मंगळवार, १ मे, २०१२

मी उगाच लढवय्या असल्याचा आव आणणार नाही


   गेल्या स्वातंत्र्यदिनाच्या दुसर्‍या दिवसापासून अण्णांचे जनलोकपाल आंदोलन सुरू झाले. तेव्हापासून मी देशातल्या एकूण राजकीय घडामोडी व राजाकारण यांचा या लेखमालेतून उहापोह करतो आहे. त्यावर कोणा राजकीय पक्षाने वा ज्यांच्यावर मी कडवी टिका केली त्या पत्रकारांनी कुठली उघड प्रतिक्रीया द्यायचे टाळले आहे. माझी त्याबद्दल तक्रार नाही. कारण जेव्हा उत्तर नसते तेव्हा मौन हेच साधन होत असते. पण याच काळात मला ज्या वाचकांच्या प्रतिक्रीया मिळत राहिलेल्या आहेत त्या कमालीच्या उत्साहवर्धक आहेत. किंबहूना त्यामुळे आजची एकूणच माध्यमे कशी सामान्य माणसापासून दुरावली आहेत त्याचाही थेट पुरावा मला मिळू शकला. अण्णांचे उपोषण १६ ऑगस्टपासून सुरू व्हायचे होते, तर माझी ही लेखमाला स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी १४ ऑगस्ट रोजी सुरू झाली. त्यावर येणार्‍या फ़ोनवरील प्रतिक्रीया उत्तेजन देणार्‍य़ा होत्याच. पण मग सहज म्हणुन मी २४ ऑगस्ट २०११ पासून येणारे फ़ोन टिपून ठेवायचा प्रयास केला. जमले तेवढे लिहून ठेवले. कोणाचा विश्वास बसणार नाही.  पण गेल्या आठ महिन्यात मी जवळपास सात हजार फ़ोन क्रमांकाची नोंद करून ठेवली आहे. त्यात एसएमएसची भर टाकली तर संपर्क साधणार्‍या वाचकांची संख्या नऊ हजारांच्या पुढे जाते. यातून मी लॅंडलाईनवरून आलेल्या फ़ोनचा समावेश केलेला नाही. कारण पुढे कधी वाटले तर या वाचकांना एसएमएस पाठवता यावा, म्हणूनच फ़क्त मोबाईल क्रमांकाचीच नोंद केली आहे. यात सोडलेले क्रमांक धरले तर दहा हजाराच्या आसपास वाचकांनी आठ महिन्यात मला आपल्या थेट प्रतिक्रीया दिल्या. त्यात मुठभर म्हणजे पंधरावीस रागावलेले वाचकसुद्धा आहेत. कदाचीत त्यांच्या व्यवहारिक बांधिलकीला माझ्या लिखाणातून इजा पोहोचल्याने ते विचलित झाले असतील. एकुण वाचक सामान्य नागरिक आहे आणि त्यातला बहुतांशी सहा्मत  झालेला वाचक आहे. नुसता सहमत झालेलाच तो वाचक नाही तर त्याला मी त्याच्याच मनातले लिहितोय असेही वाटते. आजच्या माध्यमातून वा पत्रकारितेतून आपला दडपला जाणारा आवाज कुणीतरी उठवतोय, अशीच यांची धारणा आहे. मग मी वाहिन्यांवर केलेली टिका असो की कुणा पत्रकार संपादकाचे नाव घेऊन घेतलेली हजेरी असो.

   एका बाजूला लोकांना अधिक पाने कमी किंमतीत देण्याची स्पर्धा चालू असताना जो वाचक खिशाला चाट देऊन वा पदरमोड करून लेखकाला प्रतिक्रीया देण्यासाठी दोनपाच रुपये फ़ोनवर खर्च करतो, तो मला मोलाचा वाचक वाटतो. चोखंदळ जागरुक वाचक वाटतो. त्या फ़ोन करणार्‍यात एका बाजूला सामान्य शेतकरी, कर्मचारी, कष्टकरी, गृहीणी आहेत, तसेच कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, सरकारी कर्मचारी, सुशिक्षित मध्यमवर्गियसुद्धा आहेत. वकील, डॉक्टर, इंजिनीयर, व्यापारी असे सुखवस्तू आहेत, तसेच रिक्षावाला एस्टी कंडक्टर ड्रायव्हरसुद्धा आहेत. उलततपासणी या स्तंभाकडे ते कसे आकर्षित झाले, त्याचे किस्सेही त्यांनी अगत्याने सांगितले आहेत. हा प्रतिसाद पाहिल्यावर लक्षात येते, की मराठी वाचक आजही चोखंदळ आहे आणि त्याला कमी किंमतीतले वर्तमानपत्र नको आहे, वा वाचनाततली स्वस्ताई नको आहे. तर त्याला किंमत अधिक असली तरी वाचनीय नियतकालिके हवी आहेत. असे काही सापडले तर तो त्यावर खुप फ़िदा होतो आणि त्यावर प्रतिसाद देण्यासाठीही पदरमोड करतो. त्याला स्वस्तातली भेसळ वा कचरा नको आहे. तर त्याची बौद्धिक भूक भागवणारे वैचारिक खाद्य त्याला हवे आहे. त्यात महागाई झाली तरी तो सोसायला तयार आहे. मग त्याची बौद्धिक उपासमार किती काळ चालणार असा प्रश्न पडतो.

   वाचकाच्या अपेक्षाही असतात. मी सडेतोड लिहितो वा माझे विचार विश्लेषण परखड असते हे ऐकायला मलाही बरे वाटते. पण त्याचवेळी अन्य वृत्तपत्रे परखड, नि:पक्षपाती व सडेतोड राहिली नाहीत, असा जो अर्थ या वाचकांच्या प्रतिसादातून अभिप्रेत असतो, त्याचे मला खुप दु:ख होते. जेव्हा वाचकाला असे काही परखड वाचायला मिळते; तेव्हा त्याला त्याला भेडसावणार्‍या समस्या प्रश्न वा अडचणींवर मीच उलटतपासणीमधून लिहावे असेही वाटू लागते. त्यातून आपल्याला न्याय मिळू शकेल ही त्याची भाबडी अपेक्षा असते. अशा वाचकाचा माझ्या लिखाणावरील विश्वास व श्रद्धा भारावून सोडणारी असली, तरी त्यात तथ्य नसते. कारण आता अशा लिखाणामुळे हादरून जाणारे सत्ताधारी व राजकारणी राहिलेले नाहीत. आपल्याविषयी काय छापून आले वा समाजात बोलले जाते, याची फ़िकीर बाळगणारे लोक सार्वजनिक जीवनात फ़ारसे उरलेले नाहीत. लोक काय म्हणतील, म्हणतात; त्याला वचकून वागणारे जवळपास दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळेच मी कितीही कठोर भाषेत सडेतोड लिहित असलो, तरी त्याची दखल घेऊन अन्यायाचे परिमार्जन होईल ही माझी अजिबात अपेक्षा नाही. ज्या समाजात स्वत:ला सभ्य, प्रतिष्ठीत म्हणवणारेच गेंड्याच्या कातडीचे व संवेदनाशून्य झालेले आहेत, त्या समाजातील राजकीय नेते संवेदनाशील असावेत, ही अपेक्षा बाळगता येईल काय? माध्यमातल्या मान्यवरांचा मी नावे घेऊन उल्लेख करतो, त्यांची पापे व गुन्हे चव्हाट्य़ावर आणतो. त्यांनाही कधी आपल्या खरेपणाची साक्ष द्यावीशी वाटली काय? नसेल तर अशा माध्यमात काय छापून आले वा प्रसारित केले गेले, त्याला सत्ताधीश, राजकारणी वा धनवंत कशाला वचकून असतील?

   इतकी वर्तमानपत्रे आहेत. त्यांच्या लाखो करोडो प्रती विकल्या जातात. अनेक वाहिन्या आहेत, त्यावरून कल्लोळ चालतो. त्याची किती दखल घेतली जाते? कोणी तरी आपल्या बातमीचा प्रभाव पडला आणि अन्याय दुर झाला असा देखावा निर्माण करतात, हे मी सुद्धा पहातो. पण ती शुद्ध बनवेगिरी असते. लाखात एकाला न्याय मिळतो आणि उरलेले नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अन्यायग्रस्त तसेच खितपत पडलेले असतात, त्याला प्रभाव वा इंपॅक्ट म्हणत नाहीत. तो अपवाद असतो. अपवादाने नियम सिद्ध होतो. म्हणजेच अशा इंपॅक्टने काम झाले असेल तर तो अपवाद असतो व काम होत नाही, हाच नियम असतो. कुणाला आधारकार्ड वा रेशनकार्ड, वाहिनीने वाचा फ़ोडल्यावर मिळाले असेल. पण तशा लाखो लोकांचे काय? शरीराला पोखरणार्‍या कॅन्सरच्या लाखो विषाणूंपैकी एकाचा बिमोड केला, तर त्या कॅन्सरग्रस्त रुग्णावर कुठला इंपॅक्ट झाला म्हणायचा? तो त्या जीवघेण्या रोगबाधेपासून मुक्त होण्याची आपेक्षा बाळगता येते काय? आशा असते काय? नसेल तर ही इंपॅक्टची भाषा शुद्ध दिशाभूल नाही काय? मग माध्यमे लोकांना जागृत करतात की त्यांची दिशाभूल करतात? की त्यांना आपल्या अशा देखाव्यातून लोकांची फ़सवणूकच करायची असते?  चिंता करू नका, काम होते, होऊ शकते, कळ काढा, व्यवस्था मोडलेली नाही. असे भासवणे ही फ़सगत नाही काय? मी अशा भ्रमात नाही. म्हणुनच किती ही सडेतोड लिहित असलो, माझी भाषा परखड असली तरी त्यातून लोकांच्या समस्या संपतील असा भाबडेपणा माझ्या डोक्यात नाही. मी तशा भाबड्या आशेवर वाचकाला ठेवू इच्छित नाही.

   अमुक एका विषयावर बातमी प्रसिद्ध झाली. गदा्रोळ उठवला गेला, मग त्यावर उपाय केला जातो, असे दिवस आता राहिलेले नाहीत. कारण तेवढे संवेदनाशील राज्यकर्ते आज राहिलेले नाहीत. तेवढे संवेदनाशील अधिकारी, कर्मचारी आज प्रशासनात उरलेले नाहीत. उलट तुमच्या प्रत्येक अगतिकता, समस्या. अडचणी, प्रश्न, दुखणे याचा फ़ायदा उठवून, तुमची आमची लांडगेतोड करू बघणारी माणसेच आता सार्वजनिक जीवनात वावरत असतात. सार्वजनिक जीवन, शासकीय यंत्रणा, अधिकार बाळगणारी मंडळी, राजकीय नेते व कार्यकर्ते, तुमच्या माझ्याकडे सावज म्हणून बघत असतात. मग अशा शिकारी श्वापदाकडून आपल्याला न्याय मिळेल अशी आशा बाळगायला जागा आहे काय? प्रत्येकाने या वास्तवाचा गंभीरपणे विचार करण्याची वे्ळ आता आलेली आहे. कारण अशा माध्यमांच्या खांद्यावर बसून लोकांचे प्रश्न सोडवले जात नसतात. माध्यमे ही चळवळ नसते. ते आंदोलन नसते. सामान्य माणसाने या भ्रमातून बाहेर पडण्याची गरज आहे. जनमानस जागवणे ही माध्यमांची मर्यादा आहे. पुढले काम जनाआंदोलनाचे असते. लोकांना भेडसावणारे प्रश्न व समस्या त्यातूनच सुटू शकतील, निकाली लागू शकतील. कुणाच्या सडेतोड लिखाणाने, परखड शब्दांनी ते सुटणार नाहीत. मला त्याची जाणीव आहे. म्हणूनच मी तसा लोकांचे प्रश्न सोडवण्याचा आव आणत नाही, की लढवय्या असल्याचा भ्रम वाचकाच्या मनात ठसवत नाही. मग करायचे तरी काय लोकांनी? (क्रमश:)
 भाग   ( २५० )   २९/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा