सोमवार, २८ मे, २०१२

नायक आणि खलनायक ओळखायचा तरी कसा?


   डॉ. सुदाम मुंडे यांना सैतान किंवा खलनायक म्हणून रंगवले, मग कथा फ़ार छान रंगवता येत असते. कथा ही नेहमी नायक व खलनायक अशी रंगवलेली असते. त्यात खलनायक नसला तर रंगत येत नाही. मग ती वास्तविक जिवनातली असो की काल्पनिक असो. काल्पनिक कथेमध्ये तर खलनायक हवा तसा रंगवता येत असतो. पण वास्तविक जीवनात खलनायक आपणच तयार करत असतो. किंबहूना आपल्या जीवनात आपण नायकापेक्षा नेहमी खलनायक निर्माण करत असतो, म्हटले तर वावगे ठरू नये. रामायणातला खलनायक रावण लक्ष्मणरेषा ओलांडत नाही. कुठल्या का कारणाने असेना, सीताच ती रेषा ओलांडते. मग वास्तविक जीवनात तरी वेगळी स्थिती आहे काय? सुदाम मुंडे यांना खलनायक म्हणून रंगवणे सोपे आहे. पण त्याला घडवला कोणी?

   अमेरिकेत १९१९ सालात दारुबंदीचा कायदा झाला. त्याला वोलस्टेड कायदा म्हणतात. कारण ते विधेयक तिथल्या संसदेत वोलस्टेड नावाच्या सदस्याने आणले होते. त्यावर बराच खल झाला होता, तेव्हा एका सदस्याने विरोध करताना सावधानतेचा इशारा दिला होता. एका रात्रीत तुम्ही अवघ्या देशाला गुन्हेगार ठरवत आहात, असे त्याचे म्हणणे होते. तो असे का म्हणाला? तर तिथे सर्रास मद्यप्राशन केले जात होते. एका कायद्याने त्याला बंदी घातली, म्हणुन लोकांना तो गुन्हा वाटणार नव्हता. म्हणूनच हा कायदा मोडणारा लोकांना देवदूत वाटेल, असे त्या विरोध करणार्‍याचे मत होते. आणि झालेही तसेच. कायद्याने दारु उत्पादन वा विक्रीला बंदी घातल्यावर चोरट्या मार्गाने दारू उत्पादन करणारे, विकणारे वा पुरवणारे यांना लोक शोधू लागले. त्यांच्याकडून दारू मिळवू लागले. तो कायदा मोडणार्‍यांबद्दल लोकांना धाकयुक्त आदर निर्माण झाला. परिणामी माफ़िया नावाचे भूत अमेरिकेच्या मानगुटीवर कायमचे बसले. त्या दारूबंदीने गुन्हेगारी करणार्‍यांना हक्काचा झटपट नफ़ा देणारा उद्योग सरकारने बहाल केला.

   विचित्र वाटले तरी ते सत्य आहे. जी गोष्ट करणे सर्वसाधारण लोकांना गुन्हा वाटत नाही, त्यावर कायद्याने बंदी घालून मात करता येत नाही. त्यासाठी फ़ार मोठी जनजागृती आवश्यक असते. लोकांची मानसिकता बदलावी लागते.  कायदा हे त्यातले एक प्रभावी हत्यार असू शकते. पण तेच एकमेव हत्यार वा उपाय नाही. म्हणूनच ज्या गोष्टी सामाजिक आरोग्याला अपायकारक असतात, त्यांचा पाडाव करण्यासाठी कायद्यापेक्षा लोकजागृतीला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. अमेरिकेत मद्यप्राशन कोणाला गुन्हाच वाटत नव्हता. म्हणूनच जो दारू पुरवेल तो त्यांना प्रेषित वाटला.  अगदी त्याचप्रमाणे मुलगी होणे ज्यांना नको आहे त्यांच्या मनात त्याबद्दल अपराधी भावना निर्माण झाली पाहिजे. मगच कायदा प्रभावी ठरू शकतो. उलट तशी धारणाच नसेल, तर बेकायदा असेल, पण हवे ते मिळवताना जो देऊ शकतो; तोच उपकारकर्ता वाटतो. जे लोक सुदाम मुंडे यांच्याकडे येत होते, त्यांच्या मनात कुठली अपराधी भावना नव्हती; हेसुद्धा सत्यच आहे ना? आपण पोट्च्या मुलीला जन्मापुर्वीच मारतो आहोत, यात कुठलेही पाप त्यांना वाटत नसेल तर ते मुंडेसारख्या डॉक्टरचा शोध घेणारच. त्यामुळेच तसे डॉक्टर देशाच्या कानाकोपर्‍यात तयार झाले आहेत. त्यांचा धंदा फ़ोफ़ावला आहे. त्यापैकी एकाला खलनायक म्हणून रंगवून ही शोकांतिका संपवता येणार नाही.

   मुलीची बाजू, मुलगी म्हणजे लग्नाचा प्रचंड खर्च, हुंडा, अशा ज्या शेकडो वर्षापासून मनामध्ये ठसवलेल्या गोष्टी वा समजुती आहेत, त्या पुसून काढणे हाच त्यावरचा उत्तम व खरा मार्ग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना घरात दुय्यम वागणूक देण्याची जी मानसिकता आहे, त्यातूनही वडीलधार्‍यांना मुक्त करणे आवश्यक आहे. ते काम कायद्याचा धाक करू शकत नाही. एक उदाहरण पुरेसे आहे. पाश्चात्य देशात मुस्लिम महिलांचा बुरखा वादाचा विषय झालेला आहे. त्याबद्दलच्या चर्चा अनेक वाहिन्यावर ऐकू येतात. त्यात सहभागी होणार्‍या सुशिक्षित मुस्लिम मुलीही मोठ्या आवेशात आपल्याला त्यात गैर काही वाटत नाही; असे सांगत असतात. किंबहूना त्यात ढवळाढवळ म्हणजे आमच्या व्यक्तीगत स्वातंत्र्याला बाधा असाही दावा त्यांच्याकडून होत असतो. तो खोटा नसतो. कित्येक पिढ्यांचे जे संस्कार आहेत, त्यातून आधुनिक शिक्षण मुक्ती देऊ शकत नाही. समजूती व श्रद्धा  अनेक पिढ्यांची देणगी असते. त्या चुकीच्या की बरोबर हा वादाचा विषय आहे. पण त्या असतात आणि त्याच्याच आधारावर सामान्य माणसे जगत असतात. त्यांच्या समजूती बदलणे सहजशक्य नसते. एक बदल दोन तीन पिढ्यांच्या फ़रकाने सामावून घेतला जात असतो. अनेकदा तर जुन्या कालबाह्य जाचक रुढी त्या त्या समाजाची ओळख असते. त्यापासून सर्व समाजाला मुक्त करणे, हे कायद्याचे काम नाही तर प्रबोधनाचे कर्तव्य आहे.

   राजर्षि शाहूमहाराज, महात्मा फ़ुले, महर्षि कर्वे, आगरकर वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महात्म्यांनी शंभर वर्षापुर्वी बघितलेली स्वप्ने काही प्रमाणात आज साकारताना दिसतात, ते काम कायद्याने केले नसून बदलत गेलेल्या मानसिकतेतून साधलेले आहे. मुलगी म्हणजे बोजा ही मनोवृत्ती आजही कथा, चित्रपट मालिकांमधून दाखवली जात असते, त्याचा अर्थ काय? भले तुम्ही गैरप्रथा म्हणून त्यावर टिका करणारे कथानक दाखवता. पण त्याचाच अर्थ असा, की आजही तशी मनोवृत्ती समाजात खोलवर रुजलेली आहे. कायद्याने त्यावर बंदी असेल पण त्यातून पळवाट शोधणे ही मानवी वृत्ती असतेच. मग अन्य स्वरूपात हुंडा मागणे असेल किंवा मुलगी जन्माला येण्यापुर्वीच त्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न असेल. जेव्हा अशी वृत्ती असते तेव्हा त्या "ग्राहकाला" तशी सेवा पुरवणारा व्यापारीही धंदा शोधणारच. देशाच्या कानाकोपर्‍यात इतक्या प्रचंड प्रमाणात सोनोग्राफ़ी करणारे खाजगी दवाखाने व इस्पितळे का उभी आहेत? तिथे कायदेशीर कामे होतात काय? तिथेच गर्भलिंग चाचणी घेऊन पुढले पाप उरकले जाते, हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. दुरदुरच्या गावात व शहरात अमुक एका रुग्णालयात लिंगचाचणी होते व स्त्रीगर्भ असेल तर गर्भपात करून मिळतो; ही माहिती सामान्य गरजूला असते, पण सरकारी यंत्रणा वा पोलिसांना त्याचा थांगपत्ता नसतो, यावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेविल काय? कुठलाही गुन्हा वा बेकायदा कृत्य संबंधित शासकीय यंत्रणेच्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही. अगदी पाकीटमार सुद्धा ठरलेल्या कार्यक्षेत्राबाहेर गुन्हे करू शकत नसतो. ज्या पोलिस ठाण्याला त्याचा हप्ता बांधलेला असतो, त्याच क्षेत्रात तो गुन्हे करू शकतो. मग मुंडे सारखे गर्भपाताचे दवाखाने वा रुग्णालये बिनबोभाट चालतात व सरकारी यंत्रणेला पत्ताच नव्हता, यावर कोणी विश्वास ठेवायचा आणि कसा विश्वास ठेवायचा?

   हे सर्व ठरलेले कथानक असते. ज्याचे त्याचे पात्र ठरलेले असते. संवाद ठरलेले असतात. प्रकरण उघडकीस आले, तर गुन्हेगाराने तक्रार करायची नसते. त्याचे बखोट पकडणारा सरकारी अंमलदार त्याचाच भागिदार असतो. तो आपल्या साथिदाराला सुटायला कायदेशीर मदत करत असतो. त्या नाटकात मुंडे यांनी खलनायक रंगवायचा असतो. पोलिस वा प्रशासनाने नायकाची भूमिका पार पाडायची असते. नाटक संपले मग गर्दी हटते व दोघे एकत्र बसुन मजा मारतात. कारण जे पाप आपण करत आहोत, त्याबद्दल बाकीचा समाज अलिप्त आहे याची प्रत्येकाला खात्री आहे. गर्भपात करणारा, करून घेणारा, त्यातून पैसे कमावणारा वा किंवा त्यात भागिदारी करणारा; यापैकी कोणालाच जे चालू आहे त्यात पाप वाटत नाही. कलमाडी यांच्यावर आज नुसतेच आरोप आहेत. गुलाबराव देवकर यांना तर जामीन मिळाला आहे, राजा यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध व्हायचे आहेत, येदियुरप्पा यांच्यावर आरोपपत्र सुद्धा ठेवलेले नाही, असे उजळमाथ्याने सांगणारे आपले नेते आहेत ना? मग मुंडे वा अन्य तत्सम पापी लोकांनी घाबरायचे कोणाला? कारण आता पाप-पुण्याच्या कल्पनाच पुसट होऊन गेल्या आहेत. शायनी अहुजा नावाचा एक अभिनेता आठवतो कुणाला? मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता त्याच्यावर. त्याने केलेले कृत्य नाकारले नाही. पण तो म्हणाला, तिलाही ते आवडले असेच माझे मत होते. म्हणजे त्याने बलात्कार कबूल केला होता. पण त्याची पत्नी मात्र जाहिरपणे त्याचेच समर्थन करत होती. ही आजची आपली नैतिकता आहे. ही आजच्या प्रतिष्ठीत समाजाची नितीमुल्ये आहेत. मग खलनायक वा नायक कसा ओळखायचा? सगळेच चेहरे सारखे दिसतात ना?   (क्रमश:)
 भाग   ( २७७ ) २७/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा