सोमवार, ९ जुलै, २०१२

मुले शिकतात म्हणजे तरी काय?


   तुमच्या शिक्षणात शाळेला व्यत्यय आणू देऊ नका - मार्क ट्वेन

   शाळेत मुलांना घातले म्हणजे मुलांचे शिक्षण होत अशी एक ठाम समजूत पालकांनी करून घेतली आहे. पण त्यात अजिबात तथ्य नाही. मुल शाळेच्या बाहेरच अधिक शिकत असते. आणि त्याच्या शिकण्यात आपण त्याला मदत करायची असते. निदान त्यात व्यत्यय आणायचा नसतो. मार्क ट्वेनसारखा जागतिक कीर्तीचा एक थोर लेखक विचारवंत शाळेला व्यत्यय का म्हणतो, हे समजून घेतले पाहिजे. याचे कारण एकच असते. मुल जन्माला आल्यापासूनच शिकत असते. मात्र त्याच्या या शिकण्याकडे आपण डोळसपणे बघायला तयारच नसतो.

   माझे "कोरी पाटी" हे पुस्तक वाचून एक पालक त्यांच्या सव्वा वर्षाच्या मुलीला घेऊन मला भेटायला घरी आलेले होते. त्या बालिकेला आपले व परक्यांचे घर हा भेदभाव कळत नव्हता. मग थोड्या वेळातच माझ्या घरात सरावल्यावर ते बाळ चुळबुळ करू लागले. आईबापांना सोडुन जरा मुक्तपणे माझ्या घरात वावरू लागले. तेव्हा त्याचे मातापिता कमालीचे अस्वस्थ झाले. वस्तू पाडील, काही तरी मोडून टाकेल, अशी चिंता त्यांना ग्रासत होती. पण मी शांत होतो. मी त्यांना शांत बसायला सांगत होतो. दोन्ही खोल्याभर ते मुल फ़िरले. अगदी कपाट व टेबलाचे कप्पे त्याने उघडून बघण्याचा प्रयास केला. कुठलीही वस्तू पाडली नाही, की मोडली नाही. एक मोठा चमचा घेऊन ते स्वैपाकघरातून माघारी परत आले. पण तोवर त्याच्या मातापित्यांचा जीव थार्‍यावर नव्हता. माझ्या घरातल्या वस्तुंची मला काळजी नव्हती, त्यापेक्षा त्यांना जास्त होती, असेच कोणाला वाटेल. पण वस्तूस्थिती तशी नाही. आपण पाहुणे म्हणून गेलो तिथे आपल्या मुलीने खराबी केली, असे होऊ नये म्हणून ते पालक बेचैन झालेले होते. असे अनेकच नव्हे तर बहुतांश पालकांचे होत असते. आपले मुल काहीतरी गडबड करणार या कल्पनेने ते कमालीचे अस्वस्थ असतात. त्यातून स्वत:च्या घरात वा जिथे पाहुणे म्हणून जातात तिथे, ते मुलांच्या हालचालीवर लगाम लावू बघत असतात. पण मुल कुठल्या गोष्टीची मोडतोड करायला उत्सुक नसते. त्याला जगातल्या प्रत्येक नव्या गोष्टीचे व ठाउक नसलेल्या बाबींचे कुतूहल असते. त्या उत्सुकतेपोटीच मुल तिकडे जात असते. तुम्ही त्याला रोखता किंवा अडवता, तेवढी त्यांची उत्सुकता वाढते. कुतूहल वाढते. उलट त्याला रोखले नाही, पण त्याच्यावर नुसती नजर ठेवली, तर वेगळा अनुभव येतो. मुल चौकसपणे त्या गो्ष्टी बघते व नवे काही वाटले नाही तर दुसर्‍या गोष्टीकडे वळते. सर्वांच्या घरात जवळपास त्याच त्याच वस्तू असतात. त्यामुळेच नवे काही नाही, म्हणुन मुल हातसुद्धा न लावता त्यापासून दुर जाते. आपण त्याची उत्सुकता वाढवली नाही, तर फ़ारसे काही होत नाही. इथेही तोच अनुभव आला होता.

   माझा संयम त्या पालकांना चकीत करणारा ठरला. पण मला जे व्हायचे त्याची खात्रीच होती. मी त्या बालिकेला मोकाट फ़िरायची मुभा दिली, तरी तिच्या हालचालीवर माझे बारीक लक्ष होते. कदाचित सुरी चाकू किंवा कैची तिने घेतली, तर इजा होण्याचा धोका होता. तसे होत असल्यास हस्तक्षेप करण्याची तयारी मी ठेवली होती. पण तशी वेळच आली नाही. पण त्या दोन्ही पालकांना त्यातून एकप्रकारचा आत्मविश्वास मात्र मिळाला. मग मी त्यांना स्वत:च्या घरी एक प्रयोग करायला सांगितले. तिचे वडील बॅंकेत नोकरी करत होते. त्यांना विचारले, रोज कामावरून घरी आल्यावर ते चप्पल वा बुट कुठे काढतात? घरात दारापाशीच ते पादत्राणे काढतात, असे त्यांनी सांगितले. मग मी विचारले, दारात म्हणजे कुठल्या बाजूला? उजवीकडे की डाव्या बाजूला? त्यांनी डाव्या बाजूला असे उत्तर दिले. मग मी त्यांना सुचवले, की आज इथून घरी परतल्यावर दोघांनी चपला बूट उजवीकडे काढून ठेवावेत. माझ्या सुचनेने त्यांच्या चेहर्‍यवर प्रश्नचिन्ह उमटले. कशासाठी, असा प्रश्न त्यांनी मला विचारला सुद्धा. मी म्हणालो, काळजी करू नका, कशाला ते तुम्हीच मला फ़ोन करून सांगाल. झालेही तसेच. माझ्या घरातून निघून आपल्या घरी हे कुटुंब पोहोचले आणि पाचच मिनीटात त्यांनी थक्क झाल्याप्रमाणे मला फ़ोन केला. कारण मी सांगितले त्याप्रमाणे त्यांनी आज वेगळ्या बाजूला म्हणजे उजवीकडे चप्पल बूट काढले व ठेवले होते. ते लक्षात येताच त्यांच्या त्या छोट्या बालिकेने तात्काळ ते उचलून दाराच्या डाव्या बाजूला ठेवले. मात्र तिने असे का करावे, ते तिच्या मातापित्यांच्या लक्षात येत नव्हते.

   घरी आल्यावर चपला किंवा बुट डाव्या दारापाशीच काढून ठेवले जातात, हे त्या बालिकेने अनेक दिवसांपासून बघितले होते. ती मोठ्यांसाठी नगण्य गोष्ट असली, तरी त्या बाळासाठी ते ज्ञान होते. सहाजिकच ज्या दिवशी त्यापेक्षा वेगळे घडले, मग त्या दिवशी तिच्या जन्मदात्यांकडून चुक झाली होती. त्या इवल्या बालिकेने त्यांची चुक दुरुस्त केली होती. मग त्या कृतीचा अर्थ मीच त्यांना समजावला. मुल अखंड शिकत असते. तुमच्या किंवा मुलाच्या आसपास जे काही घडत असते, त्यातून ते मुल काही नवे शिकत असते, त्याचे अनुकरण करत असते. त्याला नवी वाटणारी बाब समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. जे त्या कोवळ्या वयात त्याच्या बुद्धीला म्हणजे मेंदूला खाद्य म्हणुन मिळत असते, त्यालाच ज्ञान समजून मुल त्याचे ग्रहण करत असते. अशा ग्रहणातून त्याची स्वत:ची बुद्धी म्हणजे त्याचे तर्कशास्त्र तयार होत असते. नेहमी घरी आल्यावर मोठी माणसे चपला डाव्या बाजूला काढून ठेवतात, तेव्हा तीच त्यासाठी ठरलेली कायमची जागा आहे. त्यात बदल झाला म्हणजे गडबड झाली. चुक झाली याच समजूतीने तिने योग्य जागी चपला आणुन ठेवल्या होत्या. मुद्दा इतकाच, की शाळेत जाण्यापुर्वीच म्हणजे जन्मल्यापासून मुल भोवताली घडणार्‍या बारीकसारीक गोष्टीतून शिकत असते. अनेक लहानसहान बारकावे आत्मसात करत असते. त्यालाच शिक्षण म्हणतात. मोठ्यांनी त्यात त्याला मदत करायची असते. शिकणे म्हणजे आपले स्वत:चे निकष तयार करणे असते. बुद्धी त्याच निकषावर काम करत असते. तर्क त्या बुद्धीचा आधार असतो.

   काही निकष व तर्क कायमस्वरूपी असतात. दोन अधिक दोन चार होतात, हा असाच निकष आहे. त्यात विचार करण्याची गरज नसते. शालेय शिक्षणात असेच मुलभूत व पायाभूत निकष शिकवले जातात. ते आत्मसात करण्यावर पुढले वुद्धी कुशाग्र बनवणारे शिक्षण अवलंबून असते. त्यासाठी कुठली भाषा महत्वाची नसते, तर बुद्धी तल्लख व कुशाग्र असावी लागते. हे बुद्धीला धार लावण्याचे काम शालेय शिक्षणातून व्हायचे असते. त्यामुळेच शालेय परिक्षेत मुलांना किती गुण वा टक्के मिळतात, यापेक्षा त्याची बुद्धी किती कुशाग्र होते, त्याला अत्यंत महत्व असते. तिथे घोकंपट्टी कामाची नसते. मुलामध्ये जे उपजत कुतूहल असते, त्याला चालना देण्यात आपण जेवढी त्या मुलाला मदत करू, तेवढे मुल हुशार होऊ शकते. वर्गात किती वेळ मुल बसले किंवा तुमच्या समोर किती वेळ अभ्यास करताना दिसते, त्यापेक्षा त्याने खरेच आत्मसात किती केले; याला महत्व असते. लक्ष अभ्यासात किती आहे, त्यापेक्षा किती वेळ अभ्यास केला ती बाब दुय्यम असते. थोडा वेळ पण मन लावून केलेला अभ्यास अधिक असतो. शिवाय जो आवडतो तो अभ्यास सोपा व चांगला होत असतो.

   इथे मग शाळेत समस्या येते. प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगवेगळा असतो. पण शाळेत शिक्षक सर्व मुलांना एकाच न्यायाने शिकवत असतात. प्रत्येकासाठी शिक्षक वेगळी शिकवणी घेत नाहीत. मग मुलांच्या ग्रहणशक्ती नुसार त्याच्या शिकण्यात फ़रक पडत असतो. शिकणे शिक्षकावर फ़ार कमी अवलंबून असते. त्यापेक्षा अधिक मुलाच्या शिकण्यावर शिक्षण अवलंबून असते. नळाखाली उपडा घडा ठेवला तर अख्खा दिवस नळ वाहून गेला, तरी घडा रिताच रहातो. पण नळातून छोटी धार येत असेल आणि घड्याचे तोंड धारेखाली असेल, तर उशीरा का होईना तो घडा पाण्य़ाने भरतो. शिकणे नेमके तसेच असते. मुल शिकण्याला प्रतिसाद देत असेल व त्याच्यात शिकण्याबद्दल उत्सुकता असेल, तर शाळा कुठली वा शिक्षक कसा आहे, त्या गोष्टी दुय्यम होऊन जातात. उलट उत्तम शिक्षक व दर्जेदार शाळा असेल, पण मुल शिकण्याबद्दल उदासिन असेल, तर त्या सुविधांचा उपयोग होत नाही. म्हणुनच आपण शिकण्यात मुलांना मदत करावी असे मी म्हणतो. त्यांच्या कुतूहल व उत्सुकतेला चालना देणे अगत्याचे असते. कारण त्यातून शिकण्याला प्रेरणा मिळत असते. हे छोटे मुल स्वत:च शिकत होते. पण त्याचा जन्मदात्यांना पत्ता नव्हता. ती माझ्या भाचीची छोटी मुलगी अदिती, जे शाळेत शिकायला अनुत्सुक होती, तेच एका खेळाच्या नादात सहज शिकून गेली. कारण शिकणे ही मुलांची उपजत वृत्ती असते. तिला प्रोत्साहन देता आले पाहिजे. तिला नामोहरम केले जाता कामा नये. दुर्दैव इतकेच आहे, की त्याची जाणिव पालकांमध्ये दिसत नाही आणि शाळा व शिक्षकवर्गात त्याचे भान दिसून येत नाही. मग मार्क ट्वेन म्हणतो तसेच होऊन जाते. आपण मुलांना शिकवण्यासाठी चांगली शाळा निवडतो, पैसे खर्च करतो. पण प्रत्यक्षात मुलाला शिकायला प्रोत्साहन देण्यापेक्षा त्याच्या शिक्षणात शाळेचा व्यत्यय आणत असतो. ( क्रमश:)
 भाग ( ३१७ )   ६/७/१२

२ टिप्पण्या: