सोमवार, ७ मे, २०१२

मैदानातला सचिन पटावरचे प्यादे झाला का?


   सचिन तेंडूलकरला खासदार करण्यामागची कॉग्रेसची खेळी ओळखायची असेल तर आधी बुद्धीबळाच्या राजकीय पटावरचे पासष्टावे घर समजून घ्यावे लागेल. खर्‍या बुद्धीबळाच्या पटावर तसे पासष्टावे घर नसतेच. पण तसे घर असते याचा शोध सर्वप्रथम मराठी भाषेतले महान आधुनिक विचारवंत व संपादक कुमार केतकर यांनी सोळा वर्षापुर्वी लावला. तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेवर होते आणि अण्णा हजारे यांनी त्या सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फ़ुंकले होते. मग आज जसे मनमोहन सरकार किंवा सोनिया गांधींची कॉग्रेस अण्णांच्या विरोधात वागते आहे, तसेच सेना भाजपाचे डावपेच सुरू झाले होते. अर्थात तेव्हा अण्णांची लोकप्रियता आजच्या इतकी प्रचंड व देशव्यापी अजिबात नव्हती. पण सरकार हिंदुत्ववाद्यांचे असल्याने त्याच अण्णांना डोक्यावर आणि खांद्यावर घेऊन तमाम सेक्युलर पक्ष व संपादक नाचत होते. मग सेक्युलर विचारवंतांचे शंकराचार्य कुमारशास्त्री केतकर मागे कसे असतील? त्यांनीही अण्णांचे जोरदार उदात्तीकरण तेव्हा चालवले होते. अण्णांची जी थोरवी अण्णांनाही कधी कळली नाही, ती केतकर मोठ्या प्रयत्नपुर्वक जगासमोर आणत होते. अगदी निर्मलबाबा किंवा अनिरुद्ध बापू यांची महत्ता त्यांचा असीम भक्त सांगू शकणार नाही, तेवढे अण्णांचे दैवी साक्षात्कारी रूप केतकर महाराष्ट्र टाईम्सच्या अग्रलेखातून वर्णन करत होते. त्याच ओघात केतकरांनी पासष्टाव्या घराचा वैज्ञानिक शोध लावला होता. त्यात ते म्हणतात,

   अण्णा हजारे यांनी युपीए (महाराष्ट्र) सरकारला दिलेल्या आव्हानाचा आशय आता पारंपारिक राजकारणाच्या सीमा आरपार भेदून पुढे गेला आहे. नेमकी हीच गोष्ट पंतप्रधान मनमोहन सिंग (मुख्यमंत्री मनोहर जोशी) आणि स्वत:ला देशाचे (राज्याचे) कर्तुमकर्तुम समजणार्‍या गांधी (ठाकरे) कुटुंबियांच्या लक्षात आलेली दिसत नाही. सरकारच्या वतीने जे प्रस्ताव पंतप्रधान (मुख्यमंत्री) मांडत आहेत ते ते सर्व दैनंदिन डावपेचाच्या राजकारणात बसणारे आहेत. अण्णा हजारे यांना समाजाच्या सर्व स्तरातून जो व्यापक पाठींबा मिळतो आहे तो पहाता असल्या चलाख खेळ्या खेळून पंतप्रधान (मुख्यमंत्री) व युपीए (महाराष्ट) सरकार अण्णांवर मात करू शकणार नाही. भ्रष्टाचाराच्या गटारात आकंठ बुडालेल्या युपीए (युती) सरकारने आणि कॉग्रेस व मित्रपक्षांच्या ( शिवसेना व भारतिय जनता पक्षाच्या) पुढार्‍यांनी हे लक्षात घ्यायची वेळ आली आहे की राजकीय बुद्धीबळपटाच्या चौसष्ट घरांच्या बाहेर अण्णांनी स्वत:चे पासष्टावे घर केले आहे. त्याला शह दिला जाऊ शकत नाही. त्या पासष्टाव्या घरात बसलेल्या राजाला शह देन्याच्या फ़ंदात पंतप्रधानांनी (मुख्यमंत्र्यांनी) पडू नये. ते स्थान अढळ आहे.  

   केतकरांनी २८ नोव्हेंबर १९९६ रोजी लावलेला हा शोध आहे. उपरोक्त परिच्छेदामध्ये जे शब्द कंसात आले आहेत ते केतकर यांच्या मुळ लेखातले आहेत. आजही केतकरांचे शब्द किती खरे व नेमके आहेत, त्याची वाचकाला प्रचिती यावी म्हणुन मी मुळचे शब्द कंसात टाकून, आजच्या घटनाक्रमाला शोभतील असे मोजके शब्द बदलले आहेत. कशी मजा आहे बघा. तेव्हा अण्णांच्या मागे जनतेचा आजच्या इतका भक्कम पाठींबा नव्हता. तर सेना भाजपा युतीच्या विरोधात नामोहरम झालेल्या मुठभर डाव्या, समाजवादी पक्षाचे चळवळ्ये व सेक्युलर पत्रकारच उभे होते. बाकी जनता अण्णांच्या मागे आलीच नव्हती. आज जे समाजवादी अण्णांच्या नावाने लाखोली वहात आहेत. त्याना समाजवादाचे धडे शिकवणारे ग. प्र. प्रधान मास्तर तेव्हा पाटीदफ़्तर घेऊन अण्णांकडे क्रांतीची बाराखडी लिहायला बसले होते. तेवढेच नाही तर त्यांनी अण्णांच्या नेतृत्वाखाली क्रांती करण्याची गर्जना "साधना" साप्ताहिकात लेख लिहून के्ली होती. आपले कुमारशास्त्री केतकर त्याच सेक्युलर पंथातले असल्याने त्यांनी अण्णांमध्ये साक्षात्कारी महात्मा शोधला तर नवल कुठले? पत्रकारीता बाजूला ठेवून मग केतकर बिल्डर डेव्हलपर झाले आणि त्यांनी टाईम्सच्या दगडी बिल्डींगचे दगड चिरे उचकटून, अण्णांसाठी पासष्टावे घर बांधून काढले. तेवढेच नाही तर कॉग्रेसचा बुरूज महाराष्ट्रात ढासळून टाकणार्‍या सेना भाजपाला त्यांनी पासष्टाव्या घराला धक्का  लावाल तरी भस्मसात व्हाल, असा शापही अग्रलेखाच्या अखेरीस दिला होता.

   असो. आपल्याला केतकरांच्या शापवाणीशी कर्तव्य नसून त्यांनी बुद्धीबळाच्या पटावर अण्णांसाठी जे पासष्टावे घर बांधले, त्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव चटईक्षेत्रासाठी कोणाकडून बोगस सह्या मिळवल्या, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य आहे. मला तर कधीकधी वाटते, की केतकरांनी पटावरचे हे अवैध पासष्टावे घर बांधण्याची हिंमत केली नसती, तर आदर्श सोसायटीची भानगड झालीच नसती. केतकर पडले थोर अभ्यासक व विचारवंत. त्यांच्यासारखा माणुस जर इवल्या बुद्धिबळ पटावर सर्व लाजलज्जा निर्बंध व धरबंध सोडून पासष्टावे घर बांधत असेल तर आपण ३६ मजली अवैध बांधकामाची आदर्श सोसायटी उभारयाला का घाबरावे; असेच अशोक चव्हाण, गिडवाणी, रामानंद तिवारी यांना वाटणार ना? तर मुद्दा असा, की तेव्हा केतकरांनी अण्णांचे जे वर्णन केले होते ती निव्वळ थापेबाजी होती. युतीसमोर तमाम सेक्युलर राजकारण निष्प्रभ झाले होते, तेव्हा अण्णांनी युती विरोधात तोफ़ डागली तरी अण्णांना लोकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. मग केतकर अण्णा नावाचा फ़ुगा फ़ुगवून देखावा मात्र निर्माण करत होते. त्यांचे दुर्दैव असे, की अण्णांबद्दल त्यांनी लिहिलेले शब्द पंधरा वर्षांनी खरे ठरले. पण तेव्हा अण्णा केतकरांच्या लाडक्या कॉग्रेस विरोधात लढायला उभे ठाकले होते. जेव्हा केतकर म्हणत व लिहित होते, तेव्हा अण्णा पटावरचा राजाही नव्हते, की त्यांनी स्वत:चे कुठले घर ही पटावर निर्माण केले नव्हते. मात्र आज परिस्थिती साफ़ बदलली आहे. अण्णा खरोखरच राजकीय पटावर स्वत:चे पासष्टावे घर बनवून त्यात सुरक्षित बसले आहेत आणि त्यांना शह देणे कॉग्रेस वा युपीए सरकारच्या आवाक्यात राहिलेले नाही. त्यामुळेच अण्णांचे रामलिला मैदानावरील उपोषण सुरू होण्यापुर्वी केतकरांनी आपलाच पंधरा वर्षापुर्वी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दिलेला सल्ला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गांधी कुटुंबियांना द्यायला हवा होता.

   केतकरांनी तो सल्ला दिला असता आणि त्याप्रमाणे कॉग्रेस वागली असती, तर आज कॉग्रेसवर सचिन तेंडूलकरला खासदार करण्याची वेळ नक्कीच आली नसती. पण केतकरांनी वेळीच तो सल्ला दिला नाही आणि ज्या चुका महागात पडतील असे केतकर जोशींना सांगत होते, त्याच चुका कॉग्रेसने केल्या व त्यांना महागात पडल्या आहेत. सोनिया, चिदंबरम, सिब्बल, मनमोहन सिंग पासष्टाव्या घरात असताना अण्णांना शह देण्याचा फ़ंदात पडले आणि अकारण तोंडघशी पडले. त्यांनी राजकारणातल्या जुन्याच नेहमीच्या चलाख खेळ्या करून अण्णांना शह देण्याचा मुर्खपणा केला. त्यात नुसती कॉग्रेसच तोंडघशी पडली नाही, तर त्यात राहूल, सोनिया व प्रियंका हे कॉग्रेसचे मोठे व महत्वाचे मोहरेही निकामी होऊन गेले. त्यामुळेच आता चौसष्ट घरातले डावपेच व नेहमीच्या राजकीय मोहरे प्याद्यांना बाजूला ठेवून, कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पासष्टाव्या घरापर्यंत चेंडू भिरकावून देऊ शकेल, असा मास्टरब्लास्टर कामाला जुंपण्याची नवी खेळी केलेली असावी. की केतकरांनी आपले हे जुने तत्वज्ञान व रणनिती सोनियांना जाऊन समजावली आहे? अण्णांशी थेट लढाईच्या मैदानात उतरणारा नव्हे, तर अण्णांच्या लोकप्रियतेला शह देऊ शकणारा मोहरा आपल्या गोटात हवा; ही रणनिती केतकरांची असू शकते. कारण तीच चौसष्ट घ्ररांच्या पलिकडे जाऊन राजकारण खेळणारी निती वाटते.  

   सचिनच्या कुठल्याही जाहिराती तुम्ही बघितल्या आहेत काय? त्यात तो कधी कुठला माल खरेदी करा असे सांगत नाही. त्या मालाची गुणवत्ता सांगत नाही. तो आपण त्या मालाचे वा साधनाचे उपभोक्ता आहोत असे भासवत असतो. आपल्याला त्या सेवा किंवा उत्पदनावर विश्वास आहे असे भासवत असतो. आणि त्याला खासदार करताना तीच जाहिरात अपेक्षित आहे. आपण सोनिया गांधी यांच्या आग्रहास्तव राज्यसभेची नेमणूक मान्य केली असे त्याच्याकडून सुचवले जावे, अशी ही खेळी आहे. सचिन कॉग्रेसच्या जवळचा आहे, तो सोनिया व कॉग्रेसला मानतो, असा आभास त्यातून निर्माण करायचा आहे. त्याने अण्णांच्या विरोधात बोलण्याची गरज नाही. त्याने कशाबद्दलही बोलण्याची आवश्यकता नाही. तो कुठल्या बाजूला उभा आहे, त्यातून एक संदेश जात असतो. तेवढीच त्याच्यापासून अपेक्षा आहे. तोच त्याला राज्यसभेत नेमण्यामागचा उद्देश व हेतू आहे. तो हेतू कितपत सफ़ल होऊ शकेल? त्यामुळे पासष्टाव्या घरातल्या अण्णांना शह दिला जाऊ शकतो का?   (क्रमश:)
 भाग   ( २५८ )   ८/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा