मंगळवार, १ मे, २०१२

समाज परिवर्तनासाठी इतकी अफ़ाट गुंतवणूक?


   लोकशाही ज्यांना पोखरायची असेल तर त्यांना ज्या तीन खांबांवर ती उभी आहे तिथे धक्का देणे अवघड आहे. जेव्हा शत्रूवर हल्ला करायचा असतो तेव्हा त्याच्या सर्वात दुबळ्या व तकलादू भागावर हल्ला चढवला जात असतो. भारतीय संसदीय लोकशाही असो, की अमेरिकन अध्यक्षिय लोकशाही असो, तिच्या घटनात्मक आधारावर हल्ले चढवणे सोपे नाही. कारण तिथे कायदेशीर संरक्षण मिळू शकणार नाही. देशद्रोहाचा गुन्हा म्हणून मुसक्या बांधल्या जाऊ शकतात. कारण त्या तीन खांबांना घटनात्मक दर्जा आहे. अधिकार सुद्धा आहेत. पण ज्याच्याकडे अधिकार नाहीत, तसाच घटनात्मक दर्जा नाही; असा एक लोकशाहीचा खांब आहे तो माध्यमांचा. ज्याला आपण चौथा खांब म्हणतो. संसदेवर कब्जा मि्ळवायचा तर निवडणुकांची डोकेदुखी आहे. सरकार बनवून कब्जा करायचा, तर बहुमत मिळवायला हवे. न्यायपालिकेवर ताबा मिळवायचा तर पुन्हा पात्रता व नेमणूका अशी भानगड आहे. नुसता पैसा कामाचा नसतो. त्यापेक्षा माध्यमे हा सोपा पर्याय आहे तसाच दुबळा पर्याय आहे. त्यात किमान गुंतवणूक करून अधिक प्रभूत्व मि्ळवणे शक्य होते.

   माध्यमे काय करू शकतात ते पाहिले तर त्यांची खरी ताकद आपल्याला कळू शकते. करमणुकीची साधने, माहितीची साधने, यातून माणसाची व समाजाची मनोवृत्ती घडवता येते, तशीच बदलता येते. पुस्तके, चित्रपट, नाटके, कथामालिका, माहितीपट, वृत्तपत्रे, त्यातील लिखाण अशा मार्गाने जनमानसावर प्रभाव पाडता येतो. भाषा, चित्रे, दृष्ये, यातून लोकांच्या डोक्यात कल्पना भरवता येतात. त्यांच्या मनाशी खेळता येते. त्यातून ज्या भ्रामक प्रतिमा व प्रतिष्ठा निर्माण केल्या जातात, त्याचा जनमानसावर मोठा प्रभाव पाडता येतो. दिसायला ते निव्वळ मनोरंजन असते. पण वस्तुस्थिती तशी नाही. ते फ़क्त मनोरंजन नसते. त्यातून सुप्तावस्थेतील मानवी मनाला प्रभावित करणारे संकेत पाठवले जात असतात. त्यांचा प्रभाव जसजसा वाढत जातो, तसतसा समाज बदलत जात असतो. शिवाय अशा संकेतामधून ज्या गोष्टी सोप्या करून दाखवल्या जातात, त्याचे लगेच अनुकरण होत असते. ते काम माध्यमे अत्यंत हळूवारपणे पार पाडत असतात. तुमच्या आमच्या नकळत आपण बदलून जात असतो. त्यासाठीच आमिरखान, शाहरुख खान, सचिन तेंडूलकर, महेंद्रसिंग धोनी अशा लोकांना जाहिरातीमधून वापरले जात असते. त्या प्रभावी लोकप्रिय व्यक्तीमत्वाचा धुर्तपणे जाहिरातीमध्ये वापर केला जात असतो. शिवाय एकदा दोनदा नव्हे, तर सलग त्यांच्या जाहिरातीचा भडीमार आपल्या डोळ्यांवर, मनावर, विचारांवर केला जात असतो. मग कधी नकळत आपण त्याच्या आहारी गेलो, त्याचा पत्ता आपल्यालाही लागत नाही.

   सचिन तेंडूलकर वा धोनी यांना दिडदोनशे कोटी रुपये जाहिरात करण्यासाठी दिले जातात, तर त्यातून किती उत्पन्न त्या मालाच्या कंपन्या मिळवत असतील, त्याचा नुसता अंदाज केला तरी लक्षात येईल, की माध्यम ही काय किमया आहे. इंडियन प्रिमियर लीग नावाची जी क्रिकेटस्पर्धा भरवली जाते, त्यात करोडो रुपयांची उलाढाल होते, ते पैसे येतात कुठून? गोरेपण मिळवण्यासाठी ज्या जाहिराती अखंड चालू असतात, त्यात किती सत्य व तथ्य आहे? गोरेपण इतके सोपे असते काय? मुळात गोरे असण्याची गरजच काय? अशा जाहिराती बारकाईने बघा. त्यात अमुक तुमच्याकडे नाही, असा न्युनगंड तुमच्या डोक्यात भरवला जात असतो. त्याच न्युनगंडातून तुमच्यात त्या गोष्टी वा वस्तू मिळवण्याची इर्षा उत्पन्न केली जाते. त्यांची उपयोगिता बाजूला रहाते आणि त्यांचा हव्यास तुमच्यात जागवला जा्तो. मग उपयुक्तता व गरज याकडे डोळेझाक करून तुम्ही त्यावर पैसे उधळता. ही माध्यमांची जादू आहे. शेकडो नव्हे तर लाखो मुलांमध्ये चॅंपियन होण्यासाठी मोह निर्माण करायचा आणि त्यातून किती करोडो रुपयांची उलाढाल केली जाते; याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. तो मोह, हव्यास माणसांमध्ये जागवण्यासाठी आकर्षक जाहिराती केल्या जात असतात. ही माध्यमांची किमया आहे. जे अस्तित्वातच नाही वा फ़लद्रूप होऊच शकत नाही, त्याबद्दल मोह निर्मांण करणे, एकप्रकारे तो जुगाराचाच प्रकार असतो. लाखो लोक गमावतात, तेव्हा एखादा कोणीतरी जुगारात लखपती होत असतो. पण त्या फ़सलेल्यांची कहाणी तुमच्या कानावर कधीच येत नाही. पण जिंकलेल्याची गोष्ट कान फ़ुटायची वेळ येईपर्यंत ओरडून सांगितली जात असते. प्रत्येकाला ही संधी होती व आहे, असेच चित्र निर्माण केले जाते. पण तो निव्वळ भ्रम असतो. लाखभरांचे नशीब फ़ुटके असते, तेव्हाच एकाचे फ़ळफ़ळत असते. हेच आणि एवढेच सत्य असते. पण तसा विचारही तुमच्या मनाला शिवणार नाही इतका प्रचार चालू असतो.  

   मागल्या काही वर्षात उपग्रह वाहिन्यांचा पसारा वाढला, त्यावर दिसणार्‍या व्यक्तीरेखा, त्यांच्या कथा, त्यांचे रंगरूप घराघरात व गावागावात जाऊन पोहोचले. त्याचा सामान्य माणसाच्या जीवनावर किती प्रभाव पडला आहे? सुटाबुटात दिसणारे नवरदेव आता रंगीबेरंगी कपड्यात दिसू लागले आहेत ना? लग्नसोहळ्यात येणार्‍या पाहुण्याची वस्त्रे पुर्वीपेक्षा किती बदलली आहेत? विवाह सोहळ्याची सजावट कशी व केव्हा बदलून गेली, ते सांगता येणार नाही. हा बदल कोणी व कधी घडवून आणला? त्यामागे कोणाचे प्रयास आहेत? कोणाची प्रेरणा आहे? जे छोट्या पडद्यावर दिसत असते, त्याची नकळत लाखो लोक नक्कल करताना अवतीभवती आपण बघतो ना? मग आपण घरातल्या त्या छोट्या पडद्यावर जे बघतो ते मनोरंजन असते, की आपल्या जीवनाला बदलणारी ती एक जादू असते? माध्यमांच्या कथा, मालिका, चित्रपट, बातम्या, चर्चा यातून आपले जीवन किती सहजगत्या प्रभावित होत असते; त्याचे हे पुरावे आहेत. आणि तो प्रभाव पाडून आपले जीवन व जीवनशैली कोण बदलू पहातो आहे? त्यात त्याचा कोणता लाभ आहे? त्यासाठी कोणाला त्याने कामाला जुंपले आहे? आपण कधी तरी याचा बारकाईने विचार तरी केला काय?  

   ज्याला आपण मनोरंजन समजतो ते प्रत्यक्षात मनोरंजन नसते, तर आपले जगणे व जीवनशैली यावर प्रभूत्व मिळवण्यासाठी चाललेले ते पद्धतशीर प्रयास असतात. त्या कथा, त्यातून सुचवलेल्या गोष्टी, दाखवलेले प्रसंग; यातून तुमचे मन बनवले जात असते. घडवले जात असते. त्यातून तुमच्या वास्तविक गरजा नाहीत, त्या तुमच्या गरजा बनवल्या जात असतात. त्यसाठी तुमच्या मनात खोट्या प्रतिष्ठा उभ्या केल्या जात असतात. तुमचे मन तिकडे ओढले जाईल अशीच एकू्ण योजना असते. वास्तव जीवनापेक्षा या स्वप्नवत जगाचे आकर्षण असे लोभस असते, की त्याच्या मोहात तुम्ही केव्हा सापडता तेच तुमच्या लक्षातही येत नाही. ही आहे माध्यमांची जादू. अशा मालिका संपताना वा आरंभी जी नामावळ दाखवली जात असते, ती काळजीपुर्वक वाचा. त्यात मालिकेतील पात्रांसाठी वापरलेली वस्त्रे, कपडे साहित्य, अन्य सेवा या कोणी पुरवल्या त्यांची यादी असते. ती अभ्यासली तर लक्षात येईल, की या पात्रातून व कथेतून ते वस्त्रनिर्माते, रंगभुषा साहित्याचे निर्माते, असे अनेक व्यापारी आपल्या मालाची सहजगत्या जाहिरात करत असतात. थोडक्यात माध्यमांच्या पसार्‍याने हा एक काल्पनिक भुलभुलैया निर्माण केला आहे.

   आपल्या खर्‍या जीवनातील समस्या व अशा माध्यमातील भ्रामक कल्पनेतील प्रश्न, साफ़ वेगळे असतात. पण त्यांची अशी बेमालूम सांगड कथा व बातम्यांतून घातलेली असते, की सत्य आणि भ्रम यातली लक्ष्मणरेषाच पुसट होऊन जावी. माध्यमांनी एकप्रकारची मोहिनी समाज मनावर घातली आहे. त्यात त्याला बरेवाईट कळू नये व त्याने त्याचा स्वत: विचार करू नये, अशीच एकूण योजना आहे. त्याने विचार करू नये म्हणुन त्याला जीवनाची सोपी पण निरूपयोगी उत्तरे शोधून दिली जात असतात. तयार उत्तरे दिली जातात. मग तुम्ही बातम्यांचे चॅनेल बघा किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम बघा. त्यामधला बाजारूपणा लपत नाही. ज्या देशात अर्धी अधिक जनता अर्धपोटी आहे. तिथे अशा जाहिराती नेमके काय सांगत असतात? चांगल्यावाईटात विवेक करण्याची माणसाची उपजत क्षमता बोथट करण्यासाठीच हे कार्यक्रम चालत नाहीत काय? माध्यमात आलेल्या प्रचंड पैशाने आता समाज घडवण्या बिघडवण्याचे काम हाती घेतले आहे. आणि त्यात इतकी अफ़ाट गुंतवणूक करणारे समाजसुधारक आहेत काय? त्यांची तुलना महर्षि कर्वे, महात्मा फ़ुले, आगरकर, गाडगेबाबा, यांच्याशी होऊ शकते काय? नसेल तर त्यांनी हे सर्व कशासाठी चालवलेले आहे?   (क्रमश:)
 भाग     ( २४७ )     २६/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा