बुधवार, ११ जुलै, २०१२

रामचंद्र रेड्डी काय सांगतात बघा.


   तुम्ही नियमितपणे टिव्ही बघत असाल तर कधीतरी नॅशनल जिओग्राफ़ीक किंवा डिस्कव्हरी अशा वाहिन्यांवरचे कार्यक्रम नक्कीच बघत असाल. निदान मला तरी तसा छंद आहे. त्यामुळे अनेकदा चांगल्या गोष्टींची घरबसल्या माहिती मिळून जाते. विशेषत: ज्या गोष्टी आपल्या समोर घडत असतात, पण त्याचा थांग आपल्याला लागत नसतो, अशा गोष्टींची रहस्ये त्यातून उलगडत असतात. मागे एकदा मी वाहिन्यांवरील निखिल वागळे किंवा अन्य निवेदक खोटे बेधडक बोलताना कसे मुद्दाम हातवारे करतात, त्यावर विश्लेषण करू शकलो होतो, तीसुद्धा अशाच वाहिन्यांची कृपा होती. अशीच एकदा वाहिन्यांची भटकंती करत असताना मला डॉ. रामचंद्र रेड्डी यांच्या अभ्यास व संशोधनाची मजेशीर माहिती बघायला मिळाली. डॉ. रेड्डी हे मेंदू कसा काम करतो या विषयाचे जाणकार अभ्यासक आहेत. त्यांच्यावरचा दोन भागातला माहितीपट उपरोक्तपैकी एका वाहिबनीवर मला बघायला मिळाला. अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी हे मेंदूचे रहस्य उलगडून दाखवले आहे. ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी तो माहितीपट लक्ष ठेवून मुद्दाम बघण्य़ासारखा आहे.

   मेंदूच मानवी हालचाली व निर्णयाचे सर्वांगिण नियंत्रण करतो हे आपण जाणतो्च. पण हे काम चालते कसे? उदाहरणार्थ आपण कानाने ऐकत असतो. पण जे आपण ऐकतो, ते खरेच कानाने ऐकलेले असते का? जे आपले डोळे बघतात किंवा डोळ्यांना दिसते, ते डोळेच बघत असतात का? कुणाला कसली माहिती देतांना आपण मोठ्या खात्रीने सांगतो, मी माझ्या स्वत:च्या कानाने ऐकले आहे. माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे. असे सांगण्यामागचा आपला हेतू असा असतो, की आपण ऐकले वा पाहिले, म्हणजेच ते शंभर टक्के खरे आहे किंवा वास्तव आहे. निदान आपल्या बोलण्या सांगण्याचा तसा अविर्भाव असतो. आपले कान ऐकतात वा डोळे बघतात, म्हणजेच ते खरे आहे, ही आपण मनाशी बांधलेली खुणगाठ असते. पण आपल्या कानावर पडले वा डोळ्यांना दिसले, म्हणूनच ते खरे का असते? पण वस्तूस्थिती खुपच वेगळी असते. कानांवर पडले वा डोळ्यांना दिसले तरी त्यांनी ऐकलेले वा पाहिलेले नसते. जे काही त्यातून आपल्यापर्यंत पोहोचले, ते मेंदूने ग्रहण केलेले असते. जे मेंदू ग्रहण करत नाही, ते कानावर पडून वा डोळ्यांना दिसून काहीच उपयोग नसतो. तशा शेकडो गोष्टी डोळ्यांना रोज दिसत असतात किंवा कानावर पडत असतात. म्हणून आपण त्या बघितल्या वा ऐकल्याचे दावेही करू शकणार नाही.

   तुमचेच उदाहरण घ्या. बाजारात, बसमध्ये, रेल्वेत किंवा एखाद्या गर्दीच्या जागी तुम्ही असता, तेव्हा कित्येक आवाज तुमच्या कानावर पडत असतात. कधीकधी तुमच्या आसपासच कोणीतरी कर्कश आवाजात बोलत असतो. कधी एकदा त्याचा आवाज बंद होईल असे तुम्हाला मनोमन वाटत असते. त्याचे सर्व शब्द व बोलणे व्यवस्थित कानावर पडत असते वा ऐकू येत असते. पण जर थोड्या वेळाने त्याबद्दल तुम्हाला विचारले तर त्यातले एकही अक्षर तुम्हाला आठवणार नाही. मग तुम्ही ऐकले वा तुमच्या कानावर पडले म्हणजे काय? काहीतरी गोंगाट चालू आहे, ही तुमची धारणा असते, तेव्हा कानावर आवाज पडत असतो, पण त्याची नोंदच घेतली जात नसते. ही नोंद कोण घेतो? जो नोंद घेतो, तोच खरे ऐकत असतो किंवा बघत असतो. त्या नोंद घेणार्‍याने बघायचे नाही वा ऐकायचे नाही, असे ठरवले असेल तर तुमचे डोळे वा कान काहीही करू शकत नाहीत. अगदी समोर बोलले जात असले वा घडत असले, तरी त्याचा काहीही उपयोग नसतो. मेंदूच ऐकत असतो वा बघत असतो. म्हणुनच त्याचे काय बघितले वा ऐकले यावर सर्वकाही अवलंबून असते. कारण जे मेंदू ऐकतो, बघतो त्यावर तो तुमची प्रतिक्रिया व प्रतिसाद ठरवत असतो. मग त्याप्रमाणे तुम्ही वागत असता. जर समोर घडणारे वा कानावर पडणारे आवाज दखल घेण्यासारखे नाहीत, असे मेंदूने ठरवलेले असेल तर त्यावरची प्रतिक्रिया शून्य असते. म्हणजेच ते बघितले जात नाही वा ऐकले जात नाही. पण जेव्हा त्याची दखल घेतली जाते व त्यावरची प्रतिक्रिया वा निर्णय घेतला आत असतो, तेव्हाच ऐकले वा बघितले जात असते. म्हणुनच तुम्ही मोठ्या ठामपणे सांगता, स्वत:च्या कानाने ऐकले वा स्वत:च्या डोळ्यांनी बघितले.

   तुम्ही घटनास्थळी आहात वा हजर होता म्हणून तुम्हाला सर्वकाही कळले असे अजिबात नसते. तुम्ही म्हणजे तुमच्या मेंदूने समोर घडले त्याची किती व कशी दखाल घेतली त्यावर सर्वकाही अवलंबून असते. मग ते काम मेंदू कसा करतो? तर त्यात त्याला विविध ज्ञानेंद्रिये मदत करत असतात. ध्वनीसंकेत ग्रहण करून ते पुढे मेंदूकडे पाठवण्याचे काम मान करत असतो. डोळेही त्याचप्रमाणे समोरचे दृष्य़ घडताना त्याचे संकेतरुप मेंदूकडे पाठवत असतात. मग त्या संकेतांचे रुपांतर अर्थामध्ये करून मेंदू त्याबद्दल निर्णय घेत असतो. त्यावरची प्रतिक्रिया देत असतो. हे काम अतिशय वेगाने होत असते. डोळ्याचे पाते लवत्ते न लवते इतक्यात होऊन जात असते. पण त्यासाठी निर्णय घेण्याची मेंदूमध्ये क्षमता असली पाहिजे. ती क्षमता मेंदू वाढत्या वयाच्या अनुभवातून मिळवत असतो. त्यालाच शिकणे म्हणतात. जेवढा अनुभव दांडगा तेवढी मेंदूची निर्णयक्षमता अधिक धारदार म्हणजे तल्लख होत असते. जुने अनुभव आणि त्यावर स्वत: किंवा अन्य लोकांनी घेतलेले निर्णय, याच्या आधारावर मेंदू निर्णय घेत असतो. थोडक्यात बालपणापासून मुल शिकते म्हणजे ते आपला मेंदू तल्लख व कार्यरत करण्यासाठी धडपड्त असते. हे काम कसे चालते तेच डॉ रेड्डी यांनी छान समजावले आहे.

   मेंदू म्हणजे माहिती साठवणारी जागा आहे तशीच ती त्यावर निर्णय घेणारी अधिकृत सत्ता आहे. मग अनेकदा मेंदू अनवधानानेही तुमच्यासाठी परस्पर निर्णय घेत असतो. तुमच्या नकळत निर्णय घेऊन अंमलातही आणत असतो. एक अनुभव आपण प्रत्येकजण घेत असतो. समजा अचानक वीज गेली मग सगळीकडे गुडूप अंधार होतो. डोळ्यांना काहीही दिसत नाही. आणि आपण तर घरातही नसतो. कधी रस्त्यावर असतो, कधी जिन्यात असतो, कधी घरातच कुठेतरी चाचपडत असतो. मग काही सेकंदातच आपले डोळे अंधाराला सरावतात. त्या गुडूप अंधारातही डोळे बघण्याचा प्रयत्न करू लागतात. पण दिसत काहीच नसते. मात्र जिथे आपण असतो ती जागा अनेक दिवस, वर्षांची परिचित असल्याने आपण अंधारातही अंदाजाने इथेतिथे वावरत असतो. कुठली वस्तू कुठे आहे, जिन्याच्या पायर्‍या किती आहेत वा कुठे वळण येते; याच्या स्मृती मेंदूत नोंदलेल्या असतात. त्याच स्मृतींच्या आधारे हे काम चालू असते. डोळ्यांना काही दिसत नसले तरी त्याच स्मृतींच्या आधारे शरिराला मेंदू कामाला जुंपत असतो. अत्यंत सावधपणे हे व्यवहार चालतात. पण चालू रहातात ना? मनात खुप शंका असतात, पण आपण स्मृतीच्या आधारे वागत असतो. अनेक बाबतीत दिवसाउजेडी असेच अनवधानाने मेंदू आपल्याकडून काम करून घेत असतो. त्याला डोळ्याची वा कानाची गरज भासत नाही. अगदी सहजगत्या ही कामे आपला देह उरकत असतो. कधी आपण त्याला सवय़ीने वा सरावाने असे नाव देतो. पण सवय म्हणजे प्रत्यक्षात स्मृतीमधल्या संकेतांच्या आधारावर हे निर्णय मेंदू घेत असतो. अभ्यास ही गोष्ट त्यापेक्षा वेगळी नाही.

   प्रत्येक दिवशी व प्रत्येक क्षणी आपण सर्व गोष्टी कान, नाक वा डोळे यांच्याच मदतीने करतो असे नाही. त्यांना बाजूला ठेवूनही अशी अनेक कामे आपोआप होत असतात. स्वत: डॉ. रामचंद्र रेड्डी यांनी गाडी चालवताना दिलेल्या मुलाखतीतून ते छान समजावले आहे. ज्या रस्त्याने नेहमी ते गाडी चालवतात, त्याच रस्त्याने मुलाखतीचे चित्रण चालू असताना ते जात होते. तेव्हा त्यांची नजर समोरच असली तरी त्यांचे "लक्ष" मात्र समोर नव्हते. पण सवयीचा रस्ता असल्याने ते सहजगत्या बोलतानाही गाडी चालवत होते. सर्वच गोष्टी नेहमीच्या असल्याने काही चिंतेची बाब नसते. पण त्या दिवशी वा वेळी अचानक काही भलतेच समोर आले व घडले; तर मात्र अपघाताची शक्यता असते. कारण ती बाब जुन्या स्मृतीमध्ये नसते, ज्या स्मृतीच्या आधारे मेंदू कार्यरत असतो. अभ्यास हा असाच अधिकाधिक स्मृती जमा करण्याचा व त्यांच्या आधारे पुढील आयुष्यात नवनव्या अनुभवांचे अर्थ लावण्याचा व त्यावर निर्णय घेण्याचा भाग असतो. जेवढा मेंदू अनुभवाने व साठवलेल्या माहितीने संमृद्ध असतो; तेवढाच तो अधिक तल्लख होत जात असतो. त्याची कार्यक्षमता वाढत असते. जेवढा मेंदू परस्पर निर्णय घेण्याची क्षमता वाढवत जातो, तेवढी हुशारी वाढली असे आपण समजतो. मुलांना म्हणुनच शिकताना अधिकाधिक अनुभव घेण्याला सवड दिली पाहिजे. कारण त्यातूनच त्याचा मेंदू तल्लख होत असतो.   ( क्रमश:)
भाग ( ३२२ )   ११/७/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा