्यातून ही घटना घडली आहे. त्याला कायद्याचा नाकर्तेपणा खरा जबाबदार आहे. कायदा, प्रशासन व पोलिस हे लोकांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी असतात. जेव्हा ती सुरक्षेची हमी असते, तेव्हा सामान्य नागरिक शांतपणे जगत असतो. जेव्हा ती हमी अनुभवास येत नाही, तेव्हा तोच नागरीक स्वत:च स्वत:च्या सुरक्षेला प्रवृत्त होत असतो. म्हणजे तो स्वत:च स्वत:ची सुरक्षा करू बघतो. ज्याला सरकार किंवा माध्यमे कायदा हाती घेणे म्हणतात. इतक्या वर्षात त्या वस्तीतल्या नागरिकांनी असे कुठले कृत्य केलेले नाही. मग त्याच दिवशी ते जमाव करून असे का वागले? कधीपासून त्यांनी जमाव करून स्वत:ची सुरक्षा करण्याचा परिपाठ सुरू केला?

   ज्यांची त्यात हत्या झाली त्यांचे जमावातील कोणाशी वैर नव्हते; की जमावातला कोणी त्यांना ओळखत सुद्धा नव्हता. मग असे का व्हावे? नुसता कोणावर संशय घेऊन अशा थराला गोष्टी जात नसतात. आणि नागपुरची घटनाही आकस्मिक घडलेली नाही. तिची पार्श्वभूमी महत्वाची आहे. मेले त्यांची पार्श्वभूमी पोलिस आयुक्त तपासतात. पण घटना घडली तिची पार्श्वभूमी सांगत नाहीत. हा जमाव अचानक एकत्र आलेला नव्हता. तो काही दिवसापासून नियमित एकत्र जमत होता. नुसता सुगावा लागला, तरी काही क्षणात तिथले रहिवासी लगेच एकत्र जमत होते. कशासाठी ते असे झटपट एकत्र जमत होते? गडबड आहे म्हणजे कोणी संशयीत हाती लागला आहे, असेच लोकांना वाटत होते. कारण कित्येक दिवसांपासून त्या परिसरातील घरांवर दरोडे पडत होते. कुठे घरात घुसून मुलीवर बलात्कार झाले आहेत. चोर्‍या चालू होत्या. पण पोलिस त्याला पायबंद घालू शकत नव्हते. मग त्यातून लोकांमध्ये आपले अनुभव एकमेकांना सांगितले जात असतात. त्या गावगप्पा पुढे सरकताना त्याचे अतिरंजीत वर्णन वाढत असते व आपोआपच त्यातून एक भयगंड तयार होत असतो. नागपुरच्या त्या परिसरात असा भयगंड काही आठवड्यापासून निर्माण झाला आहे. पोलिस त्यापासून लोकांना दिलासा देऊ शकले नव्हते. ना चोर्‍या थांबत होत्या, ना चोर पकडल्याची बातमी लोकांना मिळत होती. पोलिस कसली हालचालच करत नव्हते. त्यामुळेच मग लोकांनी आपल्या परिसरात स्वत:च पहारा देण्यास सुरूवात केली शाळकरी, तरूण मुलांनी रात्र रात्र जागून काढणारी दक्षता पथके सुरू केली. पोलिसही त्यांना साथ देत होते.

   जेव्हा अशाप्रकारे जमाव काम करू लागतो तेव्हा तो शिस्तीने काम करील अशी अपेक्षा बाळगता येत नाही. कारण जमाव ही बेशिस्त गर्दी असते. तिला कसला विवेक नसतो. संशय आला म्हणजे संपले. शिवाय एकत्र असल्याने भितीची प्रतिक्रिया म्हणून एक शौर्याचा गंड तयार होतो. भित्राही अशावेळी शूर होऊन आक्रमक होतो. मग तो जमाव पशूपेक्षा वेगळा वागू शकत नसतो. या प्रकरणात चारही बहुरूप्यांना पोलिसांच्या गाडीत बसवले असताना जमावाने हल्ला केला आहे. म्हणजे चोर असा संशय असला तरी ते पळाले नव्हते. पोलिसांच्या ताब्यात होते. मग जमावाने असे पाशवी कृत्य का करावे? त्यामागची कारण शोधली पाहिजेत आणि त्यावर उपाय शोधण्याची खुप गरज आहे. कारण असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्यातल्या लोकांवर खटले भरणे, त्यांना अटक करणे, त्यांच्यावर दोषारोप करणे, वा त्यांना पशू ठरवून मोकळे होता आले, तरी त्यामुळे असे अमानुष प्रकार थांबलेले नाहीत. का वागतो असा जमाव? कधी व का कायदा हाती घेतो जमाव?   (क्रमश:)
  भाग  ( २७२ )  २२/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा