शुक्रवार, ७ जून, २०१३

सतत मत बदलणारा मतदार (इंदिराजी ते नरेंद्र मोदी -१२)

  एकदा ही तात्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थिती समजून घेतली; मग त्यावेळच्या निवडणूकीतल्या आकड्यांना अर्थ प्राप्त होत असतो. त्याचे विविध पदर उलगडत असतात. चार वर्षे आधीच्या निवडणुकीत नऊ राज्यात ज्या एकत्रित कॉग्रेसचा धुव्वा उडाला होता आणि लोकसभेत बहूमत काठावर येऊन ठेपले होते; तीच कॉग्रेस इंदिरा गांधींच्या डावपेचांनी दुभंगली होती, फ़ुटली होती. असे झाले मग कॉग्रेसच्या मतात फ़ुट पडणार, हे साधेसरळ राजकीय गृहीत असते. पण हे पुस्तकी गृहीत असते. वास्तव जगात मते हा जनतेने, म्हणजे माणसांनी दिलेला कौल असतो. त्यामुळेच आधीच्या निवडणुकीत ज्या स्थितीत व ज्या कारणासाठी लोकांनी तसे मत दिलेले असते; त्यापेक्षा परिस्थिती बदलेली असेल, तर तसेच मतदान अपेक्षित धरता येत नाही. सहाजिकच पक्षातल्या फ़ाटाफ़ुटीने मते फ़ुटणार, हे गृहीतही फ़सवे असते. कुठल्याही निवडणूकीमध्ये किमान दहा पंधरा टक्क्याच्या आसपास मतदार असा असतो, की तो कुठल्याच पक्षाचा एकनिष्ठ वा बांधील मतदार नसतो. तो परिस्थिती, अपेक्षा, प्रसंग व गरज यानुसार आपले मत नेहमी बदलत असतो. म्हणजे असे, की ज्या कारणासाठी मतदान आहे ते कारण राष्ट्रीय वा राज्याचे आहे, उमेदवार कोण आहे, कुठल्या पक्षाचे वा आघाडीचे सरकार येऊ शकते, कोण मुख्यमंत्री वा पंतप्रधान होणार आहे आणि सध्या देशाची गरज काय आहे; यानुसार अशा मतदाराचे मत प्रत्येकवेळी बदलत असते. नुसते दोन निवडणुकीतच बदलत नाही. अनेकदा काही क्षणाच्या फ़रकानेही त्याचे मत बदलत असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९९९ सालची महाराष्ट्रातली निवडणूक होय. त्यात सेना भाजपा युतीने लोकसभा निवडणुकीत मोठी बाजी मारली होती, पण विधानसभेत मात्र युतीची मते बहूमत मिळवायला तोकडी पडली होती. एकाचवेळी मत द्यायला मतकेंद्रात गेलेल्या त्या मतदाराने, अवघ्या एक दोन मिनीटाच्या फ़रकाने दोनदा मतदान केले होते. एक मत आमदारासाठी व दुसरे लोकसभेतील खासदार निवडण्यासाठी दिले होते. पण तसे करताना त्याने विधानसभेला एका पक्षाला, तर लोकसभेला दुसर्‍या पक्षाला मत दिलेले आहे. लोकसभा मोजणीत युतीची मते ३८ टक्के होती. पण विधानसभा मोजणीत तीच मते ३१ टक्के खाली आलेली होती. मग लोकसभेत युतीला मत देणारे सात टक्के मतदार एकाच मिनीटाच्या फ़रकाने आपल्या निष्ठा बदलतात काय? तसे होत नाही. याचा अर्थ इतकाच, की युतीचा ३१ टक्के मतदार वा त्यापेक्षा कमी टक्के मतदार पक्का एकनिष्ठ असू शकतो. पण बाकीचा परिस्थिती व गरजेनुसार युतीकडे येणारा व दुरावणारा मतदार असतो. कुठल्याही निवडणूकीचे निकाल फ़िरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. म्हणूनच खर्‍या अर्थाने असाच मतदार निर्णायक महत्वाचा असतो.  

   निवडणूकीचे निकाल कसे लागतात किंवा कुठल्या पक्षाचा जोर आहे; त्याचे अंदाज बांधणे म्हणूनच खुप अवघड असते. पण ज्यांना निवडणुका जिंकायच्या असतात, त्यांनाही आपला निष्ठावान मतदार कायम ठेवून हा बदलता मतदार आपल्या गोटात आणणे आवश्यक असते. कारण पारड्यात पडणारा अखेरचा बटाटा किवा कांदा जसा पारडे झुकवत असतो; तसे हे मतदार महत्वाचे असतात. त्याच्याही खेरीज आणखी एक मतदारांचा गट असतो. त्याला उदासिन वा आळशी मतदार म्हणता येईल. जो सहसा मतदानाला घराबाहेर पडायचा आळस करतो, किवा एकूणच राजकीय घडामोडींविषयी उदासिन असतो. मतदानाकडे तो पाठ फ़िरवतो. त्यामुळे त्याची गणना कोणीच करीत नाही. पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये तोच मतदार बाहेर पडला; तर मात्र तो सर्व निवडणुकीचे अंदाज व राजकीय निष्कर्ष उध्वस्त करून टाकत असतो. जेव्हा अकस्मात प्रचंड मतदान वाढते, तेव्हा असा उदासिन मतदार घराबाहेर पडलेला असतो. त्याला बाहेर काढणे अतिशय अवघड काम असते. पण जेव्हा असे घडते; तेव्हा सत्तांतर झालेले दिसेल. १९९५ सालात महाराष्ट्रामध्ये सत्तांतर अशाच मतदाराने घडवून आणलेले होते. मला ते आठवते, कारण तेव्हा प्रणय रॉय या तज्ञाने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस आपले बहूमत कसेबसे टिकवून ठेवू शकेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मला त्याच्या अभ्यासाविषयी कमालीचा आदर आहे. म्हणूनच मी तेव्हा त्यासंबंधाने तीन लेख लागोपाठ लिहिले होते. त्यापैकी दोन लेखात प्रणय रॉयचे भाकित शास्त्र कसे नेमके व योग्य आहे; त्याची माहिती व विवेचन दिले होते. मात्र तिसर्‍या लेखात त्याचे निवडणूक भाकित कुठे फ़सणार, त्याची कारणमिमांसा केली होती. ती मिमांसा नेमक्या त्याच वाढलेल्या मतदानाची म्हणजे उदासिन मतदार घराबाहेर पडण्य़ाविषयीची होती. रॉयचे अंदाजशास्त्र हे पुर्वी होऊन गेलेल्या एकूण मतदानाच्या आकडेवारी व आजच्या चाचणीच्या आकड्यावर आधारलेले होते. पण महाराष्ट्रात त्यापुर्वी कमाल मतदान ६३ टक्केच झालेले होते. १९९५ सालात शेषन महोदय चाबुक हाती घेऊन उभे असताना, किमान खर्चिक प्रचार झालेला होता. कमीत कमी गाजावाजा होऊनही तेव्हा मतदान ७१ टक्के झालेले होते. म्हणजेच आठ टक्के मतदार उत्साहाने घराबाहेर पडला होता. आणि त्या वाढीव मतदाराला रॉयचे तर्कशास्त्र लागू होत नव्हते. कमी प्रचारात इतके अफ़ाट मतदान वाढते. म्हणजेच मतदार स्वेच्छेने बाहेर पडलेला आहे आणि तो दंगलखोरासारखा बाहेर आलेला होता. असा माणुस काहीतरी उध्वस्त करायला आलेला असतो. त्याचा अर्थच तो असलेली सत्ता उध्वस्त करणार. हे माझे राजकीय तर्कशास्त्र होते आणि तसेच झाले. पण म्हणून रॉयचे शास्त्र चुकीचे नव्हते, ते तेवढ्यापुरते फ़सले.

   मुद्दा आहे तो अशा विविध मानसिकतेमध्ये असलेल्या मतदाराचा. आणि तोच मतदार निवडणूक निकालांना कलाटणी देत असतो. ज्याला कोणाला लोकमत कुठे झुकते आहे वा राजकीय वारे कुठल्या दिशेने वहात आहेत; त्याचा अंदाज करायचा असेल; त्याने अशा बदलत्या मतदार व उदासिन मतदाराचा अभ्यास करणे अगत्याचे असते, जो कुठल्या ना कुठल्या पक्षाचा बांधील एकनिष्ठ मतदार असतो, त्याच्याशी बोलून भाकिते करता येत नाहीत आणि केलीच तरी ती खरी सहसा ठरत नाहीत. या उदासिन वा बदलत्या मतदाराला प्रभावित करणारी परिस्थिती वा नेतृत्व मैदानात असेल तर निवडणुकीवर मोठा प्रभाव पडत असतो. कारण असा मतदार तो बदल घडवून आणत असतो. या उदासिन व बदलत्या मतदाराच्या मनावर जो पक्ष वा नेता कब्जा मिळवू शकतो; त्यालाच निवडणुकीत उलथापालथ घडवून आणता येत असते. १९६६ पुर्वी देशाच्या पातळीवर असा कुणी नेता बिगरकॉग्रेस पक्षांकडे नव्हता. कॉग्रेस बिनधास्त जिंकत होती. पण नेहरू यांच्या अस्तानंतर तसे राहिले नाही आणि स्थानिक पातळीवरचे लोकमत फ़िरवू शकणारे अनेक प्रादेशिक नेते उदयास आले. त्यामुळेच १९६७ च्या निवडणुकीत बदलत्या मतदारांनी चमत्कार घडवला होता. त्यातच पुन्हा मतविभागणी टाळण्याचे भान विरोधी पक्षांनी राखले होते. त्याचे प्रत्यंतर आपल्याला त्या निवडणुक निकालाच्या आकड्यातच मिळू शकते. पहिल्या तीन म्हणजे १९५२, १९५७ आणि १९६२ या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये ४५, ४८ व ४५ टक्के मते कॉग्रेसने मिळवली होती. पण लोकसभेत मिळवलेल्या जागा ३६४, ३७१ आणि ३६१ अशा भरभक्कम म्हणजे दोनतृतियांश होत्या. पण १९६७ सालात कॉग्रेसची मते अवघी चार टक्के कमी झाली आणि विरोधकांनी शक्यतो आपसात लढायचे टाळले; तर ८० जागा् कॉग्रेसच्या घटल्या होत्या. या जागा किंवा मते कमी होण्यातले महत्वाचे मुद्दे काय होते? कुठलेही देशव्यापी लोकप्रिय व्यक्तीमत्व कॉग्रेसपाशी नव्हते. त्यामुळेच जो बदलता दोनचार टक्के मतदार ढिला होता, तो अर्ध्या राज्यात कॉग्रेसच्या हातून निसटला, तर किती फ़रक पडला बघा. त्याच निवडणुकीमध्ये प्रमुख बिगर कॉग्रेस पक्ष असलेल्या कम्युनिस्ट व समाजवाद्यांची मते फ़ारशी वाढली नाहीत, तरी जागा मात्र वाढल्या होत्या. लक्षणिय मतामध्ये वाढ झाली होती, ती जनसंघ (तेव्हाचा भाजपा) या पक्षाची. त्याने आपल्या मतात दिडपटीने वाढ करून घेताना अडिच पटीने जागा अधिक जिंकल्या होत्या. याचा अर्थच असा, की तरंगता किंवा बदलता मतदार आपल्याकडे वळवण्यात तोच पक्ष अधिक यशस्वी झाला होता. त्याचे फ़ळ त्याला मिळाले व बाकीच्या पक्षांना त्याचा अधिक लाभ उठवता आला नाही. (अपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा