मंगळवार, २५ जून, २०१३

कॉग्रेसमुक्त भारत म्हणजे तरी काय?



   आधीच्या लेखात मी मोदींच्या ऐवजी केंद्रातले युपीए सरकार आजच्या परिस्थितीत उत्तराखंडाची आपत्ती झेलण्यासाठी शरद पवार यांची मदत तरी का घेत नाही; असा सवाल केल्याने अनेकजण अस्वस्थ होऊन गेले. त्यांचे मोदीप्रेम मला समजू शकते. आजच्या स्थितीत मोदी यांच्याकडे आपत्ती निवारणाचे चांगले कौशल्य उपलब्ध आहे, हे मी नाकारलेले नाही. ते नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांना ते नाकारण्यात शहाणपणा वाटतो, त्यांनी त्यात जरूर धन्यता मानावी. पण म्हणून मोदी सोडून बाकीच्या कोणालाच त्यातले काही कळत नाही, असेही मी मानत नाही. जेव्हा आपल्यापाशी संकटकाळात उत्तम पर्याय उपलब्ध नसतो, तेव्हा जे उपलब्ध पर्याय आहेत, त्यातून निवड करणे, हा मानवी स्वभाव असतो. कारण पर्याय कुठला यापेक्षाही होणारे नुकसान व हानी कशी कमी करता येईल; याला प्राधान्य द्यावे लागत असते. म्हणून युपीएच्या सेक्युलर सरकारला मोदींची अलर्जी असेल, तर त्यांच्यापाशी कुठला अन्य चांगला पर्याय उपलब्ध आहे, त्याकडे लक्ष वेधणे मला अगत्याचे वाटते. मग ते नाव शरद पवार यांचे असेल, तर तेच सांगायची मला लाज वाटत नाही किंवा त्याबद्दल माझ्या मनात कुठला किंतू नाही. केवळ शरद पवार सेक्युलर गोतावळ्यातले आहेत किंवा युपीएमधले भाजपा शिवसेनेचे विरोधक आहेत; म्हणून त्यांच्यातल्या गुणांना नाकारणे मला जम्णार नाही. तसे केले तर मग माझ्यात आणि बाकीच्या तमाम सेक्युलर विचारवंत लेखकात फ़रक तो काय राहिला? माझ्या दृष्टीने प्रश्न व समस्या सुटण्याला प्राधान्य असते. त्या समस्येला विचार वा रंग असू शकत नाहीत. त्या संकटात सापडलेल्यांना जसा धर्म, जात नसते तसाच त्यांना मदत द्यायला गेलेल्यांच्या धर्म, जात वा राजकीय विचारांना महत्व नसते. तो मुर्खपणा सेक्युलर म्हणून मिरवणारे करीत असतील, तर त्यांच्याच पद्धतीने आपणही प्रतिस्पर्धी वा दुसर्‍या बाजूचे गुण नाकारणे; मला तरी शहाणपणा वाटत नाही. म्हणूनच युपीएला मोदी नको असतील तरी त्यांच्याकडे दुसरा चांगला पर्याय पवार यांच्या रुपाने उपलब्ध आहे, हे दाखवणे अगत्याचे होते. त्याहीपेक्षा सोनिया गांधी व त्यांच्या नेतृत्वाखालची युपीए; किती द्वेषमूलक व्यक्तीद्वेषी राजकारण खेळत जनतेच्या जीवाशी खेळते आहे, त्यावर प्रकाश टाकणे मला अधिक अगत्याचे वाटते. त्यांच्या हाती सत्ता, अधिकार व सर्व साधने असतानाही केवळ राजकीय हेतूने लोकांच्या जीवाशी कसा दळभद्री खेळ चालू आहे, ते दाखवणे अगत्याचेच आहे.

   मोदी यांनी आजच्या युपीए सरकार समोर जे राजकीय आव्हान उभे केले आहे, त्याने कॉग्रेस भांबावून गेली आहे. पण म्हणून त्या राजकारणात उत्तराखंडात फ़सलेल्यांचे जीव नगण्य नसतात. जर त्यांना वाचवण्याचे व मदत पाठवण्याचे काम प्रामुख्याने कॉग्रेसच्याच नेतृत्वाकडून व युपीए सरकारकडून करून घ्यावे लागणार असेल; तर त्यांना त्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध आहे, हे दाखवायचा नाही का? ते न करणे ह्याला मी त्यांच्या त्याच दळभद्री राजकारणा इतका करंटेपणा मानतो. तोच तर मला दाखवून द्यायचा होता. ठीक आहे, मोदींना श्रेय मिळण्याच्या राजकीय भयाने त्यांना टाळायचे असेल, तर जरूर टाळा; पण त्यासाठी फ़सलेल्या पर्यटकांच्या जीवाशी खेळ नको, हेच माझे मत होते आणि आहे. सहाजिकच मोदींना टाळून दुसरा चांगला पर्याय सरकारपाशी शरद पवार यांच्या रूपाने उपलब्ध आहे. पवार यांच्या शेकडो चुका असतील वा त्यांच्यात अनेक दुर्गुण असतील. पण म्हणून त्यांच्यामध्ये कुठलाच गुण नाही, हे मला मान्य नाही. इतकी वर्षे सत्तेच्या राजकारणात टिकलेल्या या माणसाकडे दांड्गा अनुभव आहे. प्रशासनाची चांगली जाण आहे आणि किल्लारीच्या भूकंपापासून मुंबई महानगरात झालेल्या बॉम्बस्फ़ोट मालिकेपर्यंत अनेक पेचप्रसंगात त्यांनी समर्थपणे परिस्थिती हाताळल्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आपल्या अपेक्षा असतील तितके उत्तम काम पवारांकडून झालेही नसेल. पण आज सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटिल वा चिदंबरम व खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग अशांनी जो कारभाराचा बट्ट्य़ाबोळ करून ठेवला आहे; त्यांच्या तुलनेत शरद पवार हा खरेच उजवा पर्याय आहे. उत्तराखंडच नव्हेतर अण्णांचे आंदोलन, रामदेव बाबांचे उपोषण, सामुहिक बलात्काराची घटना अशा प्रसंगी सरकारची जी नालायकी व नाकर्तेपणा सिद्ध झाला, त्यापेक्षा ती स्थिती पवारांनी नक्कीच उत्तम रितीने हाताळली असती, हे निदान मी तरी नाकारू शकत नाही. आणि म्हणूनच युपीएमध्ये उपलब्ध असलेला चांगला पर्यायही सोनियांना वापरायचा नाही, त्यातही लोकांच्या जीवाशी खेळायचे दळभद्री राजकारण चालू आहे, तेच मला दाखवायचे होते.

   आणि अशा बिकट प्रसंगी कुठलाही पक्ष वा त्याची धोरणे महत्वाची नसतात, नेताही दुय्यम असतो. त्यापेक्षा ज्यांचे जीव गुंतलेले असतात, त्यांच्यापर्यंत सहाय्य पोहोचण्याला महत्व असते. अपघात झाल्यावर तातडीने रुग्णाला, जखमींना जवळच्या मिळेल त्या इस्पितळात घेऊन जातात. तिथे किमान त्याला जगवण्याला प्राधान्य असते. तशीच उत्तराखंडातील परिस्थिती होती. त्या घटनेला सात दिवस उलटून गेल्यावर देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पत्रकार परिषदेत कबुली देतात, की मदतकार्यात सुसुत्रता नसल्याने गोंधळ उडाला आहे. त्याच वेळी ते मोदींना हवाई पहाणी करता येईल, पण खाली उतरण्याची मुभा दिली जाणार नाही, असेही सांगतात. म्हणजेच ज्याच्यावर या संपुर्ण संकटनिवारण कार्याची मदार आहे; तोच सुसुत्रता नसल्याचे कबूल करतो म्हणजेच त्याला स्वत:ची जबाबदारीच कळलेली नाही, असा त्याचा अर्थ होतो. शरद पवार यांच्याकडून कितीही संकटात असताना असे शब्द जनतेला ऐकावे लागलेले नाहीत. भले कामात त्रुटी असतील. पण त्यांनी अशा बिकट प्रसंगांना हातळताना आपण हतबल असल्याचे कधी दिसू दिले नाही. त्याला इतक्यासाठीच महत्व असते, की जे फ़सलेले लोक असतात, त्यांना काही होते आहे, असा दिलासा त्यातून मिळत असतो. तो दिलासा भले फ़सवा असेल, पण बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तशी किमया तो दिलासा करत असतो, त्यांची हिंमत वाढवत असतो. ती हिंमत वाढवण्यातून त्यांना मदतकार्य करणार्‍यांशी सुसुत्र करणे हे राज्यकर्त्याचे प्रमुख काम असते. आजवरच्या अशा प्रसंगात पवार यांनी ती भूमिका लिलया पार पाडलेली आहे. टिकेचे आसुड झेलत त्यांनी खंबीरपणे असे प्रसंग हाताळलेले आहेत, पण मदतकार्य कितीही तोकडे व लंगडे पडत असताना हतबलता व्यक्त केलेली नाही. आणि तेवढ्याच गुणाची एका राज्यकर्त्या नेत्याकडून अशा प्रसंगी अपेक्षा असते. मोदी यांनी घटनास्थळी जाऊन तेच केले, हे सुद्धा विसरता कामा नये. तीच अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री आणि सोनिया वा सत्ताधार्‍यांकडून असते. मदतीसाठी आशाळभूतपणे प्रतिक्षा करणारे व त्यांच्या मदतीला संकटात धावून जाणारे; अशा दोघांसाठी असा राज्यकर्ता गरजेचा असतो. आपल्यात तो येऊन पोहोचला, हे बघून त्यांची हिंमत वाढत असते, त्यांना प्रेरणा व चालना मिळत असते. तिथे शिंदे, सोनिया व पंतप्रधान तोकडे पडले. तेच काम मोदींनी पार पाडले आणि अशी जबाबदारी शरद पवार यांच्यावर असती, तर मोदींच्या आधी पवार घटनास्थळी पोहोचले असते, याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच आजच्या युपीएमध्ये पवार यांच्याकडे लगेच ती जबाबदारी सोपवण्यासही सत्ताधार्‍यांनी टाळले; ह्याला मी दळभद्री राजकारण म्हणतो. तिथेही युपीए नव्हेतर कॉग्रेसला श्रेय मिळवण्यासाठी उपलब्ध असलेला चांगला अर्याय सोनिया वा पंतपधानांनी टाळला, हे विसरता कामा नये.

   जेव्हा देशासमोर भीषण परिस्थिती आलेली असले, बिकट प्रसंग असतो, तेव्हा पक्षिय राजकारण बाजूला ठेवून पुढे यायला हवे आणि त्यात राजकीय हेतू शोधण्याचा करंटेपणा होता कामा नये. त्याचे श्रेय घेण्याची स्पर्धा करताना पिडीतांच्या जीवाशी खेळ होता कामा नये. तसे करणारी कॉग्रेस गुन्हेगार असेल, तर त्यासाठीच मोदींचे गोडवे गाण्याचा प्रयास किंवा मोदींच्या अडवणूकीचे राजकारण करण्याचा प्रयास; सारखाच निंदनीय आहे. श्रेय मोदींना मिळायची गरज नसून लोकांना मदत मिळण्याचे अगत्य असले पाहिजे. सेक्युलर दिवटे व कॉग्रेसजन त्याचे श्रेय सोनिया वा राहुलना मिळावे म्हणून धडपडणारे गुन्हेगार असतील आणि श्रेयासाठी मोदींचे समर्थक म्हणवणारे भांडणार असतील; तर दोघांमध्ये फ़रक काय राहिला? असल्या राजकारणापासून भारतीय समाजाला मुक्ती मिळावी म्हणून जर सामान्य लोक मोदींकडे आशेने बघत असतील; तर मग इथेही मोदींच्या श्रेयासाठी हमरीतुमरी करणार्‍यांचे वेगळेपण अन्य सेक्युलर कॉग्रेसवाल्यांपेक्षा काय उरले? मी तशा अर्थाने मोदी समर्थक नसून मी बदलाचा समर्थक आहे. माझ्यासाठी मोदी हे नव्या बदलाचे प्रतिक आहे. त्यात मोदी कमी पडणार असतील, तर मोदी केवळ कॉग्रेसला पर्याय म्हणून पंतप्रधान होण्याची अजिबात गरज नाही. मोदी समर्थक, पाठीराखे सोनिया, राहुल समर्थक लोकांप्रमाणेच युक्तीवाद व भूमिका घेणार असतील; तर एक संकट जाऊन दुसरे येऊ घातले असाच त्याचा अर्थ होईल. मोदी जेव्हा कॉग्रेसमुक्त भारत म्हणतात, तेव्हा सत्तेच्या दळभद्री स्वार्थी आपमतलबी राजकारणापासून भारतीय समाजाची मुक्ती; असा त्याचा अर्थ मी घेतो, ज्यांना तो मान्य नसेल त्यांची गोष्ट वेगळी. म्हणूनच आजच्या परिस्थितीत युपीए, सोनिया व मनमोहन यांना मोदींची अलर्जी असेल, तर त्यांनी शरद पवार हा उपलब्ध पर्याय का स्विकारला नाही, असा माझा सवाल आहे. कारण आजच्या सत्तारुढ युपीए सरकारमध्ये निदान सामान्य जनतेला थोडाफ़ार दिलासा देऊ शकेल; असा चांगला प्रशासक तोच एकमेव आहे. त्याच गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा माझा हेतू होता व आहे. (क्रमश:)

1 टिप्पणी:

  1. हिंदूंच्या गरजांबाबत काँग्रेस कधीच उत्साही नव्हती. खुद्द काँग्रेसमध्ये जरी आपत्तीनिवारणतत्ज्ञ असता तरी त्याला कामाला लावला नसता. हिंदू मरताहेत तर मारूद्या असा एकंदरीत सूर आहे. हिंदूंची एकगठ्ठा मते उभारणारी मतपेढी हा एकमेव उपाय आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    उत्तर द्याहटवा