सोमवार, ९ जुलै, २०१२

शिकण्याचे काम बघा किती सोपे असते.


   आपण दुकानात जातो तेव्हा कुठली तरी एक वस्तू आपल्याला हवी असते. मग तिथे गेल्यावर ज्या शेकडो वस्तू तिथे मांडलेल्या असतात, त्यातून आपल्याला हवी असलेली वस्तू शोधण्यासाठी आपली नजर भिरभिर फ़िरत असते. पण त्या गर्दीत नेमकी ती वस्तू कुठे आहे तेच आपल्याल दिसत नसते. आकार मोठा असेल तर गोष्ट वेगळी. पण मध्यम वा लहान आकाराची वस्तू तर समोर असूनही आपल्या नजरेत भरत नाही. मग तिथला जो विक्रेता असतो त्याची आपण मदत घेतो. जे हवे ते त्याला सांगतो. तेव्हा तो तिथल्या तिथे ती वस्तू काढून आपल्या समोर ठेवतो. आपल्याला गम्मत वाटते. कारण ती वस्तू तर आपल्या समोरच होती. मग आपल्या लक्षात कसे आले नाही? मग समोर असून आपल्याला दिसत का नव्हती? तर आपल्या डोक्य़ात तेवढ्या एकाच वस्तूचा विषय नसतो आणि आपल्याला भोवताली वस्तूंची मोठी गर्दी दिसत असते. त्यातून वस्तू शोधावी लागत असते. विक्रेत्याचे तसे नसते. दुकानातल्या सर्वच वस्तू कुठे आहेत, ते सतत तिथेच वावरत असल्याने त्याला चांगले लक्षात असते. त्याला शोधाशोध करावी लागत नाही. जिथे वस्तू आहे तिथे न बघतही तो विक्रेता ती वस्तू आपल्याला देऊ शकतो. हेच वाण्याच्या दुकानात होते किंवा औषध घ्यायला गेलो असताना होते. त्यांच्यासाठी इतकी सोपी असलेली गोष्ट आपल्यासाठी तेवढीच अवघड का असते?   

   त्याचे पहिले कारण म्हणजे दुकानात ज्या वस्तू विकायला ठेवलेल्या असतात, त्या घाऊक बाजारातून आणल्यावर किंवा पुरवठेदाराने आणून दिल्यावर सवडीने दुकानदार त्याची संगतवार मांडणी करत असतो. जेव्हा दुकानात ग्राहकांची गर्दी नसते तेव्हा असा माल योग्य जागी ठेवला जातो. मागितला जाईल तेव्हा लगेच देता यावा, म्हणुन त्या मालाला जागा नेमून दिलेली असते. दुकानातली एक एक जागा ठराविक उपयोगाच्या वस्तूंसाठी राखीव केलेली असते. म्हणजे साबण, सुगंधी तेले, सफ़ाईची उपकरणे यांचा कोपरा ठरलेला असतो. मग त्याच कोपर्‍यात पुन्हा प्रकारानुसार मांडणी असते. मग चहा पावडर हवी तर सर्व कंपन्यांचा माल त्याच जागी सापडतो. केमिस्टच्या दुकानातही तसेच असते. सर्दीची, तापाची औषधे एका कप्प्यात असतात. डोकेदुखी वा वेदनाशामक अशी औषधे ठरलेल्या कप्प्यात असतात. बाटली व गोळ्या यांची जागा ठरलेली असते. तिथे आधीपासून उपलब्ध मालाची मांडणी केलेली असते. जशी मागणी येईल तसा पुरवठा केला जात असतो. थोडक्यात सांगायचे तर अशा दुकानातला विक्रेता वा दुकानदार रोजच्या रोज परिक्षा देत असतो. त्याच्याकडे येणारा ग्राहक हा त्याच्यासाठी प्रश्न असतो आणि दुकानातला माल हे त्याच्यासाठी उत्तर असते. प्रश्न समोर आला, मग उत्तर सहज दिले जाते. त्यात गफ़लत झाली, मग ग्राहकांची गर्दी वाढते आणि धंदा कमी होतो, किंवा ग्राहकांशी हुज्जत होऊ लागते. ग्राहक नाराज होऊन धंद्यावर त्याचा विपरित परिणाम होतो. शेवटी धंदा व्यापार ग्राहकाच्या खुशी व समाधानावर अवलंबून असतो. जेवढे गिर्‍हाईक खुश तेवढा धंदा तेजीत चालतो.

   तो दुकानदार विक्रेता व शाळेत जाणारा विद्यार्थी यात फ़ारसा फ़रक नसतो. त्या मुलाला अधिक मार्क्स मिळवायचे असतील तर दुकानदाराप्रमाणे उत्तरांची आधीपासून साठेबाजी करायची असते, मांडणी करायची असते आणि कमी वेळात अधिक ग्राहकांना पुरवठा करायचा तर अधिक सुटसुटीत मांडणी करायची असते. शाळेत वा अभ्यासातून मुले शिकत असतात, त्यांना मिळालेली माहिती गरज भासेल त्याप्रमाणे आठवली पाहिजे, तरच त्यांना परिक्षेत मार्क्स मिळवणे शक्य असते. कारण परिक्षा किंवा उत्तरपत्रिका तपासणारा हे विद्यार्थ्यासाठी गिर्‍हाईक असते. त्याला जे उत्तर हवे आहे ते नेमके कमीत कमी वेळात शोधून उत्तरपत्रिकेत लिहिणे ही विद्यार्थाची जबाबदारी असते. त्याची तयारी त्याने अभ्यास या नावाखाली करायची असते. कारण आजकाल शाळा किंवा शिक्षणातली गुणवत्ता ही मुलांच्या स्मरणशक्तीवर ठरत असते. त्याने वर्षभर किती अभ्यास केला व ज्ञानार्जन किती केले, त्यापेक्षा परिक्षेच्या वेळी त्यातले त्या्ला किती नेमके आठवले, त्यावर त्याला मार्क्स मिळत असतात. नाही तर नाराज होऊन दुकानातून ग्राहक निघून जावा, तसेच उत्तरपत्रिका तपासणारा नाराज होऊन अनुत्तीर्ण करत असतो. गुण वा टक्केवारी यांचा म्हणूनच ज्ञानार्जनाशी संबंध उरलेला नाही. सहाजिकच त्यात उत्तम ठरायचे असेल तर मुलांची स्मरणशक्ती वाढवली पाहिजे व त्याला जे शिकला वा शिकवले, ते स्मरणात ठेवायला साधले पाहिजे. त्यावर त्याचे गुण मिळवणे व टक्केवारी गाठणे अवलंबून आहे. नावाजलेले क्लासेस वा शाळा नेमक्या तेच काम करून घेतात. त्याचा मुलांनी बुद्धीमान होण्याशी काडीमात्र संबंध नसतो.

   आता मला सांगा कुठल्याही दुकानात विक्रेता म्हणून नोकरी करणार्‍याचे किती शिक्षण झालेले असते? उलट शिक्षण झाले नाही वा अपुरे शिक्षण आहे म्हणुनच तिथे कमी पगारात तो नोकरी करता असतो. पण काही दिवसातच तिथल्या विकावू वस्तू व त्यांच्या जागा तो नोकर नेमक्या लक्षात ठेवून येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला समाधानी करून, प्रत्येक परिक्षा चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण होत असतो ना? मग महिनाभर वा वर्षभर अभ्यास करणार्‍या मुलांना अवघ्या दोनतीन तासांची परिक्षा इतकी भयंकर अग्नीपरिक्षा का वाटावी? तर आपण मुलांच्या मनात अभ्यास व परिक्षा नावाचे भूत भरवून ठेवलेले असते. अभ्यास वा परिक्षा ही बाब आपण समजतो तेवढी गंभीर बाब नाही, तर ती स्मरणशक्तीची कसोटी असते. केमिस्टच्या दुकानातल्या किमान हजार पंधराशे विकावू वस्तुंच्या जागा, एक सामान्य विक्रेता महिनाभराच्या अनुभवातून लक्षात ठेवू शकत असेल; तर महिनाभर वा वर्षभर अभ्यास केल्यावर मुलांना परिक्षेच्या वेळीच समोर आलेल्या प्रश्नांची उत्तरे का आठवत नाहीत? त्याची दोन कारणे असतात. एक म्हणजे आपण व परिस्थितीने त्याच्या मनात घातलेली परिक्षेविषयीची भिती. परिक्षा म्हणजे संकट, अशी जी मानसिकता बालपणापासून मुलांच्या डोक्यात घातलेली असते, त्याचाच तो परिणाम असतो. जी भिती दुकानातल्या त्या दुकानदार वा विक्रेत्याला अजिबात नसते. पन्नास वेळ त्याच्या हातून चुका होत असतात व त्यातूनच त्याचे शिकणे चालू असते. पाच पन्नास वेळी चुकल्यावर त्याच्या सर्वकाही लक्षात राहिलेले असते. शिवाय आपण परिक्षा देतोय त्यामुळे चुकलो तर नापासच होणार; अशी भितीची तलवार त्याच्या डोक्यावर टांगलेली नसते.

   जिथे चुकतो वा आठवत नाही तिथे तो नोकर मालकाला किंवा जुना कोणी अनुभवी असेल त्याला विचारतो, की अमुक वस्तू कुठे आहे व ग्राहकाला देत असतो. मुलांच्या बाबतीत ती सवलत आपण नाकारत असतो. पालक घरी अभ्यास घेतात किंवा वर्गात शिक्षक प्रश्न विचारतात, तेव्हा अचुक उत्तर द्यावे अशीच अपेक्षा बाळगली जात असते. मग त्याचे दडपण मुलाच्या मनावर येते. चुकलो तर सगळे हसणार किंवा शिक्षक अवहेलना करतील, अशा भयाने मुल गांगरते. त्याला उत्तर येते किंवा नाही, यापेक्षा आपले हसू होईल काय याचीच त्याला अधिक चिंता असते. जणू आयुष्यातली अग्नीपरिक्षा देतो आहोत अशीच त्याची प्रत्येकवेळी मानसिक अवस्था आसते. याची खरेच गरज आहे काय? जेव्हा आपण शिकत असतो, तेव्हा चुका होणे म्हणजे मोठा गुन्हा नाही. पण मुलांच्या मनात प्रत्येक प्रश्न व परिक्षा म्हणजे जीवनातील अग्नीपरिक्षा असल्याचे भय आपण घातले आहे. त्याचाच हा दुष्परिणाम आहे. वर्गात शिक्षकाने विचारलेला प्रश्न असो किंवा अगदी परिक्षेत आलेला एखादा प्रश्न असो, त्याचे उत्तर आधीपासून ठरलेले आहे. ते अन्य मुलांच्या लक्षात राहिले, म्हणुन ती मुले हुशार आणि ज्याला नेमक्या वेळी आठवले नाही म्हणून तो विद्यार्थी बुद्दू, ही आपल्याकडली समस्या आहे. त्यातून पालक व मुलांनाच नव्हे तर शिक्षकांनाही बाहेर पडणे आवश्यक आहे.

   पहिली गोष्ट लक्षात घ्या, की आज ज्या परिक्षा होतात, ती मुलांच्या स्मरणशक्तीची चाचणी असते. मग त्याला लक्षात म्हणजे स्मरणात ठेवायला मदत करणे व त्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जेव्हा त्याचे एक दोनदा उत्तर चुकते, तेव्हा त्याला नामोहरम करणे गैर आहे. त्यामुळे मुलाचा आत्मविश्वास खच्ची होऊ लागतो. त्याऐवजी जिथे त्याची चुक झाली तिथे त्याला योग्य उत्तर सांगून मदत करायला हवी आहे. कारण जे उत्तर त्याने द्यायचे आहे, ते त्याने संशोधन करून काढायचे नाही, तर लक्षात ठेवायचे आहे. त्याची स्मरणशक्ती कमी पडली आहे. कधी कधी मुलांना उत्तर येतही असते. पण आत्मविश्वास पुरेसा नसल्याने त्यांची उत्तर देताना गाळण उडते आणि चुकीचे लिहिले वा बोलले जाते. त्याला गुन्हा ठरवल्याप्रमाणे शिक्षा देण्याची प्रवृत्ती यालाच शिकण्यातला व्यत्यय असे मी म्हणतो. आणि जास्त करून पालक हे पाप करताना आढळतात.   ( क्रमश:)
  भाग ( ३१९ )   ८/७/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा