रविवार, २९ जुलै, २०१२

वसंत ढोबळेना बदनाम करणारे सभ्य होते काय?


   मध्यंतरी मुंबईत वसंत ढोबळे नामक पोलिस अधिकार्‍याच्या विरोधात वृत्तवाहिन्यांवर एक मोहिमच उघडली गेली होती. हा माणूस कुठल्याही पब किंवा बारमध्ये घुसतो आणि पोलिस असूनही एखाद्या गुंडासारखा घुमाकुळ घालतो, असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे झाला होता. नशीब म्हणायचे, की मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनाईक मात्र ढोबळे यांच्यामागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी नुसते ढोबळे यांच्या आक्रमक पवित्र्याचे समर्थनच केले नाही, तर त्यांनी आयुक्तांच्याच मार्गदर्शनानुसार ही कार्यवाही होत असल्याचा निर्वाळाही दिला. तर असे हे ढोबळे काय धुमाकुळ घालत होते? जिथे चोरट्या मार्गाने नशेबाजांचे अड्डे चालतात, तिथे ढोबळे जाऊन धाडी घालत होते. तिथे सापडतील त्यांची वरात काढली जात होती. मग तिथे ज्या बड्या प्रतिष्ठीतांची हजेरी लागत होती, त्यांनीच वाहिन्यांना ढोबळे यांच्या बदनामीची सुपारी दिली होती काय? नसेल तर वाहिन्यांना व्यसनाधीन धनवंतांच्या स्वातंत्र्याची इतकी फ़िकीर कशाला वाटत होती? जर अशा कारवाया ढोबळे गुंडाप्रमाणे करत होते, तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याइतके हे धनवंत सबळ व सक्षम जरूर आहेत. पण त्यापैकी कोणीही न्यायालयात जाण्याचा विचारही केला नाही. साधी पोलिसांकडे त्यांच्याच एका गुंडगिरी करणार्‍या अधिकार्‍याच्या विरोधात तक्रारही नोंदवली नाही. त्यापेक्षा त्यांनी वाहिन्यांकडे जाणे पसंत केले. हा चमत्कार नाही काय? त्याचे कारणही समजून घेण्याची गरज आहे. तक्रार करायला त्यांना तोंड नव्हते. कारण आपण गुन्हा करत असताना, पोलिस घुसखोरी करून पकडतात, असे कुठल्या तोंडाने कोर्टाला सांगणार? त्यापेक्षा त्यांनी वाहिन्यांकडून पोलिस कारवाईचा बागुलबुवा करण्याची पळवाट शोधली.

   इथे माध्यमांच्या हेतूची शंका घ्यावी लागते. ढोबळे यांनी पोलिस म्हणुन गुन्हा पकडताना कुठल्या सभ्यतेची अपेक्षा माध्यमे त्यांच्याकडून करतात? जे असे प्रतिष्ठीत व वरपर्यंत हात पोहोचलेले लोक असतात, त्यांच्याशी नरमाईने वागले, मग ते थेट वर फ़ोन लावून गुन्ह्याची नोंदही होऊ देत नाहीत. म्हणुन त्यांच्या मुसक्या बांधून आधी त्यांच्यावर गुन्हा नोंदवणे अगत्याचे असते. एकदा गुन्ह्याची नोंद झाली, मग त्यात हेराफ़ेरी करणे अवघड असते. ढोबळे यांना त्यासाठीच आक्रमक पवित्रा घेणे भाग होते. आणि त्यांनी तसे करून दाखवले. मग अशाप्रकारे जिथे जिथे धाडी पडल्या, तिथे ताब्यात घेतलेल्या प्रतिष्ठीतांच्या खर्‍या चेहर्‍यावरचा मुखवटा गळुन पाडायची वेळ आली. कारण नुसते त्यांच्या विरोधात गुन्हेच नोंदवण्यात आले नव्हते, तर त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले होते. अशा रेव्ह पार्ट्यामध्ये मौजमजा करणार्‍यांच्या रक्तामध्ये अंमली पदार्थाचे अवशेष सापडले. म्हणजेच ज्यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता, तेच खरे ठरले. पण त्यासाठी एकातरी वाहिनीने ढोबळे किंवा तत्सम पोलिस अधिकार्‍यांच्या विरोधात केलेल्या बदनामीबद्दल माफ़ी मागितली आहे काय? मग अशा वाहिन्या व त्यांच्या बातम्या कोणत्या हेतूने दिल्या जातात, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना अशा बातमा कोण द्यायला भाग पाडतो वा त्यातून काय साध्य करायचे असते, असाही प्रश्न आहे. पण त्याची उत्तरे कधीच मिळत नसतात.

   मुद्दा वाहिन्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा नसून अशा बातम्यातून केल्या जाणार्‍या व्यसनाधीनतेच्या समर्थन व उदात्तीकरणाचा आहे. सभ्य लोकांवर पोलिसांनी अन्याय केला, असाच त्या सर्व बातम्यांचा सुर होता. जणू ढोबळे किंवा त्यांच्यासारखे पोलिस अधिकारी कुठे मंगळागौरीच्या फ़ुगड्यांचा समारंभ चालू होता आणि त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बाधा आणायला तिथे पोहोचले; असाच त्या बातम्यांचा सुर नव्हता काय? आणि अशा बातम्यांमध्ये हल्ली एक मोठा सोज्वळ शब्दप्रयोग अगत्याने केला जात असतो. कल्चरल पोलिसिंग म्हणजे संस्कृती रक्षणाचा आव पोलिस आणतात, अशी हेटाळणी या बातम्यातुन केली जात असते. पैसे उडवण्यासाठी कुठल्या खाजगी जागेत किंवा आलिशान हॉटेलमध्ये नशापान करणे सभ्य आहे काय? अशा जागी कोणी संघटनेने हल्ले केले तर त्यांना तो अधिकार कोणी दिला, असा सवाल केला जातो. पण पोलिसच कायद्याचे अंमलदार असतील तर त्यांनी कायदा हाती घेतला असे म्हणता येत नाही, तेव्हा त्यांच्यावर संस्कृतीरक्षणाचा आरोप करायचा. संस्कृती ही एवढी मागासलेली विकृत रोगट गोष्ट आहे काय? जे लोक नशापान करायला जमतात, ते संस्कृती जपत असतात काय? स्वातंत्र्य म्हणजे नशापान करायचा, स्वैराचाराचा विशेष हक्क असतो काय? अशा नशापानानंतर जे परिणाम संभवतात, त्याची जबाबदारी कोणाची असते? अशाच रेव्ह पार्ट्या किंवा नशापानाच्या सोहळ्यानंतर आपल्या अलिशान गाड्या बेफ़ाम हाकणार्‍यांनी किती निरपराधांचे बळी आजवर घेतले आहेत? त्यांच्या नशापानाच्या अधिकाराचे समर्थन करणार्‍यांना अशा निरपराधांच्या जगण्याच्या अधिकाराची आठवण तरी असते का?

   एकीकडे अशा नशापानाला हल्ली प्रतिष्ठा मिळत चालली आहे. त्याला हे वाहिन्यांवरचे नवस्वातंत्र्यवादी खतपाणी घालत असतात. त्याचा एक धोका त्या नशाबाजांच्या बेफ़ाम गाड्या हाकण्यातून सामान्य पादचार्‍यांचा बळी जाणे हा असतोच. पण त्यातला दुसरा धोका मोठा व शक्यतो लक्षात न येणारा असतो. श्रीमंती व चैन म्हणुन मध्यमवर्गिय वा गरीब कुटुंबातले तरूण त्याकडे आदर्श जीवनशैली म्हणुन बघत असतात. त्याच श्रीमंत प्रतिष्ठीतांचे अनुकरण करू बघत असतात. "यार जीना हो तो ऐसा" असे ही व्यसनाधीनता खालच्या वर्गातील मुलांना खुणावत असते. मग गटारी, थर्टीफ़र्स्ट डिसेंबर किंवा तत्सम सोहळे अशा नशापानाचे मुहूर्त बनू लागले आहेत. रेव्ह पार्ट्या किंवा तत्सम प्रकारात पकडली जाणारी मुले, कुठल्या वयात कुठल्या मार्गाला लागत आहेत, याची कुणाला फ़िकीर आहे काय? व्यसन करण्याचे स्वातंत्र्य ही कल्पनाच चमत्कारिक नाही काय? आणि पुन्हा त्यावर कायद्याचा बडगा उगारला, तर हे वाहिन्यांवरचे दिवटे विचारणार पोलिस संस्कृतीरक्षक झालेत काय? एकप्रकारे ही प्रतिष्ठीत वा सुसंस्कृत म्हणुन मिरवणारी मंडळीच समाजात व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देत नाहीत काय? मग अशी जीवनाची ऐष करण्यासाठी काही भरकटलेली मुले कुठल्याही गुन्ह्याला प्रवृत्त होत असतात. कारण अशा मौजमजेच्या गोष्टी त्यांना खुणावत असतात. खेड्यापाड्यापर्यंत आता बार संस्कृती पोहोचली आहे. कुठल्याही तालुका गावातली तरूण मुले मद्यप्राशन म्हणजे पुढारलेपणा समजू लागली आहेत. त्याला हे वाहिन्यांचे उदात्तीकरण जबाबदार आहे. तसे नसते तर त्यांनी वसंत ढोबळे यांच्या विरोधात अशी सुपारी घेतल्यासारखी मोहिम कशाला चालवली असती?

दिल्लीतल्या बीएमडब्ल्यू किंवा जेसिका खुन प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती? इथे जशा पार्ट्या चालतात, तशाच पार्ट्यामधून बाहेर पडलेल्यांनी त्या हत्या केलेल्या नव्हत्या काय? व्यसनधीनतेचे जे उदात्तीकरण वाहिन्यांच्या बातम्या किंवा चर्चेतून चालते, त्याचाच हा दुष्परिणाम आहे. कारण वयात येणार्‍या निरागस मुलांमध्ये जी बंडाची उर्मी असते, तिला अशा बातम्या व चर्चा चुचकारत असतात. प्रोत्साहन देत असतात. हिंमत देत असतात. व्यसनाची सुरूवात अशी अगदी नकळत कुतुहल किंवा उत्सुकतेपोटी होत असते. त्या उर्मी व इच्छेला निकामी करण्याची गरज आहे. व्यसन हे पाप आहे. गैरलागू आहे, अनावश्यक आहे, घातक आहे आणि त्याचवेळी त्यामुळे पोलिसांच्या तावडीत सापडण्याचा धोका आहे; अशी धारणा कोवळ्या तरूण वयात निर्माण झाली तर मुलांना व्यसनाधीन होण्यापासून रोखणे सोपे होऊ शकेल. लोकहिताचा विषय म्हणुन माध्यमांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. त्याऐवजी माध्यमेच व्यसनी मार्गावर निघालेल्यांच्या स्वातंत्र्याचे गुणगान करू लागली किंवा त्याविरोधात कंबर कसलेल्या पोलिसांना नामोहरम करू लागली; तर पुढल्या पिढीच्या आयुष्याला किड लागणे सोपेच नाही काय? मग त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागत असतात. कधी असे बहकलेले नशाबाज रस्त्यातून मुलींना उचलून त्यांच्यावर अत्याचार करतात, तर कधी त्याच बार वा पार्टीत हजर असलेल्या मुलींच्या वाट्याला तो अत्याचार येत असतो. मुंबईच्या पश्चिम उपनगरात एका तरूणीची छेड काढल्याचा जाब विचारणार्‍या तिच्या मित्राची नशाबाजांनी भर रस्त्यात हत्या करण्याचा प्रकार अशाच संस्कृतीचा बळी होता ना? ढोबळेसारखा अधिकारी त्याच मुलीचे वा त्यांच्या मित्रांना व्यसनाधीनतेच्या हल्ल्यापासून वाचवू बघतो, हे आमच्या वाहिन्यांना कधी कळणार आहे?    ( क्रमश:)
भाग  ( ३३९ )     २८/७/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा