सोमवार, ९ जुलै, २०१२

अभ्यास-परिक्षांची झापडे म्हणजे शिक्षण नव्हे


   अभ्यास किंवा परिक्षा याचे पालकांना फ़ार टेन्शन असते. मला आठवते त्याप्रमाणे मी चौथीत जाईपर्यंत शाळेत रोज काय शिकवले जाते किंवा मी त्या दिवशी काय शिकलो, याची साधी विचारपुसही पालकांनी केली नव्हती. आणि हा फ़क्त माझ्यापुरता अनुभव नव्हता. आसपासच्या सर्वच घरातला तोच अनुभव होता. तेव्हा अकरावी म्हणजे मॅट्रीक परिक्षा खुप मोठी मानली जात होती. सहाजिकच शिक्षण किती हा प्रश्न विचारला गेल्यास मोठ्या अभिमानाने कोणीही मॅट्रीक पास असे उत्तर देत असे. त्याच्या खालोखाल सुशिक्षित असल्याचे लक्षण म्हणजे नॉन मॅट्रीक असे सांगितले जात असे. इथे नॉन मॅट्रीक म्हणजे अकरावीच्या परिक्षेला नापास झालेला असा गृहीत अर्थ होता. पण अगदी दुसरी तिसरीत शाळा सोडलेल्यापासून अकरावीच्या शालांत परिक्षेला बसून अनुत्तीर्ण झालेले सगळेच, स्वत:ला नॉन मॅट्रीक म्हणवून घेत. अशा काळात शाळेत मुल घालणे, शाळा कुठली याला सर्वसाधारण समाजात महत्व नव्हते. उलट तेव्हा ज्यांनी शाळा स्थापन केल्या व चालवल्या होत्या, तेच संध्याकाळी घरोघरी फ़िरून मुलांना शाळेत पाठवण्य़ासाठी पालकांच्या विनवण्या करीत. समाजात शिक्षणाचा प्रसार वाढला पाहिजे अशा उदात विचारांनी भारावलेले लोकच शिक्षण संस्था स्थापन करून चालवत होते. त्यांची उभा्रणी करून गरीब घरच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणुन असे संस्थाचालक खिशाला चाट लावून खर्च करीत होते. तेवढेच नाही तर अनेक धनिकांच्या घरच्या पायर्‍या झिजवून देणग्यांसाठी झोळी पसरत होते. मग अशा काळात मुल शाळेत घातले म्हणजेच मोठे काम व्हायचे. मुल शिकले काय हे पालक विचारतो कशाला?

   आज चित्र आमुलाग्र बदलले आहे. पाळण्यातले मुल रांगू लागले मग पालकाला त्याच्या शाळेची चिंता ग्रासत असते. वर्षाचे मुल झाले मग पालक त्याच्यासाठी शाळेचा शोध सुरू करतो. मग अडिच तीन वर्षाच्या वयातच मुलांना शाळा नावाच्या कोंडवाड्यात डांबले जाते. जेव्हा त्या बाळाला धड बोलता येत नसते व आपले नावपत्ताही सांगता येत नसतो, तेव्हा त्याची शाळा सुरू झालेली असते. आणि नुसती शाळा सुरू होत नाही, त्या इवल्या बालकाला परिक्षा नावाच्या अगम्य स्पर्धेत उतरवले जात असते. पहिली इयत्तेत येण्यापुर्वी दोन किंव तीन वर्षे नर्सरी केजी अशा शाळा चालतात आणि त्यातल्या निरर्थक परिक्षांमध्ये बाळाने किती टक्के मिळवले त्यावर आईबाप बोलतात, तेव्हा मला हसावे की रडावे तेच कळत नाही. दोन तीन तासाची शाळा आणि नंतर घरी आल्यावर तीनचार तासांचे होमवर्क असा प्रकार असतो. याला शिक्षण म्हणायचे की बालमजूरी? कारण त्या कोवळ्या वयात त्या बालकाला काय सोसणे शक्य आहे याचा विचारही न करता त्याला नावडत्या कामाल जुंपले जात असते. ज्याला आजकालचे पालक व शाळा शिक्षण असे सोज्वळ नाव देतात. पण त्या बालकाची अवस्था बघितली तर त्या सुखवस्तू घरातले ते बालक कष्ट उपसू लागलेले असते. गरीब व सुखवस्तू घरातल्या बालकांच्या बालमजुरीत एक इवलासा फ़रक असतो. गरीबाघरचे बालक पोटाची भूक भागवण्यासाठी कष्ट उपसू लागत असते. सुखवस्तू घरातले बालक शिक्षणाचे काम उपसण्यासाठी राबत असते आणि त्याच्याकडून असे कष्ट करून घेणार्‍याला पालक उलटी मजूरी देत असतात. ज्याला फ़ी वा देणगी वगैरे नावे आहेत. यात जे काही चालते त्याला शिक्षण किंवा अभ्यास असे म्हटले जाते वा समजले जाते. पण खरेच ते शिक्षण आहे काय? तो खरेच अभ्यास आहे काय?

   रोज रोज तेच तेच शब्द अर्थ कळत नसताना पाठ करणे. त्यांची न समजणारी वाक्ये बनवणे किंवा लिहून काढ्णे, ज्यांचा अर्थच लागत नाही असे आकडे तोंडपाठ म्हणत रहाणे; हा अभ्यास आहे की शिक्षण आहे? आणि हे सर्व लक्षात कशासाठी ठेवायचे? तर परिक्षेत तेच विचारले जाणार असते. जे विचारले जाते ते आठवून लिहिता वा सांगता आले पाहिजे. मगच मार्क मिळतात. त्याच मार्कांची टक्केवारी होत असते. ज्या टक्केवारीवर पुढल्या उच्चशिक्षणात प्रवेश मि्ळणार असतो. थोडक्यात शिक्षण व अभ्यास बाजूला पडला असून, टक्केवारी व ती देणारी परिक्षा हे शिकण्याचे निकष बनले आहेत. त्यामुळे जास्त टक्के, त्यासाठीची परिक्षा याकडे लक्ष देताना मुलाचे शिक्षण दुर्लक्षित होऊन गेले आहे. जे काही शिकवले जाते किंवा घोकून घेतले जाते, ते परिक्षेच्या वेळी आठवले पाहिजे व लिहिता, सांगता आले पाहिजे. पण आपण जे सांगतो वा लिहितो आहोत, ते त्या मुलाला समजण्याची गरज उरलेली नाही. थोडक्यात त्या बालकाला विषय समजत नाही, त्याचा आवाका येत नाही, पण प्रश्नांची उत्तरे येतात व मार्क्स मिळतात. पालक खुश असतात. विषय समजणे आणि त्यासंबंधातील नुसत्या प्रश्नांची उत्तरे देता येणे, यात प्रचंड फ़रक असतो. विषय समजला तर प्रश्न कसाही विचारला गेला तरी उत्तर देता येते. उलट प्रश्नोत्तरांची घोकंपट्टी केली, मग विषय बाजूला पडून त्याच प्रश्नाचे उत्तर लक्षात रहाते. त्याचा दुष्परिणाम असा होतो की शब्द वा मांडणी बदलून तोच प्रश्न विचारला, मग घोकंपट्टी करणार्‍याची गाळण उडते. आजच्या प्रश्नोत्तरांच्या अभ्यास पद्धतीने तेच नुकसान केले आहे. त्याचे परिणाम सुरूवातीला दिसत नाहीत. उलट ते टक्केवारीत लपवले जातात.

   ठराविक प्रश्न व त्यांची ठरलेली उत्तरे ७० टक्के गुण हमखास मिळवून देतात. कारण ते यांत्रिक काम असते, शंभर गुणांपैकी २५-३० गुण असे असतात की जे बुद्धीमत्तेला आव्हान असतात. तिथे विचारलेल्या प्रश्नांना आपली बुद्धी वापरून उत्तर द्यायचे असते. पण घोकंपट्टीने बुद्धी विकसित होत नाही तर कुंठीत होते. निष्क्रिय बनते. त्यामुळेच त्या निर्णायक २५-३० गुणांच्या स्पर्धेत बहूतेक मुले मागे पडतात. पण त्याची कारणे त्या मुलांसह पालकांना कधीच समजावून सांगितली जात नाहीत. आज आपण परिक्षांचे निकाल बघितले तर सामान्यत: जी मुले थोडाफ़ार अभ्यास करतात ती सहजगत्या ७० टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचतात. पण ती अभ्यासात हुशार झालेली नसतात, तर ती घोकंपट्टीने तिथपर्यंत पोहोचलेली असतात. पण ज्या मुलांचा बौद्धिक विकास झालेला असतो ती मुले ९० टक्क्यांच्या पलिकडे जातात. ज्या प्रकारच्या परिक्षा होतात, त्यात मुलांची हुशारी वाढवायची असेल तर त्याला ९० टक्क्यांच्या पार घेऊन जाणे अगत्याचे आहे. ते काम बुद्धीला चालना देणार्‍या अभ्यासातून होऊ शकेल. आणि ते करायचे तार मुलांना घोकंपट्टीतून खर्‍या अभ्यासासाठी सवड मिळू दिली पाहिजे. त्याला क्लासेस, शिकवण्या व होमवर्कच्या जोखडाखालून मुक्त करावे लागेल. या जोखडाला मी शिक्षण म्हणत नाही तर घाण्याच्या बैलाचे काम म्हणतो. कारण तिथे मुलाच्या बुद्धीला कामच नाही. दुसर्‍यांनी जी उत्तरे तयार ठेवली आहेत ती उचलून द्यायची. लक्षात ठेवुन द्यायची. तो प्रश्न काय आहे ते न समजताच त्याचे उत्तर देणे, याला बुद्धी लागत नाही की त्यामुळे बुद्धीला धार चढत नाही. म्हणजेच शिकणे होत नाही. होतो तो फ़क्त सराव असतो. मग तो इंग्लिश भाषेतला असो की मातृभाषेतला असो.

   इंग्लिश माध्यम म्हणजे हुशारीची बुद्धीची गुरूकिल्ली अशा भ्रमातून हे घड्ले आहे. त्या छोट्या बालकाला ती भाषाच ठाऊक नसते व समजत नसते. मग त्याला प्रश्नच कळणार कसा आणि त्याचे उत्तर त्याने द्यावेच कसे? पण त्याची कुणाला पर्वा आहे? घोकंपट्टी तिथूनच सुरू होत असते. जो प्रश्नच कळला नाही त्याचे उत्तरही बुद्धी न वापरता दिले जाते त्याला शिक्षण म्हणायचे काय? मग मुल शिकते काय, तर आपली बुद्धी वापरायची नाही, मार्क्स मिळतात म्हणून अमूक प्रश्नाला तमूक उत्तर द्यायचे. ते योग्य-अयोग्य, बरोबर की चुक त्याचा तर्कही करणे ते बालक शिकत नाही. कारण तसा तर्क करण्याची सवड त्याला नसते, सवड त्याला दिली जात नाही. झापडे लावलेला बैल किंव घोडा जसा पाठीवर चाबूक बसला मग धावत सुटतो तशी या बालकाची मानसिकता बनत जाते. त्याचे दुष्परिणाम मग जेव्हा खरी बौद्धिक कसोटी लागायची वे्ळ येते तेव्हा दिसू लागतात. मात्र तोपर्यंत बौद्धिक विकास होणाचे वय टळून गे्लेले असते. बालकाच्या मेंदूचा म्हणजे बुद्धीचा विकास पहिल्या अठरा वीस वर्षाच्या वयात होत असतो. त्या कालखंडात जी तर्कबुद्धी विकसित होते, त्याच पायावर पुढल्या आयुष्यात त्याच्या बुद्धीने उंच उंच शिखरे पादाक्रांत करायची असतात. तोच कालखंड पाठांतर व घोकंपट्टीच्या पायदळी तुडवला गेला, मग मुलाचा बौद्धीक पाया घातला जाणारच कसा? मग त्याची बुद्धी केमिस्टच्या वा वाण्याच्या दुकानातल्या विक्रेत्यासारखी कुंठीत होऊन जाते. कशी ते उद्या वाचू.      ( क्रमश:)
  भाग ( ३१८ )   ७/७/१२

३ टिप्पण्या:

  1. हे सर्व आसपास घडत असताना त्याचा फोलपणा चांगला ठसतो.

    उत्तर द्याहटवा
  2. आता मात्र केवल दरोडेखोरांनी आणि लुटारूनी सगळ्या शाळा आणि महाविद्यालये ताब्यात घेतल्या आहेत. तिथे हाणलेल्या पैशातून त्यांनी खाजगी विद्यापीठे उभारली आहेत. चांगली कमाई चालू आहे. खरे तर त्यांची शिक्षणाची आदत दुकानेच आहे कॉंग्रेसच्या मोंढ्यात स्थापन झालेली ! चांगली चाललीत. शेठ्ची मुले फक्त पैसे मोजत असतात. शेठ दिल्ली नाहीतर मुंबईत 'दुस-या घरी.' !

    उत्तर द्याहटवा