गुरुवार, ६ जून, २०१३

कॉग्रेसमधील पहिलीवहिली फ़ाटाफ़ूट (इंदिराजी ते नरेंद्र मोदी -११)

   बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण केले म्हणजे खाजगी बॅन्कांवर आता सरकारचे नियंत्रण आलेले होते. त्यामुळे जणू हा भांडवलदारांच्या खिशातला वा तिजोरीतला पैसा, आता जनतेला इंदिराजींनी खुलाच करून दिला; अशी एक अफ़वा पिकवण्यात आली. अफ़वा एवढ्यासाठी म्हणायचे, की त्या बॅन्कांच्या कारभारात गरीबाला काय मिळाले, ते आता चार दशकांनी आपल्याला दिसतेच आहे. मात्र त्यात राजकारण्यांना हस्तक्षेप करायची संधी मिळाली. पण व्यवहार फ़ारसे बदलले नाहीत. काही नव्या उद्योजक वा व्यापार्‍यांना किरकोळ कर्जे मिळण्याची सोय झाली. पण खर्‍या अर्थाने त्यातून जनतेचे कल्याण होऊ शकले असे कोणी म्हणू शकणार नाही. पण इंदिराजींनी गरीबांसाठी बॅन्का व भांडवलदारांच्या तिजोर्‍या खुल्या केल्या; असा प्रचार सुरू झाला आणि त्यासाठी मग खजीन्यावरचे विंचू वा नाग असल्यासारखी बाकीच्या कॉग्रेस नेत्यांची प्रतिमा रंगवण्याचे काम डाव्या विचारवंत व काही नेत्यांनी हाती घेतले. इंदिराजींना तेच तर हवे होते. त्यांनी अतिशय धुर्तपणे त्याचवेळी समाजवादाच्या दिशेने आपण जात आहोत आणि कॉग्रेसमधले ढुढ्ढाचार्य आपला मार्ग अडवून बसले आहेत, अशी सूचक विधाने केली. तशीच गोरगरीब व गांजलेल्यांना सुखद वाटावी, अशी एक घोषणा दिली; ‘गरीबी हटाव’. तिचा डंका पिटण्याची जबाबदारी फ़ुकटात  समाजवादी व डाव्यांनीच उचलली होती. आणि त्यातच मग राष्ट्रपती पदाची निवडणुक आली. त्यातून इंदिरा गांधींना आपल्या पुढले डाव खेळणे सोपे झाले. एकीकडे विरोधातले डावे समाजवादी व दुसरीकडे स्वपक्षातली जुनी खोडे; यांना संपवण्याचा मस्त डाव त्या खेळल्या. त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीचा जुगार असा खेळला, की त्यात हे दोन्ही गट चितपट होऊन गेले. त्यापैकी एक त्यांच्या स्वपक्षातला विरोधक गट होता तर दुसरा विरोधातला त्यांच्या शिकारीचे स्वेच्छेने झालेले सावज होता. गिरी यांना अपक्ष रिंगणात उतरवून इंदिराजींनी कॉग्रेसच्या नेत्यांना गिरींना पाडायचे आव्हान दिले. तर दुसरीकडे त्याच गिरी यांना कॉग्रेसच्या नाकावर टिच्चून निवडून आणायचे आव्हान डाव्या समाजवाद्यांनाही दिले. आता गिरींचा म्हणजे पर्यायाने इंदिराजींचा पराभव म्हणजे जणू या समाजवादी डाव्यांचाच पराभव; अशी भ्रामक स्थिती निर्माण झाली होती. कॉग्रेस त्यातून फ़ुटेल आणि मग त्या पक्षाला उतरती कळा लागेल; अशी गाजरे डावे समाजवादी खात होते. मात्र आपण इंदिराजींना प्रेषित म्हणून जनतेपुढे उभे करतोय; याचे त्यांना अजिबात भान नव्हते. त्यातून पुन्हा इंदिराजी कॉग्रेसचेच पुनरूज्जीवन करीत आहेत, हे सुद्धा त्या अतिशहाण्या डाव्या समाजवाद्यांच्या ध्यानात आले नाही. गिरी जिंकले तो दिसायला कॉग्रेसमधील जुन्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाचा पराभव होता. पण त्यातच विरोधकांनी स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. कारण त्यांनी प्रभावी नेतृत्वाच्या अभावी घसरगुंडीला लागलेल्या कॉग्रेस पक्षाला गांधी-नेहरू यांच्या दर्जाचा लोकमताला गुंगवून सोडणारा नेता त्यातून बहाल केला होता.

   समाजवादी डाव्यांना हाताशी धरून दोन डाव यशस्वी झाल्यावर इंदिराजींना पक्षातल्या जुन्या खोडांचे भय उरले नाही. जनमानसात त्यांची उद्धारक अशी प्रतिमा उभी राहिली होती आणि गिरी यांच्या विजयाने त्यांच्या धाडसी वृत्तीवर शिक्कामोर्तब झाले होते. गरीब लोकांना कॉग्रेसमधल्या भांडवलशाही मनोवृत्तीच्या नेत्यांपासून मुक्ती हवीच होती. पण दुसरीकडे विरोधकांच्या विविध राज्यातील सत्तालंपट अराजकातून सुटका देणाराही कोणी उद्धारक जनतेला हवाच होता. इंदिराजींनी त्या दोन्हीवरला आपणच एकमात्र रामबाण उपाय आहोत; अशी आपली स्वतंत्र प्रतिमा उभी करून घेतली होती. आणि तेवढे झाल्यावर त्यांनी आपल्या जुगारातला अखेरचा निर्णायक डाव खेळायची तयारी केली. गिरी यांचा विजय म्हणजेच कॉग्रेसचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार संजीव रेड्डी यांचा पराभव होता. त्यावर निमूट बसणे म्हणजे कॉग्रेसच्या तमाम ज्येष्ठ नेत्यांसाठी नामुष्की होती. त्यांनी मग पहिले पाऊल उचलले. इंदिराजी जणू त्याचीच प्रतिक्षा करत होत्या. कॉग्रेस श्रेष्ठींनी आपल्याच पक्षाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, यांची पक्षातून हाकालपट्टी केली. अशा कॉग्रेसने मग आपले अधिवेशन बोलावले. त्याला शह म्हणून इंदिराजींनी पक्षातील आपल्या समर्थकांना पुढे करून वेगळे कॉग्रेस अधिवेशन बोलावले. शेवटी सत्ता श्रेष्ठ असते आणि नेत्याची हुकूमतही महत्वाची असते. पक्षात इंदिराजींनी आपले अनेक तरूण समर्थक उभे केलेले होतेच. त्यांना त्या काळात तरूण तुर्क संबोधले जायचे. त्यात चंद्रशेखर, मोहन धारिया अशा आजच्या पिढीला वयोवृद्ध वाटणार्‍या अनेकांचा समावेश होतो. त्यांनी जुन्याजाणत्या नेत्यांवर खुलेपणाने तोफ़ा डागण्याचे काम हाती घेतले. तर अनेक समाजवादी व विचारांनी डावे असलेले नेते विचारवंत, थेट कॉग्रेसमध्ये दाखल झाले. अर्थात ही कॉग्रेस शास्त्री-नेहरूंची नव्हती. ती इंदिरा गांधी यांना दैवत मानायचा आग्रह धरणार्‍यांची नवी कॉग्रेस होती. त्यातून मग कॉग्रेस पक्षात अधिकृत फ़ुट पडली. अनेक मंत्री राजिनामा देऊन बाहेर पडले. त्यांच्या पक्षाला संघटना कॉग्रेस व इंदिरा गटाला सत्ताधारी कॉग्रेस, असे नाव मिळाले. वृत्तपत्रिय व राजकीय भाषेत त्यांना सिंडिकेट व इंडिकेट असेही म्हटले जायचे. त्यातून लोकसभेत प्रथमच विरोधी नेता मिळाला. सिंडिकेट कॉग्रेसमध्ये हे पन्नास साठ खासदार राहिले, त्यांना विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळाली. राजिनामा दिलेले रामसुभग सिंग यांची त्या गटाचा नेता म्हणून विरोधी नेते पदावर नेमणूक झाली होती. त्यात तारकेश्वरी सिन्हा या फ़टकळ महिला नेत्याचाही समावेश होता. १९७० साल उजाडेपर्यंत अशी विस्कटलेली राजकीय स्थिती आलेली होती. कॉग्रेस फ़ुटली होती. संसदेत इंदिराजींच्या गटाचे अल्पमत सरकार कायम होते. विविध राज्यात संविद सरकारांचे अराजक माजलेले होते त्यातून भांबावलेल्या व गांजलेल्या जनतेला इंदिराजींनी ‘गरीबी हटाव’चे स्वप्न दाखवले होते.

   म्हणजेच एकूणच देशात राजकीय अस्थिरता, अराजक व विस्कटलेली घडी होती. अगदी स्पष्ट सांगायचे तर आज जी अस्वस्थता आपण देशभर बघतो आहोत व या देशाचे काय होणार, अशी जी सार्वत्रिक भावना लोकांच्या बोलण्यातून सातत्याने व्यक्त होत असते; त्याचेच प्रतिबिंब तेव्हाच्या जनभावनेमध्ये पडलेले होते, असे मानायला हरकत नाही. कायद्याचे राज्य खिळखिळे झाले होते, राजकीय बेदिली पराकोटीला गेलेली होती. गटबाजी, तटबाजी व रा्जकीय बेबनावाने प्रशासनावर कोणचीच पकड नाही, ही जाणीव जनतेला हवालदिल करून सोडत होती. आणि त्यातून मार्ग काढू शकेल व देशाला एकत्र ठेवू शकेल असा पक्ष नव्हता की नेता कोणी नाही; अशी जनभावना झाली होती. अशावेळी लोक तशा नेत्याचा शोध घेऊ लागतात. नेमक्या त्याचवेळी इंदिराजींनी स्वत:ला त्याच रुपात जनतेसमोर पेश केले. त्यासाठी आपल्या समर्थकच नव्हे; तर विरोधक व प्रतिस्पर्ध्यांनाही त्याच कामाला जुंपले. त्यामुळे मग कुठल्या पक्षाला वा त्याच्या संघटनात्मक ताकदीला महत्व राहिले नव्हते. मात्र त्याचे भान राजकीय अभ्यासक वा पत्रकार, संपादक, विचारवंतानाही नव्हते, म्हणूनच इंदिराजी काय करीत आहेत, त्यांना लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे किंवा कशामुळे प्रतिसाद मिळतो आहे; त्याचे विश्लेषण या अभ्यासक पत्रकारांनाही करता येत नव्हते. किंबहूना अशा सर्व राजकीय जाणकारांचा जनतेशी संपर्कच तुटला होता, म्हणायला हरकत नाही. मग त्यांना इंदिराजींना लोक कशामुळे पाठींबा देतात वा मते कशाला देतील; त्याचा तरी अंदाज कसा बांधता येईल? त्यामुळेच मग इंदिराजींची लोकप्रियता मतातून कशी व्यक्त होऊ शकेल, याचाही अंदाज कोणी करू शकत नव्हता. आणि त्यावेळी आजच्यासारख्या मतचाचण्य़ा घेतल्या जात नव्हत्या किंवा अंदाजही वर्तवले जात नव्हते. फ़ार तर पोलिस गुप्तचरांचा अंदाज, हेच निवडणुकीचे भाकित मानले जायचे. पण ज्यांना जनतेची नाडी ओळखता येते, त्यापैकी इंदिराजी असल्याने, त्यांनी तीच वेळ साधून मग पुढला डाव खेळला. अगदी अनपेक्षित वेळी त्यांनी १९७० च्या अखेरीस अकस्मात लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली. तो त्यांच्या कॉग्रेसमधील व बाहेरील विरोधकांना जबरदस्त धक्का होता. तसाच त्यांची पालखी उचलून नाचणार्‍या डाव्या समाजवाद्यांनाही हादरा होता.

   आपण जनमानसाच्या आकांक्षेचे प्रतिक व इच्छा झालो आहोत, याची खात्री इंदिराजींना झाली होती. आपण सांगू तेच लोक मानतील आणि लोकांना  राजकीय स्थैर्य व चोख कारभार, यापेक्षा अधिक काहीही नको आहे, हे त्यांनी ओळखले होते. कुठल्या विचारसरणी वा तत्वज्ञानापेक्षाही लोकांना आता त्यांच्या जीवनातील समस्यांपासून मुक्ती हवी होती. आणि ती देऊ शकणारा किंवा तसे निदान स्वप्न दाखवणारा जो कोणी असेल; त्याच्यासाठी कुठलाही जुगार खेळायला देशातला गरीब सज्ज होता. असा माणूसच खरा लोकप्रिय नेता असतो. तो लोकांना सुखाची, संमृद्धीची, स्थैर्याची स्वप्ने दाखवत असतो. ती स्वप्ने आवाक्यातली नसली तरी भुलवणारी व शक्यतेच्या कोटीतली वाटावी लागतात. त्यासाठीचे सोपे व जवळचे मार्ग लोकांना दाखवण्याची खुबी त्या नेत्यापाशी असावी लागते. ती स्वप्ने साकारण्याला कितीही विलंब होत असेल, तरी तितका काळ लोकांना झुलवण्याची किमया त्या माणसापाशी असावीच लागते. महत्वाचे म्हणजे त्या स्वप्नपुर्तीमध्ये खरेखुरे कितीही अडथळे असले, तरी ते साकार होऊनच शकते, असे ठामपणे बोलणारी भाषा व बोलणारा माणूस लोकांना खुप आवडत असतो. कारण अशी स्वप्ने पुर्ण होण्यापेक्षाही, तसे आश्वासन व आशा लोकांना आजच्या यातना वेदनांमधून दिलासा देत असतात. मग त्या स्वप्नांच्या पुर्तीमधल्या खर्‍या अडचणी व समस्या कोणी सांगितल्या, तरी त्याचा लोकांना कमालीचा राग येतो. ती एकप्रकारची नशाच असते. नशेतून बाहेर पडणे म्हणजे असह्य स्थितीला पुन्हा सामोरे जाणे असते. आणि म्हणूनच अशी स्वप्ने दाखवणारा व त्यांच्या पुर्तीची ठाम आश्वासने देणारा, नेताच लोकांना खुप आवडतो. त्याच्यासाठी जीव व आयुष्य ओवाळून टाकायला लोक सज्ज असतात. त्याच्या अशा किमयागार प्रतिमेचे दैवतीकरण सुरू होते आणि त्यातूनच मग व्यक्तीकेंद्री राजकारण उदयास येत असते. इंदिराजींनी नेमके तेच केले होते. गरीबी हटावचे स्वप्न दाखवून त्यांनी बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण करताना देशाचा वा भांडवलदारांचा पैसा जनतेच्या खिशात आणून टाकल्याचा भुलभुलैया निर्माण केला होता आणि मग तेच स्वप्न जनतेचे होऊन इंदिराजी त्याच्या स्वप्नांच्या लाटेवर स्वार झाल्या. अशी लाट जेव्हा उसळी मारून उभी रहाते; तेव्हा पोथीनिष्ठ राजकारण व संघटनात्मक पक्षाचे राजकारण अर्थहीन होऊन जाते. सगळेच राजकारण झंजावाती भोवरा होऊन एका व्यक्तीभोवती घुमू लागले, घिरट्या घालू लागते, इंदिरा गांधी यांनी राजकीय खेळी व डावपेचांनी देशातल्या लोकमताचे व जनभावनेचे आपल्या भोवती धृवीकरण करून टाकले होते. कोण कुठल्या पक्षात, संघटनेत, प्रांत वा शहरात होता, त्याला महत्व राहिले नाही. देशाची दोन गटात विभागणी झाली. इंदिरावादी व इंदि्रा विरोधी. (अपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा