गुरुवार, २५ जुलै, २०१३

चार दशकानंतर पहिल्या राजकीय पर्यायाचा उदय (इंदिराजी ते नरेंद्र मोदी -१६)


   त्याच १९९१ च्या निवडणुकीत भाजपाने १२० जागापर्यंत मजल मारली होती. पण त्या जागांपेक्षाही भाजपाने मतांच्या टक्केवारीत मारलेली मजल अतिशय महत्वाची होती. तोपर्यंत स्वातंत्र्योत्तर चार दशकात कुठल्याच बिगर कॉग्रेस पक्षाने स्वबळावर मिळवली नव्हती इतकी प्रचंड मते भाजपाने मिळवली होती. अवघ्या दोन वर्षात भाजपाने ११.३६ वरून २०.११ टक्के इतकी मोठी झेप घेतली होती. त्याचा अर्थ इतकाच, की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुठला तरी पहिलाच पक्ष स्वबळावर कॉग्रेसला पर्याय म्हणून पुढे येत होता आणि मतदार त्याला पर्यायी पक्ष म्हणून प्रतिसाद देताना दिसत होते. ही लक्षणिय बाब होती. त्याच निवडणुकीतील कॉग्रेसच्या ३६.२६ टक्के मतांच्या तुलनेत भाजपाची २०.११ टक्के मते क्षुल्लक वाटू शकतात. पण त्यांनी किती काळात ती मजल मारली आणि त्याच काळात कॉग्रेसने त्याच प्रमाणात मतांमध्ये घसरगुंडी करून घेतली; हे लक्षात घेण्याची गरज आहे. १९८४ सालात सर्वच विरोधी वा बिगर कॉग्रेस पक्षांचा इंदिरा हत्येने धुव्वा उडवला होता. तेव्हा कॉग्रेसच्या सरासरी म्हणजे ४०-४२ टक्के मतांच्या पुढे थेट ४९ टक्क्यांपर्यंत गेली होती. राजीव गांधींनी ही मजल मारली होती. तेव्हा भाजपाची स्थिती काय होती? त्या पक्षाला लोकसभेत अवघ्या दोन जागा व ७.७४ टक्के मते मिळाली होती. म्हणजेच १९७७ सालात जनता पक्षात विलीन होताना जनसंघ म्हणून जी त्या पक्षाची ताकद होती; तिथेच पुन्हा नवा भाजपा सात वर्षानंतर १९८४ साली पोहोचला होता. पण त्या धक्क्यातून सावरताना लालकृष्ण अडवाणी यांनी नव्याने पक्षाची संघटनात्मक बांधणी व कॉग्रेसला पर्याय होण्याच्या दिशेने ठाम पावले टाकायचा यशस्वी प्रयत्न केला होता. त्यासाठी जनता दल व व्ही पी सिंग यांच्याशी हातमिळवणी करून आपले बस्तान पक्के केले होते. अधिक सेक्युलर पक्षांच्या ओरड्याकडे साफ़ पाठ फ़िरवून जनसंघाच्या मूळच्या हिंदूत्वाकडे मोर्चा वळवला होता. त्याला प्रतिसादही मिळू लागला होता. त्यामुळेच १९८९ मध्ये ११.३६ टक्के व १९९१ मध्ये २०.११ टक्के इथपर्यंत भाजपाने मजल मारली. त्याचे श्रेय हिंदूत्वाला, संघाला व अडवाणी यांच्या ठाम नेतृत्वाला द्यावेच लागेल. पण त्याहीपेक्षा भाजपाच्या त्या यशाचे मोठे श्रेय अवसानघातकी सेक्युलर बिगर कॉग्रेस पक्षांनाही द्यावे लागेल. कारण त्यांच्या नाकर्तेपणानेच भाजपाला त्यांची जागा व्यापणे शक्य होत गेले आहे. मजेची गोष्ट अशी, की त्या सर्व काळात वाजपेयी भाजपाचे नेतृत्व करीत नव्हते, की त्यांच्या नेतृत्वाच्या कालखंडात भाजपाला (किंवा जनसंघाला) इतकी मोठी मजल मारता आलेली नव्हती. पण वाजपेयी माध्यमे व अन्य सेक्युलर पक्षात सौम्य हिंदूत्वाचा चेहरा म्हणून मान्यता पावलेले होते. मात्र त्यांची ही लोकप्रियता मतदारामच्ये नव्हती व म्हणूनच त्यांच्यामुळे भाजपाला मतदानाची वाढीव टक्केवारी मिळत नव्हती. तो पल्ला अडवाणी यांनी गाठून दिला आणि त्यांच्या आक्रमक हिंदूत्वाच्या भूमिकेनेच मिळवून दिला होता. म्हणूनच १९९१ ची निवडणुक राजीव गांधींचे नेतृत्व इंदिरा गांधींच्या तुलनेत किती खुजे होते, त्याची साक्ष आहे. तेवढीच ती निवडणूक भाजपा स्वातंत्र्योत्तर काळात कॉग्रेसला पर्याय म्हणून मतदाराने स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचीही साक्ष आहे.

   म्हणूनच आज जेव्हा भाजपा आणि कॉग्रेस यांच्या संघटनात्मक ताकद, जागांची व मतांची तुलना केली जाते; ती साफ़ चुकीची आहे. पाच सहा दशकात भाजपाने आपल्या आजवरच्या अनुभवातून कॉग्रेसला पर्याय होण्याचा केलेला प्रयास विचारात न घेता तशी उलना होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे त्याच कालखंडात भाजपाने देशाच्या विविध प्रांतामध्ये पाय रोवून उभे राहाण्यात मिळवलेले यश नजरेआड करून तशी तुलना होऊ शकत नाही. केवळ कॉग्रेसचे यश व भाजपाचे अपयशच दाखवायचे असेल; तर तशी तुलना ठिक आहे. पहिली गोष्ट म्हणजे पुर्वाश्रमीचा जनसंघ किंवा नंतरच्या काळात भाजपा यांना वगळता कुठल्याच राजकीय पक्षाने स्वातंत्र्योत्तर काळात कॉग्रेसला पर्याय देण्याचा प्रयत्न कधी केला नाही. जनता व सामान्य मतदार कॉग्रेसला पर्याय नेहमी शोधत राहिला. पण झटपट यशाच्या व क्रांतीच्या मागे धावत सुटलेल्या विविध पक्षांनी नेहमीच मतदाराचा प्रत्येकवेळी अवसानघातच केलेला आहे. १९६७ सालात नऊ राज्यात यशस्वी झालेल्या मतविभागणी टाळण्याच्या प्रयासाला मतदाराने उत्तम प्रतिसाद दिला होता. पण त्याच्या भावना समजून एकत्र गुण्यागोविंदाने न नांदणार्‍या आघाडीच्या राजकारणातील विविध पक्षांनी लोकांचा भ्रमनिरास केला होता. त्यामुळेच मग स्थैर्यासाठी बदलता मतदार पुन्हा कॉग्रेसकडे वळला व त्या पक्षाला सत्तेची संजीवनी मिळाली. पुढे तसे वाद टाळण्यासाठी १९७७ सालात चार प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. त्यात जनसंघ सहभागी झाला होता व लोकांनी त्या नव्या पक्षाला कॉग्रेसला पर्याय म्हणून स्विकारल्याचे मतांची टक्केवारी व जिंकलेल्या जागांमधूनही स्पष्ट होते. ४१ टक्के मते व २९५ जागा जनता पक्षाला मिळाल्या होत्या. अधिक त्यांच्याशी जुळवून घेणार्‍या कम्युनिस्ट डाव्या गटाला सात टक्के अधिक २९ जागा मिळाल्या होत्या. कॉग्रेसची घसरण होत ३४ टक्के मते व १५४ जागा अशी स्थिती झाली होती. पण दिडदोन वर्षे सरकार चालले नाही; तर सेक्युलॅरिझम नावाचे नाटक समाजवादी गटाने सुरू केले व जनता पक्षातील पुर्वाश्रमीच्या जनसंघियांनी रा. स्व. संघाशी असलेले संबंध तोडण्याचा आग्रह सुरू केला. त्यातून मग अडिच वर्षात जनता पक्षात फ़ुट पडली व लोकांचा भ्रमनिरास होऊन गेला. त्यातल्या फ़ुटीर गटाने चक्क इंदिरा गांधीचा पाठींबा घेऊन चौधरी चरणसिंग सरकार बनवले होते. त्याच दरम्यान कॉग्रेसमध्येही दुसरी फ़ुट इंदिरा गांधी यांनी पाडली होतीच. मुद्दा इतकाच, की दुसर्‍यांदा भारतीय जनतेने कॉग्रेसला पर्याय म्हणून बिगर कॉग्रेसी प्रयोगाला भरभरून पाठीबा दिला; त्याचा विचका स्वत:ला सेक्युलर म्हणवणार्‍यांनी केला. आणि त्याचीच पाच दशकात सातत्याने पुनरावृत्ती होताना दिसेल.

   कॉग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळात कधीच पक्षाची संघटनात्मक बांधणी वा लोकांचा विश्वास संपादन करण्याचे खास प्रयत्न केलेले नाहीत. स्वातंत्र्याच्या चळवळीचा वारसा व पुण्याई अधिक हाताशी असलेली सत्ता यांच्या बळावर कॉग्रेस टिकून राहिली आहे. त्यात मग विरोधी पक्षातल्या महत्वाकांक्षी वा कर्तबगार नेत्यांना सत्तापदाचे आमीष दाखवून ओढून घ्यायचे; असेच कॉग्रेसचे संघटनात्मक स्वरूप राहिले आहे. जेव्हा त्यातही घट होऊन कॉग्रेस नामोहरम व्हायची वेळ आली; तेव्हा पुन्हा विरोधी पक्षात बसलेल्या पण सेक्युलर वा अन्य कुठले निमित्त शोधून लोकांचा भ्रमनिरास करणार्‍या प्रवृत्तीने कॉग्रेसला प्रत्येकवेळी नवी संजीवनी दिलेली आहे. त्यात असे अनेक समाजवादी वा डावे सेक्युलर पक्ष आत्मसमर्पण करून अस्तंगतही झाले आहेत. त्याला अपवाद पुर्वीचा जनसंघ व त्याचा नंतरचा अवतार भाजपा इतका एकच आहे. १९६७ नंतर समाजवाद्यांनीच आघाडी सरकारांना स्थिर होऊ दिले नाही आणि १९७७ नंतरच्या जनता प्रयोगातही सेक्युलर नाटक रंगवून त्या सरकारचे बुड अस्थिर केले होते. मजेची गोष्ट म्हणजे त्यालाच कंटाळून मग १९८० च्या मध्यावधी निवडणूका संपल्यावर पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांचा व नव्याने राजकीय जीवनात आलेल्या तरूणांचा मोठा गट भाजपा म्हणून वेगळा झाला. तिथून मग मात्र भाजपाने विरोधकांच्या कॉग्रेस विरोधी आघाडीत सोबत रहायचे; पण त्यात विलीन व्हायचे नाही, हा दंडक पाळला. १९७७ चा पराभव झाल्यावर काही कामानिमित्त युरोपच्या दौर्‍यावर गेलेल्या इंदिराजींना तिथल्या पत्रकारांनी जनता सरकार पाडणार काय; असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर खुप मार्मिक होते. ते सरकार बाहेरून कोणी पाडायची गरज नाही. त्यात सहभागी झालेत त्यांनीच ते काम हाती घेतले आहे; असे इंदिराजी म्हणाल्या होत्या. आणि झालेही नेमके तसेच. मग पुन्हा सहा वर्षांनी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. राजीव गांधी यांची पाच वर्षाची कारकिर्द बोफ़ोर्स प्रकरणाने डागाळली होती. तेव्हा त्यांच्याविरुद्ध बंड पुकारणारे व्ही. पी. सिंग विरोधकांना प्रेषित वाटले. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा बिगर कॉग्रेस सत्तेचा प्रयोग झाला. भाजपा व डावे वगळून सेक्युलर म्हणवणारे तमाम पक्ष पुन्हा एकत्र येऊन त्यांनी जनता दल स्थापन केले व लोकांनी पुन्हा बिगर कॉग्रेस सत्तेला साथ दिली. डावे व भाजपा यांनी बाहेरून पाठींबा दिलेले जनता दलाचे विश्वनाथ प्रतापसिंग सरकार सत्तेवर आले. त्याचेही पतन सेक्युलॅरिझम नावाच्याच नाटकाने केले. त्यातून पुन्हा कॉग्रेस पक्षाला नवी संजीवनी देण्याचे काम समाजवादी व जनता दलीयांनी केले.
(अपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा