रविवार, ६ मे, २०१२

सचिन पासष्टाव्या घरातला बादशहा आहे का?


   सचिन तेंडूलकर हे नाव त्याच्या पराक्रमाने जगभर विख्यात झाले आहे. अशी नावे किंवा नाव कमावलेली माणसे लोकांवर छाप पाडायला उपयोगी असतात. पुण्याच्या अमित एंटरप्रायझेस नामक व्यावसायिक संस्थेने त्याला आपला ब्रॅंड अंबॅसेडर केले म्हणजे काय केले? तर सचिन त्यांच्या जाहिराती करणार आहे. आपण त्या कंपनीने बांधलेली घरे विकत घेतो, म्हणजे सचिनशी जोडले जातो, असा समज त्यातून लोकांमध्ये निर्माण होत असतो. अर्थात त्या कंपनीच्या कुठल्याही प्रत्यक्ष व्यवहाराशी सचिनचा थेट संबंध असणार नाही. पण सचिनची जी लोकप्रियता आहे, त्याचा अप्रत्यक्ष लाभ ती कंपनी उठवू शकणार आहे. नेमके हेच सचिनच्या खासदार होण्याचे रहस्य आहे. कॉग्रेसची आज भारतीय राजकारणातील पत साफ़ घसरली आहे. राहूल गांधी वा प्रियंका गांधी यांच्या हसण्याचा किंवा लोकांत मिसळण्याचा फ़ारसा प्रभाव आता जनमानसावर पडेनासा झाला आहे. कारण मध्यंतरीच्या दोन वर्षात जे आर्थिक घोटाळे व भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आली, त्याने कॉग्रेस पक्षाची पुरती नाचक्की झालेली आहे. त्यातच बाबा रामदेव किंवा अण्णा हजारे यांच्या आंदोलनांनी  कॉग्रेसी सत्तेचा पाया हादरवला आहे. जे संसदेतील विरोधी पक्षांना संख्याबळाने जमले नाही, ते या दोघा राजकारणबाह्य विभुतींनी करून दाखवले आहे. त्यांच्या आंदोलने व आरोपांच्या विरोधात माध्यमांना कामाला जुंपूनही काही उपयोग झाला नाही. तेव्हा आता कॉग्रेसला व सरकारला आपले बुडणारे जहाज वाचवण्यासाठी कुणाची तरी पुण्याई आवश्यक वाटू लागली आहे. त्यातूनच सचिनच्या खासदारकीचा डाव खेळण्यात आला आहे.

   राजकारण हा तसा बुद्धीबळासारखा पटावरचाच खेळ असतो. त्यात एकाने आपले मोहरे प्यादे पुढे करायचे असतात व त्यातून दुसर्‍याला शह द्यायचा असतो. मग तो शह उठवण्यासाठी दुसर्‍यालाही आपले मोहरे प्यादे हलवावे लागत असतात. त्यातून शह देणार्‍याला काटशह द्यावा लागत असतो. मग अशा खेळात प्रत्येक मोहरे आपापल्या पात्रतेनुसारच काम करू शकत असतात. पण त्याचवेळी मोक्याच्या जागी बसलेले वा असलेले प्यादेसुद्धा मोहर्‍याला भारी ठरू शकत असते. गोत्यात असलेल्या वजीराला साधे प्यादेही मारू शकते. अनेकदा तर हत्ती वा उंटाचा बळी देऊन वजीर वाचवावा लागतो. आणि कोणा मोठ्या मोहर्‍याच्या नव्हे, तर साध्या प्याद्याच्या तावडीत दोनदोन मोहरे सापडलेले असतात. परिस्थितीच त्यांची पटावरील लायकी व पात्रता ठरवत असते. राजकारणात तेच असते. बेछूटपणे खेळले तर आपणच आपले मोहरे दुसर्‍याच्या प्याद्यापेक्षा निरूपयोगी करून टाकत असतो. उलट सावध खेळी केली तर आपले साधे प्यादेही समोरच्या मोहर्‍यांना भारी ठरू शकतात. कॉग्रेसला आठ वर्षापुर्वी गमावलेली सत्ता पुन्हा मित्र पक्षांच्या मदतीने मिळाल्य़ावर जी मस्ती चढली, त्यातून जे बेछूट डाव खेळले गेले त्याने त्या पक्षाची अवस्था आज दुबळी झाली आहे. मग एखादी चाल चुकली वा फ़सली तर प्रथम सावरासावर करायची असते. कधीकधी माघारही आक्रमणापुर्वीची कुटील चाल असू शकते. पण याचे कुठलेही भान न ठेवता जे राजकारण खेळले गेले, त्याने आज कॉग्रेसला नको तेवढे अडचणीत आणले आहे. त्याचे एक एक मोहरे गारद झाले आहेत. स्वच्छ चेहर्‍याचे मनमोहन सिंग, कर्तबगार चिदंबरम, अनुभवी प्रणबदा मुखर्जी, ताजतवाना चेहरा राहूल गांधी, सोनियांचे त्यागी रूप, प्रियंकाचे घायाळ करणारे स्मित, असे अनेक मोहरे कॉग्रेसने पटावर मांडले होते. त्यातून २००४ सालात खे्ळ सुरू केला होता. पण आज त्यातला एकही मोहरा कामाचा उरलेला नाही.

   विरोधकांकडे नेमकी खे्ळी करू शकणारे व सत्तेला कोंडीत पकडू शकणारे मोहरे नसल्याने, या घरातून त्या घरात सत्तेचा राजा पळवत ठेवण्याची तारांबळ कॉग्रेसकडून चालली आहे. त्यातून सुटकेचा मार्गच सापडेनासा झाला आहे. विरोधक म्हणजे भाजपा व इतरांकडे मोहरेच नाहीत. प्यादीही फ़ारशी उरलेली नाहीत, अशा विश्वासावर कॉग्रेसची मस्ती चालू होती. पण आधुनिक बुद्धीबळाचे आर्यचाणक्य कुमारशास्त्री केतकर यांनी राजकीय पटाची केलेली नवी मांडणी कॉग्रेसलाच ठाऊक नसावी हा केवढा दैवदुर्विलास. पंधरा वर्षापुर्वीपर्यंत जगात बुद्धीबळाचा पट फ़क्त ६४ घरांचाच होता. म्हणजे एका रांगेत आठ घरे व अशा आठ रांगा मिळून ६४ घरे व्हायची. पण १९९७ च्या दरम्यान कुमारशास्त्र्यांनी त्या पटाला ६५वे घर असल्याचा शोध लावला आणि राजकीय बुद्धीबळाचा पटच आमुलाग्र बदलून गेला. कुमारशास्त्र्यांचे दुर्दैव इतकेच, की ज्यांच्या घराण्यात त्यांनी आयुष्यभर पाणक्याचे काम करण्यात धन्यता मानली, त्याच नेहरू गांधींच्या आधुनिक वंशजांनी कुमारशास्त्र्यांच्या या "पासष्टाव्या घराची" दखलही आपल्या खेळात घेतलेली नाही. ती घेतली असती तर आज त्यांना सचिन तेंडूलकरची आराधना करण्याची वेळ कशाला आली असती? की आज आपली फ़सलेली खेळी सावरण्यासाठी सोनियांनी कुमारशास्त्र्यांना सलागार बनवले आहे? आणि त्यातून सचिनला पासष्टाव्या घरासमोर आणुन बसवण्याची नवी चाल खेलली गेली आहे?

   अलिकडेच निर्मलबाबा नावाचे एक प्रकरण उजेडात आले आहे. अडलेनडले त्याच्याकडे जातात आणि आपल्या अडचणीवर उपाय मागतात, तशाच सोनिया गांधी कुमारशास्त्री केतकरांकडे आल्या आणि शास्त्रीबुवांनी सचिनला खासदार करण्याचा उपाय सुचवला असेल काय? अण्णा हजारे व रामदेव बाबा यांच्यावर खुप आरोप केले, माध्यमांना सुपार्‍या देऊन त्यांच्या बदनामीच्या मोहिमा राबवल्या गेल्या. त्यांचे सहकारी फ़ोडून वा त्यांच्यावरच आरोप करून झाले. राजकीय डावपेच खेळून झाले. पण कशानेच अण्णा वा रामदेव यांच्या आंदोलनाला शह दिला जात नाही; ही कॉग्रेसची मोठी अडचण झाली आहे. कारण त्यांचे सर्व डाव व चाली या राजकीय पटावरच्या ६४ घरापुरत्या मर्यादित आहेत. त्यातली सर्व प्यादी व मोहरे त्याच पटाच्या मर्यादेतले आहेत. आणि कुमारशास्त्री केतकरांच्या सुमारबुद्धी अनुसार अण्णा तर पासष्टाव्या घरात बसले आहेत. परिणामी अण्णांना शह दिला जात नाही की अण्णांची कोंडीसुद्धा होत नाही. म्हणूनच आता दिग्विजय सिंग थकले, अग्निवेश संपले, संघाशी संबंध हा आरोप मागे पडला, प्रचारकी माध्यमे कंटाळली. पण अण्णा व रामदेव मात्र आपल्या जागी जसेच्या तसे उभेच आहेत. मग त्यांना रोखायचे कसे? कुठलाही मोहरा, प्यादे वा खेळी हे दोघे ठाण मांडून बसलेल्या पासष्टाव्या घरापर्यंत पोहोचतच नाहीत. मग करायचे तरी काय? त्यासाठीच मग नेहमीचे प्यादे, मोहरे वा खेळी बाजूला ठेवून चौसष्ट घरांच्या पलिकडे ज्याचा प्रभाव पडू शकतो असा कोणी खेळाडू वा मोहरा आणणे भाग होते, ज्याच्यावर कुठला आरोप होऊ शकत नाही, ज्याच्या चारित्र्यावर डाग नाही, ज्याचे वर्तन निष्कलंक आहे, ज्याचे व्यवहार शुद्ध आहेत, ज्याच्याविषयी जनमानसात आदराची भावना आहे, असा कुणी मोहरा अण्णांसमोर ठेवायचा, अशीच ही चाल नाही काय? जेवढ्या अण्णा व रामदेव यांच्याकडून भारतीयांना आज अपेक्षा आहेत व आशा आहेत, तेवढाच सचिनबद्द्ल विश्वास व प्रेमभावना लोकांमध्ये आहे.  

   दिग्विजय सिंग, कुठला संपादक, अग्निवेश, अगदी स्वच्छ चारित्र्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही कुठला ना कुठला आरोप होऊ शकतो, आक्षेप घेतला जाऊ शकतो. पण रामदेव आणि अण्णा यांच्यावर आरोप झाला, तरी त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. ही कॉग्रेसची अडचण आहे तशीच ती माध्यमांची अडचण आहे. अण्णा नाही तरी त्यांचे सहकारी वा रामदेव यांच्या आश्रमावर बेछूट आरोप झाले आहेत. पण त्याचा कुठलाही सज्जड पुरावा कोणी समोर आणू शकलेला नाही. म्हणूनच अशा आरोपांवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. याच्या उलट परिस्थिती कॉग्रेस व त्यांच्या समर्थनाला पुढे येणार्‍यांची आहे. कॉग्रेसवर कुठलाही आओप झाला तर कोणी आज पुरावा मागत नाही. इतकी कॉग्रेसची विश्वासार्हता लयाला गेलेली आहे. त्यामुळेच कॉग्रेसच्या इशार्‍याने अण्णा व रामदेव यांच्यावर शरसंधान करणार्‍या माध्यमांवरचाही लोकांचा विश्वास उडालेला आहे. नियमित माध्यमांपेक्षा आज लोक मोबाईल, फ़ेसबुक, इंटरनेट, ब्लॉग अशा पर्यायी माध्यमांवर अधिक विश्वास दाखवू लागले आहेत. त्यावर आलेल्या अफ़वाही लोकांना अधिक विश्वासार्ह वाटतात. पण नेहमीच्या माध्यमातील वास्तविक बातमीही संशयास्पद बनली आहे. त्यावरला उपाय म्हणून कॉग्रेसने सचिनला खासदार करण्याचा हा डाव खेळला आअहे काय? त्यातून कॉग्रेसला काय सुचवायचे आहे?  (क्रमश:)
  भाग  ( २५७ ) ७/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा