मंगळवार, १ मे, २०१२

आपण आपल्यासाठी काय करू शकतो?


    "दुसर्‍याच्या चुका शोधणे खुप सोपे असते. पण आपल्या चुका ओळखणे अत्यंत अवघड असते." अशी भगवान बुद्धाची शिकवण आहे. त्याचा अर्थ इतकाच, की आपण कधी चुकत नसतो. ही समजूतच आपली सर्वात मोठी चुक असते. सर्व समस्या तिथूनच सुरू होत असतात. मग आपण आपल्या आयुष्यातल्या समस्यांकडे त्याच नजरेने पाहू लागतो. ज्या गोष्टी चुकल्याने आपल्याला त्रास होत असतो, त्यावर उपाय शोधण्यापेक्षा आपणच त्याचे खापर दुसर्‍याच्या माथ्यावर फ़ोडून समाधानी होतो. पण ते समाधान फ़सवे असते. कारण त्यातून समस्या सुटत नसते, की आपला त्रास संपत नसतो. उलट ती समस्या सोडवण्याची इच्छाच आपण गमावून बसत असतो. मग अशा समस्येचे निदान करायला वा त्यावरचा उपाय शोधायला आपण इतरांकडे आशाळभूतपणे बघू लागतो. त्यात त्या दुसर्‍याला धंदा दिसला, तर तो आपल्या या गरजेचे वा लाचारीचेच दुकान थाटत असतो. या सर्वामागे एकच कारण असते, आपण चुकतच नाही, ही आपली ठाम समजूत सर्वात मोठी चुक असते. तिथे अहंकार बाजूला ठेवून आत्मपरिक्षण करण्याची गरज असते.

   एक उदाहरण देतो. मला एका तरूण मुलाचा फ़ोन आला. तो उलटतपासणी नियमित वाचणारा आहे. त्याला वाटते मी खुप परखड सडेतोड लिहितो. म्हणून त्यातून लोकांना न्याय मिळू शकेल, मिळत असावा. मग मी कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्येवर लिहिले पाहिजे. माझ्या सडेतोड लिखाणाने कांदा उत्पादकांना न्याय नक्की मिळेल, असा त्याला विश्वास वाटत होता. हे सर्व ऐकायला बरे वाटणारे होते. पण ते अजिबात सत्य नव्हते. कारण मी वर्षभर लिहितो आहे, म्हणुन कुठल्या समस्या प्रश्नाचे निराकरण झाले, असा माझा तरी अनुभव नाही. मग ऊस वा कांदा उत्पादकांना मी लेखणीने न्याय मिळवून देऊ शकतो, यावर मी विश्वास कसा ठेवायचा? पण त्या मुलाची तशी गाढ श्रद्धा होती. मी त्याला खुप समजावले. पण तो हट्ट सोडत नव्हता. लेखनाने वा प्रसिद्धीने समस्या सुटत नसतात वा न्याय मिळत नसतो. त्यातून जी लोकजागृती होते, त्याच्या धाकाने सत्ता जागी झाली, तर न्यायासाठी हालचाली होऊ शकतात. पुर्वी काही प्रमाणात असे होत असे. मग त्याला माझा अनुभव सांगितला.  

   १९७६ नंतर शरद जोशी यांच्या पुढाकाराने शेतकरी संघटना अस्तित्वात आली, तीच मुळात कांदा उत्पादकांच्या आंदोलनातून. त्यावेळी मी त्याच विषयावर लेख लिहिला होता. ’कांदा का कावला?’ असे त्याचे शिर्षक मला अजून आठवते. माझे लिखाण शेतकर्‍याला न्याय देऊ शकत असते, तर आज पुन्हा तो कांदा उत्पादक असा अन्यायग्रस्त कशाला राहिला असता? तेव्हा कांदा उत्पादकाला न्याय मिळाला. कारण तेव्हा त्याने संघटित होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. शेतकरी संघटना त्यातून उदयास आली. जेव्हा ती मरगळली, तेव्हा पुन्हा कांदा उत्पादक शेतकर्‍याचे हाल सुरू झाले. आज तीसपस्तीस वर्षांनी रडगाणे तसेच चालू आहे. तेव्हाही उत्पादन किंमतीच्या तुलनेत कांद्याला बाजारभाव मिळत नाही, हीच तक्रार होती. आज तीच तक्रार तशीच चालू आहे. तेव्हा कदाचीत त्या फ़ोन करणार्‍या मुलाचा पिता तेव्हा याच्या इतका तरूण असेल. मुद्दा इतकाच, की कठोर शब्दात लिखाण केले, म्हणुन न्याय मिळत नसतो; तर लोकशक्तीच न्याय मिळवून देत असते. पण आंदोलन हे एकावेळच्या उपायावर थांबता कामा नये, तर त्या समस्येवर कायम स्वरुपी उपाय काढला गेला पाहिजे. कोणाच्या आंदोलनाने वा लिखाणातुन आपल्याला न्याय मिळेल या समजूतीमधून लोकांनी बाहेर पडले पाहिजे. मग ते शेतकरी संघटनेचे आंदोलन असो किंवा अण्णा हजारे, स्वामी रामदेवांचे आंदोलन असो. त्यात प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्यावर सामुहिक न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होत असते. सहानुभूती हे न्यायाचे सुत्र झाले पाहिजे.

   अन्याय दुर करणे हे आपले उद्दीष्ट असले पाहिजे. मग तो अन्याय कोणावर झाला हे महत्वाचे नाही, अन्याय करणारा एका बाजूला व अन्याय सोसणारा दुसर्‍या बाजूला, अशी समाजाची विभागणी झाली पाहिजे. मग लक्षात येईल, की अन्यायग्रस्तांची संख्या प्रचंड आहे, तर अन्याय करणार्‍यांची संख्या नगण्य आहे. ही नुसती संख्या बघितली तरी अन्याय करणार्‍यांचे पाय चळचळा कापू लागतील. त्यांच्याकडे न्यायाची भिक मागावी लागणार नाही. तेच गयावया करीत तुमच्या पायाशी न्यायासह लोळण घेतील. पण तसे कधीच होत नाही. कारण सगळे अन्यायग्रस्त एकत्र येत नाहीत. कधी शाळेच्या देणगीने त्रस्त झालेले लढत असतात, तर कधी कांदा उत्पादक लढत असतात. कधी घरासाठी गिरणी कामगार लढत असतात, तर कधी ऊस उत्पादक, दुध उत्पादक लढत असतात. जेव्हा एका समाज घटकाचा लढा प्राणपणाने चालू असतो, तेव्हा वेगवेगळ्य़ा कारणाने अन्यायग्रस्त असलेले इतर समाजघटक, त्याकडे त्रयस्थ, तटस्थ म्हणून बघत असतात. थोडक्यात इतर अन्यायग्रस्त, त्या लढणार्‍या एका समाजगटाला एकाकी शत्रूच्या जबड्यात सोडुन देत असतात. तेव्हा प्रत्यक्षात असे इतर अन्यायग्रस्त त्या मुठभर अन्याय करणार्‍यांचे हातच बळकट करत असतात. तिथे त्या एका अन्यायग्रस्ताची शिकार होऊन जाते. मग पुढे कधी दुसरा अन्यायग्रस्त समाजगट त्याच अवस्थेत शिकार्‍याचे सावज होत असतो.  

   आपण जे स्वत:ला अन्यायग्रस्त समजत असतो, त्यांनी आपल्या आपल्या समस्यांपुरती मर्यादित झालेली संवेदनशीलता सोडली पाहिजे. अन्याय कुठलाही असो. त्यात अन्यायग्रस्त आपला बांधव समजून एकजुटीने उभे रहाण्याची गरज आहे. शेवटी सत्ता ही लोकसंख्येला घाबरत असते. एकेकाला गाठून नामोहरम करणे, एवढीच तिची ताकद मर्यादीत असते. सर्वच अन्यायग्रस्त एकवटले, तर त्याच सत्तेला अन्याग्रस्तांना सामोरे जाण्याची हिंमत नसते. कारण तिची तेवढी ताकदसुद्धा नसते. हे कसे व्हायचे? तर कुठल्याही अन्यायाविरुद्ध आंदोलन होईल, तेव्हा इतरांनी ते एकाकी पडू देता कामा नये. जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा कुठल्याही आंदोलनात आपण सहभागी झाले पाहिजे. कांदा उत्पादकाने ऊस उत्पादकाच्या किंवा शाळेने केलेल्या फ़िवाढीच्या विरुद्ध होणार्‍या आंदोलनात आपल्या घरचे कार्य असल्याप्रमाणे उतरले पाहिजे. दुध उत्पादकाने आपल्या परिसरात कुठलेही अन्यायविरोधी आंदोलन दिसले, तर त्यात हजेरी लावली पाहिजे. त्याच्याशी माझा काय संबंध, अशी जी मानसिकता आहे ती सोडून, मुळात कुठल्याही अन्यायाला थारा मिळता कामा नये, असे आपण वागायला सुरूवात केली पाहिजे. तिथे मोठा फ़रक पडू शकतो. आपल्याला म्हणजे सामान्य माणसाला जोडणारे एकच नाते आहे. ते म्हणजे आपल्यावर होणारा अन्याय. त्या नात्याने जेव्हा आपण जगाकडे पाहू लागतो व वागू लागतो, तेव्हा ज्यांच्या हाती सत्ता आहे; त्यांची झोप उडत असते. अन्यायाचे स्वरूप महत्वाचे नसते, तर त्यामागची मनोवृत्ती भयंकर असते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो म्हणतात, तशी ही अन्यायकारी मनोवृत्ती असते. एक अन्याय अत्याचार पचला, मग ती रक्ताला चटावलेल्या श्वापदाप्रमाणे इतरांवर अन्याय करू लागते. आज आपले सार्वजनिक जीवन गांजले आहे, त्याचे तेच प्रमुख कारण आहे. जे छळणारे आहेत, त्यांच्याकडूनच आपण सुटकेची वा न्यायाची अपेक्षा आपण करत असतो. त्यातून इतर कोणीही आपल्याला सो्डवू शकणार नाही. अगदी अण्णा हजारे वा रामदेवसुद्धा त्यावर उपाय देऊ शकत नाहीत. उपाय त्यांच्या हाती नसून आपल्या हातीच आहे.  

   अन्यायग्रस्तांची एकजूट हाच तो उपाय आहे. जेव्हा अशा आंदोलनकर्त्यांच्या मागे प्रचंड लोकसंख्या उभी राहू लागते, तेव्हाच त्यांच्या शब्दामध्ये शक्ती निर्माण होत असते. मग तो शेतकरी नेता असो वा अण्णांसारखा भ्रष्टाचार विरोधी आवाज उठवणारा नेता असो. त्याची पुण्याई कुठला प्रश्न सोडवू शकणार नाही. त्याच्या मागे जनतेची एकवटण्याची किमयाच जादू करत असते. लिखाणाने, कुणाच्या बातमीतून पर्दाफ़ाश करण्याने, अन्याय दुर होत नसतो. तो दुर करण्य़ाची क्षमता लोकांच्या इच्छाशक्तीमध्ये असते. ती दाखवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कुठल्याही आंदोलनात व्रतस्थ वृत्तीने सहभागी होण्याची सवय लोकांनी अंगवळणी पाडून घेतली पाहिजे. घरात बसून टिव्हीवर अशा आंदोलनाच्या बातम्या ऐकण्यापेक्षा जवळ कुठे असे धरणे, निदर्शने असतील तर त्यात हजेरी लावणे, फ़ार कष्टाचे काम आहे काय? दुसर्‍यांच्या चुका शोधण्यात आपली बुद्धी खर्ची घालण्यापेक्षा, जर आपण अशी अघोषीत अन्यायग्रस्तांची एकजुट दाखवू शकलो, तरी खुप मोठी क्रांती होऊ शकते. अन्याय आपल्याला येऊन भिडणारा असो वा नसो, त्या अन्यायाचे निवारण करण्यात आपले योगदान म्हणुन, प्रत्येक आंदोलनात जमेल तेवढा सहभाग घेण्याचा निर्धार आपण करू शकतो का? बघा, मनोमन विचार करून त्याचे उत्तर आपल्याच मनाला सांगावे. मग आपल्यापासूनच अन्याय निवारणाचे काम सुरू होऊ शकेल. दुसर्‍या कुणाच्या तोंडाकडे आशाळभूतपणे बघण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.  (क्रमश:)
 भाग    ( २५२ )   १/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा