रविवार, १ जुलै, २०१२

’झोपी गेलेला जागा झाला’ त्याचा फ़ार्स


   उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रालयात आगीच्या प्रसंगी जे आपत्ती व्यवस्थापन केले, त्याचे अजबगजब नमूने मंत्रालयातल्या अनेक जनसंपर्क अधिकार्‍यांनी विविध वृत्तपत्रात छापुन आणले आहेत. त्यापैकी दोन बातम्या मी (भाग ३०९ मधून) पुण्यनगरीच्या वाचकांना सादर केल्या आहेतच. त्यातला तपशील खरा मानायचा, तर अजितदादा व त्यांच्या या जनसंपर्क अधिकार्‍यांकडे कुठली तरी सिद्धी असली पाहिजे असेच वाटते. त्यापैकी दैनिक पुढारीच्या अंकातील निवेदनात अजितदादांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख छातीठोकपणे ग्वाही देतात की, "ही कार्यवाही यशस्वी होऊ शकली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातला कार्यकर्ता जागा असल्यामुळे."  त्यांना म्हणजे देशमुखांना "जागा" म्हणजे जागृत वा जागरूक असे म्हणायचे आहे काय? तसे असेल तर दादा कधी जागे असतात व कधी त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला गाढ झोप लागते; त्याचाही देशमुखांनी त्याच निवेदनातून खुलासा करायला हवा होता. कारण शेवटी यशस्वी कार्यवाही करण्यासाठी जो कार्यकर्ता अजितदादांमध्ये खडबडून जागा झाला, तो ते स्वत:च सहाव्या मजल्यावर असतांना झोपा काढत होता काय? निदान देशमुखांचे निवेदन तरी त्याचीच साक्ष देणारे आहे. मला तर देशमुखांचा हा प्रयत्न ते नव्याने एक जुने गाजलेले मराठी नाटक नव्याने सादर करू बघत असल्यासारखा वाटला.  

   १९६० च्या दशकात मराठी रंगभूमी खुप जोशात होती. तेव्हा रंगभूमीवर बबन प्रभू नावाचा एक नटसम्राट अक्षरश: धुमाकूळ घालत होता. त्याने नुसते रंगमंच्यावर पदार्पण करावे, की प्रेक्षकात खसखस पिकायची. तेव्हा बबन प्रभूची गाजत असलेली दोन नाटके लोकांना वेड लावून गेली होती. त्यापैकी एक होते "दिनूच्या सासूबाई राधाबाई" आणि दुसरे नाटक होते "झोपी गेलेला जागा झाला". अशा विनोदी नाटकांना फ़ार्स म्हणतात. त्यातला बबन प्रभू धमाल उडवून द्यायचा. "झोपी गेलेला जागा झाला"मधला बबन एका बॅंकेत नोकरी करत असतो. त्याला कधीही अचानक झोप लागते. म्हणजे तो दिसायला जागा असतो, पण आपण कोण आहोत व काय करतो आहोत, त्याचे त्याला अजिबात भान नसायचे. मग त्यातून तो उलटसुलट गोष्टी करायचा आणि त्यातून सगळी विनोद निर्मिती व्हायची. जागेपणातली त्याची झोप त्याच्याकडून वाटेल त्या गोष्टी करून घ्यायची. आणि अचानक त्याला जाग यायची. म्हणजे आपण खरे कोण आहोत, याचे भान यायचे आणि त्याची भलतीच फ़जिती व्हायची. इतरांची मात्र तारांबळ उडायची. अजितदादा वा संजय देशमुख नाटके बघायला लागायच्या वयात येण्यापुर्वीच बबन प्रभूने या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे कदाचित त्यांना ही दोन्ही नाटके बघता आलेली नसतील. पण आज जी पन्नास साठीच्या पलिकडची पिढी जिवंत आहे, त्यांना बबन प्रभू आणि त्याचा "झोपी गेलेला" नक्कीच आठवू शकेल. निदान दादांचे अनुभवी काका शरद पवार यांना तर झोपेतही नक्कीच आठवेल. त्यामुळेच थोरल्या पवारांनी देशमुखांचे पुढारीतले निवेदन वाचले असेल, तर त्यांना आपल्या पुतण्याच्या रुपाने नवा बबन प्रभू अवतरला, की काय असेच वाटल्याशिवाय रहाणार नाही.

   त्यात फ़ार्समध्ये बबन प्रभू कामावर येताना आणलेल्या चपात्या बॅंकेच्या तिजोरीत ठेवतो आणि बॅंकेत जमा झालेली कॅश रक्कम फ़्रिजमध्ये ठेवतो. असा चमत्कार घडवत असतो. जे करायचे त्याच्या नेमके उलट करणे हे झोपी गेलेल्या फ़ार्सचे कथासुत्र आहे. आणि देशमुख लिहितात, त्यावर विश्वास ठेवायचा तर मंत्रालयातील अग्नीकांडाच्या तासभराच्या कालखंडात अजितदादा नेमके तसेच चमत्कारिक वागले आहेत. ते लिहितात, "ही कार्यवाही यशस्वी होऊ शकली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातला कार्यकर्ता जागा असल्यामुळे."  माझा मुद्दा इतकाच आहे, की दादांमधला तो कार्यकर्ता जागा कधी झाला? सहा मजले उतरून तळमजल्यावर सुखरूप जागी पोहोचल्यावर जागा झाला काय? आणि सहाव्या मजल्यावर समिती कक्षात आले असताना, सचिवांच्या दालनाकडे जात असताना किंवा तिथेही धुर दिसल्यावर जिन्याकडे जात असताना, दादांमधला तो कार्यकर्ता गाढ झोपला होता काय? म्हणजे दादा तिथे त्या अग्नीकांडाच्या काळात झोपेत वावरत होते काय? दादांना झोपेत चालण्याची वगैरे सवय आहे काय? कारण जिथे देशमुख व अन्य जनसंपर्क अधिकार्‍यांना नुसत्या हाका मारून सावध केल्यास, त्यांना आगीच्या दाहक अनुभवातून जावे लागले नसते, तिथे अजितदादा त्यांच्याकडे पाठ फ़िरवतात. त्यांना आगीत होरपळायला सोडून देतात. सोपे काम अवघड करून ठेवतात. आणि त्यांच्या जीवावर बेतले, मग जागृत कार्यकर्त्याप्रमाणे धावपळ करतात. याला कार्यकर्ता म्हणायचे की झोपी गेलेला जागा होणे म्हणायाचे?

   देशमुख आपल्या दाहक अनुभवाचे सत्यकथन पुढारीमधून करत आहेत, की त्या भीषण अग्नीकांडाचा एक नाट्यमय फ़ार्स बनवत आहेत? जर त्यांनी हा फ़ार्स लिहिला नसेल, तर त्या घटनाक्रमामध्ये दादांनी तिथल्या तिथे कक्षात अडकलेल्यांना ओरडा करून पळायला सांगितले पाहिजे होते. त्यांच्यातला कार्यकर्ता सोडाच, साधा सामान्य माणूस जरी जागा असता तरी दादांनी ओरडा केला असता. आपण रस्त्यातून जाताना, कोणा अनोळखी माणसाच्या अंगावर मागून गाडी येत असेल व तो गाफ़ील असेल, तर ओरडून त्याला सावध करतो. आपण जागरुक कार्यकर्ते नसतो, तर एक सामान्य नागरिक असतो आणि माणुसकी म्हणुन तसे ओरडत असतो. ह्या माणसाच्या उपजत प्रवृत्ती आहेत. कुणीही तसाच वागतो. कार्यकर्ता त्याच्याही पुढे जाऊन स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या अनोळखी व्यक्तीला वाचवायला धावतो. अजितदादांनी त्यापैकी काहीच करू नये, हे चमत्कारिक नाही काय? की त्यांच्यातल्या जागृत कार्यकर्त्याने त्यांना अशा सामान्य माणसाला शक्य असलेल्या गोष्टी केल्या नाहीत? शक्य आहे. एका राज्याचा उपमुख्यमंत्री इतक्या सामान्य माणसासारखा सामान्य वागला तर मरणार्‍याचे प्राण नक्कीच वाचतील. पण त्यातून उपमुख्यमंत्र्याची शान धुळीस मिळेल ना? मग सामान्य माणूस व अजितदादांमधल्या जागृत कार्यकर्त्याची महती काय फ़रक उरला? उपमुख्यमंत्री सोपे काम कशाला करील? त्याच्या प्रतिष्ठेला शोभेल असे अशक्य कार्य हातून पार पडावे म्हणुन तो सोपे काम अधिक अवघड करून ठेवणार ना? त्या काम अवघड करण्यालाच देशमुख कार्यकर्ता जागा असणे म्हणत असावेत.

   सामान्य नागरिकातला माणुस जागा असला तर त्याने प्रथम अग्नीशमन दलाला पाचारण केले असते. पण अजितदादा पडले उपमुख्यमंत्री. त्यांनी असली फ़डतूस कामे कशाला करायची? त्यांचे काम त्यांच्या अधिकाराला शोभणारे हवे ना? मग दादानी अग्नीशमन दलाला पाचारण केले नाही. पण उशीरा अग्नीशमन दलाचे लोक आल्यावर त्यांना दमदाटी करण्याचे काम दादांनी केले. याला म्हणतात, जागृत कार्यकर्ता. कितीही बिकट प्रसंग वा संकट ओढवलेले असो, जो आपल्या अधिआर व प्रतिष्ठेला बाधा येऊ न देता, लोकांना संकटात सोडण्याचा संयम बाळगू शकतो, ती त्याच्यातला कार्यकर्ता जागा असल्याची साक्ष असते. थॅंक्यू मिस्टर संजय देशमुख. तुम्ही तुमच्या निवेदनातून मराठी जनतेचे डोळे चांगलेच उघडलेत. त्यामुळे आमच्यासारख्या मुर्खांना कार्यकर्ता जागा असतो म्हणजे काय ते कळू शकले. त्यामुळेच २६ नोव्हेंबरला गृहमंत्री आर. आर. आबा यांच्यातला कार्यकर्ता कसा जागा होता, त्याचा शोध लागला. आबांमधला कार्यकर्ता जागा नसता, तर कसाबच्या टोळीची काय बिशाद होती, मुंबईत येऊन इतक्या निरपराध माणसांना किडामुंगीप्रमाणे मारण्याची? जेव्हा पावणे दोनशे माणसे कुत्र्याच्या मौतीने मारली गेली, तेव्हाच आर आर आबांमधला कार्यकर्ता जागा झाला होता ना? मगच चार दिवसांनी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत नैतिक जबाबदारी स्विकारली होती ना? आबांमधला कार्यकर्ता जागा नसता, तर पावणे दोनशे मुंबईकर जीवाला मुकले असते काय? पाचसातशे लोक जखमी झाले असते काय? त्यांच्यातला कार्यकर्ता जागा होता म्हणुनच साळसकर, कामथे वा करकरे कायमची चिरनिद्रा घेऊ शकले ना? कसाबच्या अंगावर झडप घालणारा व त्याला पकडताना स्वत:चे प्राण गमावणारा तुकाराम ओंबळे बहुधा झोपेत असावा ना देशमुख साहेब?

   अजितदादांच्यातला कार्यकर्ताच कशाला, शासनातील तुमच्यापैकी ज्यांच्यातला कार्यकर्ता जोवर जागा असेल, तोवर आमचे जीव असेच धोक्यात असणार ना? जोवर जातपात, आरक्षण, अनुदान वा अन्य कुठल्यातरी स्वार्थामध्ये गुरफ़टलेला आपला समाज झोपी गेलेला आहे, तोवर आम्हाला अजितदादांच्या अशा जागृत शक्तीवरच विसंबून जगणे भाग आहे. पण देशमुख साहेब, ज्या दिवशी तो झोपी गेलेला समाज जागा होईल ना, त्या दिवसानंतर तुम्ही म्हणता तशा कार्यकर्त्यांना पळायला व लपायला जागा उरणार नाही हे लक्षात ठेवा. कारण सामान्य माणूस सहनशील व सभ्य असला, तरी तुम्ही समजताइतका मुर्ख नाही. त्याच्या सहनशीलतेमध्ये उदासिन असलेले लाखो तुकाराम ओंबळे जागे होतात, तेव्हा शस्त्रधारी कसाबही जेरबंद होऊन जातो, हा जगाचा इतिहास आहे.    (क्रमश:)
 भाग  ( ३१२ )     १/७/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा