सोमवार, २८ मे, २०१२

कायद्यापेक्षा नितीमुल्ये प्रभावी हत्यारे असतात


    कालचा लेख वाचला त्यापैकी काहीजणांना वाटेल, की त्या अपराधी डॉ. सुदाम मुंडे यांचे मी समर्थन करतो आहे की काय? पण तसे अजिबात नाही. कुठल्याही गंभीर विषय वा गंभीर आजाराचे मुळ शोधल्याशिवाय त्यावर थातुरमातुर उपाय शोधले; मग उपायापेक्षा अपायच अधिक होतो असाच जगाचा अनुभव आहे. आणि मुंडे प्रकरण असो की स्त्रीभृणूहत्या हा विषय असो, त्यात जितक्या उथळपणाने गदारोळ उठवला जातो आहे, ती मला अधिक मोठी समस्या वाटते. कारण या समस्येची जननीच मुळात एका सोप्या उपायात सामावलेली आहे. आमिरखानच्या ज्या सत्यमेव जयते कार्यक्रमाचे पहिल्याच भागानंतर वाहिन्यावरून प्रचंड कौतुक झाले. तो भाग किती लोकांनी गंभीरपणे पाहिला, याचीच मला शंका आहे. गंभीरपणे म्हणजे बारकाईने बघितला व समजून घेतला; असा माझा प्रश्न आहे. विशेषत: ज्यांनी तो पहिला भाग संपताच आमिरखानवर स्तुतीसुमने उधळण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला आणि स्त्रीभृणूहत्या या विषयावर कल्लोळ सुरू केला; त्यापैकी कितीजणांनी तो भाग काळजीपुर्वक बघितला, याची मला दाट शंका आहे. कारण आमिर काय म्हणतो, दाखवतो; त्याकडे त्यांचे लक्षच नसावे. लक्ष असते तर त्याच लोकांनी डॉ. मुंडे यांच्या पापकर्मावर बोलताना उथळपणा केलाच नसता. आज त्या मुंडे यांना सत्ताधारी वा राजकारणी संरक्षण देतात, असा आरोप होतो आहे. काय मोठा गौप्यस्फ़ोट होता त्या आमिरच्या मालिकेत? कुठले सत्य त्याने सांगितले होते?

   आज आपण मुंडे यांच्याकडे गर्भपात करून तुंबडी भरणारे म्हणून बघतो आहोत. त्यांच्यावर आरोप करतो आहोत. पण अशा स्त्रीहत्याकांडाची सुरूवात कुठून झाली, त्याचा गौप्यस्फ़ोट आमिरच्या कार्यक्रमात झाला होता. मात्र तेवढीच माहिती कोणी गंभीरपणे लक्षात घेतली नाही. त्यात सहभागी झालेल्या एका जुन्या अधिकारी व्यक्तीने गर्भपात व लिंगचाचणी कधीपासून सुरू झाली व ते प्रकरण कसे देशाच्या कानाकोपर्‍यात जाउन पोहोचले; त्याचा इतिहास कथन केला होता. १९७५ च्या सुमारास किंवा नंतर जेव्हा भारताच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी भारत सरकारचे आरोग्य खाते उपाय शोधत होते; तेव्हा नावडत्या गर्भाला काढून टाकण्याला कायदेशीर मान्यता देण्याचे धोरण स्विकारण्यात आले. त्याच दरम्यान सोनोग्राफ़ी करणारी यंत्रे विकसित झाली होती. त्यामुळे ज्यांना गर्भातील अर्भकाचे लिंग कळू शकत होते, त्यांनी नको असलेला गर्भ म्हणजे मुलगी नको असेल, तर गर्भपात करावा याला सरकारी पातळीवर प्रोत्साहन दिले जात होते, असे त्या निवृत्त अधिकार्‍याने सांगितले. म्हणजेच आज ज्याला आपण स्त्रीभृणूहत्या म्हणतो आहोत, त्याला मुळातच सरकारनेच प्रोत्साहन दिले आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा तो सोपा उपाय शोधला गेला, त्यातून हा नवा मानसिक रोग उद्भवला आहे. एका बाजूला सरकारचे प्रोसाहन व दुसरीकडे सोनोग्राफ़ी यंत्रांचे उत्पादक; यांनी खप वाढवण्यासाठी लहानसहान डॉक्टर लोकांनाही त्यात ओढले. तिथून ही विकृत मनोवृत्ती समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन पोहोचली. त्यातून स्त्रीयांची लोकसंख्येतील घट नजरेत येईपर्यंत कोणी त्यावर बोलत नव्हता. सरकार तर त्यावर अवाक्षर बोलत नव्हते. तो कालखंड लक्षात घेतला, तर बहुधा तेव्हा हे सुदाम मुंडे वैद्यकीय कॉलेजात भरतीसुद्धा झालेले नसतील. कदाचित तेव्हा ते शालेय विद्यार्थी सुद्धा असतील. मग त्यांना किंवा त्यांच्यासारख्या काही हजारबाराशे डॉक्टरांना खलनायक ठरवून उपाय सापडणार आहे काय?

   तेव्हा परिणामांचा विचारही न करता लोकसंख्या आटोक्यात राखण्याचा मार्ग म्हणुन मुलींचे गर्भ जन्मापुर्वीच मारून टाकण्याचा जो सोपा उपाय योजला गेला किंवा त्याला अगदी सरकारी पातळीवरून गुपचुप प्रोत्साहन देण्यात आले; त्याचे दुष्परिणाम आज आपला समाज भोगतो आहे. गर्भपाताला प्रोत्साहन देताना मुलींचे गर्भ पाडणे, हा लोकसंख्या नियंत्रणाचा सोपा उपाय होता. कारण त्याला लोकांकडून चटकन प्रतिसाद मिळत होता. पण त्यातून आपण चुकीच्या समजुती व विकृत कल्पनेला खतपाणी घालत आहोत; याचे भान कोणाला होते काय? एका नव्या रोगाला आपण आमंत्रण देतो आहोत, याची साधी जाणीव कोणाला होती काय? नव्हती, म्हणून तर आज त्याचाच एक भलथोरला महाकाय राक्षस तयार झाला आहे. आमिरच्या कार्यक्रमात या गौप्यस्फ़ोटाला अधिक महत्व होते. कारण माझ्यासारख्या चौकस पत्रकारालाही, ती माहिती प्रथमच कळू शकली. त्याबद्दल मी सत्यमेव जयते व आमिरखानचा आभारी आहे. खरे तर त्यावर गदारोळ उठला पाहिजे. पण तिकडे कोणाचेच लक्ष नाही. सगळे आमिरचे कौतुक करण्यात रममाण झाले आहेत. तेवढेच नाही तर आता अशा स्त्रीभृणूहत्या करणार्‍यांना शिक्षा कशी होईल यावरच तावातावाने बोलले जात आहे. पण मुलगीच नको, अशी जी विकृत मानसिकता आहे, त्याच्या विरोधात जनमानस प्रबुद्ध करण्याबद्दल कोणीच बोलत नाही. बोलले नाही. डॉक्टर मुंडे यांना खलनायक म्हणून रंगवण्यात सर्वांना उत्साह आहे. पण आपल्यातलेच निम्मे नव्हे त्यापेक्षा अधिक लोक मुलीपेक्षा मुलगा हवा, अशा मनोवृत्तीचे आहेत, त्यांच्या विकृतीबद्दल कोण बोलतो आहे? ते अवघड काम आहे ना?

   पत्रकार असोत किंवा वाहिन्या असोत, त्यांना नुसती खळबळ उडवून द्यायची आहे. आमिर भले म्हणो, की हंगामा खडा करना मेरा मक्सद नही, पण त्याचे ढोल पिटणार्‍यांना तर तेच करायचे आहे. मग त्यासाठी आमिरने उपस्थित केलेल्या विषयाचे गांभिर्य नष्ट झाले तरी काय बिघडते? मुली मरोत की मारल्या जावोत, सवाल टिआरपीचा आहे. स्त्रीभृणूहत्या हे फ़क्त निमित्त आहे. ज्या काळात गर्भपात व सोनोग्राफ़ी करून लोकसंख्या नियंत्रित करण्याचे असे चुकीचे धोरण अवलंबिले गेले, त्याही काळात हेच चालू होते. उपाय कुठला, मार्ग कुठला त्याची कुणाला फ़िकीर नव्हती. लोकसंख्येला आळा घाला, असाच ओरडा सुरू होता. त्यावरूनच गदारोळ केला जात होता. हम दो हमारे दो, अशी तेव्हा कुटुंब नियोजनाची घोषणा होती. मग हम दो हमारा एक, अशी घोषणा बदलली. त्यातून लक्षात येईल, की लोकसंख्येला आवर घालणे यासाठी सरकारवर सतत दडपण आणले जात होते. त्याचाच दुष्परिणाम मग स्त्रीगर्भ उदरातच मारून टाकण्याच्या पर्यायाकडे घेऊन गेला. कुठलाही विचार न करता घाईघाईने जेव्हा निर्णय घेतला जातो, तेव्हा तो घेणाराच नव्हेतर त्यासाठी दडपण आणणाराही तेवढाच दोषी असतो. ज्यावेळी अशा गर्भपाताला मोकळीक देण्याचे धोरण पत्करले गेले, तेव्हा त्याच्या दुरगामी दुष्परिणामांचा विचार झाला नव्हता. ना सरकार पातळीवर झाला, ना अभ्यासक पातळीवर झाला. त्यात सरकारला आज दोषी ठरवता येईल. पण तात्कालीन अभ्यासक जाणकारांचे काय? सरसकट गर्भ मारण्याची मोकळीक कुठल्या थराला जाईल; याची शंकाही त्यांच्या मनाला शिवली नसेल का? की त्यांनी त्याकडे गंभीरपणे बघितलेच नाही?

   कुणाला तरी दोषी ठरवणे, खलनायक रंगवणे म्हणूनच मला घातक वाटते. कारण त्यातून विषयातले गांभिर्य संपुन जाते. जणु त्या खलनायकाला संपवले, मग समस्या संपली; अशी भाबडी समजूत समाजात तयार होते व समस्या मात्र जशीच्या तशी कायम रहाते. कदाचित तिच समस्या अधिकच उग्र रुप धारण करते. त्या काळात म्हणजे चार दशकांपुर्वी गर्भपात करणे म्हणजे पाप, अशीच समाजाची समजूत होती. कोणी राजरोस उघडपणे गर्भपात करून घेत नसे. लाज व पाप या दोन वेसणी त्याला कारणीभूत होत्या. त्याच सैल सोडल्या गेल्यास ही समस्या पाशवी रुप धारण करील, हे समाजचिंतकांच्या तरी लक्षात यायला हवे होते ना? कायदा नव्हे इतकी लाज व पापपुण्य ही संकल्पना माणसातल्या पशूला काबूत ठेवत असते. त्याचे भान ठेवले तर यासारख्या समस्यांवरचे उपाय सापडू शकतात व समस्येवर नियंत्रण मिळवणे शक्य असते. गर्भपात हे पाप नाही व त्यात घातक अपायकारक काहीच नाही, असे जे प्रोत्साहन लोकसंख्या नियंत्रणासाठी देण्यात आले, त्यातून त्याला प्रतिष्ठा मिळाली. मग त्यातूनच नको असलेला गर्भ म्हणजे मुलगी मारून टाकणे जणू प्रतिष्ठीत होऊन गेले. त्यासाठी ग्राहक तयार झाला आणि तशी सेवा पुरवणारे व्यापारी उदयास आले. डॉ. सुदाम मुंडे त्यापैकीच एक आहेत, हे सत्य नाकारून सत्यमेव जयते म्हणता येईल काय? आपणच त्यांना जन्म दिला आहे व त्यांची जोपासना केली आहे हे नाकारणे शक्य आहे काय?  (क्रमश:)
भाग   ( २७८ )    २८/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा