ती पहिली निवडणूक अशी होती, की ती विविध पक्षांमध्ये लढली गेली नाही. ती इंदिरा गांधी हव्यात किंवा इंदिरा नको, अशी मतांची विभागणी झाली होती. आज आपल्याकडे मोदी व राहुल यांची तुलना होते, तेव्हा अनेक शहाणे अभ्यासक अगत्याने सांगतात, इथे अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय लोकशाहीची प्रणाली नाही व पंतप्रधान थेट लोकमताने निवडला जात नाही. आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे, त्यामुळे पक्षांचे प्रतिनिधी निवडले जातात आणि ते प्रतिनिधी बहूमताने पंतप्रधानाची निवड करतात, असेही हे शहाणे ठासून सांगतात, तेव्हा मला म्हणूनच हसू येते. कारण व्यवस्था संसदीय लोकशाहीची असली, तरी लोकांनी आपल्याला हवा असलेला नेता थेट पंतप्रधान होऊन सर्व सत्ता मिळवू शकतो; असा पर्याय शोधलेला आहे आणि तसे मतदानही करून दाखवलेले आहे, तो इतिहास आजचे विद्वान विसरतात. किंवा त्यांना भारतीय राजकारण वा निवडणुकीचा इतिहासच ठाऊक नसावा, असे वाटते. इंदिराजींनी १९७१ सालात जिंकलेली निवडणुक व मिळवलेली मते; ही त्यांची मतदाराने थेट पंतप्रधान पदावर केलेली निवडच होती. कारण मतदानच असे करण्यात आले, की इंदिराजींना त्यापासून वंचित ठेवणार्यांनाही मतदाराने लोकसभेत पोहोचू दिले नव्हते. आणि जे पोहोचले, त्यांना तशी अडचण करण्याचे बळही मतदाराने मिळू दिले नव्हते. आपली अक्कल चालवतील वा वेगळे मत देतील; अशा लोकांना खड्यासारखे मतदाराने बाजूला केले होते. जो कोणी निमूटपणे इंदिराजींच्या इशार्यावर नाचू शकतो, त्यालाच लोकांनी निवडून लोकसभेत पाठवले होते. ज्याला मते दिली, निवडून दिला, त्याच्याशी मतदाराला कर्तव्य नव्हते, तर त्याला आपला प्रतिनिधी म्हणुन ज्याने पाठवले, त्याच्यावर लोकांचा विश्वास असतो व तसेच मतदान होते, त्याला लाटेचे मतदान व लाटेवरच्या त्सुनामी निवडणुका म्हणतात. तशी १९७१ सालची झाली, ती पहिली लाटेची निवडणुक होती. तिने इंदिरा गांधींना देशाचा एकमुखी लोकप्रिय नेता म्हणुन प्रस्थापित करताना संघटनात्मक पक्षांचे लोकशाही राजकारण उध्वस्त करून टाकले व व्यक्तीकेंद्री राजकारणाचा भक्कम पाया घातला. पाऊणशे वर्षाची कॉग्रेस संघटना व तिचे राजकीय चारित्र्य, त्याच निवडणुकीने व इंदिरा गांधींनी जमीनदोस्त करून टाकले. त्यानंतर कुठल्या प्रांतामध्ये वा राज्यामध्ये कॉग्रेसचा कोणी बलवान वा लोकमान्य पुढारी शिल्लक राहिला नाही. जे कोणी नेता, मुख्यमंत्री वा मंत्री असतील; ते इंदिराजींच्या शब्दावर तालावर नाचणार्या कठपुतळ्या होऊन गेल्या.
इंदिरा लाटेचा तो झंजावात इतका तुफ़ानी होता, की त्याची चाहुल पत्रकारांना लागली नसली तरी लोकांमध्ये वावरणार्या राजकीय नेते व कार्यकर्त्यांना नक्की लागली होती. अनेकांनी आपापली घरे व तंबू ठिकठाक करायचे उपायही योजले होते. त्या काळात आजच्याप्रमाणे लोकप्रियतेच्या मतचाचण्या होत नव्हत्या. पण जनमानसाचा अंदाज घेऊ शकणारे, खरे लोकांमध्ये वावरणारे कार्यकर्ते बहुतेक पक्षात मोठ्या संख्येने होते. म्हणून तर अनेक पक्षांनी मतविभागणी टाळून आपली कातडी वाचवण्याचेही पवित्रे घेतले होते. कालपर्यंत आपण कॉग्रेस श्रेष्ठी असल्याचा दावा करून इंदिराजींची पक्षातून हाकालपट्टी करणार्या संघटना सिंडिकेट कॉग्रेस नेत्यांनी; स्वतंत्र पक्ष व जनसंघ अशा उजव्या पक्षांसोबत जागावाटप केले होते. त्याला त्याकाळात बडी आघाडी असे संबोधले जात होते. दुसरीकडे डाव्या व समाजवादी पक्षांनीही आपापसात जागावाटप करून घेतले होते. कारण त्यांना येऊ घातलेला इंदिरा झंजावात जाणवू लागला होता. पुढे निकालात त्यांची पुर्णत: वाताहत झाली ही गोष्ट वेगळी. पण ते निकाल इतके धक्कादायक होते, की अनेकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही मध्य मुंबईत मनोहर जोशी यांचा पराभव सेनेला पचवणे इतके अवघड गेले, की शिवसेनाप्रमुखांनी मतदानात गफ़लती झाल्याचा गंभीर आरोप केला होता. शिवाजी पार्कवर निकालानंतर घेतलेल्या सभेत बाळासाहेबांनी एक सनसनाटी आरोप असा केला. ‘हा बाईचा (इंदिरा गांधींचा), गाईचा (गायवासरू निशाणीचा) नव्हेतर शाईचा विजय आहे.’ शाईचा म्हणजे मताचा शिक्का मारणारी जी शाई वापरण्यात आली, ती शिक्का मारल्यावर काही वेळाने अदृष्य़ होणारी होती आणि त्या जागी आपोआप आधीच छपाई केलेला गायवासरावरला शिक्का दिसण्याचा डाव खेळला गेला; असा दावा ठाकरे यांनी जाहिरपणे केला होता. मुद्दा त्यातल्या खरेखोटेपणाचा नसून इंदिरा नावाच्या झंजावाताने राजकारणी लोकांची मती किती गुंग केली होती, त्याचा आहे. पण कोणत्या परिस्थितीत लोक इंदिरा गांधींना इतक्या प्रचंड प्रमाणात मते द्यायला सरसावले; त्याचा कोणीही विचार केला नाही. त्याची मिमांसा करण्याचा प्रयास तेव्हा तरी केला नाही. सवाल परिस्थितीचा होता आणि त्या परिस्थितीचा आपल्या लाभासाठी इंदिराजींनी करून घेतलेल्या वापराचा होता. आधीपासून नाकर्तेपणा व भ्रष्टाचार यांनी गांजलेल्या कॉग्रेसलाच इंदिराजींच्या नेतृत्वाने व व्यक्तीमत्वाने पुन्हा जनमानसात आशेचा किरण बनवल्याचा तो परिणाम होता. इंदिराजी पंतप्रधान राहिल्या व झाल्या; तर देशाची प्रगती होईल, गरीबी दूर होईल, असे स्वप्न लोकांनी मनावर घेतले होते. तेवढेच नाही तर इंदिराजींच्या हाती सर्वाधिकार दिले. तर त्या देशाचा चेहरामोहरा बदलून टाकू शकतील; असा विश्वास जनमानसात निर्माण झाल्याचा तो परिणाम होता.
परिणाम म्हणजे तरी काय असतो? जो कॉग्रेस पक्ष नऊ राज्यात लोकांनी चार वर्षापुर्वी नाकारला होता आणि त्याच पक्षात बेदिलीने फ़ुट पडलेली होती, असा दुबळा पक्ष हाताशी घेऊन इंदिराजी मैदानात उतरल्या होत्या. त्याच्याकडे पत्रकार, अभ्यासक व जाणकार लोक कॉग्रेसचा एक गट म्हणून बघत होते. पण सामान्य मतदारासाठी तो संपुर्ण वेगळा व इंदिराजींचा पक्ष होता. त्या पक्षाचा इतिहास व पार्श्वभूमी लोक विसरून गेले होते. त्याच्या नावाला किंमत नव्हती. लोक कॉग्रेसला मत देतच नव्हते, लोक त्याच्याकडे कॉग्रेस म्हणून बघतच नव्हते. लोक इंदिराजींना मत देत होते. कारण आपल्या समस्यामधून मुक्ती इंदिराजी देऊ शकतात; म्हणून त्यांनाच सर्वसत्ताधीश करायचे होते. त्यामुळे ज्याला उमेदवार केला वा शेंदूर फ़ासला; तो कागदोपत्री इंडीकेट कॉग्रेसचा उमेदवार होता. पण मतदारासाठी तो इंदिरा गांधीना पंतप्रधान बनवणारा उमेदवार होता. दुसरीकडे तमाम विरोधी पक्ष किंवा गट तरी कॉग्रेसच्या विरोधात कुठे होते? त्यांचा सगळा रोखही व्यक्तीविरोधी होता. इंदिराजींना पाडायला तमाम उजवे डावे कटीबद्ध झालेले होते. म्हणजेच ती १९७१ सालची निवडणूक इंदिरा समर्थन व इंदिरा विरोध अशी विभागली गेलेली होती. एका बाजूला एकट्या इंदिराजी व दुसर्या बाजूला सगळे पक्ष; अशी स्थिती होती. सहाजिकच ज्या कोणाला इंदिरा नको, त्याच्यासाठी अनेक पक्ष होते. पण त्यातला कुठला पक्ष नको असेल, त्याच्यासाठी एकमेव इंदिरा हाच पक्ष होता. व्यक्तीकेंद्री राजकारण व निवडणुकीत अशी स्थिती निर्माण होत असते. त्यात मग पक्षाचा इतिहास, आधीचे कर्तृत्व, संघटनात्मक ताकद; अशा सर्व गोष्टी दुय्यम होऊन जातात. नेता कोण, याच भोवती सर्व राजकारण घुमू लागते. तशी परिस्थिती निर्माण होण्याचे डाव इंदिराजी खेळल्या, त्याला यश मिळवायला अन्य पक्ष व विरोधक त्यांच्या मदतीला आले आणि त्याचेच परिणाम मतदान व निकालातून समोर आले. ती लोकप्रियता वा यश इंदिराजींना कायम टिकवता आले नाही, हे मान्यच करावे लागेल. पण विजय वा पराभवात देशाचे राजकारण नंतरही त्यांच्या हयातीत त्यांच्याच भोवती घुटमळत राहिले; ही वस्तुस्थिती कोणीच नाकारू शकणार नाही. अगदी १९८४मध्ये त्यांची हत्या झाल्यावरही देश इंदिरा गांधी, याच व्यक्तीमत्वाच्या भोवती घुटमळत, चाचपडत वा प्रदक्षिणा घालत राहिला. त्या (१९७०-१९८४) कालखंडातल्या चारही लोकसभा निवडणुका म्हणूनच लाटेच्याच राहिल्या. आणि त्यांच्या अस्तानंतर तसे व्यक्तीमत्व नसल्याने पुढच्या सात निवडणूका लाटच निर्माण करू शकल्या नाहीत, की कुठल्या पक्षाला वा नेत्याला निर्णायक बहूमत देऊ शकल्या नाहीत.
इंदिराजी यांच्याच वाटेने जाऊ बघणारे अनेक नेते देशात उदयास आले. पण जात, पात, प्रांत, भाषा, धर्म, पंथ अशा सीमा ओलांडून पलिकडे सर्वच प्रांतामध्ये आपल्या व्यक्तीमत्वाची भुरळ घालू शकणारा नेता इंदिराजींनंतर भारतीय क्षितीजावर उगवला नाही. काहीशा उलट्या स्थितीमध्ये तसे देशव्यापी चहाते व समर्थक अलिकडल्या काळात नरेंद्र मोदी यांच्या वाट्याला आलेले दिसतात. विविध व्यासपीठावर वा प्रांतामध्ये त्यांच्याविषयीची उत्सुकता मोदींना गुजरातच्या सीमेपार घेऊन जाणारी आहे. पण दुसरीकडे त्याचवेळी त्यांच्याकडून काही मोठे कार्य घडू शकते. असे मानणारी लोकसंख्या वाढते आहे. पक्षाच्या पलिकडे जाऊन त्यांचे समर्थन वाढताना दिसते आहे. भाजपाविषयी आस्था नसलेले अनेक समाजगट किंवा संस्था-व्यक्ती मोदींकडे आशेने बघताना आढळून येतात. आपल्या विविध भाषणे व कल्पनांमधून मोदी यांनी, देशाच्या मोठ्या लोकसंख्येला उज्वल स्वप्ने साकार होऊ शकतात, अशी आशा दाखवली आहे. कुठलेही तत्वज्ञान वा विचारसरणी यात अडकून न पडता; मोदींनी लोकांना स्वप्न दाखवून त्या स्वप्नांवर स्वार होण्याचा चालविलेला प्रयत्न लपत नाही. तशी स्वप्ने राजीव गांधी व त्यांच्या नंतरच्या काळात व्ही. पी. सिंग, वाजपेयी वा अलिकडल्या काळात सोनिया गांधींनीही लोकांना दाखवली आहेत. परंतू त्यातल्या कोणीही धाडसी पावले उचलून खंबीर निर्णय घेण्याची कुवत कधीच सिद्ध केली नाही. त्यामुळेच राजीव गांधींना पदार्पणातच मिळालेल्या अभूतपुर्व यशाचे योग्य भांडवल करता आले नाही आणि व्ही. पी, सिंग यांना सदिच्छांचा अर्थच लागला नाही. वाजपेयी कितीही चांगला नेता असले, तरी त्यांना लोकांच्या स्वप्नावर स्वार होता आले नाही, वा अप्रिय निर्णय घेण्याची हिंमत दाखवता आलेली नाही. सोनिया गांधींना लोकसंपर्कच साधत नाही. तरीही त्यांना जनतेने संधी दिली तरी पुर्वपुण्याईतून बाहेर पडायचे धाडस त्यांना दाखवता आलेले नाही. परिणामी इंदिरा अस्तानंतर लाट निर्माण करणारा नेताच उदयास आला नाही. त्याची थोडीशी चाहुल मोदी यांच्या रुपाने लागली आहे. आणि ते नेमके इंदिराजींच्या पावलावर पाऊल टाकल्याप्रमाणे वाटचाल करताना दिसतात. म्हणुनच भाजपाला सत्तेपर्यंत घेऊन जाणारा हाच नेता असेल काय, त्याचे विवेचन करताना इंदिराजींचा अभ्यास आवश्यक ठरतो. त्या कालखंडात इंदिराजी या व्यक्तीमत्वाभोवती घुटमळणार्या त्या चार लोकसभा निवडणुका असे मी का म्हणतो, तेही आता तपासून बघू या. (अपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा