शुक्रवार, १३ जुलै, २०१२

त्यांनी छ्ळावे आणि आपण छळून घ्यावे


   माणसाला मस्ती चढली मग तो कसा वागतो व बोलतो, त्याचा कुणाला पुरावा हवा असेल तर त्याने आजच्या युपीए मंत्र्यांपैकी काही लोकांना बारकाईने बघितले तरी खात्री पटेल. बंगलोर येथे एका पत्रकार परिषदेत केंद्रिय गृहमंत्री चिदंबरम यांना देशातल्या वाढत्या महागाईबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी तुच्छतेने दिलेले उत्तर त्याच मस्तीचा साक्षात पुरावा आहे. जे लोक पंधरा रुपये मोजून मिनरल वॉटर म्हणजे बाटलीबंद पाणी रस्त्यात खरेदी करतात किंवा आईसक्रीमवर वीसपंचवीस रुपये क्षणाचाही विचार न करता खर्च करतात, त्यांनी महागाईबद्दल बोलणे हास्यास्पद आहे, असेच त्यांचे विधान होते. ज्यांना तो खर्च परवडतो तेच गहू किंवा तांदळाच्या किंमतीत किलोसाठी एक रुपया अधिक मोजताना खळखळ करतात. साध्या पिण्याच्या पाण्यावर पंधरा रुपये किंवा आईसक्रीमच्या चैनीवर वीस रुपये उधळणार्‍यांना धान्य भाजीच्या किंमतीतली किरकोळ भाववाढ महागाई का वाटते; असे या महोदयांना कोडे पडले आहे. त्यातूनच त्यांचा वास्तवाशी व सामान्य नागरिकाच्या जगण्याशी संपर्क कसा तुटला आहे, त्याची सक्ष मिळते. 

   नुसते शब्द ऐकले वा पाहिले तर कोणालाही ते तर्कशुद्ध विधान वाटेल. खरेच आहे पंधरावीस रुपये उधळणार्‍यांना किलोमागे रुपया दोन रुपये वाढले तर जाणवता कामा नये. पण ज्याने हा महागाईचा प्रश्न विचारला, त्याचा रोख कुणाकडे होता? त्याचा रोख आईसकीम खाणारे वा बाटलीबंद पाणी पिणार्‍यांकडे नव्हता. कारण असे लोक तक्रार करत नसतात. अगदी त्या पत्रकार परिषदेत हजर असलेले किंवा असा प्रश्न विचारणारे पत्रकार सुखवस्तू मध्यमवर्गातलेच असतील. पण त्यांनी स्वत:ला भेडसावणार्‍या महागाईबद्दल प्रश्न विचारला नव्हता. त्याचा रोख दोनवेळच्या अन्नासाठी दाहीदिशा फ़िराव्या लागणार्‍या सामान्य गरीब आम आदमीला भेडसावणार्‍या महागाईबाबत तो प्रश्न विचारला होता. पण त्या प्रश्नाविषयी ज्या तुच्छतेने चिदंबरम उत्तरले, त्यातून आजच्या सताधीशांची मुजोर मानसिकता स्पष्ट होते. त्यांना या देशातला आम आदमी व गरीब कसा जगतो आहे व मेटाकुटीला आलेला आहे, त्याची माहिती नसावी किंवा त्याबद्दल कसलेही कर्तव्य नसावे. अन्यथा चिदंबरम असे उत्तर देऊच शकले नसते. कारण आज देशातील अर्धीअधिक जनता उपासमारीच्या कडेलोटावर उभी आहे. गरिबीरेषेच्या खाली जगणार्‍या जनतेचे लोकसंख्येतील प्रमाण चिदंबरम यांना ठाऊक नाही, की त्यांना तिच्याशी कर्तव्यच उरलेले नाही?

   आधूनिक जगातल्या नव्या राजकीय अवताराची सुरूवात, अशाच एका चिथावणीखोर बेजबाबदार विधानातून झाली आहे. लोकशाही असो, की समाजवादी क्रांती असो, त्याचा राजकीय इतिहास फ़्रेंच राज्यक्रांतीपासून सुरू होतो. तेव्हा फ़्रांसमधल्या अमीर उमरावांची चैन व ऐषोआराम चालू होते आणि तिथली जनता उपासमारीने मरायची वेळ आलेली होती. एकदा त्याच भुकेल्या जनतेने राजवाड्यावर मोर्चा काढला, तर त्यांच्या घोषणांचा आत चाललेल्या मौजमजेत व्यत्यय आल्याने राणीसाहेब सज्जामध्ये आल्या आणि त्यांनी आक्रोश करणार्‍या जमावाला कारण विचारले. तर लोक म्हणाले आम्हाला खायला पावही मिळेनासा झाला आहे. इतक्या महागाईने आम्ही त्रस्त झालेले आहोत. जरा चैन सोडून आमच्या हालअपेष्टांकडे बघा. त्यावर राणीसाहेबांनी त्या जमतेला फ़र्मावले, पाव मि्ळत नसेल वा परवडत नसेल, तर केक खाऊन जगा. ते शब्द जखमेवर मीठ चोळल्यासारखे डिवचणारे होते. त्यामुळे जमाव चवताळला व राजवाड्यावर चाल करून गेला. त्याने राजघराणेच नव्हेतर तिथल्या तमाम सरदार, उमराव, जमीनदारांवर हल्ला चढवला. प्रचंड रक्तरंजीत क्रांती त्यातून झाली. त्यालाच राज्यशास्त्रात व राजकीय इतिहासात फ़्रेंच राज्यक्रांती म्हणतात. राज्यशास्त्राचे शिक्षण वा राजकारणाचा अभ्यास फ़्रेंच राज्यक्रांतीकडे पाठ फ़िरवून होऊच शकत नाही. पण कदाचित आपल्या आर्थिक जाणकारीवरच विसंबून मिरवणार्‍या चिदंबरम यांनी फ़्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास वाचलेला नसावा. किंवा कुठलाही इतिहास न वाचता नवा इतिहास घडवायला निघालेल्या राहुल गांधींचे नेतृत्व स्विकारले असल्याने, चिदंबरम यांना फ़्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास शिकण्य़ाची गरज वाटत नसावी. कदाचीत इटालीच्या इतिहासाचे तोंडपाठ अध्ययन केले असल्याने त्यांना तो फ़्रांसचा इतिहास फ़डतूस वाटत असावा. म्हणून त्यांनी फ़्रेंच राणीला शोभणार्‍या शब्दात बंगलोर येथे मुक्ताफ़ळे उधळली असावीत.

   ज्या देशात अर्धीअधिक जनता अर्धपोटीच जगते आहे. तिच्यासाठी एक रुपया म्हणजे ताटातला आणखी एक घास काढून घेणेच असते. चिदंबरम यांच्याच सरकारने नेमलेल्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनीच मध्यंतरी २८ रुपयात ग्रामीण व ३१ रुपयात शहरी माणूस जगू शकतो आणि त्याला गरीब म्हणता येणार नाही; अशी व्याख्या केलेली होती. त्या व्याख्येत पंधरा रुपयाची पाण्याची बाटली बसू शकते काय? अहलुवालियांच्या व्याखेतल्या सुखवस्तू माणसाने वीस रुपयाचे आईसक्रीम खरेदी केले तर त्याच्या घरातली चुल पेटण्यासाठी इंधन खरेदी करायला पैसे शिल्लक उरतील काय? मग ती चु्ल पेटली तरी त्या चुलीवर पातेले चढवून त्यात शिजवणार काय? कारण आईसक्रीम व इंधन खरेदीतच २८ किंवा ३१ रुपये संपलेले असतील. मग चुल पेटवून त्यावर ठेवलेल्या पातेल्यात स्वतं:चेच अवयव कापून माणसाचे शिजवावेत अशी चिदंबरम यांची अपेक्षा आहे काय? ज्याला बाटलीतले पाणी किंवा आईसक्रीम परवडते, त्याला महागाईची फ़िकीर नसते. कारण तो महाग वा स्वस्त किराणा माल खरेदी करण्यासाठी बाजारातही जात नसतो. ते काम करणारे नोकरचाकर त्याच्या घरी असतात. म्हणूनच तो महागाईबद्दल तक्रार करत नाही, की तांदुळ गहू यासाठी रुपया दोन रुपये सोडा, दहा पंधरा रुपये अधिक मोजतानाही तक्रार करत नाही. कारण बाजारात अशा गोष्टींच्या काय किंमती आहेत तेच त्याला माहित नसते. तेवढेच नाही. त्याला वाढणार्‍या पेट्रोल वा डिझेलच्या महागाईचीही फ़िकीर नसते. नव्या आलिशान गाड्यांच्या किंमती वा फ़्लॅट्च्या वाढत्या किंमतीबद्दल तो फ़ार तर तक्रार करत असतो. पण चिदंबरम यांना तो कोण आणि उपासमारीने व्याकूळ झालेला, महागाईने भरडला जाणारा कोण तेही ठाऊक नाही. कारण त्यांना भारत नावाचा देश कुठे आहे व तिथे कोण जगते-मरते तेही ठाऊक नाही. किंबहूना त्यांना काहीच ठाऊक नाही हीच तर त्यांची अर्थमंत्री वा गृहमंत्री होण्यातली मोठी पात्रता आहे. अन्यथा त्यांना सोनियांनी गे्टवरूनच हाकलून लावले नसते का?

   काय देशाचा कारभार चालू आहे बघा. गृहमंत्र्याला व माजी अर्थमंत्र्याला गरीब व श्रीमंत कोण ते ठाऊक नाही. पंतप्रधानाला त्याच्याच कार्यालयात कोण काय करतो त्याचा पत्ता नाही. मुख्यमंत्र्याला आपण कुठल्या फ़ाईलवर कशासाठी सह्या करतो त्याचा थांगपता नसतो. नशीब त्यांना आपण कॉग्रेस पक्षात आहोत आणि सोनिया गांधी त्याच्या अध्यक्षा वगैर आहेत, हे ठाऊक आहे. अन्यथा एवढा अनर्थ झाला असता ना? जे उपासमारीने मरत आहेत ते मरायलाच जन्माला आले आहेत. ज्यांच्यावर अन्याय होतो, ते अन्याय सोसण्यासाठीच जन्माला आले आहेत आणि आपण त्यांच्या जीवाशी खेळ करायला जन्म घेतला आहे, अशीच त्यामागची मानसिकता आहे. त्यातूनच असे शब्द चटकन उच्चारले जाऊ शकतात. महागाई देशातल्या अर्ध्याहुन अधिक जनतेच्या जिवाला घोर लावणारी आहे, हेच ज्यांच्या मेंदूत शिरत नाही, त्यांच्यासाठी ती गरीब जनता किंवा आम आदमी माणुस वा नागरीकच नसतो. नशीबात येईल तेवढे आणि ताटात पडेल तेवढ्यात त्याने जगावे, तक्रार करू नये, हीच चिदंबरम यांची भूमिका आहे. त्याच मस्तवाल भूमिकेतून अशा मुजोर शब्दांचा उच्चार होत असतो. मात्र त्यावर कल्लोळ माजला, तेव्हा आपल्या शब्दांचे विकृतीकरण झाल्याचा कांगावा चिदंबरम यांनी केला आहे. ती आता कॉग्रेसच्या नेत्यांची व मंत्र्यांची शैली झाली आहे.  

   आणि का त्यांना अशी मस्ती चढू नये? मागल्या सहा दशकात ज्यांनी जवळपास अखंड सत्ता उपभोगली आणि तरीही त्यांचा राजपुत्र पुन्हा मधली तीनचार वर्षे सत्तेवर बसलेल्यांच्या डोक्यावर अपयशाचे खापर फ़ोडतो, तर टाळ्य़ा वाजवून त्यांनाच मते जी जनता देते, तिलाही हेच हवे असते ना? आपण मरो किंवा उपासमारीची वेळ येवो. कुणाला त्याची फ़िकीर आहे? चिदंबरम सोडा. तुम्हाआम्हाला तरी महागाई, घोटाळे, उपासमार यांची फ़िकीर आहे का? असती तर पुन्हा पुन्हा त्यांनाच सिंहासनावर आपणच कशाला बसवले असते? त्यांनी छळावे आणि आपण छळवाद सहन करावा, हीच आपली इच्छा लोकशाहीतून व्यक्त करणार्‍याच्या नशीबी दुसरे काय येणार? तेव्हा जय आम आदमी, जय सोनिया व जय चिदंबरम म्हणून कोरडा ढेकर द्या पाहू.   ( क्रमश:)
 भाग ( ३२५ )   १४/७/१२

1 टिप्पणी:

  1. भाऊ आपण दोन वर्षांपूर्वी लिहालेल्या या लेखाचे उत्तर लोकांनी २०१४ मधे दिले आहे. फ्रेंच राज्यक्रांती आणि लोकसभा निवडणुका २०१४ यांत फरक एवढाच आहे की भारतीय राज्यक्रांती रक्ताचा एकही थेंब न सांड़ता झाली आहे. आपण त्या वेळेस हा 'गरिबांचा असुड' ओढ़ल्याबद्दल धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा