मंगळवार, ९ जुलै, २०१३

अपप्रचारातून लोकप्रियता कशी मिळते? गेल्या दहा वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडात सेक्युलर विचारवंत, माध्यमे व राजकीय पक्षांनी अखंड व अव्याहत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात खर्‍याखोट्या गोष्टींचा अपप्रचार केला, हे आता कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळेच असा माणुस नामोहरम होण्याऐवजी थेट देशाचा पंतप्रधान होण्यापर्यंत कशी मजल मारतो आणि त्याचा पक्ष त्याला इतकी धाडसाने संधी कशाला देतो; असा प्रश्न त्याच तमाम सेक्युलर मंडळींना भेडसावतो आहे. शिवाय त्याच वाहिन्या व माध्यमांनी वारंवार घेतलेल्या चाचण्यांमध्येही मोदींची देशातली लोकप्रियता सतत वाढत असल्याचेच आकडे येत आहेत. त्यामुळे तर अशा सेक्युलर लोकांना वेड लागण्याची पाळी आलेली असून अनेक बेताल कारवाया त्यांच्याकडून होत आहेत. त्याचे मूळ कारण असे, की आपण इतका अपप्रचार व बदनामी करूनही मोदींविषयी जनमत कलुषित कशाला झालेले नाही; हा प्रश्न त्यांना उलगडलेला नाही. एक गोष्ट खरी आहे, की कुठल्याही खोट्या अफ़वा उठवून वा खोट्यानाट्या गोष्टी पसरवून एखाद्या व्यक्ती वा संस्थेबद्दल जनमत कलूषित करता येत असते. पण असे म्हणतात, की तुम्ही सर्व लोकांना सर्वकाळ फ़सवू शकत नसता. काही काळ सर्व लोकांना व सर्वकाळ काही लोकांना फ़सवता येते. पण सर्वांना सर्वकाळ फ़सवणे शक्य का नसते? तर सर्वकाळात कधीतरी त्यातल्या कोणाला तरी सत्य व वस्तुस्थितीचा शोध लागणे शक्य असते. आणि तसा शोध ज्याला कोणाला लागतो, त्याला ती माहिती इतरांपर्यंत पोहोचवल्याखेरीज चैन पडत नाही. त्यायोगे मग सत्य फ़ैलावत जाते आणि असा खोट्याचा पर्दाफ़ाश होत असतो. मोदी यांच्या बाबतीत नेमके तसेच झाले आहे. हे माझ्या अनुभवातून मी सांगू शकतो.

   त्यावेळी म्हणजे पंचवीस वर्षापुर्वी मी ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक म्हणून काम बघत होतो. १९८५ च्या मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेनेला स्वबळावर सत्ता मिळाली आणि त्या संघटनेला नवी संजीवनी मिळाली. त्यानंतरचा हा काळ आहे. लोकसभा विधानसभा निवडणूकीत जबरदस्त अपयश पचवलेल्या शिवसेनेने मग नवी उभारी घेण्याचा ध्यास घेतला होता. योगायोगाने त्याच काळात विरोधी पक्षात सत्तेशिवाय घुसमटलेल्या शरद पवारांनी पुन्हा माहेरी कॉग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि विरोधी राजकारणात मोठीच पोकळी निर्माण झालेली होती. तीच जागा घ्यायला शिवसेना जोमाने पुढे सरसावली. शरद पवार आमदार घेऊन कॉग्रेसमध्ये गेले तरी त्यांच्यामागे उभा राहिलेला कॉग्रेसविरोधी तरूण कार्यकर्ता पोरका झाला होता आणि नवा पक्ष व नेता शोधत होता. त्यालाच कुशीत घ्यायला नव्या दमाचे मुंबईतील शिवसेना नगरसेवक सर्वत्र फ़िरू लागले. त्यांनी खेडोपाडी शिवसेनेच्या शाखा स्थापनेचा सपाटा लावला होता. गावाच्या वेशीवर स्वागत करणारे शाखेचे फ़लक व भगवे फ़डकणारे झेंडे बघून पवारही बेचैन झाले होते. नुसते फ़लक व झेंडे लावून पक्षाची बांधणी होत नाही, असे टोमणे पवारांनी मारले होते आणि तेच छापायला उत्सुक उतावळे असलेल्या सेक्युलर माध्यमांनी त्याच शब्दांचा आडोसा घेत सेनेची खिल्ली उडवण्यात धन्यता मानली होती. त्याचवेळी आणखी एक अपप्रचार शिवसेनेच्या विस्तारासंबंधाने चालू होता. मुंबई पालिकेत पैसे खाणारे व भ्रष्टाचार करणारे त्याच पैशातून गावोगावी शाखा काढत आहेत; असे जनता दलाच्या नेत्या व पुर्वाश्रमीच्या समाजवादी नेत्या मृणाल गोरे सातत्याने करीत असत. त्यांना अर्थातच मोठीच प्रसिद्धी मिळत होती. पण त्यातूनच शिवसेनेला अधिक लोकप्रियता मिळत गेली होती. कारण मृणाल वा पवार यांच्या आरोपात अर्धसत्य होते आणि तेच त्यांच्यावर उलटत होते.

   शिवसेनेचे नगरसेवक किंवा सत्ताधारी पालिकेच्या कारभार अत्यंत स्वच्छ पद्धतीने करत होते असे कोणी म्हणू शकणार नाही. त्यामुळेच सेनेकडूनही पालिकेत भ्रष्टाचार होतो, यात जरूर तथ्य होते. पण तोच पैसा गावोगावी शाखा स्थापन करण्यासाठी केला जातोय; हे धडधडीत असत्य होते. त्या शाखा स्थापणारे तरूण आपल्या खि्शाला चाट लावुन तिथे शाखा स्थापण्यापासून कार्यक्रमाचे आयोजन करीत होते. त्यांनी वा त्यांच्या आप्तस्वकीयांनी असे आरोप ऐकले; तर त्यांना मृणाल किंवा पवार थापाडेच वाटणार ना? त्याच काळात एका शिवसेनेच्या नेत्या समवेत मला परभणीला जाण्याचा योग आलेला होता. विमानाने आम्ही नांदेडला पोहोचलो आणि तिथून जीपने आम्हाला परभणीला नेण्यात आले. माझाही असा समज होता, की हा सगळा खर्च तो सेनानेताच आपल्या खिशातून करतो आहे. पण तिथे विविध सभा व बैठका चालू असताना माझ्या कानावर जी कुजबुज पडली, त्यातून लक्षात आले, की आमच्या नांदेडपर्यंतच्या विमान भाड्याचे पैसेही त्या तरूण कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून भरलेले होते. एकूण खर्चाच्या तणातणीची चर्चा माझ्या कानावर पडली तरी ती बडबड करणार्‍यांना त्याचा पत्ता नव्हता. ते समजल्यावर मी संबंधित नेत्याला म्हणालो, पुन्हा मुंबईला परत जाण्याचा प्रवास मी विमानाने करणार नाही. या गरीब कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून खर्च केला असेल, तर माझ्या विमान प्रवासावर ती रक्कम खर्च करणे मला योग्य वाटत नाही. मग येताना आम्ही सगळेच रेल्वेने परतलो. पण मुद्दा तो नाहीच. मुद्दा आहे तो अर्धसत्याचा. तिथल्या भागात वा अन्यत्र जे लोक मृणाल वा पवार यांचे आरोप वृत्तपत्रातून वाचत वा भाषणातून तेव्हा ऐकत असतील; त्यांचे मत काय बनले असेल? ही इतकी मोठी माणसे बेधडक खोटे बोलतात. असेच त्या लोकांना वाटणार ना? कारण तिथे होणारा खर्च तिथले तरूण खिशातून करतात हे लोकांना अनुभवातून दिसत व माहित होते. पण त्या असत्यामुळे दुसरा खरा आरोपही खोटाच पडणार ना? जर इथे शाखेसाठी मुंबईतून पैसा आणला जात नाही व खर्च होत नाही; तर मुंबई पालिकेच्या कारभारात सेनेचे नगरसेवक पैसे खातात, यावर तरी कोण विश्वास ठेवणार?

   थोडक्यात सेनेच्या शाखा विस्ताराबद्दल जे खोटे बोलले गेले ते उघडे पडू लागले; तसे त्याला जोडून केलेले खरे पालिका भ्रष्टाचाराचे वास्तव आरोप देखील लोकांना खोटेच वाटु लागले. परिणामी महाराष्ट्रातील तात्कालीन भ्रष्ट कॉग्रेस सरकारच्या कारभारावरला उपाय म्हणून शिवसेनेकडे मुंबई बाहेरचा मतदार आशेने पाहू लागला. मग ठाणे पुण्याच्या पलिकडे पंचविस वर्षात मजल मारू न शकलेल्या सेनेने औरंगाबाद पालिकेत थेट सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येण्यापर्यंत मजल मारली. खोट्या आरोप व अपप्रचाराचा असा लाभ मिळत असतो. त्या काळात माध्यमांना छपाई क्षेत्रापुरत्या मर्यादा असल्याने सेनेच्या बाबतीतला अपप्रचार मर्यादित राहिला. मोदींच्या काळात माध्यमांचा विस्तार अफ़ाट झाल्याने दिवसरात्र अफ़वांचे जणू रानच पिकवण्यात आले. सहाजिकच त्या अपप्रचार व खोट्या आरोपांचा दिवसरात्र रतीब घातला गेला. त्याचा विस्तार देशव्यापी असल्याने मोदींची आरंभीच्या काळातील कलंकीत वाटणारी प्रतिमा हळूहळू बदलत गेली. जसजशी गुजरात व मोदींचा कारभाराविषयी वास्तविकता लोकांच्या समोर येत गेली, तसतशी माध्यमे आणि सेक्युलर थापेबाजी उघडी पडत गेली. आज तर अशी विचित्र परिस्थिती आलेली आहे, की माध्यमांची व सेक्युलर मंडळींची त्या बाबतीतली विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे. आज मोदी यांच्यावर कोणी कितीही खरा व गंभीर आरोप केला, तरी त्याच्यावर लोकांचा विश्वास बसू नये अशी स्थिती येऊन ठेपली आहे. किंबहूना सेक्युलर लोक व माध्यमे मोदींवर आरोप करतात, म्हणजेच त्याच्या नेमके उलटच काही घडलेले असणार; असे लोकांना वाटू लागले आहे. म्हणूनच जितक्या कंड्या आणि अफ़वा पसरवल्या जात आहेत, त्यातून मोदींविषयी शंका व संशय निर्माण होण्यापेक्षा त्यांच्याबद्दल जनमानसातला आत्मविश्वास वाढत चालला आहे. मग त्याचेच प्रतिबिंब विविध मतचाचण्यांमध्ये पडत असते.

   अगदी ताजा विषय घ्या. याच मोदींचा विषय घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपासोबतची आघाडी मोडली. खुद्द भाजपात अडवाणी सारख्या नेत्याने बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला. इतके होऊनही त्याच बिहार राज्यातल्या मतचाचणीत नितीशच्या चौपट लोकांनी मोदींच्या नावाला कौल दिला आहे. ह्या एकूणच मोदी लोकप्रियतेचे खरे श्रेय म्हणूनच त्यांच्या समर्थकांपेक्षाही त्यांच्या विरोधकांना द्यावे लागेल. त्यातही पुन्हा मोठे श्रेय मोदींच्या विरोधात सतत कंड्या पिकवून त्यांना बदनाम करण्यासाठी जे राबले, त्यांच्या अपप्रचारालाच मोदींच्या लोकप्रियतेचे श्रेय म्हणू्नच द्यावे लागेल. मात्र ते श्रेय घ्यायला या सेक्युलर लोकांपैकी कोणी पुढे येत नाही आणि दुसरीकडे आपण कुठे फ़सलो व मोदींच्या पंतप्रधान पदाचा मार्ग सोपा केला; त्याचाही विचार करायची या मुर्खांना गरज वाटत नाही. उलट जे अपप्रचाराचे तंत्र फ़सलेले आहे, तेच पुढे चालविले जात असून खुद्द मोदी आता त्याचा आपल्या फ़ायद्यासाठी उपयोग करून घेण्यात वाकबगार झालेले आहेत. म्हणूनच थेट कुठल्या माध्यमाशी न बोलता किंवा उघडपणे स्वत:विषयी कुठलीही माहिती न देता; आपल्याविषयी कंड्या पिकवल्या जातील, असे मोदी मुद्दाम वागतात की काय अशी कधीकधी शंका येते. उत्तराखंडात थेट मोदी जाऊन पोहोचल्यावर माध्यमांना कळले आणि पुढल्या बातम्या वादग्रस्त झाल्या. अकस्मात त्यांनी बिहारच्या कार्यकर्त्यांशी टेलेसंपर्क साधला. कुणाच्या ध्यानीमनी नसताना आपला विश्वासू सहकारी अमित शहाला उत्तरप्रदेशचा प्रभारी नेमले. अशा कित्येक कृती दाखवता येतील, की वादग्रस्त व्हाव्यात व आपल्या अपप्रचारकांनी त्यावर तुटून पडावे; असे मोदी मुद्दाम वागल्याचे दिसेल. स्वत: अयोध्या वा कुंभमेळ्यात जायचे टाळून अमित शहाला अयोध्येत पाठवून त्यांनी सराईतपणे राममंदिराचा विषय माध्यमांना व विरोधकांना मतदार समोर आणायला भाग पाडले. थोडक्यात आता आपले पत्ते मोदी मोठ्या हुशारीने खेळत आहेतच. पण त्यांच्या विरोधकांच्या हाती असलेले पत्तेही, मोदींना हवे तसेच खेळायलाही मोदी भाग पाडतात, असेच वाटते.

२ टिप्पण्या: