रविवार, २८ जुलै, २०१३

भाजपाच्या मोजपट्टीने मोदींचे आकलन चुकीचे: (इंदिराजी ते नरेंद्र मोदी -१८)  गेल्या वर्षभरात अनेक मतचाचण्या समोर आलेल्या आहेत. त्यात मोदींना झुकते माप मिळते आहे आणि त्यांच्या तुलनेत भाजपाला पक्ष म्हणून मिळणारा मतदाराचा प्रतिसाद कमी दिसतो आहे, त्याची ही अशी कारणमिमांसा आहे. नुसता भाजपा घेतला तर त्याची झेप कॉग्रेसच्या व युपीएच्या नाकर्तेपणामुळे फ़ार तर २५ टक्के मतांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळेच त्याला १९० ते दोनशे जागांचा टप्पा फ़ार तर गाठता येऊ शकतो. त्याला लोकसभेतील बहूमताचा टप्पा गाठायचा तर अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणारच. पण त्याच भाजपाचे नेतृत्व नरेंद्र मोदी करणार असतील तर? लगेच परिस्थिती बदलते. जशी कॉग्रेसचे नेतृत्व केसरी करताना व सोनिया करताना परिस्थिती बदलते तशीच ही गोष्ट आहे. नेता कोण यावर कार्यकर्त्यांमध्ये व जनतेमध्ये वर्तनाचा बदल घडून येत असतो. मोदी यांना सामान्य माणसाकडून मिळणारा प्रतिसाद व कार्यकर्त्यांमधला उत्साह; त्याचेच निदर्शक आहे. अनेक चाचण्यात पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या नावाला देशभरात सर्वाधिक पसंती मिळते, असे दिसून आलेले आहे. पण त्याचवेळी मोदीशिवायचा भाजपा व त्यांच्या नेतृत्वाखालचा भाजपा; यांना मिळणार्‍या प्रतिसादामध्ये प्रचंड तफ़ावत त्यामुळेच दिसते. ती अनेक जाणकार पत्रकारांना समजून घेणे अवघड होते, कारण त्यांना जिंकलेल्या जागांचे कौतुक अधिक आहे, पण पक्षाची पात्रता ही त्याच्या पायाभूत मतांच्या टक्केवारीवर ठरत असते, त्याकडे हे लोक कधीच गंभीरपणे बघत नसतात. राजीव गांधींनी अवघी पाच टक्के मते अधिक मिळवली तर अभूतपुर्व ४०० हून अधिक जागा मिळवल्या होत्या. विरोधकांची फ़ाटाफ़ूट व दोन टक्के मते अधिक मिळता इंदिराजींनी दुसर्‍यांदा दोनतृतियांश बहूमत मिळवले होते. पण त्यासाठी किमान तीस पस्तीस टक्के मतांचा भक्कम पाया कॉगेसपाशी होता. बहूमताच्या वा पर्यायी पक्ष होण्याच्या स्पर्धेत उतरण्यासाठी राष्ट्रीय पक्षाला वीस टक्के मतांचा पाया पक्का असायला लागतो. मागल्या दोन दशकात व सहा लोकसभा निवडणूकीत भाजपाने १९ टक्क्याच्या वर आपली मते कायम टिकवली आहेत. त्यामुळेच तो पक्ष आजही बहूमत गाठण्याच्या व सत्तेच्या स्पर्धेत उतरण्याच्या किमान पात्रतेवर ठाम उभा आहे. सवाल आहे, तो त्या पायावरून झेपावण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाचा व त्याच्या लोकप्रियतेचा. गरज आहे जनमतावर स्वार होऊ शकणार्‍या नेत्याची आणि त्याच्याच अभावी मागल्या दोन निवडणुकीत भाजपाला फ़टका बसला होता. आज त्यांच्या गोटात लोकप्रियतेमध्ये सोनियांना वा नेहरूंच्या वारसाला मागे टाकण्याच्या कुवतीचा नेता आहे. तिथे मोठा फ़रक पडत असतो. म्हणूनच आकड्याच्या जंगलात शिरताना, त्यातल्या वाटा व रस्ते नेमके समजून घेण्याची गरज असते. नुसत्या जिंकलेल्या जागा किंवा संपादन केलेली सत्ता वा जमवलेली समिकरणे; भावी निवडणुकीचे आडाखे बांधायच्या कामाची नसतात, तर मतांची टक्केवारी, बांधील मते, बदलणारी मते, परिस्थिती व जनमानसावर स्वार होऊ शकणार्‍या नेतृत्वाचा प्रभाव; असे अनेक मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. आणि जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यासारखा लोकांना स्वप्ने दाखवणारा आणि लोकांच्या स्वप्नावर स्वार होणारा नेता स्पर्धेत असतो; तेव्हा तर अशा बारीकसारीक तपशीलाला खुपच महत्व येत असते. 

   भारतीय निवडणुकीच्या इतिहासात भावी पंतप्रधान कोण अशी चर्चा सहसा झालेली नाही. शिवाय कॉग्रेसचे नेहरू, इंदिराजी व नंतर राजीव किंवा अलिकडे सोनिया गांधी ही नावे वगळता, कधी इतक्या गंभीरपणे भावी पंतप्रधान कोण अशी चर्चा झाली नव्हती. राहुल गांधी हे नाव गेल्या दोनतीन वर्षात पुढे आले आणि त्याला पर्याय म्हणून मोदी हे नाव पुढे आले. आज त्यावर तावातावाने चर्चा करणार्‍या किंवा त्यातल्या त्रुटी दाखवणार्‍यांची मला एकाच गोष्टीसाठी कींव करावीशी वाटते. मोदी यांच्या व्यक्तीमत्वापासून त्यांच्या स्विकारार्हतेबद्दल शंका काढणार्‍यात सर्वात पुढे असणार्‍यांनी जरा आपल्या मागल्या दहा वर्षातल्या विधाने वा युक्तीवादाची आधी चाचपणी करावी. त्यांनाच त्यांच्या बुद्धीची लाज वाटल्याशिवाय रहाणार नाही. ज्यांनी या दहा वर्षात मोदी हा माणूस गुजरातचा मुख्यमंत्री असायलाच नालायक आहे व अपात्र आहे, असे ठरवण्यासाठी आपली सर्व बुद्धी पणाला लावली होती; तेच तमाम लोक आज तोच मोदी देशाचा पंतप्रधान व्हायला कसा अपात्र आहे सांगण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. पण ज्याला मुख्यामंत्री म्हणून नालायक ठरवण्यात केलेले कष्ट कुठे व कसे वाया गेले, त्याचे आत्मचिंतन त्यांनी एकदा तरी केले आहे काय? जर त्यांची बुद्धीवाद व युक्तीवाद खरे व योग्य असते, तर आज हा माणुस गुजरातचा मुख्यमंत्री सुद्धा राहिला नसता. मग पंतप्रधान पदासाठी त्याच्या नावाची चर्चाच दूर राहिली असती ना? पण अशा तमाम जाणकारांनी केलेला अपप्रचार व बदनामीचे अडथळे ओलांडून तो तिसर्‍यांदा स्वबळावर मुख्यमंत्री म्हणून निवडून आला आहे आणि आता तर थेट पंतप्रधान पदाचा स्पर्धक बनला आहे. तर त्याचे कुठे चुकले नसून आपलेच आकलन फ़सले आहे, हेसुद्धा अशा शहाण्यांच्या अजून लक्षात आलेले नाही. त्यांच्याकडून भावी राजकारण वा निवडणुकीच्या भाकिताची अपेक्षा करता येईल काय? ज्याला इतका बदनाम केला, तो मुळात त्यानंतरही देशातील सर्वोच्च पदाचा दावेदारच कसा होऊ शकतो, याचा अशा अभ्यासकांनी मुळात अभ्यास करायची गरज आहे. तोही न करता जे मोदींच्या पंतप्रधान पदाच्या विषयावर बोलतात, त्यांचा कुठलाही दावा किंवा निष्कर्ष विचारात घेण्याच्याही लायकीचे असू शकत नाहीत. 

   म्हणूनच मतचाचण्यांचे आकडे किंवा त्यापासून अशा राजकीय पंडितांनी काढलेले निष्कर्ष निरूपयोगी आहेत. आपण कशाबद्दल बोलतोय किंवा कोणाबद्दल बोलत आहोत; त्याचाचा त्यांना पत्ता नाही, इतकाच त्याचा अर्थ आहे. त्यांना निवडणूकीतल्या मतांच्या टक्केवारीची महत्ता माहित नाही. त्यांना निवडणुक निकालांचा इतिहास माहित नाही. त्यांना पक्षाच्या लोकप्रियतेवर व्यक्तीमत्वाची मात कधी व कशी होते, त्याचा थांगपत्ता नाही. ज्यांना व्यक्तीकेंद्री राजकारण वा त्यातून उदभवलेल्या त्सुनामी निवडणुकांचे निकष माहित नाहीत; त्यांनी मोदी, त्यांच्या लोकप्रियतेचे मतचाचणीतून येणारे निष्कर्ष किंवा त्यामागची लोकभावना याबद्दल मतप्रदर्शन करण्यात काही अर्थ असतो का? नरसिंहराव किंवा सीताराम केसरी यांच्यापेक्षा अधिक यश सोनिया मिळवू शकलेल्या नाहीत, तर केवळ जागांची व संख्येची जुळवाजुळव करून त्यांनी सत्तेचा पल्ला गाठला आहे, हे साधे राजकीय सत्य ज्या राजकीय पंडितांना उमगलेले नाही किंवा लपवायचे सते; त्यांच्याकडून मोदी नावाचा येऊ घातलेला झंजावात किंवा घुमणार्‍या वादळाचे आडाखे बांधले जातील, अशी अपेक्षा करणेच मुर्खपणा असू शकतो. त्यामुळेच मग वाहिनीवर चाचण्यांचे आकडे अंदाज सांगतानाच विश्लेषण करणारे जुनेजाणतेही अगदी केविलवाणे वाटू लागतात. भाजपातील अंतर्गत वादविवाद व स्पर्धा बघताना त्यापैकी राजकीय अभ्यासकांना चार दशकांपूर्वीच्या कॉग्रेसमधील इंडीकेट सिंडीकेट यांच्यातली हाणामारी व तात्कालीन राजकीय उलथापालथ आठवत नसेल; तर त्यांचा राजकीय अभ्यास व जाण म्हणजे तरी नेमके काय; अशी शंका येते. सहाजिकच मोदी नावाचे वादळ घुमते आहे आणि त्यातूनच एक चक्रावात येऊ घातला आहे, त्याची चाहुल ज्यांना लागलेली नाही, त्यांना मोदींचे आकलन करता येत नाही. 

   इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे भाजपासाठी नरेंद्र मोदी ही जमेची बाजू आहे. पण त्याचावेळी मोदींची पंतप्रधान व्हायची महत्वाकांक्षाच असेल; तर त्यांच्यासाठी भाजपाचे आजचे राष्ट्रीय नेतृत्व किंवा पक्षश्रेष्ठी हा बोजा आहे. नेमकी हीच स्थिती चार दशकांपुर्वी इंदिरा गांधी व तेव्हाच्या कॉग्रेस पक्षाची होती. इंदिराजींना डाव्यांच्या पाठींब्यावर मुदत पुर्ण होईपर्यंत सरकार चालवणे अशक्य नव्हते. पण त्यांनी त्यापेक्षा मध्यावधी निवडणुकीचा जुगार खेळला होता. कारण त्यांना संसद व सरकार दोन्हीवर एकमुखी अधिकार हवा होता. नरेंद्र मोदी हा नेमका त्याच मानसिकतेचा व स्वभावाचा माणुस आहे. आणि म्हणून मोदींची देशाच्या सर्वोच्च पदासाठी महत्वाकांक्षा असेल, तर तो माणूस अन्य पक्षांच्या पाठींब्याने म्हणजे एनडीएचा पंतप्रधान होण्याची अजिबात शक्यता नाही. पंतप्रधान व्हायचे तर पाठीशी स्वत:चे हुकमी बहूमत असले तरच मोदी पंतप्रधान होतील आणि ते एनडीएचे वा भाजपाचेच बहूमत असून चालणार नाही. ज्या भाजपावर मोदींचे प्रभूत्व असेल; अशाच भाजपाचे बहूमत पाठीशी असेल, तेव्हाच मोदी पंतप्रधान व्हायला पुढे येतील. आणि ती स्थिती येण्याच्या दिशेने निवडणुकात परिस्थिती निर्माण व्हावी, असा प्रयास मोदी यांनी दोन तीन वर्षापासून चालविला आहे. त्यात युपीए व कॉग्रेस पक्षाने विविध घोटाळ्यातून मोदींना छान साथ दिली आहे. त्यामुळे अजून राष्ट्रीय राजकारणात थेट प्रवेश न करताही मोदींकडे मोठ्या लोकसंख्येने अपेक्षेने बघावे, अशी परिस्थिती आयतीच तयार झाली आहे. पक्षातील अडथळे ओळखून दोनचार वर्षात मोदी यांनी पद्धतशीर आपले स्थान कार्यकर्ते, पाठीराखे व संघटनात्मक ढाच्यामध्ये निर्माण केले आहे. अनेक बारकावे तपासले तर १९६७-७० या कालखंडातून इंदिरा गांधी हे व्यक्तीमत्व जसे राजकीय क्षितीजावर उगवले, तसाच मोदी यांचा उदय झाल्याचे लक्षात येऊ शकेल. आणि म्हणूनच इंदिरा गांधींच्या भोवती फ़िरलेले चार निवडणूकातले राजकारण, त्यातले आकडे व निकाल यांच्या संदर्भानेच मोदींच्या पंतप्रधान होण्याच्या शक्यतेचा पडताळा घ्यावा लागेल. एवढ्या पार्श्वभूमीनंतर आता आपण त्या चार लाटेवर स्वार झालेल्या व्यक्तीकेंद्री चार निवडणुकीतली आकडेवारी तपासून बघायला हरकत नसावी. 
(अपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा