गुरुवार, ५ जुलै, २०१२

आपण बेडूक आहोत की सरकारच बेडकांचे आहे?


   मंत्रालयातली भीषण आगही आजच्या राज्यकर्त्यांना जाग आणु शकत नसताना, तिथल्या मंत्र्याचे जे जनसंपर्क अधिकारी आगीचे चटके सोसल्यावरही सारवासारव करतात, तेव्हा मनात एक शंका येते; की आपण आजचे भारतीय नागरिक बेडूक झालो आहोत काय? की आपल्यावर राज्य करणारे सत्ताधीश व त्यांना त्यात मदत करणारी प्रशासन यंत्रणाच बेडकांची बनली आहे? इथे कोणाला बेडूक या प्राण्याची उपमा देण्याचा माझा हेतू अजिबात नाही. मला इथे बेड्कामध्ये जो उदासिन स्वभावधर्म आहे, त्याची आठवण झाली. म्हणुनच मला इथे बेडूक कोण आहे असा प्रश्न सतावतो आहे. बेडकाविषयीचा एक वैज्ञानिक प्रयोग आहे. 

   बेडूक सतत पाण्यात असतो किंवा चिखलात जगतो. त्याला पाण्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही. त्याच्याशीचा हा प्रयोग संबंधित आहे. एका पातेल्यात थंड पाणी भरून त्यात बेडकाल सोडा. तो अजिबात बाहेर उडी मारत नाही. मग तेच पातेले मंद विस्तवावर ठेवून पाणी हळुहळू गरम होऊ द्या. जसेजसे पाणी तापत जाते, तसतसे बेडकाला त्याची उष्णता जाणवू लागते. पण तो भाजले म्हणून पाण्यातून बाहेर उडी मारत नाही. तो त्याच्या शरीराची उष्णता सहन करण्याची क्षमता वाढवत जातो. पुढे पुढे पाण्याचे तापमान खुप वाढले, की साक्षात मरण समोर येऊन उभे रहाते. पण उष्णता पचवण्याची सवय अंगवळणी पडलेला बेडूक त्यातून बाहेर पडण्याचा विचारही करत नाही. त्याला ते जीवाला घातक असलेले उष्ण पाणी सोडुन बाहेर पडायची इच्छाच होत नाही. त्या तापलेल्या प्राणघातक पाण्यातच त्याला सुरक्षितता वाटू लागलेली असते. मग तो त्यात शिजवला जातो. मरून जातो. पण त्यातून बाहेर पडायला धजावत नाही. आजच्या भारतीय समाजाची अवस्था तशीच झालेली नाही काय? आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेतच. पण साक्षात मरणाचे संकेत मिळू लागले तरी आपण हातपाय हलवण्याचे साफ़ विसरून गेलो आहोत. जे घातक आहे, जिथे नुकसान होण्याची खात्री आहे व तसाच अनुभव आहे, त्यातच आपण आपली सुरक्षितता शोधू लागलो आहोत. म्हणुन अशी दुर्दैवी परिस्थिती आपल्या नशिबी आज आलेली आहे.

   आता असे म्हटले, की सत्ताधारी वा राजकारणी गेंड्याच्या कातडीचे झालेत, अशी एक निरर्थक भाषा सुरु होते. मंत्रालयाच्या आगीसंबंधाने मी जेवढे लेख लिहिले, त्यानंतर कित्येक वाचकांनी मला फ़ोन करून राज्यकर्त्यांवर लेखनाचा परिणाम होणार नाही, कारण ते गेंड्याच्या कातडीचे आहेत, असे सुचवले. पण ते मला अजिबात मान्य नाही. कारण जे राज्यकर्ते तुमच्या आमच्या बाबतीत बेफ़िकीर असतात, त्यांच्यावर आपण संवेदनाशून्य असा आरोप नक्की करू शकतो. पण मंत्रालयाला लागलेल्या आगीत सापडलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अधिकारी ज्याप्रकारे जीवावरच्या त्या दाहक अनुभवानंतरही खोटे बोलत व सारवासारव करत आहेत, त्याला संवेदनाशून्य तरी कसे म्हणायचे? त्यांची अवस्था त्या पातेल्यातल्या बेडकासारखीच नाही काय? तो बेडूक पाण्यातून बाहेर पडू इच्छित नाही. जिवावर बेतले तरी त्याला उकळत्या पाण्यातच सुरक्षितता वाटते. तशीच या राज्यकर्त्यांची अवस्था झालेली नाही काय? त्यांच्या बेजबाबदारपणाने सामान्य माणुस मरतच असतो, मारला जात असतो. पण मंत्रालयाच्या आगीचा खेळ त्याच राज्यकर्त्यांच्या जीवाशी झाला आहे. पण त्यांना आपल्या भ्रामक समजुतीमधून बाहेर पडून सत्याला सामोरे जाण्याची इच्छा वा हिंमत होते आहे का बघा. त्या दिवशी आग लागल्यानंतर मंत्र्यांपासून अधिकार्‍यांपर्यंत प्रत्येकाचे वागणे अत्यंत बेजबाबदार होते, नाकर्तेपणाचे होते. तसे नेहमीच होत असते. मात्र त्याचेदुष्परिणाम जनतेला भोगावे लागत असतात. पण यावेळी खेळ झाला होता, तो सत्ताधार्‍यांच्याच जीवाशी झाला होता. पण म्हणुन डोळे उघडण्याची इच्छा दिसते का बघा. आजही अजितदादा पवार किंवा त्यांच्या हलगर्जीपणावर पांघरुण घालायला मोठ्या उत्साहात पुढे आलेले अर्धा डझन जनसंपर्क अधिकारी, कोणाशी खोटे बोलत आहेत? कोणाला फ़सवत आहेत?

   त्या मंत्रालयाच्या आगीत जो हलगर्जीपणा झाला त्यात दोनच मिनीटे उशीर झाला असता; तर खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा त्याच आगीत अन्य अधिकार्‍यांप्रमाणेच अडकले असते, असे तेच अधिकारी सकाळच्या बातमीदाराशी बोलताना सांगत आहेत. म्हणजे आग लागल्यापासून अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात दिरंगाई झाली, त्यामुळे आपलेच जीव धोक्यात आले, हे कबूल न करून ते कोणाला फ़सवत आहेत? मंत्रालयात कुठलीही अग्नीशमन यंत्रणा कार्यरत नाही व नव्हती; हे सत्य लपवून ते कोणाची दिशाभूल करत आहेत? कोणाच्या जीवाशी खेळत आहेत? २६ नोव्हेंबरच्या कसाब टोळीच्या हल्ल्यानंतर ज्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या अजून पावणेचार वर्षांनीही उभ्या राहिलेल्या नाहीत. त्याबद्दल खोटे बोलले जाते तेव्हा हे सत्ताधीश व अधिकारी तुमच्याआमच्या जीवाशी खेळ करत असतात. आपल्याला फ़सवत असतात. पण मंत्रालयात जो निष्काळजीपणा झाला, त्याचे तेच बळी होणार होते. सुदैवाने ते बचावले आहेत. जे तेवढे नशीबवान नव्हते, ते अजितदादांचे दोन बारामातीमधले मित्र जीवानिशी गेले आहेत. नगर अकोले येथील त्यांचाच एक कार्यकर्ताही प्राणाला मुकला आहे. त्याच हलगर्जीपणामुळे मुख्यमंत्र्यांचे दोन इमानी चोपदार मारले गेले आहेत. म्हणजेच थापेबाजी व दिशाभूल करण्याचे परिणाम आता याच सत्ताधार्‍यांच्या अंगापर्यंत येऊन पोहोचले आहेत. पण म्हणुन त्यांना खरे बोलण्याची इच्छा होते आहे का बघा. यालाच मी बेडूक म्हणतो. तो पातेल्यात हळुहळू तापणार्‍या पाण्यातला बेडूक जसा मरण इशारे देत असतांनाही खोट्या समजूतीमध्ये सुरक्षितता शोधू पहातो, तशीच या राज्यकर्त्यांची अवस्था झालेली नाही काय?

   जगाला फ़सवणे खुप सोपे असते. पण माणूस कधी स्वत:ला फ़सवू शकत नसतो. म्हणुनच जनाची नाही तर मनाची लाज बा्ळगावी असे म्हणतात. कारण आपण आपल्या मनापासून काहीही लपवू शकत नसतो. तीन दिवसात मंत्रालय सुरू केल्याचे छाती फ़ुगवून सांगणारे बांधकाममंत्री छगनराव भुजबळ किंवा आपल्या जनसंपर्क अधिकार्‍यांच्या थापा छापून आल्यावरही त्यांना न झापणारे अजितदादा; स्वत:च्या जीवाशी खेळत आहेत हे त्यांनी विसरू नये. कारण प्रत्येक वेळी नशीब एवढेच बलवत्तर असेलच असे नाही. इंदिरा गांधींचे वा राजीव गांधींचेही नशीब बलवत्तर नव्हते, हे विसरू नका. सर्व सुरक्षिततेचे उपायही त्यांना वाचवू शकले नाहीत. इंदिरा गांधी यांनी सुरक्षा यंत्रणेचे सल्ले डावलले होते. राजीव गांधी यांनीही तेच केले होते. किंमत कोणी मोजली? मंत्रालयाच्या भीषण आगीनंतर म्हणुनच राज्यकर्त्यांनी मंत्रालय तीन दिवसात पुन्हा सुरू केल्याच्या थापा मारण्यात अर्थ नाही. महापुरात बुडालेल्या गावातले संसार देखिल असेच दोन दिवसात पुन्हा सुरू होतात. त्याला संसार म्हणत नाहीत. मंत्रालय सुद्धा आज सुरू झाले, म्हणजे जसे पुर्वी कार्यरत असायचे तसे झालेले नाही. तिथे मंत्र्यांपासून कर्मचार्‍यांना होत्या, त्या सुविधा आज नाहीत. लोकांचे कामे जशी होऊ शकत होती, तशी होण्याची व्यवस्था लागलेली नाही. मग तीनचार दिवसात मंत्रालय सुरू झाल्याचे दावे करून कोणाला ही मंडळी फ़सवता आहेत?

   उद्या पुन्हा तशीच आग लागली व पसरू लागली; तर काय करायचे ते भुजबळ किंवा पृथ्वीराज वा अजितदादा सांगू शकतील काय? एक गोष्ट आहे, आता मंत्रालयात नुसता फ़ोडणीचा धुर निघू लागला, तरी मुख्यमंत्र्यापासून सगळेच जीव मुठीत धरून पळ काढतील. त्याला मंत्रालय सुरक्षित झाले असे नक्कीच म्हणता येणार नाही. मुद्दा आहे तो धडा शिकण्याचा. बाहेरच्या भिंतीवर जे काळे धुराचे व जळीताचे डाग पडले होते, ते दोन दिवसात रंगरंगोटीने साफ़ केले म्हणजे मंत्रालय पुर्ववत सुरू झाले; असे सांगणे ही स्वत:ची सरकारनेच केलेली फ़सवणूक आहे. मग त्याचे नाव अजितदादा असो की पृथ्वीराज असो की छगन भुजबळ असो नाहीतर संजय देशमुख असो. एखाद्या गंभीर आजाराने पछाडलेल्या माणसाने डॉक्टरचे सांगिलेले पथ्य चोरून मोडावे, तशीच ही दिशाभूल आहे. म्हणजे घरी पथ्य पाळत असल्याचे नाटक रंगवायचे आणि बाहेर हॉटेलात जाऊन त्याच पदार्थांवर ताव मारायचा, त्यातला हा प्रकार नाही काय? कारण इतरांना फ़सवून त्यांचे नुकसान होणार नसते. जो दिशाभूल करतोय त्याचाच जीव जाणार असतो. त्या पाणी उकळण्यापर्यंत तापमान वाढणार्‍या पाण्य़ातला बेडुक आणि असे स्वत:ची दिशाभूल करणारे राज्यकर्ते, यांच्यात कुठला फ़रक असतो? मग ते अजितदादांच्या पराक्रमाचे गोडवे गाणारे संजय देशमुख असोत किंवा त्यांच्या स्तुतीने खुश होणारे अजितदादा असोत. मग प्रश्न पडतो, त्यांचे हे खोटेपण निमूट ऐकणारे आपण बेडूक झालोत, की तेच संवेदनाशुन्य बेडकाच्या अवस्थेत गेलेत?     ( क्रमश:)
 भाग ( ३१४ )   ३/७/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा