‘इशरत जहान ही गुजरातमध्ये म्हणजे नरेंद्र मोदींच्या राज्यात चकमकीत मारली गेली, म्हणूनच सेक्युलरांना तिचा इतका कळवळा आहे. गुजरात बाहेर, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या सेक्युलर (कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असलेल्या) महाराष्ट्रात; मुंबई वा महाराष्ट्र पोलिसांनी इशरतला खोट्या चकमकीत अशीच ठार मारून टाकली असती तर? किती सेक्युलर मंडळींनी तिच्यासाठी आजच्याप्रमाणे छाती बडवून मातम केला असता? यातल्या कोणी तिच्या मृत्यूकडे ढुंकूनही बघितले नसते, की तिला हिंग लावून विचारले नसते. बिचारी गुजरातमध्ये मारली गेली, म्हणून इतके कौतुक. कुठल्या राज्यात खोट्या चकमकीत मारले जावे, यालाही आजच्या सेक्युलर जमान्यात महत्व आहे. म्हणून म्हणतो, सेक्युलर राज्यात मारले गेलात तर ‘कुत्रा’ सुद्धा विचारणार नाही. पण भाजपाच्या राज्यात वा त्यातही मोदींच्या राज्यात मारले गेलात; तर अजरामर झालात म्हणून समजा. म्हणूनच त्या अर्थाने इशरत नशीबवान म्हणावी लागेल.’
असे विधान मी गंमत म्हणून केलेले नाही किंवा कोणाला डिवचण्यासाठीही केलेले नाही. ती निव्वळ वस्तुस्थिती आहे. सामान्य मुस्लिम असतील तर त्यांना असेच वाटत असेल, की या सेक्युलरांना आपल्याविषयी केवळ मुस्लिम म्हणून किती आस्था आहे. स्वत:च्या धर्माच्या आणि जातीवंशाच्या हिंदूंच्या भावनांना लाथ मारून हे सेक्युलर; आपल्या दह्शतवादी, जिहादी, घातपाती संशयितांच्याही पाठीशी कसे खंबीरपणे उभे रहातात, त्याने सामान्य निरागस मुस्लिम सुद्धा भारावून जात असतील. पण यातल्या कुणाही सेक्युलराला कुठल्या मुस्लिमाविषयी आस्था आपुलकी नाही, की कुणा साध्या माणसाविषयी सुद्धा माणुसकीचा ओलावा नाही. त्यांच्यासाठी हिंदू असो, मुस्लिम वा ख्रिश्चन असो, ती सगळी सामान्य माणसे राजकारणातली पुढे करायची, झुंजवायची किंवा प्रसंगी मारून टाकायची पटावरची प्यादी मोहरे असतात. जिथे गरज असते व स्वार्थ असतो, तिथे त्यांना पुढे करायचे आणि जिथे गरज संपली वा अडचणी झाली, मग मारून टाकायचे. अडगळीत फ़ेकून द्यायचे. इतक्या निर्दयपणे व निर्ढावलेपणाने ज्याला अनभिज्ञ भोळ्या माणसांचा वापर करता येईल, त्यालाच सच्चा सेक्युलर होणे शक्य असते. त्यात मग इशरत जहानचे कुटुंबीय किंवा त्या अहमदाबादच्या गुलमर्ग सोसायटीत जाळल्या गेलेल्या अहसान जाफ़रीची पत्नी असे मुस्लिम चक्क प्याद्याप्रमाणे वापरले जात असतात. म्हणूनच मी वरचे खटकणारे विधान केलेले केलेले आहे. कारण देशाचा गेल्या सहा आठ दशकांचा इतिहासच त्याचा साक्षिदार आहे, घडामोडीच त्याची ग्वाही देतात. इशरतचा इतका कळवळा ती खोट्या चकमकीत मारली गेली म्हणून आहे, की ती मुस्लिम होती म्हणून आहे? इशरत माणुस होती म्हणून, की तिला न्याय नाकारला गेला आणि नि:शस्त्र हत्या झाली म्हणून सगळा सेक्युलर कल्लोळ चालू आहे? की यापेक्षा वेगळेच या तिच्यासाठी चाललेल्या मातमचे कारण आहे? केवळ गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेल्या चकमकीत मारली गेली म्हणून तिला इतके महत्व नाही; असा दावा कोणी करू शकतो काय? मोदींच्या विरोधात अपप्रचार करायला एक प्यादे म्हणून इशरतचा वापर झालेला आणि चालू नाही काय? मुंबईतच तिची अशी खोट्या चकमकीत हत्या झाली असती; तर किती लोकांनी असे अथक अश्रू ढाळले असते?
माझा हा सवाल फ़ेसबुकवर पोपटपंची करणार्यांपुरता मर्यादित नाही. तर इशरतच्या प्रकरणात सतत पुढे पुढे करणारे राष्ट्रवादीचे मुंब्रा येथील आमदार जीतेंद्र आव्हाड यांच्यासाठी सुद्धा आहे. परवा इशरत प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यावर आव्हाड इशरतच्या कुटुंबाला घेऊन पत्रकार परिषदेत आले. बघणार्यांना काय वाटेल? हा माणुस मुस्लिमांवर होणार्या अन्यायासाठी किती झटतो आहे. त्या आव्हाडांपासून तमाम अन्य इशरत भक्तांना म्हणूनच माझा सवाल आहे, की समजा तिला महाराष्ट्रात, मुंबईत वा ठाण्यातच खोट्या चकमकीत इथल्या पोलिसांनी ठार मारली असती; तर तुम्ही इतके अश्रू ढाळले असते काय? इशरतच्या जागी दुसरी कोणी निष्पाप मुलगी वा कोणी निष्पाप मुस्लिम इथल्या पोलिसांनी मारला असता; तर असेच ओक्साबोक्शी टाहो फ़ोडून रडला असता काय? किती सेक्युलर छातीवर हात ठेवून त्याची ग्वाही देतील? मला अगदी त्यांनी मुस्लिमांसाठी पक्षपाताने वागणेही अशा बाबतीत मंजूर आहे. त्यांचे मुस्लिमांविषयी अतोनात प्रेमही मला कबुल आहे. पण ते मुस्लिमप्रेम तरी खरे आहे काय? की केवळ इशरत मोदींच्या गुजरातमध्ये मारली गेली म्हणून हा सगळा उमाळा आहे? नेमका रडण्याचा तमाशा कोणत्या कारणासाठी आहे? मुस्लिमांविषयी आस्था आहे, की निष्पाप निर्दोष व्यक्ती चकमकीत मारली गेल्याची वेदना आहे? खोट्या चकमकीचे दु:ख आहे, की गुजरातमध्ये मारली गेल्याला आक्षेप आहे? इतरत्र खोट्या चकमकी वा निष्पाप नागरिकांना मारायला हरकत नाही, त्यासाठी टाहो फ़ोडण्याचे कारणच नाही; असा दावा आहे काय? की केवळ मोदींच्या राज्यात अशी चकमक घडली म्हणून घोर पाप झाले असा दावा आहे? तेच तर आहे. गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री नसते किंवा भाजपाचे सरकारन नसते; तर यातला कोणी अवाक्षर बोलला नसता. त्यांचे दु:ख इशरतसाठी नाही, की मुस्लिमांवर अन्याय होण्याशी यातल्या कोणाला कर्तव्य नाही. केवळ मोदी यांना कोंडीत पकडण्यासाठीचे प्यादे यापेक्षा इशरत या कोणा सेक्युलराला मोलाची वाटलेली नाही. खोट्या चकमकीविषयीचे आक्षेपही तितकेच धडधडीत कांगावखोरीचे आहेत. कारण इशरतसाठी वर्षभर अश्रूंचा पूर आणणार्या कोणाला सय्यद ख्वाजा युनूस सय्यद अयुब आठवत सुद्धा नाही. त्याच्यासाठी यापैकी कोणी अश्रू ढाळल्याचे मला तरी आठवत नाही, की दिसलेले नाही. की तो माणूस नव्हता किंवा त्याला जगण्याचा व न्यायाचा अधिकारच नव्हता असा या सर्वांचा दावा आहे?
कारण ख्वाजा युनूसच्या तुलनेत इशरत खुपच नशीबवान आहे. इशरतचे कुटुंबीय सुद्धा मोठेच नशीबवान म्हणायचे. कारण तिची चकमक नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये झाली व गुजरात पोलिसांकडून ती मारली गेली. रस्त्यात ती मारली गेल्यावर अन्य तीन संशयितांसह तिच्या मृतदेहाचाही पंचनामा गुजरात पोलिसांनी केला आणि रितसर अंत्यविधीसाठी तो मृतदेह कुटुंबियांच्या हवाली केला. हीच चकमक जर सेक्युलर महाराष्ट्रातील कॉग्रेस राष्ट्रवादीच्या सेक्युलर सरकारच्या आज्ञा पाळणार्या सेक्युलर पोलिसांनी घडवून आणली असती; तर इशरतचा मृतदेह सुद्धा तिच्या कुटुंबियांना बघायला मिळाला नसता. त्यांना तिचे अंत्यसंस्कार सुद्धा करता आले नसते आणि त्यात राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड मिरवूही शकले नसते. कारण महाराष्ट्रात अशी खोटी चकमक झाली असती, तर मृतदेह सुद्धा सापडत नाहीत. इतकी इथली सेक्युलर कायदा व्यवस्था कडेकोट आहे. त्यात खोट्या चकमकी होऊ शकतात, कुणाही संशयितांना ताब्यात घेतले जाऊ शकते. त्यांचा कस्टडीत मृत्यू होऊ शकतो आणि तो लपवण्यासाठी मृताचा देहसुद्धा विल्हेवाट लावून बेपत्ता होऊ शकतो. त्या अर्थाने इशरत नशीबवान, कारण तिचा मृतदेह मोदींच्या गुजरात पोलिसांनी गायब केला नाही. बिचारा सय्यद ख्वाजा युनूस तितका नशीबवान नव्हता. त्याच्या दुर्दैवाने त्याला गुजरात पोलिसांच्या ऐवजी कॉग्रेस-राष्ट्रवादी सेक्युलर सरकारच्या मुंबई पोलिसांनी पकडले व गायब करून टाकले. कुठे भूमीत गडप झाला, की आसमानाने त्याला आपल्यात सामावून घेतले, त्याचा आज अकरा वर्षात थांगपत्ता लागलेला नाही. मोदी हिंदूत्ववादी असल्याने अशी माणसे पळवून कायमची गायब करण्याची सेक्युलर किमया त्यांना अजून साधलेली नसावी. अन्यथा इशरतचा मृतदेह त्यांच्या पोलिसांनी कुटुंबियांच्या हवाली कशाला केला असता? तशी वेळच कशाला आली असती? मोदी सेक्युलर नसल्याचा परिणाम आहे. सेक्युलर असते तर इशरतचा मृतदेहच सापडला नसता. मग या तमाम सेक्युलरांना इशरतसाठी अश्रू ढाळण्याची संधीही मिळाली नसती.
म्हणूनच म्हणतो, की यापैकी कोणालाच इशरतविषयी आस्था नाही की आपुलकी नाही. त्यांना मणुसकीचा ओलावा नाही, की न्यायाची चाड नाही. त्यांच्यासाठी इशरतचा मृत्यू केवळ मोदी यांना कोंडीत पकडण्यासाठीची एक छान सोंगटी आहे. अन्यथा आपण यांनाच सय्यद ख्वाजा युनूससाठी इतकेच अश्रू ढाळताना व टाहो फ़ोडून रडताना बघितले असते. पण त्यापैकी कोणाच्या बोलण्यात, लिहिण्यात वा आक्षेपात आपल्याला त्य कमनशीबी ख्वाजाचे नाव तरी येताना दिसले आहे काय? इशरतच्या प्रकरणाचा अजून कोर्टात निकाल तरी लागायचा आहे. ती दोषी होती की निर्दोष; त्याची अजून खातरजमा व्हायची आहे. पण ख्वाजा युनूसचे तसे नाही. त्याची हत्या पोलिसांनी केली आणि ती हत्या सेक्युलर कॉग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना झाली, याचा निर्वाळा मुंबईच्या हायकोर्टाने आपल्या निकालातून दिला आहे. म्हणजेच त्याच्या निर्दोष व निष्पाप असण्याची ग्वाही मिळालेली आहे. पण त्या दुर्दैवी ख्वाजाच्या वाट्याला सेक्युलरांचा एकतरी सेक्युलर अश्रू आलेला आहे काय? कशाला येईल? ख्वाजा तर सेक्युलर राज्यात मारला गेला ना? मुस्लिम असला, माणुस असला व निर्दोष असला म्हणून काय झाले? आपल्या सेक्युलर राज्यात हकनाक मारला गेला ना? मग त्याला मोक्षच मिळाला. त्याच्यासाठी मातम कशाला करायचा? मारले कोणी, कुठे व कुणाच्या राज्यात यानुसार मृताचा गुन्हा, पाप, पुण्य वा दोष सिद्ध होत असतो. सेक्युलर राज्यात चकमक खरी असते. मारला जाणारा दोषीच असतो आणि त्याला कोर्टात आणायची वा मारल्यास मृतदेहही आप्तेष्टांना देण्याची ग्रज नसते. याला सेक्युलॅरिझम म्हणतात मंडळी.
Tumche agdi khare ahe sir karan janewari mahinyat Dhule ethe dangal jhali ani 14 taurun marle gele yavar awhad sahebanchya samrthkana kahich kase vatle nahi ani patrkar parishad sudha ghetli nahi
उत्तर द्याहटवा