बुधवार, २४ जुलै, २०१३

विरोधकांना प्रोत्साहन द्या, मोदींना सशक्त करा   गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा अकरा वर्षात कुठल्याच प्रमुख माध्यमांकडून वहाव्वा मिळवली नाही. गुजरातच्या मतदाराने त्यांना लागोपाठ तीनदा मोठ्या बहूमताने सतत निवडून दिले आहे आणि त्या यशात भाजपाचे श्रेय जवळपास नगण्य आहे. पण इतके असूनही पत्रकारांनी मात्र सातत्याने दंगलीच्या जखमा ओरबाडत मोदींवर शिव्याशापांचाच वर्षाव केला आहे. खरे पाहिल्यास मोदी यांचे प्रमुख विरोधक अन्य राजकीय पक्षात बसलेले नाहीत. त्यांचा प्रमुख विरोधक आहे माध्यमातील सेक्युलर विचारांची मंडळी, ज्यांनी सतत मोदींची बदनाम प्रतिमा उभी करण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावली आहे. हा माणूस गुजरातचा मुख्यमंत्री होण्यास कसा नालायक आहे व त्याच्या हाती एका राज्याची सत्ता म्हणजे त्या राज्याचा विध्वंसच होण्याची हमी देता येते; अशीच एकूण प्रतिमा माध्यमांनी सातत्याने रंगवली आहे. तरीही मोदी यांनी तीनदा मोठे यश मिळवून गुजराती मतदाराचा विश्वास आपल्यावर असल्याचे वारंवार सिद्ध केले आहे. त्यांच्या यशाचे खरे रहस्य कोणते, असा अनेकांना प्रश्न पडत असतो आणि ते रहस्य आपल्यालाच उमगले आहे असे दावे करणारे अनेक राजकीय निरीक्षक व अभ्यासक आहेत. पण त्यातल्या कुणालाही ते रहस्य अवगत झालेले नाही. अर्थात ते रहस्य देखील नाही. कुणा अभ्यासकापेक्षा राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष असलेले मुरलेले राजकारणी शरद पवार यांनी मोदींचे रहस्य नेमके सांगितले आहे. पाच सात वर्षापुर्वी एनडीटीव्ही या वाहिनीसाठी शेखर गुप्ता यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये पवार यांनी मुख्यमंत्री कसा असावा, हे सांगताना मोदींचा उल्लेख केला होता. पवार म्हणाले होते, मोदी हा असा मुख्यमंत्री आहे की गुजराती जनतेला वाटते, तो आपल्या हितासाठी वाटेल ते करू शकतो. तो विश्वासच मोदींची ताकद आहे. याचा अर्थ इतकाच, की सामान्य माणूस म्हणजे मतदार वॄत्तपत्रातील लेख वा वाहिन्यांवरील चर्चेतून आपले मत बनवत नाही, तर प्रत्यक्ष जीवनातील अनुभव त्याचे मत बनवत असतो आणि त्यानुसारच तो कौल देत असतो. 

   हे खरे असले तरी आज देशाच्या कानाकोपर्‍यात किंवा गुजरातबाहेर लोकांना मोदीविषयी आकर्षण का वाटावे? तर त्या जनमानसावर गुजरातच्या जनभावनेचा प्रभाव पडला आहे आणि त्याचे प्रमुख कारण गेल्या दहा वर्षात मोदींच्या विरोधात झालेली खोटीनाटी टिका वा अपप्रचार हेच आहे. एका बाजूला मोदी विरोधातला अपप्रचार व दुसरीकडे गुजरातमधील बदल विकासाविषयी गावगप्पातून लोकांपर्यंत पोहोचलेली माहिती. अर्थात मोदींचा विकासाचा दावा साफ़ खोटा आहे, असेही वृत्तपत्रे व त्यांचे विरोधक विविध आकडेवारी देऊन सतत सिद्ध करीत असतात. पण आकडेवारी हा शहाण्यांच्या अभ्यासाचा विषय असतो आणि लोकांना अनुभवात रस असतो. गुजरातमध्ये विनाखंडीत वीजपुरवठा होतो, हा अनुभव कोणी नाकारू शकलेला नाही. गेल्या पाच सहा वर्षात वीजेचे दर वाढलेले नाहीत हे लोकांना नाकारता आलेले नाही. कुपोषण वा आरोग्य अशा विषयात आकडे देऊन मोदींचे दावे फ़ेटाळले जात असले, तरी गुजरातमधून इतर राज्यात जाणारे सामान्य नागरिक वा तिकडे जाऊन येणारे अन्य प्रांतिय लोक, यांचा अनुभव कुठल्याही आकडेवारीपेक्षा अधिक प्रभावी असतो. कारण ते सांगणारा अनोळखी पत्रकार नसतो तर आपला कोणी परिचित असतो. आणि तो ‘मी स्वत:च्या डोळ्यांनी बघितले’ असा हवाला देत असतो. त्यावर मग लोकांचा अधिक विश्वास बसत असतो. आज देशातल्या अन्य कुठल्याही राज्यापेक्षा गुजरातमध्ये उत्तम राज्यकारभार चालू आहे, एवढे सत्य गांजलेल्या सामान्य माणसासाठी पुरेसे असते. त्याला अभ्यासात वा अर्थशास्त्रीय सिद्धांतामध्ये अजिबात रस नसतो. त्याला आपल्या जीवनात नित्यनेमाने भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण हवे असते. ते निराकरण होत असल्याचा अनुभव सांगणारे लाखो गुजराती बांधव किंवा गुजरातमधून फ़िरून आलेले अन्य प्रांतिय सांगत असतील, तर मग अपप्रचाराचा विपरित परिणाम होत असतो. लोकांना माध्यमातल्या बातम्या अविश्वसनीय वाटतात व मोदी या माणसाविषयी मोठे कुतूहल निर्माण होते. इथे आपल्याला शाहीद सिद्धीकी यांच्या विरोधाभासी वाटणार्‍या विधानाची प्रचिती येते. मोदी त्यांच्यावरील बिनबुडाची टिका व आरोप, अधिक विरोधकांनी केलेला अपप्रचार यापासून ताकद मिळवतात, असेच सिद्धीकी यांना म्हणायचे आहे. ही ताकद कशी मिळते? 

   समजा तुम्ही रेल्वे स्थानकात गाडीची प्रतिक्षा करीत आहात आणि उशीर झाल्याने त्यात गर्दी असेल व आपल्याला घुसायला जागाही मिळणार नाही, अशी भिती तुमच्या मनात असते. अशा वेळी नेमकी रिकामी गाडी आली, मग तुम्ही किती खुश होता? तोही अपेक्षाभंगच असतो. विपरित घडण्याची अपेक्षा केली आणि ती फ़सली तर माणसाला आनंदच होतो. नेमके गेल्या दहा वर्षात विरोधकांनी मोदींसाठी तेच काम करून ठेवले आहे. मोदींच्या विरोधात खर्‍याखोट्या इतक्या कंड्या व अफ़वा पिकवून ठेवण्यात आल्या, की मोदी म्हणजे कोणी भयंकर सैतान असल्याच्या समजूती आरंभीच्या काळात निर्माण झाल्या होत्या. पण पाचसात वर्षांनी अन्य मार्गाने ज्या गुजरातच्या विकासाच्या व प्रगतीच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचू लागल्या; त्यातून त्या ‘समजुतीचा’ अपेक्षाभंग झाला. पण तो अपेक्षाभंग आवडणारा होता व आवडू लागला. आज गुजरात बाहेरच्या जनतेमध्ये मोदींविषयी असे अपेक्षाभंगातून येणारे आकर्षण म्हणूनच तर त्यांच्या विरोधकांनी जन्माला घातले म्हणावे लागते. ही लोकप्रियता वा जनमानसातील आकर्षण, हीच कुठल्याही राजकीय नेत्यासाठी खरी ताकद असते व सिद्दीकी त्याकडेच लक्ष वेधत आहेत. मोदींवर टिकाच करू नये, असा सिद्दीकी यांचा अजिबात दावा नाही. तर जी टिका कराल ती मुद्देसुद व पुराव्यानिशी असावी. निदान बिनबुडाची व खोटी पडणारी नसावी, इतकाच सिद्दीकी यांचा आग्रह आहे. कारण जितकी खोटी टिका तितकी ती खोटी पडून मोदींविषयी चांगले लोकमत होण्यास हातभार लागणे अपरिहार्य आहे. त्यालाच सिद्दीकी शत्रूंकडून बळ मिळवणे म्हणतात. मोदींइतकेच किंवा त्यांच्या जवळपास पोहोचू शकेल; असे काम अनेक मुख्यमंत्र्यांनी देशात केलेले असेल. नविन पटनाईक उगाच तीनदा बहूमत मिळवू शकलेले नाहीत. पण त्याचा फ़ारसा गवगवा कुठे नाही. त्यांच्याबद्दल ओरिसाबाहेर कुठे कोणाला कौतुक नाही. पण मोदींबद्दल आकर्षण कशामुळे आहे? रोजच्यारोज मोदींच्या नावाने देशव्यापी जो शिव्याशाप देण्याचा खेळ चालू आहे, त्याचाच तो परिणाम नाही काय? आणि आता मोदी स्वत:च त्यात कमालीचे पारंगत झालेले आहेत. मोठ्या खुबीने ते आपल्या विरोधकांचा आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी उपयोग करून घेत असतात. आणि इथे मी विरोधकांचा म्हणतो तेव्हा माध्यमातल्या सेक्युलर पत्रकार विद्वान एवढेच नाही, चक्क राजकीय विरोधी पक्षांचाही मोदी वापर करून घेतात. ही मोदींची लबाडी त्यांच्या विरोधकांनी ओळखलेली नाही.  

   जुलै महिन्याच्या आरंभाचीच घटना घ्या. मोदी इथल्या कुठल्या वाहिनी वा वृत्तपत्रांना मुलाखत देत नाहीत. पण अकस्मात त्यांनी युरोपातील रॉयटर नामक एका वृत्तसंस्थेला खास मुलाखत दिली. त्यात दंगलीचा विषय निघाल्यावर त्यांनी गाडीखाली येणार्‍या कुत्र्याच्या पिल्लाचे उदाहरण दिले. त्यातून वादंग निर्माण होईल किंवा वाद उपस्थित केला जाईल, हे न समजण्याइतके मोदी अजिबात दुधखुळे नाहीत. पण त्यांनी मुद्दाम हेतूपुर्वक तो वाद करायची संधीच माध्यमांना दिली. पण त्यावरचा वाद माध्यमे एकटीच रंगवू शकत नाहीत. आपण मोदींचे राजकीय विरोधक नाही, तर फ़क्त घडणार्‍या घटना व राजकारणात बोलल्या जाणार्‍या गोष्टीच लोकांसमोर मांडतो, असे नाटक माध्यमांना करावेच लागते. त्यासाठी मग माध्यमांना, पत्रकारांना वाद उकरून काढण्यासाठी मोदी विरोधकांना डिवचणे व बोलते करणे भाग होते. हे विरोधकही मोदींवर शिव्यशापांची बरसात करण्याची आणखी एक संधी म्हणून त्यात कंबर कसून उतरतात. मोदी समर्थक व भाजपाचे प्रवक्तेही छान नाटक रंगवतात. त्यातले किती शब्द वाचणार्‍या वा ऐकणार्‍यांच्या लक्षात रहातात? स्मरणात उरते फ़क्त मोदी हे नाव. ह्याला जाहिरात तंत्र म्हणतात. डोकोमो, रिलायन्स. जॉन्सन, आयडिया, व्होडाफ़ोन अशा कंपन्या सातत्याने जाहिराती बदलत असतात. त्यात त्यांचे नाव म्हणजे ब्रान्ड लोकांच्या मनात घर करील, हेच सुत्र असते. शब्दरचना प्रत्येक जाहिरातीमध्ये बदलते; लक्षात रहाते कंपनी वा ब्रान्डचे नाव तेवढे. हेच गेल्या पाचसात वर्षात मोदींनी यशस्वीरित्या राबवलेले हे मार्केटींगचे तंत्र आहे. प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक माध्यमातला वक्ता व सर्वच अभ्यासक मोदींचेच नाव सतत घेतात, म्हणजे या माणसात काही तरी विशेष आहे; अशी समजून सामान्य माणसात दृढ होते आणि तेवढेच मोदींना अपेक्षित आहे. माध्यमांनी रोजच आपले गुणगान करावे, ही त्यांची अपेक्षाच नाही. मात्र प्रत्येकाच्या तोंडी मोदी असावा, ही ‘माफ़क’ इच्छा आहे. आणि ती अपेक्षा मोदी समर्थकांपेक्षा प्रत्येक मोदी विरोधकाने जोमाने पुर्ण केलेली आहे. त्या रॉयटरच्या मुलाखतीमध्ये खरेच काही वादग्रस्त नव्हते. तेच शब्द दुसरा कोणीही बोलला तर त्यावरून वाद झाला नसता. पण मोदी बोलले आणि त्यांनी वाद मुद्दाम ओढवून घेतला. दमडी कर्च न करता त्यांच्या नावाचा किती जप झाला? मोदी मार्केटींग करतात हा त्यांच्यावरचा आक्षेप आहे. पण त्यांच्या या मार्केटींगमध्ये त्यांना मोफ़त सेवा कोण देतो आहे? त्यांचे विरोधकच नाहीत काय? माध्यमातल्या विरोधकांना चिथावणी देऊन मोदी आपल्या मार्केटींगसाठी आपल्या राजकीय विरोधकांना किती सहजगत्या फ़ुकटचे वापरून घेतात, त्याचा ती मुलाखत हा उत्तम नमूनाच आहे. हे कौशल्य मोदींचे समर्थक असतील त्यांनीही तसेच वापरले तरी मोदींना त्यांच्याकडून मोठीच मदत मिळू शकेल. मोदींवरील टिका व आरोप करणार्‍यांना प्रोत्साहन हा त्यातला एक मार्ग आहे.

1 टिप्पणी: