गुरुवार, ११ जुलै, २०१३

एका फ़डतूस कफ़नीची गोष्ट



 एक राजा शिकारीला गेला होता. कुठेसे हरण दिसले आणि बेभान होऊन त्याचा पाठलाग करताना राजाचे साथी मागे राहून गेले आणि तो एकटाच निबीड अरण्यात भरकटला. असा एकाकी राजा डाकूंच्या तावडीत सापडला. तेव्हा त्यांनी त्याला लुबाडलेच; पण त्याच्या दागदागिन्यांसह अंगावरची उंची भरजरी वस्त्रे देखील मूल्यवान म्हणून चोरट्यांनी काढून घेतली. बिचार्‍या राजाला अगदी विवस्त्र करून जंगलात सोडून दिले. नशीब जवळपास कोणी नव्हते. कारण राजाची अब्रूच उघडी पडली होती. झाडाची मोठमोठी पाने घेऊन राजाने आपली अब्रू झाकली आणि पुन्हा आपल्या राजधानीकडे प्रस्थान ठेवले. त्या निर्जन प्रदेशातून जाताना त्याला एक गोसावी संन्याशांची टोळी भेटली. यात्रेला निघालेल्या साधूंचा तिथे विश्रांती घेण्यासाठी मुक्काम होता. तेव्हा झुडपाच्या  आडूनच राजाने त्यांना आपली चाहूल दिली. पण तो विचित्र परिस्थितीमुळे समोर यायला तयार नव्हता. मग झुडपातूनच त्याने आपली करुणास्पद कथा संन्याशांच्या गुरूला कथन केली. त्याने काहीही न बोलता आपल्या झोळीतून एक नवीकोरी कफनी काढून झुडपात फ़ेकली आणि परिधान करून समोर यायला राजाला सांगितले. अंगभर वस्त्र मिळाल्याने राजा सुखावला आणि कफ़नीधारी होऊन झुडपातून साधूंच्या कळपात आला. त्याने मन:पुर्वक गुरूंचे आभार मानले आणि राज्यात परतल्यावर हवे ते दान द्यायचे वचन दिले. त्यावर गुरूजी हसले. म्हणाले,

   राजन, आम्ही पडलो साधू संन्याशी, आम्हाला संपत्ती, पैशाचा मोह नाही. कुणा भक्ताने दिलेली ही कफ़नी आज तुझी अब्रू झाकू शकली, यातच आम्हाला काय मिळायचे ते मिळाले. कसली भरपाई करतोस?

   गुरूजींचे उच्च उदात्त विचार ऐकून राजाही भारावला. त्यांच्या सोबतच पायपीट करीत आपल्या राज्याच्या दिशेने जाण्याचा निर्णय त्याने घेतला. विश्रांती संपवून तो कळप मजल दरमजल करीत सूर्यास्ताच्या सूमारास एका गावात पोहोचला. साधूसंतांचा मेळा भघून गावकरी गोळा झाले व त्यांनी महंताचे यथोचित स्वागत आदरातिथ्य केले. त्यांच्या विश्रांतीची व भोजनाची व्यवस्था लावली आणि रात्री गावकर्‍यांवर प्रवचनाचा अनुग्रह करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे भोजन आदी उपचार उरकल्यावर गुरूजी प्रवचनाला उभे राहिले. संसार आणि मालमत्तेच्या मोहमायेने माणुस कसा संसारात गुंतून पडतो व त्याला मोक्षापासून कसे वंचित रहावे लागते; त्यावर गुरूजींनी छान निरूपण केले. पैसा, मोहमाया किती तकलादू व क्षणिक असते; त्याचे विवेचन करताना गुरूजींनी ताजाच किस्सा गावकर्‍यांना कथन केला.

   ‘हा आमच्यातला एक राजबिंडा साधू दिसतो ना तुम्हाला, तो कोणी साधू नाही, तर एक राजा आहे. गजांत लक्ष्मीचा मालक. त्याच्या इशार्‍यावर सरकारी खजीन्याची दारे सताड उघडतात आणि भल्याभल्या सावकारांवर त्याची हुकूमत चालते. पण ती सगळी संपत्ती व सत्ता आज त्याच्या कामी आली नाही. इतका श्रीमंत राजा जंगलात डाकूंच्या तावडीत सापडला आणि अंगावरच्या कपड्यालाही महाग झाला. विवस्त्रावस्थेत फ़िरताना मला आढळला आणि अब्रू झाकायला मीच त्याला माझ्याकडली कफ़नी दिली. एका राजाला माझी कफ़नी परिधान करून दिवस काढायची वेळ आली. म्हणून मोह माया फ़सवे असतात. वगैरे वगैरे.’

गावकरी अध्यात्म ऐकून सुखावले आणि आपापल्या घरी निघून गेले. देवळात साधू मंडळींनी पथारी पसरली. तेव्हा आपल्या नव्या शिष्याला म्हणजे राजाला (यशस्वी प्रवचनाने सुखावलेले) गुरूजी म्हणाले, कसे वाटले आमचे प्रवचन? राजाला असा प्रश्न अपेक्षित नव्हता. पण त्याने धीर करून म्हटले, ‘गुरूजी प्रामाणिक उत्तर देऊ? आपण मोहमाया खोटी असे सांगत असताना सामान्य कफ़नीसारख्या किरकोळ वस्तूच्या मोहातून सुटला नाहीत या्चीच मला खंत वाटली. माझ्यावरच प्रसंग सांगायला काहीच हरकत नव्हती. पण तुम्ही मला देऊन टाकलेली कफ़नी तुमची आहे, हा मोह तुम्हाला आवरता आलेला नाही. तुमची इच्छा व जीव अजून त्या कफ़नीमध्ये गुंतून पडला आहे. त्याला मोह नाही तर काय म्हणायचे?’

गुरूजींच्या चेहर्‍यावरचे विजयी भाव क्षणार्धात विसर्जित झाले. त्यांचा चेहरा निराशेने काळवंडला. विषण्ण मनाने ते म्हणाले, ‘राजन, तू खरे बोललास. इतकी तपस्या करूनही अजून मला एका क्षुल्लक वस्त्राच्या मोहाने भ्रमित केले. मला माझ्या अशा वर्तनाचा पश्चात्ताप आहे. तु माझे डोळे उघडलेस त्याबद्दल तुझे मन:पुर्वक आभार. मला अजून माझे मन काबीज करायला हवे आहे. मोहातून बाहेर पडायला हवे. कठोर प्रयत्न करायला हवेत.’ 

दुसर्‍या दिवशी अशीच पायपीट झाली आणि रात्री पुढल्या गावात मुक्काम पडला आणि कालच्याच रात्रीची पुनरावृत्ती झाली. पण प्रवचनाला उभे राहिलेले गुरूजी आज कमालीचे सावध होते. प्रवचनाच्या ओघात त्यांनी राजाची दुर्दैवी कहाणी कथन केली आणि ती संपवताना चटकन त्यांच्या तोंडून शब्द निघून गेले. ‘आणि बर का वत्सांनो, राजाच्या अंगावरची कफ़नी मात्र त्याचीच आहे. कारण मी त्याला ती देऊन टाकलेली आहे.’

आता आपण कसे मोहातून बाहेर पडलो, त्याचे गुरूजींना कौतुक होते. रात्री त्यांनी पुन्हा राजाला कालचाच सवाल केला. म्हणाले, ‘मोहातून बाहेर पडणे आमच्यासारख्या संन्याशाला अवघड नसते. आज तुझी कहाणी सांगतांना मी सुधारणा केली की नाही?’ त्यावर राजा उत्तरला, ‘सुधारणा नक्कीच केलीत. पण तुमच्या दानशूर असण्याचा दाखला दिलातच ना? कारण माझ्या अंगावरची कफ़नी तुम्ही मला दान केलेली आहे, हे सांगितलेच. इतक्या तपस्येनंतर एका साध्या कफ़नीत तुमचा जीव अडकून पडणार असेल, तर संसारातच गुरफ़टलेल्या सामान्य माणसाने मोहमायेतून मोक्ष कसा मिळवायचा गुरूदेव?’

पुन्हा गुरूजींचा हिरमोड झाला. आपली चुक त्यांनी प्रांजळपणे मान्य केली आणि राजाची चक्क माफ़ी मागितली. आणखी कठोरपणे मनावर काबू मिळवण्याचे आश्वासन देऊन गुरूजी निद्राधीन झाले. तिसर्‍या दिवशी पुन्हा तीच पुनरावृत्ती झाली. आजच्या प्रवचनात पुन्हा राजावरच्या प्रसंगाची गोष्ट आलीच आणि तिचा शेवट करताना गुरूदेव म्हणाले, ‘अशा या राजाच्या अंगावर आज भरजरी वस्त्रे नाहीत, तर साधी कफ़नी आहे. आणि त्या कफ़नीबद्दल मी काहीच बोलणार नाही.’ असे म्हणत गुरूजींनी राजाकडे विजयी मुद्रेने बघितले. राजानेही त्यांच्याकदे बघून स्मित केले. रात्री पुन्हा तोच संवाद झाला, तेव्हा राजाने अन्य कुणा साधूकडून जुनी जीर्ण कफ़नी मिळवून परिधान केली होती आणि गुरूदेवांची कफ़नी घडी घालून त्यांना तशीच पुन्हा अर्पण केली. तेव्हा त्याच्याकडे थक्क होऊन बघत गुरूजी म्हणाले,

‘राजन हे काय? कफ़नी कशाला देतोस परत. मी तर ती तुला देऊन टाकली आहे. ती तुझी आहे. मला तिचा काय उपयोग?’

त्यावर राजा म्हणाला, ‘गुरूदेव, या कफ़नीने आपले चित्त विचलित केले आहे. आपली एकाग्रता खंडीत केली आहे. तुम्हाला त्या कफ़नीच्या मोहातून मुक्त होता आलेले नाही. ती तुमच्यापाशीच असायला हवी. तिच्यावरचा मालकी हक्क सोडणे तुम्हाला साधलेले नाही. अन्यथा पुन्हा पुन्हा तिथेच तुमचे मन येण्य़ाची गरज काय? दृष्टांत देताना माझ्यावरच्या भयंकर प्रसंगाची कथा योग्यच आहे. पण कफ़नी दानापर्यंत तुमचा मोह तुम्हाला फ़रफ़टत घेऊन येतोच. कारण त्या नगण्य किंमतीच्या कफ़नीच्या मालकीचा मोह जितका नाकारायला जाता, तितका तुम्हाला तो अधिकच गुंतवतो आहे. तेव्हा मन:शांतीसाठी ती कफ़नी तुम्ही तुमच्याच जवळ बाळगणे आवश्यक आहे. मला मोठ्या राज्याचा साम्राज्याचा मोह आहे. पण खरे सांगू गुरूजी? मोहापेक्षा एखादी गोष्ट आपण जितक्या तावातावाने नाकारतो ना, तितके आपण त्यात गुंतलेले असतो. तुम्ही जितक्या आवेशात ती कफ़नी दान केल्याचा व तिचा मोह नसल्याचे सांगत आहात; तितके तिच्या मोहात अधिक फ़सलेले आहात. तेव्हा ती कफ़नी तुम्ही तुमच्याच जवळ ठेवा. तरच तिच्या विवंचनेतून बाहेर पडणे तुम्हाला शक्य होईल. गुरूदेव सत्य नाकारल्याने त्याच्या पाशातून मुक्ती मिळत नसते. आधी सत्य असेल तसे स्विकारावे लागते, तरच त्यातून मुक्ती शक्य असते. अन्यथा मुक्तीच्या भ्रमात आपण त्याच पाशात गुरफ़टलेले रहातो.’ 

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीने अस्वस्थ झालेल्या त्यांच्या विरोधकांची बारिकसारीक बाबतीतली संवेदनशीलता बघितली; मग मला नेमकी ही ‘गुरूदेवांची गोष्ट’ आठवते. जितके म्हणून हे सेक्युलर व मोदी विरोधक तावातावाने मोदींच्या अपयशाची खात्री देत असतात; तितके ते आपल्याच मनात भयभीत झाल्यासारखे वाटतात. कुणा मोदी समर्थक वा अनुयायाला आणि भाजप-संघवाल्यांना मोदींच्या पंतप्रधान होण्याची खात्री आज वाटत नाही, तितके हे विरोधक तसे झाल्यानंतरच्या परिणामांनी भेदरल्यासारखे वागत आहेत. जसे गुरूदेव आपण मोहातून बाहेर पडल्याचे सातत्याने सांगत असतात, परंतू त्याच एका कफ़नीमध्ये गुरफ़टलेले असतात, त्यापेक्षा मोदी विरोधकांची मानसिकता वेगळी उरलेली आहे का? जर मोदी भाजपाला यश मिळवून देणेच शक्य नाही, पंतप्रधान होण्याची शक्यताच नाही आणि मोदी हा दखल घेण्यासारखाही विषय नाही; तर बारीकसारीक नगण्य विषयातही, ही मंडळी मोदींचा उद्धार व उच्चार कशाला करीत असतात? सेक्युलर माध्यमे, पत्रकार, संपादक, कॉग्रेस व सेक्युलर पक्षांचे नेते प्रवक्ते यांना एक दिवस तरी मोदी विरोधात बोलले नाही, तर चैन पडते काय? त्यांना मोदींचे नाव कशाला घ्यावे लागते आहे? मोदी तर त्यांच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही. आणि यांच्या मनात दबा धरून बसलेला मोदी त्यांची पाठ सोडायला तयार नाही.  

८ टिप्पण्या:

  1. Bhau apanas sadar pranam.
    Atishay samarpak,muddesud,yogya ase udaharan ani titkyach taktine tyache samarthan,spashtikaran. . .
    Bhau apan lekhanine wichar badalawun takanare ek asamanya wyaktimatwa ahat
    Yogesh Watve.

    उत्तर द्याहटवा
  2. कालच्या IBN लोकमत वरील चर्चेत डॉ. सदानंद मॊरेंनी तर कमालच केली. सांप्रत राजकीय पर्यायाची चर्चा करताना दोघेही वाईट आहेत आणि मोदी फॅसीस्ट आहेत आणि कॉंग्रेस भ्रष्ट आहे त्यामुळे जनतेने दबाव टाकून काँग्रेसला सुधारण्यास भाग पाडावे आणि काँग्रेसला मत द्यावे. असे मत मांडले. अर्थात साथीला निखिल वागळेच होते. पण डॉ. मोरेंचे मत मात्र अव्यवहार्य आणि आश्चर्यकारक वाटले.

    उत्तर द्याहटवा