रविवार, २ जून, २०१३

राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरींची निवडणूक (इंदिराजी ते नरेंद्र मोदी -८)

इंदिरा गांधी यांचा दबदबा आणि वचक त्या काळात किती होता; त्याचा हा दणदणीत पुरावा. तेव्हाच्या इंडिया टुडे’ पाक्षिकाने नंतरच्या काळात प्रसिद्ध केला होता. जगप्रसिद्ध छायाचित्रकार रघू राय यांच्या कॅमेराने टिपलेला आहे. देशाचा राष्ट्रपती वराह गिरी व्यंकट गिरीही इंदिराजींसमोर कशा अवस्थेत आहेत बघा.



राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरींची निवडणूक
(इंदिराजी ते नरेंद्र मोदी -८)
   योगायोग असा, की १९६८ सालात देशाचे तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचा आकस्मिक अकाली मृत्यू झाला व उपराष्ट्रपती वराह गिरी व्यंकट गिरी यांना हंगामी राष्ट्रपती म्हणून बढती मिळाली. सहाजिकच नव्याने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पाळी आली. त्यासाठी कॉग्रेसतर्फ़े उमेदवार ठरवण्याची वेळ आल्यावर दोन्ही गट पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यात इंदिराजींचे बहूमत नसल्याने पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराला मान्यता देणे त्यांना भाग होते. त्यांना मान्य होणार नाही, असा उमेदवार पक्षश्रेष्ठींनी मुद्दाम मुक्रर केला. पक्षाचा उमेदवार म्हणून इंदिराजींनी संजीव रेड्डी यांच्या अर्जावर सूचक म्हणूनही सही केली. पण अशी खेळी केली, की त्यांना कठपुतळी म्हणणार्‍यांनाही तोंडात बोट घालायची वेळ आली. हंगामी राष्ट्रपती असलेल्या गिरी यांनी आपल्या पदाचा राजिनामा देऊन अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. त्यांच्यामागे इंदिराजींचीच प्रेरणा होती हे सर्वश्रुत होते. पण त्यानंतर पक्षातर्फ़े रेड्डी यांनाच मतदान करण्याचा व्हीप काढायला इंदिराजींनी नकार दिला आणि कॉग्रेसमधील दुफ़ळी चव्हाट्यावरच आली. पक्ष म्हणून कोणी त्यांच्यावर व्हीप काढायची सक्ती करू शकत नव्हता. शिवाय आपल्या क्रांतीच्या पाठीशी आता डाव्यांचे पाठबळ भक्कम उभे रहाणार, याची इंदिराजींना खात्री होती. म्हणूनच त्यांनी गिरींना उमेदवार बनवून हिशोबी जुगार खेळला होता. कॉग्रेसचा अधिकृत उमेदवार संजीव रेड्डींना पाडून गिरी यशस्वी होणार याची इंदिराजींना खात्री होती. तर आपणच कॉग्रेस उमेदवार पाडणार, यासाठी समाजवादी व डावे खुश होते. कॉग्रेस पक्षांतर्गत राजकारणात इंदिराजी आपला खुबीने मोहर्‍याप्रमाणे वापर करून घेत आहेत, याचा थांगपत्ता तेव्हा या डाव्यांना लागला नव्हता. उलट आपण इंदिराजींना आपल्या डावपेचात वापरतोय अशी त्यांची भोळी समजूत होती. पण प्रत्यक्षात डाव्यांना तशा भ्रमात ठेवून इंदिराजी त्यांचा वापर कॉग्रेसमधल्या दिग्गजांना संपवायला करीत होत्या. अधिक आपली व्यक्तीगत प्रतिमा जनमानसात उजळून घेण्याचा खेळही खेळत होत्या. सगळे राजकारणच असे खेळले जात होते, की इंदिरावादी व इंदिराविरोधी असे राजकीय धृवीकरण होत चालले होते आणि आपल्या प्रत्येक चालीतून इंदिराजी त्या धृवीकरणाला गतिमान बनवत होत्या. आपल्या विरोधकांना, प्रतिस्पर्ध्यांना व समर्थकांनाही इंदिराजींनी आपल्या हेतूविषयी कधी अंदाज येऊ दिला नाही. देशाचे राजकारण आपल्याभोवती घुमावे फ़िरावे, अशी त्यांचे धोरण व खेळी होती.

   इंदिराजींनी संसदीय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून आपल्या पक्षाच्या खासदारांनी रेड्डी यांनाच मत देण्याचा आदेश जारी करणे आवश्यक होते. पण त्यांनी प्रत्येकाने आपली विवेकबुद्धी वापरून मत देण्याचा सल्ला कॉग्रेसजनांना दिला. ही विवेकबुद्धी म्हणजे रेड्डी नाकारून गिरींना मतदान करणे असाच त्याचा अर्थ होता आणि घडलेही तसेच. त्या निवडणुका अटीतटीच्या झाल्या. गिरी विरुद्ध रेड्डी अशा लढतीमध्ये कॉग्रेसच्या बहुसंख्य खासदारांनी व मोजक्या आमदारांनी गिरीच्या यांच्या पारड्यात मत टाकले. मात्र पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या यशवंतरावांचा महाराष्ट्र पक््हीय उमेदवाराच्या म्हणजे रेड्डींच्या बाजूने ठाम उभा राहिला. पण त्याची इंदिराजींना फ़िकीर नव्हती. नऊ राज्यात विरोधकांचाच वरचष्मा होता. लोकसभेतही कॉग्रेसचे हुकूमी बहूमत नव्हतेच. त्यामुळे अर्धेअधिक कॉग्रेस खासदार वा आमदार इंदिराजींच्या बाजूने उभे राहिले तरी पुरेसे होते. कारण संसद वा विधानसभांमधील बहुतांश सदस्य विरोधी व डाव्यांचेच होते. त्यांच्या मतांची इंदिराजींना हमी होती. किंबहूना त्याच बळावर इतका मोठा जुगार इंदिराजी खेळल्या होत्या. तो यशस्वी झाला आणि चांगल्या मताने गिरी राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्या विजयाचा आनंदोत्सव इंदिरा गांधी व त्यांच्या कॉग्रेस पाठीराख्यांपेक्षा डाव्या समाजवाद्यांनीच साजरा केला होता. याला म्हणतात रणनिती. ज्यांना आपले राजकीय महात्म्य उभे करण्यासाठी इंदिराजी प्याद्याप्रमाणे वापरत होत्या व त्यांचेच खच्चीकरण करण्याचे डाव खेळत होत्या; तेच लोक त्यांचा उदो उदो करण्यात आघाडीवर होते. ज्या विजयाने इंदिरा नावाचे वादळ भारतीय राजकारणात उभे केले, ती येऊ घातलेल्या कॉग्रेसविरोधी राजकारणाच्या विध्वंसाची चाहुल होती. पण ज्यांच्यासाठी ते संकट येऊ घातले होते; तेच त्याचा आनंदोत्सव साजरा करत होते. ती नव्या व्यक्तीकेंद्री राजकारणाची मुहूर्तमेढ होती. कारण त्या दोनतीन चाली व डावात इंदिराजींनी डाव्या व समाजवादी पक्षांच्या मदतीने कॉग्रेसमध्ये असलेला त्यांच्या विरोधातला गट खच्ची व निकामी करून टाकला आणि त्याचवेळी कॉग्रेस विरोधातल्या आक्रमक राजकीय नेते-पक्षांकडून आपले नगारे वाजवून घेतले होते. आपली उद्धारक वा प्रेषिताची प्रतिमा त्यांनी जनमानसात उभी करून घेतली व दुसरीकडे देशाचे सर्वच राजकारण इंदिराजी या व्यक्तीभोवती घुटमळत राहिल; अशी नेपथ्यरचना करून घेतली होती. त्याला कसायाला गाय धार्जिणी म्हणावे तसे डावे समाजवादी बळी पडले होते.

   पंतप्रधान होईपर्यंत किंवा त्यानंतरही पक्षात व सरकारमध्ये इंदिराजींची भूमिका ही एक कॉग्रेस नेता इतकीच होती. त्यांनी पक्षापेक्षा स्वत: मोठे व्हायचा प्रयत्न केला नव्हता. पण पक्षात राहून व इतक्या उच्च पदावर असूनही आपल्याला काही करून दाखवण्याची संधी मिळत नाही, अशी जाणीव झाली; तेव्हाच त्यांनी वेगळा विचार सुरू केला होता. तेव्हा एकीकडे विरोधी पक्षातली दिशाहीनता व दुसरीकडे स्वत:च्याच कॉग्रेस पक्षात सत्तेची चाललेली साठमारी; यांनी जनतेचा होत चाललेला भ्रमनिरास त्यांना दिसत होता. पण दोन्हीकडल्या दिवाळखोर राजकीय नेत्यांना ते समजावून त्यांत बदल करणे त्यांना शक्य नव्हते. पण सामान्य जनतेला विश्वासात घेतले, तर ती जनता आपल्याला पुर्ण अधिकार देईल व आपल्या मनासारखा कारभार करीत या देशाला नवी दिशा देता येईल; याची इंदिराजींना मनोमन खात्री पटली होती. त्यातूनच त्यांनी एक वेगळाच जुगार खेळला होता. त्यांनी पित्याच्या सावलीतून बाहेर पडून स्वत:ची एक राष्ट्रीय व अजोड नेता, अशी प्रतिमा उभी करून जनतेलाच विश्वासात घेण्याचा पवित्रा घेतला होता. मग त्यासाठी आवश्यक असलेले डावपेच वा रणनिती अत्यंत निर्दयपणे त्यांनी योजली व अंमलात आणली. त्यात त्यांनी कॉग्रेसमधील वडीलधार्‍या नेत्यांचे अहंकार व विरोधी पक्षांच्या बावळटपणाचा अत्यंत खुबीने वापर करून घेतला. त्यात धुर्तपणे आपले सहकारी, समर्थक, प्रतिस्पर्धी व विरोधकांचा वापर करून घेतला. आणि त्या प्रत्येक चालीतून त्यांनी जनमानसाच्या कल्पनाशक्तीवर कब्जा मिळवण्याचे आपले उद्दीष्ट साध्य केले. १९६६ सालात एकसंघ कॉग्रेसचे लोकसभेतले बहूमत घसरले होते व नऊ राज्यात सत्ता गेलेली होती. तेव्हा त्याच इंदिराजी नेतृत्व करत होत्या. पण अवघ्या पाच वर्षात त्यांनी पक्षात फ़ुट पाडून लोकसभेत कॉग्रेसचे दोन तृतियांश बहूमत व देशाच्या सर्वच राज्यात पुन्हा कॉग्रेसला सत्ता मिळवून दिली. मात्र कॉग्रेस पक्ष आता आमुलाग्र बदलून गेला होता. आता जिंकून आलेल्या पक्षाचे नाव तेच असले, तरी तो नेहरू, गांधी, पटेलांचा कॉग्रेस पक्ष राहिला नव्हता. तर तो इंदिराजींच्या इच्छेपुढे मान तुकवणारा व्यक्तीकेंद्री कॉग्रेस पक्ष झाला होता. तो एकखांबी तंबू झाला होता. त्यात कार्यकारिणी वा पदाधिकारी होते. पण त्यांची लायकी व अधिकार इंदिराजी म्हणतील त्यावर शिक्कामोर्तब करण्यापलिकडे उरले नव्हते. थोडक्यात कॉग्रेस पक्ष शिल्लकच राहिला नव्हता. तर इंदिराजी म्हणतील त्या जमाव किंवा नेत्यांच्या समुहाला कॉग्रेस समजले जात होते. सगळ्या देशाचे राजकारणच इंदिरा या शब्दाभोवती घुमू लागले होते. (अपुर्ण)                        

1 टिप्पणी: