मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

जावेद अख्तर आणि गुलाम वस्तानवींचे अनुभव


   मला वाटते बहूधा गुजरात दंगलीनंतरची गोष्ट आहे. तेव्हा इंग्रजी भाषेतील एनडीटीव्ही ही एकच वाहिनी होती. तिथे राजदीप सरदेसाई राजकीय संपादक म्हणुन काम करत होता. दर रविवारी त्याचा बिग फ़ाईट नावाचा वादविवादाचा कार्यक्रम असायचा. तीन किंवा चार पाहुणे आणि त्यांना प्रश्न विचारणारे तीन पत्रकार असा सोहळा असे. त्यात वाद व चर्चेपेक्षा हमरीतुमरीच अधिक होत असे. अशाच एका कार्यक्रमाचा विषय होता धार्मिक अन्याय असाच काही. त्यात प्रसिद्ध चित्रपट कथाकार कवी जावेद अख्तर सहभागी झाले होते. राजदीपने त्यांना मुस्लिमांना भेदभावाची वागणूक मिळते काय असा प्रश्न विचारला. त्याची त्यांनी उत्तरे व उदाहरणे दिली. मग त्यांनी असाच हिंदूंवर भारतात अन्याय होतो काय, असाही प्रश्न विचारला. जावेद अख्तर यांनी त्याचेही स्वत:च्या अनुभवाने उत्तर दिले होते. त्यांनी एक किस्साच सांगितला. भारतीय सेक्युलर प्रशासन हे हिंदूंना कसे भेदभावाने वागवते, त्याचा तो सर्वोत्तम किस्सा आहे. त्या काळात जावेदची पत्नी शबाना आझमी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेची खासदार होती. सध्या स्वत: अख्तरच आहेत. असो, जावेदभाईंनी सांगितलेला किस्सा असा.

   एकदा त्यांना मुंबईच्या ताडदेव भागातील एका मुस्लिम महिलेचा फ़ोन आला. नवरात्रोत्सवाचे लाऊडस्पिकर खुप जोरात वाजत असल्याने त्यांच्या मुलांचा अभ्यास होऊ शकत नाही. त्याचा बंदोबस्त करावा अशी त्या महिलेची मागणी होती. त्याप्रमाणे तिचा पत्ता घेऊन अख्तर यांनी संबंधित पोलिस ठाण्याला आपण खासदार शबानाचा पती बोलत असल्याचे सांगून त्या लाऊडस्पिकरचा आवाज बंद करण्याची विनंती केली. काही वे्ळाने त्या महिलेचा आभार मानणारा फ़ोन आला. तिचे काम झाले होते. तिच्या जवळ वाजणारा नवरात्रीचा लाऊडस्पिकर बंद झाला होता. काही दिवसांनी उलट परिस्थिती आली. अशाच एका महिलेचा फ़ोन आला. ती महिला मुस्लिम नव्हती तर हिंदू होती. कुठला तरी मुस्लिम सण चालू होता आणि त्या निमित्त तिलाही असाच जोरात वाजणार्‍या लाऊडस्पिकरचा त्रास होत होता. पुन्हा त्याच पोलिस ठाण्याला अख्तर यांनी तक्रार केली. पण तासाभराने काम न झाल्याची तक्रार करणारा फ़ोन त्या महिलेने केला. आता चीड आलेल्या जावेदभाईंनी पुन्हा पोलिस ठाण्याला फ़ोन करून तिथल्या अधिकार्‍याला जाब विचारला. तर तो अधिकारी म्हणाला, लाऊडस्पिकर मुस्लिम सणासाठी लावला आहे आणि तो बंद करता येणार नाही. जावेदभाईंनी कारण विचारले तर हसत त्या अधिकार्‍याने सांगितले हे असेच चालते.

   इतका किस्सा सांगून जावेदभाई म्हणाले, हा त्या महिलेवर ती हिंदू आहे म्हणूनच झालेला भेदभाव नाही काय? मुस्लिम महिलेची तक्रार ऐकून हिंदू सणासाठी वाजणारा लाऊडस्पिकर बंद करण्यात आला. पण तशीच तक्रार असताना मुस्लिमांचा लाऊडस्पिकर मात्र बंद करण्यात आलेला नव्हता. हा भेदभाव नाही तर काय? अशा तक्रारी शिवसेना किंवा भाजपाकडून नेहमीच होत असतात, विशेषत: गणपती किंवा नवरात्रोत्सवात होतात. पण त्यांनी असा भेदभाव होतो म्हटले, की त्याला खोटे पाडले जाते. पण इथे तीच तक्रार भाजपावर सतत टिका करणार्‍या एका सेक्युलर मुस्लिमाने केली होती. पण राजदीप सरदेसाईने ती तक्रार साफ़ फ़ेटाळून लावली. राजदीप म्हणाला, यात काही तथ्य नाही. जावेदभाई पटकथाकार आहे, तो कुठल्याही कथेला कसलेही नाट्यमय वळण देऊ शकतो. म्हणजे जावेद अख्तर यांनी जो आपला अनुभव सांगितला, त्याला सेक्युलर राजदीप कथा ठरवून मोकळा झालेला होता. हा आपल्या देशातला सेक्युलॅरिझम आहे. त्यात मुस्लिमांवरच अन्याय होतो अशी ठाम श्रद्धा व समजुत आहे. मग एखाद्या मुस्लिमाने आपल्यावर अन्याय झाला नाही किंवा होत नाही म्हटले तरी सेक्युलर विचारवंत किंवा पत्रकार माध्यमे त्याला खोटा पाडायला कमी करत नाहीत. आणि एखाद्या हिंदूने आपल्यावर अन्याय होतो म्हटले, तरी त्याला खोटे ठरवणे म्हणजे सेक्युलॅरिझम अशी स्थिती आहे. आणि त्यातूनच आज या दोन प्रमुख धार्मिक समाज घटकांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. त्यावरच सेक्युलर मंडळी आपली पोळी भाजून घेत असतात. अर्थात जावेद अख्तर यांचा हा एकमेव किस्सा आहे असे कोणी मानायचे कारण नाही. असे कित्येक किस्से मी सांगू शकतो.

   मध्यंतरी देशातील सर्वात मोठे असे मुस्लिम धर्मपीठ देवबंदचे प्रमुख मौलवी गुलाम वस्तानवी यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्यावर सेक्युलर माध्यमे व पत्रकारांनी झोड उठवली. वस्तानवी हे मुळचे गुजराती मुस्लिम आहेत. त्यांनी इस्लामी धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास केलेला आहे. म्हणुनच त्या अभ्यास व अनुभवातून त्यांना धर्मपीठाचे प्रमुख म्हणुन नेमण्यात आलेले होते. पण त्यांनी सत्य बोलण्याची हिंमत केली आणि त्यांना ते सन्मानाचे पद अपमानित होऊन सोडावे लागले. एका मुलाखतीमध्ये त्यांनी गुजरातमधले सत्यकथन केले. तिथे दंगली होऊन त्यात मुस्लिम मारले गेले, मुस्लिमांवर खुप अन्याय झाला, हे सर्व खरे असले तरी आज त्या राज्याची जी प्रचंड आर्थिक प्रगती झाली आहे; त्याची फ़ळे गुजराती मुस्लिमांनाही चाखायला मिळत आहेत. आणि त्या विकासाचे श्रेय मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना द्यावेच लागेल. असे विधान वस्तानवी हे करून बसले आणि आयुष्यात सत्य बोलण्य़ाचा त्यांनी सर्वात मोठा सेक्युलर गुन्हा केला. झाले, वस्तानवी यांनी मोदींचे कौतुक केले असे काहूर माजवण्यात आले. वस्तानवी यांनी आपण मोदी यांच्या धोरणाचे, राजकारणाचे किंवा दंगलीतील वर्तनाचे कौतुक केलेले नाही, तर त्याच मुलाखतीमध्ये मोदींची दंगलीबद्दल निंदाच केल्याचे पुन्हा पुन्हा सांगून बघितले. पण काही उपयोग झाला नाही. मुस्लिम असून मोदींच्या विकासकामाचे कौतुक त्यांनी केले, म्हणुन आपल्या सेक्युलर माध्यमांनी वस्तानवी यांना अपराधी ठरवून टाकले होते. माध्यमातून इतके काहूर माजवण्यात आले, की त्याची दखल घेऊन देवबंद पीठाला वस्तानवी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावाच लागला.

   मुस्लिम आहे त्याने मोदी यांची निंदाच केली पाहिजे. आणि एखाद्याचा अनुभव वेगळा असेल, तरी त्याने सत्य बोलण्याचे धाडस करता कामा नये, अशी आपल्या देशातील सेक्युलर परिस्थिती आहे. हिंदूंवर अन्याय झाला तरी त्याबद्दल अवाक्षर उच्चारणे सेक्युलर गुन्हा असतो. त्याचप्रमाणे इथे या देशात मुस्लिमांवर अन्याय होतो असे सेक्युलर माध्यमांनी ठरवून ठेवले आहे. त्यात कोणी गफ़लत केली तर तो मुस्लिम असला तरी त्याला क्षमा नसते. मग वस्तुस्थिती काहीही असो. हिंदू अन्याय करतात आणि मुस्लिमांवर अन्याय होतो हा सिद्धांत मान्य करणे म्हणजे सेक्युलर असणे झाले आहे. तशी वस्तुस्थिती असायचे कारण नाही. अशी आजच्या सेक्युलर माध्यमांची मनस्थिती असेल तर त्यांना आझाद मैदानावर मुस्लिम गुंडांनी धुडगुस घातला किंवा हैदोस केला, तर ते दिसेल कसे? त्याऐवजी त्यांना त्यातही अजून हिंदूत्ववादी संघटनांचा हात कसा दिसलेला नाही हे एक आश्चर्य आहे. त्याचेच प्रतिबिंब सर्वच माध्यमात व वाहिन्यांच्या चर्चेत पडलेले दिसेल. म्हणून निखिल वागळे याने आपल्या सवालमध्ये का्रण नसताना सुनिल देवधर याच्यावर आरोपांची बरसात केली. कारण देवधर हिंदू संघटनेशी संबंधित आहेत आणि त्यांना शिव्या घातल्या किंवा खोटे आरोप त्यांच्यावर केले, मगच निखिल सेक्युलर ठरत असतो. सेक्युलर विचारसरणीची अशी आज विकृत अवस्था झालेली आहे. हिंदूंच्या भावना दुखावणे म्हणजे सेक्युलर आणि मुस्लिम गुंडगिरीचे समर्थन म्हणजे सेक्युलर; अशी त्या विचारधारेची दुर्दशा झालेली होऊन गे्ली आहे, सामान्य मुस्लिम त्याच विकृतीचा बळी होत चालला आहे. कारण असल्या सेक्युलर चाळ्यांनी मुस्लिम समाजात संयमी व समंजस वृत्तीला स्थानच राहिलेले नाही. जे भडकपणे बोलतील वा चिथावणीखोर वागतील, त्यांनाच माध्यमे मुस्लिम प्रतिनिधी म्हणून समोर आणत असतात. आणि संयमी मुस्लिम नेत्यांना प्रसिद्धी दिलीच जात नाही. जेणे करून बहुसंख्य हिंदू समाजामध्ये मुस्लिमांबद्दल गैरसमज, संशय व चिड निर्माण होईल अशाच लोकांना पुढे आणले जात असते. नुसती अशा मुस्लिम नेत्यांवर नजर टाकली तरी त्याची साक्ष मिळेल. त्याला मुस्लिम समाज जबाबदार नसून सेक्युलर विचारांचे विकृतीकरण त्याला कारणीभूत आहे. आणि या राजकारणात एका निरागस मुस्लिम मुलीचा कसा बळी घेतला गेला त्याचा तपशील उद्या बघू.     ( क्रमश:)
भाग   ( १४ )  २९/८/१२

२ टिप्पण्या:

  1. Maulana vastanvi yanche samajasathi far mothe yogdan ahe. Garibanchi mule jya atyalpa kharchat tyanchyakade engg, pharmacy shiktat tyala tod nahi. Te jase madarse chalawtat tase medical college, engg college, pharmacy, BEd college chalawtat. Ani madarsa madhe shiknari mule hehi shikshan ghetat. Ani ahi collgeges mulinsathi hi ahet. Pan ashi manse media kadhi samor annar nahi.

    उत्तर द्याहटवा
  2. Deshachi waet avastha karun takliye lokanni...udya desh vikaila pan mage pudhe nahi pahanar...

    उत्तर द्याहटवा