गुरुवार, १० मे, २०१२

उंडारू भाजपाचा बंगारू लक्ष्मण


   तब्बल बारा वर्षांनी भाजपाचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपाचा निकाल लागला आहे. सीबीआयच्या कोर्टाने त्यांना दोषी ठरवून चार वर्षाच्या कैदेची शिक्षाही फ़र्मावली आहे. त्यामुळे भाजपाचे नाक कापले गेलेच आहे. पण त्याचवेळी कॉग्रेसला बर्‍याच दिवसांनी नाक वर करून भाजपाला उपदेश करण्याची संधी मिळाली आहे. सहाजिकच कॉग्रेस प्रवक्त्याने आत्मपरिक्षणाचा सल्ला भाजपाला द्यावा, हे ओघानेच आले. जणू भाजपाचा कोणी आरोपात अडकला म्हणजे कॉग्रेसला आपल्या स्वच्छ चारित्र्याचा दाखला मिळत असावा, असेच ऐकणार्‍याला वाटण्यासारखे वक्तव्य केले जाते. अर्थात त्यासाठी कॉग्रेसला चोर भामटा म्हणायचे कारण नाही. जेव्हा कोणी कॉग्रेसवाला अशाच आरोपात अडकतो, तेव्हा भाजपाचा कोणी प्रवक्ता तेवढाच सात्विक चेहरा करून कॉग्रेसला आत्मपरिक्षणाचा उपदेश करत असतो. एकूणच राजकारण हा बेशरमपणाचा आखाडा बनला आहे. दुर्दैव इतकेच, की त्यांचे हे विद्रुप  चेहरे लोकांसमोर आणायचे काम माध्यमांकडून योग्यरितीने पार पाडले जात नाही.

   1977 पर्यंत कॉग्रेस हाच देशातला अबाधित अपराजित सत्ताधारी पक्ष होता. त्यामुळे भ्रष्टाचार म्हटला, मग तो कॉग्रेसचाच, अशी एक सार्वत्रिक समजूत होती. आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या चांगल्या वागण्यातून, बोलण्यातून त्याची प्रत्यक्ष ग्वाहीच दिली होती. अनेक प्रयत्नातून कष्टाने निवडणूका जिंकणारे विरोधी पक्षातले अभ्यासू कर्तबगार नेते, कधी सत्ता वा मंत्रीपदाची भुरळ पडल्याने सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला गेले नाहीत. त्यांनी कायम विरोधी पक्षात बसून अभ्यासपुर्ण संसदपटू होताना, त्याचे लाभ उकळण्याचा विचारही केला नव्हता. आपण जनतेला व विचारसरणीला बांधील असल्याची ती गाढ श्रद्धा त्यांच्या चारित्र्याची साक्ष होती. जो सत्तेला भुलत नाही तो भ्रष्टाचार काय करणार, अशी त्यांच्याबद्दल लोकभावना होती. 1977 च्या जनता क्रांतीने ते चित्र पुसून टाकले. कारण कालपर्यंत विरोधी पक्षात बसून सत्ताधार्‍यांच्या भ्रष्टाचार व गैरकारभारावर आसूड ओढणारेच मग विविध आरोपाच्या भोवर्‍यात सापडले. नुसता आर्थिक व पैशांचा भ्रष्टाचारच नव्हे, तर बौद्धिक व नैतिक भ्रष्टाचार करण्यातही त्यांनी मोठी आघाडी मारली.  

   तोपर्यंत विचारसरणी व राजकीय भूमिका यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावण्यात धन्यता मानणारे अनेक दिग्गज विरोधी राजकीय नेते, सत्तेच्या वादळात कुठल्या कुठे भरकटत गेले. ज्या सामान्य जनतेशी बांधिलकी मानणे त्यांनी कर्तव्य म्हणून पार पाडले होते, तेच सत्तेच्या नको तितके आहारी जाताना पाहून लोकांचा भ्रमनिरास झाला. त्याची सुरूवात समाजवादी व सेक्युलर म्हणून मिरवणार्‍यांनी तेव्हा केली. मग त्यांच्यापासून बाजूला झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या गटाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. कारण पुढल्या काळात त्याच गटाने आपले चारित्र्य व प्रामाणिकपणा लोकांच्या नजरेत भरावा असे पद्धतशीर प्रयास केले होते. तेवढेच नाही तर देशातला कॉग्रेसचा भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर पर्यायी राजकीय पक्ष असायला हवा आणि तो भाजपाच असू शकतो, अशीही अपेक्षा जनमानसात निर्माण केली. त्याचाच फ़ायदा मग त्या पक्षाला अवघ्या दहा वर्षात मिळाला.

   1980 सालात जनता पक्षातून पुर्वाश्रमीच्या जनसंघियांचा गट वेगळा झाला. त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचा आरोप होत राहिला. ती कटकट संपवण्यासाठी त्यांनी वेगळी राजकीय चुल मांडली. मात्र दरम्यान राजकारणाने असे चमत्कारिक वळण घेतले होते, की लौकरच आलेल्या निवडणूकांत सर्वच विरोधी पक्षांचा पालापाचोळा उडाला. इंदिरा हत्येने हवालदिल झालेल्या भारतीय जनतेने राजीव गांधींना इतकी भरभरून मते दिली, की लोकसभेत विरोधी पक्ष नामोहरम होऊन गेला. अगदी विरोधकांचे दिग्गज पराभूत झाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा हुकमी एक्का पराभूत झाला. सर्वच विरोधी पक्षात नैराश्य आले होते. त्यातून पक्षाची नवी बांधणी करण्याचा निर्धार करून लालकृष्ण अडवाणी यांनी कंबर कसली. आपल्यावरचे हिंदुत्वाचे आरोप नाकारण्यापेक्षा हिंदुत्वाचाच अजेंडा घेऊन ते मैदानात उतरले. त्यातून भाजपाने नवी उभारी धरली. तर आधीच्या दिवाळखोर सत्ताकारणाने बदनाम झालेल्या मुळच्या समाजवाद्यांना मग कॉग्रेसमधून बाहेर पडलेल्या विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या आश्रयाने राजकारण करायची वेळ आली. त्या आरंभीच्या पंधरा वर्षात भाजपाने जी वैचारिक बांधिलकी व संघटनात्मक इमानदारी दाखवली, त्याचे फ़ायदे त्या पक्षाला नंतरच्या काळात मिळत गेले.  

   1984 च्या निवडणुकीत अवघे दोन खासदार पदरी पडलेल्या भाजपाने पाच वर्षात 90 खासदार जिंकण्यापर्यंत मजल मारली. तेवढेच नाही तर व्ही.पी. सिंग यांच्या जनता दलाला बाहेरून पाठींबा देताना, सत्तेत जाण्याचा मोह टाळण्याची हिंमतसुद्धा दाखवली होती. त्यातूनच त्या पक्षाची लोकप्रियता वाढत गेली. जनता दल वा अन्य पक्षात सत्तेसाठी जी साठमारी चालली होती, त्यांच्या तुलनेत मोठी संख्या असूनही सत्तेचा मोह आवरणारा पक्ष; ही प्रतिमा जनतेला भावली होती. त्याचे शिल्पकार पक्षाध्यक्ष लाल्लकृष्ण अडवाणीच होते. कारण त्यांनी एका बाजूला कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा देऊन संघटित केले होते, तर दुसरीकडे जनभावना ओळखून आपल्या मुळच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा जाहिर उच्चार करण्याची हिंमत दाखवली होती. संघाने उचललेला अयोध्येतील बाबरी मशीद व रामजन्मभूमीचा मुद्दाही अडवाणींनी हिरीरीने उचलला होता. त्यातूनच लोकभावना भाजपाकडे आकर्षित झाली होती. मात्र दुसरीकडे त्याचाच परिणाम म्हणून अन्य पक्ष सेक्युलर हट्टापायी भाजपाशी हातमिळवणी करायला राजी नव्हते. तरीही संसद व रस्त्यावर चालू असलेल्या आक्रमक राजकारणाने भाजपाची जनमानसातील लोकप्रियता वाढतच गेली. जितके अन्य सेक्युलर पक्ष भाजपाला वाळीत टाकत होते, तेवढी याची लोकप्रियता व ताकद वाढतच होती. त्याला फ़क्त हिंदुत्व एवढेच कारण नव्हते. तर सत्तालंपट नसलेला पक्ष ही प्रतिमा अधिक उपयोगी ठरली होती.  

   त्याचेच पर्तिबिंब मग मतदानातही पडलेले दिसू लागले. 1996 साली संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा लोकसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणुन निवडून आला. भले त्याला स्वत:चे बहुमत मिळवता आलेले नसेल. पण प्रथमच त्याने कॉग्रेसला मागे टाकून पहिला मान मिळवला होता. इथून मग भाजपाची नैतिक घसरण सुरू झाली. कारण त्याला सत्तेचे वेध लागले. नुसती सत्ता मिळवायची नाही, तर सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते करायला भाजपा हळुहळू तयार होऊ लागला. 1996 साली सर्वात मोठा पक्ष म्हणून त्याने 13 दिवसाचे सरकारही बनवले. पण त्याला बहुमताचा पाठींबा मिळवता आला नाही. मग वाजपेयी यांनी राजिनामा दिला आणि कॉग्रेससह तमाम बिगर भाजपा पक्षांच्या पाठींब्याने देवेगौडा पंतप्रधान झाले. ते किंवा त्यांच्या नंतरचे गुजराल सरकार कॉग्रेस पाठींब्याने बनले असले तरी कॉग्रेसने ते चालू दिले नाही आणि अखेर पुन्हा मध्यावधी निवडणुका घेण्याची वेळ आली. त्यात पुन्हा भाजपाच सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. एव्हाना सेक्युलर थोतांडाला कंटाळलेले काही प्रादेशिक पक्ष, भाजपाच्या गोटात आलेले होते. त्यांची मोट बांधून भाजपाने मग प्रथमच बहुमताचे आघाडी सरकार बनवले. त्यातही दुफ़ळी माजवून राजकारणात नव्या असलेल्या सोनियांनी सरकार पाडले आणि वर्षभरात आलेल्या मध्यावधी निवडणुकीत पुन्हा भाजपानेच सर्वात मोठा पक्ष होण्याची बाजी मारली. सत्ता पाच वर्षे टिकवूनही दाखवली. पण या सत्तेच्या फ़ेर्‍यात फ़सलेल्या भाजपाची जनमानसातली प्रतिमा ढासळत गेली. बंगारू लक्ष्मण त्याचेच प्रतिक आहे.  

   बंगारू लक्ष्मण यांनी जे केले त्याला ते जबाबदार आहेतच. कायदा त्यांनाच जबाबदार धरून दोषी ठरवणार. पण पक्षात एक प्रामाणिकपणा व शिस्त असती तर बंगारू हा माणुस पक्षाध्यक्ष पदावर बसून असे कृत्य करू धजावला असता काय? त्याची तेवढी हिंमत झाली कारण सत्तेवर जाऊन बसलेल्या पक्षाच्या जुन्याजाणत्या म्होरक्यांनी सत्तेचे गणित जमवताना पावित्र्याला सोडचिठ्ठी दिली होती. कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवणे व टिकवणे योग्य असेल तर पैसेही वाटेल त्या मार्गाने मिळवणे वा मागणे बंगारूला अयोग्य वाटले नाही. म्हणूनच कायदा जरी त्या एकट्याला गुन्हेगार मानत असला तरी नैतिक दृष्टीने पक्षाचे श्रेष्ठी व वरिष्ठ नेतेही तेवढेच दोषी आहेत. हे नेते म्हणजेन भाजपाचे राम सत्तेसाठी उंडारले नसते तर लक्ष्मण कशाला बहकला असता? (क्रमश:)
भाग   ( २६१ )    ११/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा