सोमवार, ९ जुलै, २०१२

आपण मुलाचे बौद्धिक कुपोषण करतो का?


   पुर्वी कधी नाही इतके आजचे पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी जागरूक झाले आहेत. त्यासाठी पैसे खर्च करायलाही मागेपुढे बघत नाहीत. पण त्या गडबडीत पालक एक गोष्ट विसरून गेला आहे, की त्याने आपल्या वागण्यातून स्वत:ला ग्राहक बनवून घेतले आहे. उत्तम शाळा, इंग्रजी माध्यमाची शाळा, टयूशन अशा नव्या बाजारपेठेतला पालक हा एक ग्राहक बनला आहे. जेव्हा तुम्ही ग्राहक बनता, तेव्हा तुमच्या मागण्या पुरवण्यासाठी व्यापारी सज्ज होत असतात. आणि व्यापार म्हणजे समाजसेवा नसते, तर सरळसोट धंदा असतो. त्यातून तुमच्या पदरात काय पडणार याचा व्यापारी विचार करत नसतो; तर त्याला किती नफ़ा काढता येणार आहे, त्याच दृष्टीने संपुर्ण आखणी केली जात असते. दुर्दैव असे, की ती बाब पालकाच्या कधीच लक्षात येत नाही. एका बाजूला तो ग्राहकाप्रमाणे या बाजारात शिरतो, पण दुसरीकडे तो त्याच व्यापारी पेठेतून सेवाभावाची अपेक्षा करत असतो. पण जसे जसे दिवस सरकत जातात, तसे त्याला आपण गिर्‍हाईक बनल्याचे अनुभव वाढू लागतात. मग त्याची चिडचीड वाढू लागते. 

   तुम्ही कुठली वस्तू खरेदी करायला बाजारात गेलात, मग तिथला दुकानदार किंवा विक्रेता त्या टिव्ही किंवा वॉशींग मशीनच्या कोणत्या कोणत्या खुबी आहेत, ते अगत्याने सांगत असतो. तुमचा कल बघून वस्तूच्या गुणवत्तेचे कौतुक करता असतो. पण त्यात येऊ शकणारे दोष कधीच सांगत नाही, की निदर्शानास येऊ देत नाही. तुम्ही शंका काढली, तरी सारवासारव करून वस्तू तुमच्या गळ्यात बांधतो. अगदी तशीच स्थिती आजच्या पालकाची शिक्षणाच्या बाजारपेठेत झाली आहे. चारचौघांकडून त्याने कुठल्यातरी शाळेचे कौतुक ऐकलेले असते. इंग्रजी माध्यमाचे गुणगान ऐकलेले असते. तेवढ्या शिदोरीवर तो पालक आपल्या मुलाला अशाच कुठल्यातरी शा्ळेत दाखला मिळावा म्हणुन उतावळा झालेला असतो. जणु अशा नामवंत शाळेत प्रवेश मिळवणे, म्हणजे  त्याला आपल्या प्रतिष्ठेत भर पडल्यासारखे वाटत असते. पण आधी तिथे प्रवेश घेतलेल्या मुलांचे काय झाले, त्याकडे तो नवा ग्राहक म्हणजे नवा पालक ढुंकूनही पहात नाही. आणि तो त्या दुष्टचक्रात अडकतो. पुढे जेव्हा त्याचे चटके बसू लागतात, तेव्हा त्याला जाग येऊ लागते. पण तिथून मागे फ़िरायची वेळ निघून गेलेली असते.

   वेळ गेली म्हणजे काय ते आधी समजून घेतले पाहिजे. साधारण चौथी पाचवीच्या वर्गात मुले पोहोचतात, तेव्हा इंग्रजी माध्यमाचे तोटे पालकांच्या लक्षात येऊ लागतात. कारण तिथूनच खर्‍या शालेय शिक्षणाला आरंभ होत असतो. तोवर त्या मुलाने जर आपली मातृभाषा नसलेली इंग्रजी भाषा व्यवहारी पातळीवर आत्मसात केलेली नसेल, तर त्याला खरे विषयांचे पायाभूत शिक्षण घेताना अडथळे येऊ लागतात. त्यामुळे होते असे, की त्याला मातृभाषेच्या माध्यमात आणता येत नाही. कारण त्याला धड मातृभाषाही येत नसते. मग त्याला त्याच इंग्रजी माध्यमातून फ़रफ़टत जावे लागत असते. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू पालकाची आहे. जसजसे मुल वरच्या वर्गात जात असते तसतसा त्याचा त्या कौतुकाच्या शाळेतला खर्च वाढत जात असतो. घरच्या घरी पालक त्याचा अभ्यास घेऊ शकत नसतात. मग घरचा अभ्यास करून घेण्यासाठी जवळपासच्या शिकवणी वर्गात मुलाला दाखल करावेच लागते. परिणाम असा, की शाळेची मोठी फ़ी अधिक शिकवणी वर्गाचा भुर्दंड. मुलावरचा खर्च सतत वाढतच असतो. मात्र जेवढा खर्च वाढत असतो, तेवढ्या प्रमाणात मुलामध्ये प्रगती तर दिसत नसते. उलट अधोगती मात्र जाणवत असते. मग पालक त्याचा राग मुलावर काढू लागतात. आपण मुलासाठी इतका मोठा खर्च करतो आणि त्याला साधी अभ्यासातली मेहनत करता येत नाही, याचा संताप पालकांना अनावर होत असतो. आरंभी एबीसीडी पुटपुटणारे बालक कौतुकाने अंगाखांद्यावर खेळवणारा तोच पालक, चौथीपाचवीच्या वर्गात पोहोचलेल्या मुलाच्या अभ्यासात मागे पडण्याने कमालीचा विचलित होऊन गेलेला असतो.

   इथे काय गडबड होते? पहिलीत वा नर्सरीमध्ये सर्वच मुले सारखी वाटत असतात. मग त्यातली आठदहा मुलेच पुढे जातात आणि बाकीची मुले मागे का पडतात? जसजशी वरच्या वर्गात मुले जात असतात, तसतसा त्याच्या आकलनात फ़रक पडू लागतो. त्याचे कारण ज्या काळात आपण मुलांना शाळेत घालत असतो, त्यातले प्राथमिक शिक्षणाचे वय हे मुलाच्या मेंदूचे सशक्तीकरण होण्याचे वय असते. जन्मत: मुलाला पालकांकडून जे गुण मि्ळालेले असतात, त्यावर त्याची वाटचाल सुरू झालेली असते. पण प्रत्येक सशक्त मुलाला मानवी उत्क्रांतीमध्ये विकसित झालेला मेंदू जन्मत: देणगी म्हणुन निसर्गाने दिलेला असतो. त्या मेंदूमध्ये अब्जावधी ज्ञानपेशी असतात. त्यांना कामाला जुंपण्याचे म्हणजे कार्यरत करण्याचे काम याच कोवळ्या वयात सुरू झालेले असते. वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापर्यंत ७५-८० टक्के मेंदू कार्यरत होत असतो. म्हणजेच किती वेगाने मुलाचा मेंदू कार्यरत होत असतो ते लक्षात येईल. याचा अर्थ इतकाच, की मुलाच्या बौद्धीक विकासासाठी तो कालखंड अत्यंत मोलाचा असतो. त्याची बुद्धी म्हणजे आकलनशक्ती विकसित होण्याचा तो कालखंड असतो. सभोवारच्या गोष्टी समजून घेऊन त्याबद्दल आपले मत व तर्क बनवण्याचा तो काळ असतो. ती संधी त्याला नाकारणे म्हणजे त्याच्या बौद्धिक विकासात अडथळे आणणेच असते.

   इथे आकलनशक्ती म्हणजे काय तेही पालकांनी समजून घेण्याची गरज आहे. बुद्धी ज्याला आपण म्हणतो ती एक मेंदूची क्षमता असते. अमूक म्हणजे अमूक असे जे ठोकताळे आपल्या प्रत्येकाचे असतात, त्याच्या आधारावरच आपण जगातल्या घटना व गोष्टी समजून घेत असतो. जशी लांबी मोजण्यासाठी मोजपट्टी असते किंवा वेळ मोजण्य़ासाठी घड्याळ वा द्रवपदार्थ मो्जण्यासाठी लिटर हे परिमाण असते, तसेच प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची एक मोजपट्टी, जग समजून घेण्यासाठी असते. ती मोजपट्टी म्हणजेच त्याची आकलनशक्ती असते. ती प्रत्येकाला आपल्या मेंदूच्या विकासातून वा त्यातल्या ज्ञानपेशी कार्यरत करून बनवता येत असते. त्यालाच पुढल्या का्ळात बुद्धी म्हटले जात असते. ठरविक वयात म्हणजे त्या ज्ञानपेशी कार्यरत होण्याच्या मुदतीतच त्या क्रियान्वित झाल्या नाहीत, तर निकामी होऊन जातात वा आळशी होऊन जातात. त्यांचा उपयोगच होऊ शकत नाही. म्हणून तर बालकामध्ये त्या वयात भयंकर उत्सुकता व उतावळेपणा आढळून येतो, कुतूहल दिसते. चौथी म्हणजे सहा अधिक चार असे मुलाचे वय दहा वर्षाचे होत असते. तीन ते दहा वर्षे वयात नर्सरी ते चौथीच्या वर्गातल्या मुलाला आपण घोकंपट्टी वा प्रश्नोत्तरांच्या घाण्याला जुंपले तर त्याच्या मेंदूच्या विकासात अडचण येते. कारण चौकसपणे जगाकडे बघून त्याला स्वत:ला जग समजून घ्यायला अडथळा येत असतो. त्यासाठी त्याला सवडच दिली जात नसते. त्याचा बौद्धिक कोंडमारा केला जात असतो. अभ्यासात वा त्यासाठी इंग्रजीसारखी एक नवी भाषा शिकण्यात त्याचा वेळ दवडला जातो. तिथे सगळी समस्या सुरू होते.

   जेव्हा त्याच्या बुद्धीचा विकास होण्यात आपण अडचण करतो, तेव्हा त्याच्या पुढल्या शिक्षणासाठी आवश्यक असा बौद्धीक पायाच व्यापक होण्यात अडथळा आणत असतो. त्याचेच परिणाम मग चौथीनंतर दिसू लागतात. ज्या मुलांची बुद्धी जन्मत:च तल्लख असते, त्यांना ती अडचण येत नाही. पण सामान्य बुद्धीच्या मुलांना योग्य वेळी बौद्धिक विकासात अडथळा आणला गेला, तर त्याचा त्रास अपरिहार्य असतो. कारण जर त्याची बुद्धी योग्य कालखंडात विकसित झाली तरच त्याला पुढल्या काळात विज्ञान वा गणित जसे आत्मसात करता येते, तसेच त्याला इंग्रजी आत्मसात करणे अवघड नसते. पण त्या कोवळ्या वयात त्या्चा बौद्धिक विकास खंडीत झाला वा कुंठीत झाला, तर त्याला विज्ञान-गणित असे अन्य विषयसुद्धा अवघड होऊन जातात. पाचवीनंतर असे विषय सुरू होतात आणि सर्वसामान्य मुलांना तिथेच अभ्यासात अवघडल्यासारखे होऊ लागते. कारण त्यांना इंग्रजी बोली येत असते, पण त्यांची बुद्धी अन्य गहन विषय समजून घेण्यात तोकडी पडू लागलेली असते. त्याचे कारण म्हणजे योग्य वयात त्याचा बौद्धिक विकास आपण होऊ दिलेला नसतो. आजकालच्या व्यवहारी भाषेत सांगायचे तर त्या शारिरीक वाढीच्या मोक्याच्या वयात आपण आपल्याच लाडक्या मुलाचे बौद्धिक कुपोषण केलेले असते. जे शिकवण्याची गरज नसते तर त्याच्या शिकण्यात त्याला मदत करायची असते, तिथेच आपण सगळा घोळ करून ठेवतो. शिकण्याच्या उपजत वृत्तीमधून कुतूहलापोटी मुल शिकत असते, तीच संधी त्याला नाकारून आपण त्याच्या बुद्धीचा विकासच रोखून धरतो आणि त्याचे परिणाम पाचवीनंतर दिसू लागतात. पण मागे वळता येत नसते आणि अधिक पुढे गेल्यावर मुले निराशेच्या आहारी जातात.   ( क्रमश:)
भाग ( ३२१ )   १०/७/१२

1 टिप्पणी: