एक राजा होता आणि म्हणूनच तो शिकारीला आपल्या लव्याजम्यासह गेला. बाकीच्या सामान्य रयतेला शिकार करायची कुठे मोकळीक असते? तर जंगलात शिकार शोधता शोधता त्यांच्या नजरेत एक हरणांचा कळप आला. मग राजाचे पथक त्या कळपाचा भरधाव पाठलाग करू लागले. झाडीझुडपातून हरणे बेफ़ाम पळत होती आणि राजाचे सहकारी त्यांचा तितक्याच वेगाने पाठलाग करीत होते. राजा अर्थातच आघाडीवर होता. मध्येच एक मोकळे पटांगण लागले, तेव्हा आपल्या भात्यातून तीर काढून राजाने नेमही धरला. इतक्यात त्याला समोर असे दृष्य दिसले, की त्याने घोड्याचा लगाम खेचला आणि त्याचा वेग मंदावला. सगळेच थबकले. त्याचा फ़ायदा घेऊन हरणांचा कळप पुढल्या झुडपांच्या गर्दीत पसार झाला. इकडे समोरच्या दृष्याने विचलित झालेला राजा जागीच थबकून समोर दिसेल ते विस्मित होऊन बघतच राहिला होता.
तिथे त्या निबीड अरण्यात दोन शिपाई खांद्यावर तलवार भाले घेऊन पहारेकर्यासारखी गस्त घालीत होते. अर्धा पाऊण तास असा गेल्यावर, दोघे थांबले आणि त्यांनी विडीकाडी तंबाखुचा आस्वाद घेतला. मग त्या ‘ब्रेक’नंतर पुन्हा आपली हत्यारे सावरत गस्त सुरू केली. पुन्हा तासाभराने त्यांचा लंचटाईम झाला. दोघांनी हत्यारे बाजूला ठेवून सोबत आणलेली मिठभाकर शिदोरीची पुरचुंडी सोडली आणि भोजन उरकले. अजून लंचटाईम बाकी होता. दोघांनी मस्त थोडीशी डुलकी काढली. पुन्हा उठून त्यांची गस्त चालू झाली. दिडदोन तासांनी पुन्हा तंबाखू विडीचा ब्रेक आला. इतके तास राजा व त्याचा लवाजमा हा सगळा घटनाक्रम निरखून बघत होते. आता कुतूहल अतीच झाल्याने राजा पुढे झाला आणि महाराजांना बघून त्या दोघा शिपायांनी लवून मुजरा केला. नतमस्तक होऊन ते राजाच्या आज्ञेची प्रतिक्षा करू लागले. तेव्हा महाराजांनी विचारले, ‘तुम्ही दोघे इथे इतक्या घनदाट अरण्यात काय करीत आहात?’
शिपाई एकाचवेळी उत्तरले- ‘पहारा महाराज’
- पहारा? कसला पहारा? कशासाठी पहारा?
- ते माहित नाही महाराज. पण इथे आमची ड्युटी आहे. रोज येऊन इथे आम्ही गस्त घालत असतो.
- अरे, पण इथे गस्त पहारा कशासाठी?
- खरेच महाराज ते आम्हाला ठाऊक नाही.
- कोणी नेमले तुम्हाला इथे? पगार कोण देतो तुम्हाला?
- हा काय प्रश्न झाला मायबाप? आपणच आमचे पोशिंदे. आपल्याच खजिन्यातून आम्हाला पगार मिळत राहिला आहे. इमानदारीने आपली सेवा करतो महाराज.
- कमाल झाली. आम्ही पगार देतो आणि आम्हाला तुमची नेमणूक माहित नाही? तुम्ही पगार घेऊन गस्त घालीत बसलाय आणि पहारा कशासाठी तुम्हाला ठाऊक नाही?
- जी सरकार.
- हे कधीपासून चालले आहे? कधीपासून पहारा देताय इथे?
- हे बघा आमच्या आज्यापासून चालू आहे. त्याच्याकडून बापाकडे वारसा आला आणि गेली आठदहा वर्षे आम्ही पहारा देतोय. आपलं मीठ खातो आहे हुजूर. कुठे बेईमानी होणार नाही.
आता राजा शिकार विसरून गेला. तिथला पहारा व गस्त, अधिक सगळा प्रकार बघून राजा अस्वस्थ होऊन गेला होता. शिकार तिथेच सोडून तो राजधानीत परतला आणि त्याने दुसर्याच दिवशी दरबार भरवला. प्रधानापासून तमाम सरदार सरंजामदारांना फ़ैलावर घेतले. पण त्या अमूक अरण्यात दोन शिपाई तीन पिढ्यांपासून पहारा कशासाठी देत आहेत; त्याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता. खुद्द राजाला काही सुचेनासे झाले. त्यावर प्रधानाने एक युक्ती सूचवली. चौकशी आयोग नेमावा आणि राजाने ती तात्काळ स्विकारली. एका जाणत्या निवृत्त न्यायाधीशावर हे रहस्य उलगडण्याचे काम सोपवण्यात आले आणि त्याला लागेल ती मदत व माहिती देण्याचा फ़तवा राजाने काढला. त्यासाठी तात्कालीन सचिवालय, अर्काईव्ह, दफ़्तरखाने खोलून देण्यात आले. त्यानेही एखाद्या इतिहासकार व संशोधकाच्या जिद्दीने बारीकसारीक तपशील तपासले, शोधले, ताडून-पडताळून बघितले. तेव्हा कुठे वर्षभरात त्याचा चौकशी अहवाल तयार झाला. मग दरबार भरवून त्याचे वाचन करण्यात आले. तेव्हा राजासह सर्वांचेच डोळे पांढरे व्हायची वेळ आली.
गोष्ट तीन पिढ्याची होती. आजच्या राजाचा आजोबा सिंहासनाधिष्ठीत होता आणि त्याच्या सुंदर नाजूक राणीला दिवस गेले होते. अशावेळी तिला डोहाळे लागले होते. एकेदिवशी तिने शिकारीला जाण्याचा हट्ट धरला; तेव्हा राजा चिंतेत पडला. हिला अरण्यात कुणा श्वापदाने मारले, फ़ाडून खाल्ले तर काय घ्या? पण डोहाळे लागलेल्या लाडक्या राणीला तो नकार देऊ शकत नव्हता. मग त्याने राणी शिकारीला जाऊन सुखरूप परत येण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रधानावर सोपवली. त्यांनी सेनापती व कोतवाल यांना कामाला लावले आणि राणी शिकारीला जाणार होती, तिथे दोन शिपायांची ‘झेड सिक्युरिटी’ तैनात केली. राणीची हौस फ़िटली आणि ती सुखरूप राजवाड्यात पोहोचली. दोन शिपाई तिथे पहारा देत राहिले. त्यांना कोणी परत यायला सांगितलेच नव्हते. नेमणूकीप्रमाणे त्यांची ड्युटी चालू होती. इथे राणीचे दिवस पुर्ण होऊन तिला देखण्या राजबिंड्या पुत्ररत्नाचा लाभ झाला. राज्याला वारस मिळाला म्हणून सर्वत्र आनंदोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. हत्तीवरून मिठाई वगैरे वाटण्यात आली. राजा खुश होता, दरबारी समाधानी होते आणि तिकडे दोघा शिपायांचा पहारा गस्त चालूच होती.
तो सुंदर देखणा राजपुत्र कलेकलेने वाढत गेला आणि एकेदिवशी तोच नवा राजा झाला. त्याचा राज्यारोहण सोहळा दिमाखात पार पडला. सुंदरशी राजकन्या शोधून त्याचाही विवाह सोहळा पार पडला. तिकडे पहारा चालूच होता. मग या नव्या राणीला दिवस गेले आणि तिलाही पुत्र रत्नाचा लाभ झाला. राज्याला वारस मिळाला म्हणून सर्वच विधी व सोहळे यथासांग पार पडले. तिकडे पहारा चालूच होता.
नवा तिसर्या पिढीतला राजपुत्र दिवसामागे वाढत होता. तरूण झाला. राज्यकारभाराचे धडे गिरवू लागला आणि होता होता तो राजाही होऊन गेला. तिकडे पहारा चालूच होता. ज्या राणीने शिकारीचा हट्ट केला ती वयोवृद्ध होऊन मरण पावली. तिकडे पहारा चालूच होता. तिचा पुत्र राजपदावरून निवृत्त झाला आणि तिचा नातू राजा झाला. तरी तिकडे पहारा चालूच होता. तिथेही पहारेकरी शिपायांच्या तीन पिढ्या बदलल्या होत्या. आजोबा इथे कशाला पहारा द्यायला आलेला, ते नातवांनाही आठवत नव्हते. पण पहारा कसा निष्ठेने व इमानदारीने चालूच होता.
पण पहारा कशासाठी? ते ना पहारेकर्याला माहित होते, ना राजाला माहित होते, ना तिथल्या रयतेला कधी उमगले होते. पहारा अखंड चालू होता. नातवाने सत्ता हाती घेतली, त्यालाही ठाऊक नव्हते. तो शिकारीला गेला आणि त्याचे कुतुहल जागे झाले; म्हणून इतका तीन पिढ्यांचा उलगडा झाला. तो शिकारीला गेलाच नसता तर? आणि गेला तरी त्याच्या मनात समोरचे दृष्य पाहून कुतूहल जागेच झाले नसते तर? किती पिढ्या तो पहारा तशी गस्त चालू राहिली असती?
ही कुठल्या राज्यातली? कुठल्या देशातली? कुठल्या युगातली कथा वा घटना आहे? जिथली कुठली असेल वा नसेल; पण नक्कीच भारत नावाच्या देशातली नसावी. कारण आपल्याकडे तर पणतू राजा व्हायला निघाला आहे. पण कशामुळे? कशाच्या बळावर? कोणत्या हेतूने? कोणाला माहिती आहे काय? आपण सगळे शिपाई असतो. निमूट नेमून दिलेल्या जागी पहारा करावा, गस्त घालावी. कशासाठी, कोणासाठी असले प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार असतो काय? त्यांनी ‘हात’ दाखवावा, आपण साथ द्यावी. यापेक्षा सामान्य रयतेला कुठले अधिकार असतात? त्यांच्या सोहळ्यात आपला आनंद मानावा, नाचावे, खुश व्हावे. लवून मुजरा करावा. ‘होय मायबाप सरकार’ म्हणावे. बाकी विडीकाडी, तंबाखूचा बार, शिदोरी सोडून भुक भागवावी, सवड मिळाल्यास डुलकी काढावी, यापेक्षा आपल्याला तरी काय हवे असते? कशासाठी? कोण? कुठले? असले प्रश्न आपल्याला सुचतच नाहीत. की ते सुचले तरी बोलून दाखवायची हिंमत, इच्छा आपण गमावून बसलो आहोत? निश्चिंत रहा मित्रांनो, पहारा चालू आहे. किंचित फ़रक आहे, इथल्या पहार्यासाठी ‘जागते रहो’ हे घोषवाक्य नाही. ‘निर्धास्त झोपा’ हे ब्रीदवाक्य आहे आपले.
http://www.truthofgujarat.com/
उत्तर द्याहटवाya website waril secular panditana kahi suchava Bhu...
भाऊ, असाच एक किस्सा आहे. कोठे वाचला ते आठवत नाही. १९९० च्या दशकात Mumbai च्या एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत एक नवीन अधिकारी आला. शाखेचे दैनंदिन काम पाहताना त्याच्या लक्षात आले कि रोज विमानाने Jammu शाखेचे लेजर येते , त्याची एक प्रत मुंबई शाखेत बनवतात आणि मग लेजर परत पाठवल्या जाते. मग त्या अधिकार्याने तेथे photo copy करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले कि हे काम का करता? ते म्हणाले माहिती नाही आम्हाला हे काम तुमच्या आधीच्या साहेबाने नेमून दिले आहे. आमच्या आधी येथे xyz आणि abc काम करायचे. मग त्या अधिकार्याने xyz आणि abc ला विचारले कि हे काम का करायचे? त्यांना पण काही कल्पना नव्हती. मग तो अधिकारी आपल्या पुर्वासुरींकडे गेला , तर त्यांना पण काही कल्पना नव्हती कि हे काम का करायचे. आता त्या अधिकार्याला त्याची उत्सुकता शांत बसू देत नव्हती. त्याने जम्मू शाखेला फोन लावून विचारले कि लेजर रोज का पाठवता. तर जम्मू शाखेने निरोप दिला कि हे काम असेच सुरु आहे का सुरु आहे ते माहिती नाही. मग मात्र हा पट्ट्या इरेला पेटला. त्याला कळले कि गेले २५-२६ वर्षे हे असेच सुरु आहे. त्याने २५ वर्षापूर्वी तिथला अधिकारी कोण होता त्याची माहिती काढली. आणि सुट्टी टाकून तो त्या २५ वर्षापूर्वीच्या अधिकार्याकडे गेला. नमस्कार-चमत्कार झाले. ओळखी पालखी झाल्यात आणि ह्या नवीन अधिकार्याने आपले येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावर त्या जुन्या अधिकार्याने दिलेले स्पष्टीकरण असे "१९७१ साली अशी भीती होती कि जर पाकने जम्मुवर हल्ला केला आणि त्यात जम्मू शाखा नष्ट झाली तर आपल्याकडे backup असावा म्हणून दररोज लेजरची एक प्रत बनवून घेणे." युद्ध संपले पण कोणी photo copy बनवू नका असे सांगितले नाही म्हणून नंतर ची २५-२६ वर्षे ते तसेच सुरु राहिले. आपल्याकडची प्रश्न न विचारण्याची पद्धत पहिली तर हि घटना खोटी असेल असे वाटत नाही.
उत्तर द्याहटवा