सोमवार, १५ जुलै, २०१३

मोदींचे खरे प्रायोजक त्यांचे विरोधकच



  गुजरातचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान होण्याच्या बातम्या सुरू झाल्यापासून त्यांचे समर्थक व विरोधक यांच्यात अक्षरश: युद्ध छेडले गेले आहे. त्यातल्या दोन्ही बाजू वाचताना, ऐकताना मजा येते. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करावी असे वाटते. जितक्या आवेशात मोदींचे बहुतांश समर्थक लढत असतात, त्यांनी पहिली गोष्ट अक्षात घ्यावी, की त्यांच्या प्रयत्नांमुळे आज मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकलेले नाहीत. काहीजण खुप आधीपासून मोदींचे समर्थक असतील, तर काहीजण अलिकडल्या काळात त्यांचे समर्थक बनलेले असतील. पण त्यांच्या कुठल्याही प्रयत्नांमुळे आज मोदी इतकी मजल मारू शकले नसते. त्यासाठी मोदींच्या यशाचे श्रेय त्यांच्या कट्टर व कडव्या विरोधकांनाच द्याचे लागेल. कारण माध्यमापासून विविध स्वयंसेवी संघटना व मुस्लिमधार्जिण्या सेक्युलर पक्ष, विचारवंतांनी सातत्याने मोदी विरोधी देशव्यापी आघाडी उघडली व अव्याहत चालूच ठेवली नसती; तर मोदींची ओळख अवघ्या देशाला इतक्या सहजतेने होऊ शकली नसती. कारण अगदी त्यांच्याच पक्षात, भाजपामध्ये मोदींचे समर्थक नव्हते आणि दिल्लीत बसलेले त्यांच्या पक्षाचे श्रेष्ठीही मोदींच्या विरोधातच होते. विरोधक मोदींना गुजरातमधून हुसकून लावायला कंबर कसून लढत होते, तर पक्षातले त्यांचे विरोधक त्यांना गुजरातमध्येच रोखून धरायला कटीबद्ध होते. त्यामध्ये पक्षातले विरोधक संघटनात्मक पातळीवर यशस्वीही झाले. पण त्यांच्या यशाला मोदींच्या सेक्युलर विरोधकांनी सुरूंग लावल्यानेच मोदींविषयी गुजरात बाहेर कुतूहल निर्माण झाले आणि मोदी कोण कुठचा व त्याने काय काय केले; याचा शोध लोक घेत गेले. सतत मोदी नावाचा जप चालू असल्याने हे होऊ शकले. भाजपाने वा मोदींच्या समर्थकांनी कितीही प्रचार करून मोदींचे नाव असे खेडोपाडी जाणे शक्य झाले नसते; ते काम विरोधकांनी स्वत:कडे घेऊन पार पाडले आहे.

   तसे पाहिल्यास ज्योती बसू प्रदिर्घकाळ मुख्यमंत्री राहिले होते. त्यांनी काही वाईट सरकार चालवले, असे कोणी म्हणू शकत नाही. तेही उत्तम प्तशासक होतेच. पण त्यांचा पश्चिम बंगालच्या बाहेर कितीसा गाजावाजा झाला? आताही नविन पटनाईक तीनदा ओरिसाचे मुख्यमंत्री झालेले आहेत. अगदी भाजपाने त्यांची साथ सोडल्यावर त्यांनी दोन निवडणूका स्वबळावर जिंकून दाखवल्या आहेत. पण त्यांना ओरिसा बाहेर किती लोक ओळखतात? दिल्लीच्या शीला दिक्षीत वा छत्तीसगडचे रमण सिंग व मध्यप्रदेशचे शिवराज सिंग चौहान; यांनीही दोनदा निवडणूका जिंकून आपली चांगली प्रतिमा आपापल्या राज्यात उभी केली आहे. पण त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर त्यांचा गवगवा कितीसा आहे? मुलायम-मायावती कधी उत्तरप्रदेश तर कधी दिल्लीत राजकारण करत आले. त्यांनाही राष्ट्रीय पातळीवरचे नेता मानले जाते. पण अन्य राज्यात त्यांच्याविषयी कितीसे आकर्षण आहे? मग मोदीच इतके देशाच्या कानाकोपर्‍यात कसे जाऊन पोहोचले? त्यांच्याच भाजपाने त्यांना अन्य राज्यात आणायचेही कटाक्षाने टाळलेले होते. पण तरीही मोदींचे नाव आज पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. अगदी विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंग वा युपीएच्या अध्यक्षा सोनिया व राहुल यांच्यापेक्षाही अधिक लोक मोदींना पसंत करतात, हे विविध मतचाचण्यांमधून सिद्ध झालेले आहे. ते कोणामुळे होऊ शकले? विरोधक व सेक्युलर माध्यमांनी बदनामीसाठी जर मोदी विरोधात इतकी अथक मोहिम चालवली नसती; तर गुजरातबाहेर त्यांना निदान आजच्या इतक्या लोकांनी ओळखले सुद्धा नसते. म्हणजेच मोदी हे नाव देशाच्या कानाकोपर्‍यात घेऊन जाण्याचे श्रेय मोदी विरोधकांना द्यावेच लागेल. २००५ च्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत लालूंनी गुजरातच्या दंगलीचे निमित्त करून मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी मोदी विरोधात आघाडी उघडली होती. तसे त्यांनी केलेच नसते; तर बिहारच्या खेड्यापाड्यापर्यंत मोदी हे नाव कशाला पोहोचले असते? लालूंनी वा कॉग्रेसने मुस्लिम मतांसाठी मोदी विरोधात आघाडी उघडली व सेक्युलर माध्यमांनी आज्ञाधारक सेवकाप्रमाणे ती जबाबदारी पार पाडली, हे सत्य आहे. पण त्यातूनच मोदी हे नाव अनायसे देशात सर्वदूर जाऊन पोहोचले हे कोणी नाकारू शकत नाही. ते काम कुठल्या जाहिरात कंपनी वा संघटनेमार्फ़त पैसे मोजून तरी होऊ शकले असते का?

   म्हणजेच आज जी मोदींची लोकप्रियता आहे, ती त्यांच्या समर्थकांची मेहनत नाही, तर त्यांच्या विरोधकांच्या अपप्रचाराचे फ़ळ आहे. त्यामुळे मोदींच्या आजच्या लोकप्रियतेचे श्रेय समर्थकांना घेता येणार नाही. किंबहूना त्यातले अनेक समर्थकच मुळात आधी मोदींविषयी काडीमात्र आस्था नसलेले असतील. पण मोदी विरोधी अपप्रचारामुळे ते मोदींच्या समर्थनाला पुढे आलेले असतील. म्हणजेच अशा मोदी चहात्यांना मोदी समर्थक बनवण्याचे श्रेय विरोधकांचेच नाही काय? त्यांना मोदींवरील खोटेनाटे आरोप ऐकायलाच मिळाले नसते आणि त्याबाबतीतले सत्य समोर येण्याची त्यांना गरजही वाटली नसती; मग असे लोक मोदींच्या समर्थनाला पुढे कशाला आले असते? तेही मनातल्या मनात म्हणाले असते, गुजरातच्या मुख्यमंत्र्याशी आपला काय संबंध. राहू देत त्याला तिथेच. आज गुजरात बाहेरचे जे अनेक मोदी समर्थक आहेत, त्यांचा नविन पटनाईक, ममता बानर्जी वा शिवराजसिंग चौहान यांना विरोध आहे काय? नसेल तर त्यापैकी कितीजण इतक्याच हिरीरीने त्यापैकी कोणाचे समर्थन करायला पुढे येतील? का येत नाहीत? तर त्यांच्या मनात त्या इतर नेत्यांविषयी कुठलीच भावना नाही. पण असे लाखो करोडो लोक गुजरात बाहेर आज आहेत; ज्यांचे एका नेत्याविषयी अनुकुल वा प्रतिकुल काहीतरी मत आहे. असे मत होऊ शकले, ते कुठल्या समर्थनीय प्रचारामुळे व जाहिरातीमुळे होऊ शकलेले नाही. तर मोदीविषयक अपप्रचारामुळे तयार झालेले आहे. सहाजिकच ज्यामुळे तसे होऊ शकले, त्यांनाच मोदींच्या देशव्यापी प्रतिमेसाठी श्रेय द्यायला नको काय? ही एक बाजू झाली, तशीच त्याला दुसरी बाजू सुद्धा आहे. ह्या विरोधामुळे मोदी इतक्या आवेशात प्रतिकाराला पुढे आलेले आहेत. समजा अन्य राज्यातल्या दंगलीनंतर हळूहळू सर्वकाही स्थिरस्थावर होते, तसेच गुजरातमध्ये झाले असते; तर आपण मोदींचे नावही आज घेतले नसते. १९९२-९३ सालात मुंबईत मोठ्या दंगली झाल्या होत्या. त्यावेळचा मुख्यामंत्री तरी कोणाला आज आठवतो काय? खुद्द गुजरातमध्ये आजवर मोदीपुर्व काळात डझनभर मोठ्या दंगली झालेल्या आहेत. पण यावेळचा तिथला मुख्यामंत्री कोणाला आठवतो काय? उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहारमध्ये यापेक्षा भीषण दंगली झाल्या व त्यातही मुस्लिम मोठ्या प्रमाणात मारले गेले होते. पण तेव्हाचा तिथला मुख्यमंत्री कोणाला आठवत सुद्धा नाही. म्हणजेच त्या त्या दंगलीचे असे सेक्युलर भांडवल कधी झाले नाही. म्हणून सर्व स्थिरस्थावर झाल्यावर लोक त्या मुख्यमंत्री नेत्याला विसरून गेले. म्हणजेच सेक्युलर माध्यमे व पक्षांनी गुजरातची दंगलही तशीच इतिहासजमा होऊ दिली असती; तर एव्हाना गुजरातमध्ये एकहाती सत्ता मिळवणे व राखणेही मोदींना शक्य झाले नसते. त्यांच्याच पक्षातल्या बंडखोरी व गटबाजीने मोदींना इतिहासजमा केले असते. पण मोदींच्या सर्व सेक्युलर विरोधकांनी तसे होऊ दिले नाही. त्यांनी गुजरातची दंगल कोणाला विसरू दिली नाही, की मोदी हे नाव कोणाला विसरू दिलेले नाही. त्यामुळेच आज मोदी यांच्या नावाजलेपणाचे खरे श्रेय त्यांच्या कडव्या विरोधकांना द्यावेच लागेल.

   अर्थात मोदी विरोधकांना व सेक्युलर मंडळींना मोदींच्या आजच्या यशाचे मानकरी ठरवताना मी कंजूषी अजिबात करणार नाही. नुसत्या बदनामीमुळे मोदी इतकी मजल मारू शकले नसते. आपल्या बचावासाठी मोदींना एकाकी लढण्याची पाळी सेक्युलर लोकांनी आणली नसती; तर मोदी कधीच इतिहासजमा झाले असते. पण सतत मोदींना या लोकांनी लक्ष्य केल्याने त्या माणसाला स्वसंरक्षणार्थ उलट प्रतिकारासाठी कंबर कसून उभे रहाणे भाग पडले. दुसरी गोष्ट म्हणजे एका बाजूला दंगलीचे आरोप, हिंसेचे आरोप यातून पक्षातील तळागाळाच्या कार्यकर्त्याचे भवितव्य अशा विरोधकांनी मोदींशी जोडून टाकले. बचावासाठी त्यांच्यामागे पक्ष व राष्ट्रीय नेतृत्वही उभे राहिले नाही, तेव्हा एकटा मोदीच त्यांचा नेता होता. सहाजिकच बाकीच्या गुजराती भाजपा नेत्यांपेक्षा कार्यकर्ता मोदींशी एकनिष्ठ होत गेला. पर्यायाने मोदींना गुजरात भाजपावर निरंकुश हुकूमत प्रस्थापित करणे सोपे होऊन गेले. तिसरी बाजू प्रशासनाची. सेक्युलर पक्ष, विचारवंत व माध्यमांनी गुजरातच्या संपुर्ण प्रशासन यंत्रणेलाच दंगलीसाठी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. त्यांच्या पाठीशी मोदी सोडून कोणीच उभा नव्हता. त्यामुळे ते प्रशासन मोदींचे निष्ठावान होत गेले आणि त्याचेही श्रेय म्हणूनच मोदी विरोधकांना द्यावे लागेल. त्याहीपेक्षा मोदी विरोधकांचे मोदीसाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी सातत्याने मोदींना लढायला, प्रतिकाराला सज्ज रहाण्यास भाग पाडले. गेल्या दहा वर्षात इतक्या प्रकारे या विरोधकांनी मोदींना अग्नीदिव्यातून जायला भाग पाडले आहे, की मेलेली कोंबडी आगीला भीत नाही म्हणतात, तशी मोदींची स्थिती निर्भय झालेली आहे. अपप्रचार. खोटे आळ व इशारे-धमक्या पचवण्यात दहा वर्षे अहोरात्र घालवणार्‍या मोदींना आता कशाचेच भय वाटेनासे झाले आहे. थोडक्यात मोदींचे नाव देशव्यापी करण्यापासून, त्यांना गुजरातबाहेर समर्थक मिळवून देण्यापासून त्यांच्यामध्ये कितीही प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करण्याची क्षमता निर्माण करण्यापर्यंतचे अत्यंत मोलाचे काम त्यांच्याच कट्टर विरोधकांनी विनामूल्य करून दिलेले आहे. त्यामुळेच आजचे तमाम मोदी समर्थक त्या विरोधकांवर आक्षेप घेतात, ते मला रास्त व न्याय्य वाटत नाही. उलट मी म्हणेन जो कोणी मोदी समर्थक असेल व ज्याला खरोखरच मोदी पंतप्रधान व्हावेत असे मनापासून वाटत असेल; त्याने मोदी विरोधकांना ‘त्यांचे आधीपासून चालू असलेले काम’ अधिक वेगाने व जोशात करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे. तसेच माझे प्रामाणिक मत आहे. नव्हे मोदी समर्थकांना माझे तसे आवाहन आहे. कृपया मोदी विरोधकांना हतोत्साहित करू नका, निराश करू नका, उलट त्यांना जास्त उत्तेजन द्या. ही मंडळी थंडावली वा निष्क्रीय झाली, तर मोदींना आगामी निवडणुकीत अपेक्षित यश मिळणे अवघड होऊन बसेल. खरे नाही वाटत? पुढल्या लेखात मोदींना विरोध व अपप्रचार कसा उपयुक्त आहे, त्याचे विवेचन करूया.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा