सोमवार, २१ मे, २०१२

व्यंगचित्र वादातले छूपे भामटे


   कालपरवाच पुणे विद्यापीठाच्या एका कार्यालयावर एका जमावाने हल्ला केला. रिपब्लिकन पॅंथर ऑफ़ इंडिया असे त्या जमावातील तरूणांच्या संघटनेचे नाव सांगितले जाते. त्याचे कारण होते एका पाठ्यपुस्तकतील एक व्यंगचित्र. घटनाकार डॉ. बाबासाहेबांचे हे खुप जुने व्यंगचित्र आहे. ते हयात असतानाच ते प्रसिद्ध झाले होते. त्यांनी पाहिलेही होते. त्याबद्दल त्यांनीही नाराजी व्यक्त केल्याचा कुठला ऐतिहासिक पुरावा नाही. म्हणून बाबासाहेबांनी त्याचे कौतुक केले होते असा दावा कोणी करू शकणार नाही. पन्नास वर्षे जुन्या या व्यंगचित्राने आज कुणाच्या भावना दुखावण्याचे काही कारण नाही. ज्यांना कोणाला इतिहासाचा अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी हे व्यंगचित्र अभ्यासाचा विषय असू शकतो. त्याबद्दल कोणी आक्षेप घेतल्याचे निदान माझ्यातरी ऐकी्वात नाही. मग इतक्या जुन्या व्यंगचित्राचे निमित्त करून कोणी टोळी असा हल्ला राजकारणास्तव करील काय? पण तो हल्ला झाला. कारण त्या व्यंगचित्राचे आज पुनर्मुद्रण झाले आहे. तेही शालेय पाठ्यपुस्तकात झाले आहे. त्याची गरज काय होती? हे पाठ्य़पुस्तक भारत सरकारच्या एका खास अभ्यास गटाने तयार केलेले आहे. ते पुस्तक आज छापले गेलेले नाही, तर पाच वर्षे होऊन गेली आहेत. पण त्यातून आज वाद उफ़ा्ळला आहे. मग त्या पुस्तकाच्या आखणीत सहभागी असलेले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला झाला आहे. वास्तविक त्याबद्दल संसदेत वादळ उठले आणि पळशीकर व त्यांचे सहकारी योगेंद्र यादव यांनी लगेच संबंधित अभ्यास गटाचा राजिनामा दिलेला आहे. तरीही हा हल्ला झालेला आहे. मग लगेच आविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्ला, असा हल्लागुल्ला सुरू झाला. ही आता नेहमीचीच बाब झाली आहे. आधी कळ काढायची आणि त्याबद्दल थप्पड बसली, मग विचारस्वातंत्र्यावर गदा आली म्हणून छाती बडवायची; ही एक बौद्धिक फ़ॅशनच  बनली आहे.

   ज्यांनी हा हल्ला केला त्यांनी कायदा हाती घेतला अशी बोंब झालेली आहे. पण त्यांना हाती घ्यायला काहीच नव्हते आणि रिकामपणी काम नाही म्हणून त्यांनी कायदा हाती घेतला आहे काय? बाबासाहेबांवर ज्यांची श्रद्धा आहे, त्यांना त्यांची कुठलीही विटंबना झाल्यास राग येणे स्वाभाविक आहे. त्यानंतर त्यांनी प्रक्षुब्ध प्रतिक्रिया देणेही स्वाभाविक आहे. पुस्तकात हे व्यंगचित्र वापरताना त्यातून लोकभावना भडकतील, एवढेही ज्यांना कळत नाही त्यांना शहाणे म्हणता येईल काय? पन्नास वर्षे जुने व्यंगचित्र आहे, म्हणून आज प्रतिक्रिया उमटणार नाही, हे गृहीत कुठून आले? पुस्तकात इतर अनेक तात्कालीन नेत्यांचीही व्यंगचित्रे आहेत हा बचाव कशाला? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा हे चित्र प्रथम प्रकाशीत झाले, तेव्हा बाबासाहेब मोठा नेता असले तरी त्यांचे दैवतीकरण झालेले नव्हते. आज त्यांना जो दलित पिडीत समाज देवासमान मानतो, त्यांचे बाबासाहेब व विद्वान शहाण्यांचे बाबासाहेब, यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. तो फ़रक विचारात न घेता जे लोक वागतात, त्यांना विवेकशुन्य म्हणावे लागेल. जो परिणामांचा विचारही करत नाही, तो शहाणा कसला? आणि तो शहाणाच नसेल तर तो मुलांना शिकवायची पुस्तके तरी कशी तयार करू शकेल? कुठल्याही ज्वेलर्सच्या दुकानातून दोनपाच किलो सोन्याची चोरी झाली आणि दिवेआगरच्या मंदिरातून दिड किलो वजनी सोन्याच्या गणपतीची चोरी झाली, यात मोठासा फ़रक तो काय? ज्याची त्या दैवतावर श्रद्धा आहे, त्याच्यासाठी ते सोने नसते तर देव असतो आणि ज्याची श्रद्धा नसते त्याच्यासाठी ते सोने असते. अगदी त्याचप्रमाणे ज्यांच्यासाठी बाबासाहेब हे विचारवंत असतात, त्यांच्यासाठी त्यांचे छायाचित्र व व्यंगचित्र यात फ़रक नसेल. पण ज्यांना ते महापुरूष वाटतात, त्यांच्यासाठी छायाचित्र व व्यंगचित्र यात मोठाच फ़रक असतो. आणि ही बाब जगभरची आहे.

   काही वर्षापुर्वी स्वीडन किंवा अशाच कुठल्या देशात इस्लामचे धर्म संस्थापक महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रे काढण्याची स्पर्धाच योजण्यात आली होती व त्यातली आही प्रकाशीत करण्यात आली. त्यावरून जगभर काहूर माजले होते. त्यावेळी झालेल्या निदर्शनात लाखो नव्हेतर जगभरच्या करोडो मुस्लिमांनी भाग घेतला होता. त्यातल्या एक टक्का तरी मुस्लिमांनी ती चित्रे पाहिली होती काय? एक टक्का दुरची गोष्ट झाली. काही हजार मुस्लिमांनीही ती व्यंगचित्रे पाहिली नव्हती. पण असे झाले आहे, या नुसत्या बातमीने मुस्लिम जगतामध्ये धुमाकुळ माजला होता. अनेक अरब मुस्लिम देशात त्यासाठी युरोपियन देशातून येणार्‍या मालावर दिर्घकाळ बहिष्कार घालण्यात आला होता. अखेर अनेक युरोपियन सेक्युलर सरकारांनी त्या व्यंगचित्रांचा निषेध केला होता. त्यांच्या प्रकाशनावर निर्बध घातले होते. इतकेच काय, ज्या देशात ही व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली, तिथल्या सरकारने त्याबद्दल माफ़ीसुद्धा मागितली होती. ज्याचे चित्रच उपलब्ध नाही, त्याचे व्यंगचित्र कसे होऊ शकेल. त्यामुळे जी व्यंगचित्रे काढली गेली वा प्रकाशीत झाली, ती पैगंबराची आहेत असा दावाही करणे चुकीचे होते. पण तो तर्क कोणी मानला काय? मग त्यासाठी माफ़ी मागणार्‍या वा त्यावर बंदी लागू करणार्‍या, पाश्यात्य सेक्युलर सरकारांना अविष्कार स्वातंत्र्यविरोधी म्हणायचे काय? आज बाबासाहेबांच्या व्यंगचित्रानंतर जे पोपट अविष्कार स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहेत, त्यापैकी कितीजणांना महंमद पैगंबराची व्यंगचित्रे आठवली? त्यापैकी कितीजण त्या चित्रांचे इथे प्रकाशन करून आपल्या आविष्कार स्वातंत्र्याची लढाई लढायला तयार आहेत? आधी त्यांनी त्याची तयारी दाखवावी मगच चिडलेल्या दलित संघ्हटना व आंबेडकरप्रेमी लोकांना शहाणपण शिकवावे.

   आपल्या सोयीचे असेल तेव्हा स्वातंत्र्याच्या राणाभिमदेव थाटातल्या गप्पा मारायच्या आणि जिथे लढायची वेळ येते, तिथे शेपूट घालायची ही सेक्युलर शहाण्यांची हिंमत असते. यातले कितीजण तेव्हा त्या व्यंगचित्राच्या लढ्यात उतरले होते? झाडून सगळे बिळात लपून बसले होते. डॉ. बाबासाहेबांनीच आम्हाला घटनेतून आविष्कार स्वातंत्र्य दिले आहे; असे वागळे व बाळ ठणकावून दलित कार्यकर्त्यांना सांगत होते. मग तेच स्वातंत्र्य जपायची लढाई महंमद पैगंबराच्या चित्रांच्या वेळी का लढली गेली नाही? इथे भारतातही त्यावर बंदीच घातली गेली होती. तेव्हाचे सोडा आज कोणी तशी हिंमत करणार आहे काय? करून दाखवा. मग दलित संघटनाही तुमच्या स्वातंत्र्याला मुजरा करून तुमचे दावे मान्य करतील. अन्यथा तुम्ही लफ़ंगे आहात हेच सिद्ध होईल. अर्थात विषय तेवढ्यापुरता नाही. इथे हे पुस्तक कोणा खाजगी संस्थेने प्रसिद्ध केलेले नाही, तर सरकारी खर्चाने प्रसिद्ध झालेले आहे आणि देशभरातल्या मुलांना पाठ्यक्रम म्हणून लावले गेले आहे.

   समजा आज दिल्लीत वाजपेयी सरकार असते, तर हे तमाम सेक्युलर शहाणे हीच भाषा बोलले असते का? यांचीच भाषा एकदम उलट दिसली असती. त्यांनी संघाच्या प्रेरणेने मुद्दाम दलितांच्या भावना दुखावण्यासाठीच असा बाबासाहेबांचा अवमान करण्यात आला; असे सांगत त्याच पुस्तक व चित्रावर टिकेची झोड उठवली असती. यातला मानभावीपणा सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे. योगेंद्र यादव कायबीइन लोकमतच्या सवालात बोलताना म्हणतात, त्यांना सुहास पळशीकर यांनी आंबेडकर शिकवला. यासारखा भंपकपणा दुसरा असूच शकत नाही. दिल्ली वा अन्य कुठल्या विद्यापीठात दिर्घकाळ राज्यशास्त्र, समाजशास्त्र अशा विषयाचा अभ्यास करणारे व शिकवणारे प्रा. योगेंद्र यादव यांनी पळशीकर भेटण्यापुर्वी कधी आंबेडकर वाचला नव्हता काय? यादवांचा जन्म होण्या आधीपासून बाबासाहेब दिल्लीच नव्हे तर जगात विचारवंत म्हणून विख्यात होते. त्यांनी राज्यघटना तयार केली. त्यांचे वास्तव्य दिल्ली व अन्यत्र होते. त्या बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी कुणा मराठी विद्वान वा प्राध्यापकाची गरज यादव यांना भासली असेल, तर त्यांचा भारतीय स्वातंत्र्य व सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास किती, याचीच शंका येते. कारण 1950 च्या सुमारास बाबासाहेबांच्या लेबर पार्टी व शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशनच्या शाखा देशाच्या अनेक राज्यात होत्या. आणि बाबासाहेबांचे कार्य हा तेव्हापासूनच अभ्यासकांचा चिंतनाचा विषय होता. यादवांना त्याचाच पत्ता नाही काय? आणि आंबेडकर विचारांचे पळशीकर एवढे गाढे अभ्यासक कधीपासून झाले, की यादवांसारख्या जाणकाराला त्यांच्याकडून बाबासाहेब समजून घेण्याची वेळ यावी? वाचक, प्रेक्षक, कार्यकर्ते, दलित चळवळीचे नेते व संघटनांना हे लोक मुर्ख समजतात काय? सगळी निव्वळ ढोंगबाजी.    (क्रमश:)
भाग  ( २६५ )   १५/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा