सोमवार, ६ मे, २०१३

कळपाच्या सामुहिक भयगंडातून दंगल उदभवते




सामुहिक भयगंड प्राण्यांच्या कळपामध्ये उपजत समुह मनोवृत्तीची जाणिव उत्पन्न करत असतो आणि मग त्यामुळे जे आपल्या कळपातले नाहीत असे वाटते, त्यांच्या विरोधा्त भयंकर क्रुर प्रतिक्रियेचा उदभव होतो - बर्ट्रांड रसेल

   रसेल हा विसाव्या शतकातला जगप्रसिद्ध विचारवंत चिंतक मानला जातो. त्याच्या या विधानातला नेमका अर्थ समजून घेतला, तर आपल्याला भारतात वारंवार होणार्‍या दंगलीचे योग्य विश्लेषण करता येईल. पण दुर्दैव असे आहे, की आपल्याकडे सगळ्या चर्चाच उथळपणे चालतात. त्या जम्मूच्या तुरूंगातला भारतीय कैदी असा अमानुष का वागला; त्याचे मानसिक विश्लेषण होण्याची गरज असते. अशा प्रकरणाचा निचरा करण्यासाठी त्याचा उपयोग नसतो. पण अशा घटनांची पुनरावृती होऊ नये, यासाठी असे विश्लेषण उपयोगी असते. त्यामुळे कुठल्या परिस्थितीचा सामान्य माणसावर किंवा कैद्यावर कसा प्रभाव पडतो आणि त्यांच्याकडून कशा प्रतिक्रिया उमटू शकतात; त्याचा आधीच अंदाज येऊ शकत असतो. म्हणूनच रसभरीत सनसनाटी वाद रंगवण्यापेक्षा, अशा घटनांचे काटेकोर मानसिक विश्लेषण अगत्याचे असते. गेल्या वर्षी दिल्लीत कृषीमंत्री शरद पवार एका कार्यक्रमाला चालले असताना कोणा शीख तरूणाने त्यांना थप्पड मारण्याचा प्रसंग घडला होता. त्याचे गांभिर्य माध्यमांनी किती समजून घेतले? दिवसभर त्याचे सतत प्रसारण चालू होते. त्याचा निषेध संसदेतही झाला. त्यावेळी बोलताना संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी नेमके दुखण्यावर बोट ठेवलेले होते. ‘मारणार्‍याने एकच थप्पड मारली होती. पण माध्यमांनी व वाहिन्यांनी हजारो, थपडा मारून घेतल्या’ असे यादव म्हणाले. त्यांचे हे विश्लेषण कुणा वाहिनीवरच्या शहाण्याने विचारात तरी घेतले काय? दिवसभर असा कल्लोळ माध्यमातून झाल्यावर पवारांच्या समर्थकांना घरात बसून रहाणे शक्य राहिले नाही. आपल्या सर्वोच्च नेत्याच्या अपमानावर लोकांना दिसेल अशी प्रतिक्रिया देणे त्यांना भाग होऊन गेले. मग पुण्याचे महापौरही शहराचे कारभार बंद पाडायला रस्त्यावर उतरले होते. तर हीच माध्यमे त्या महापौराला आरोपी बनवत होती. पण त्याला व अन्य पवार समर्थकांना रस्त्यावर यायला कोणी भाग पाडले? त्याचा शोध कोणी घ्यायचा?

   माणूस कसा विचार करतो आणि कसा प्रवृत्त होतो; याचे जाणकारांनी म्हणूनच भान ठेवावे लागत असते. कुणी घरात, कुटुंबात दुबळ्या मनाचा असेल तर त्याला दु:खाची घटना लगेच सांगत नाहीत. तसेच तापट स्वभावाचा कोणी असेल तर त्याच्या मनाचा तोल जाणारी घटना त्याच्यापासून लपवली जात असते. कारण नुसती अशी माहिती शांतपणे स्विकारणे व तारतम्याने त्यावर व्यक्त होणे; त्या लोकांना शक्य नसते. समजून घेण्याची प्रत्येक व्यक्तीची कुवत व क्षमता वेगवेगळी असते. सभ्य विचारी माणुस शब्दात निषेध व्यक्त करतो आणि मुखदुर्बळ माणूस हातात सापडेल ते घेऊन हिंसक प्रतिक्रिया देत असतो. म्हणूनच अशा प्रतिक्रियांचा विचार करूनच हाती आलेली माहिती पुढे पाठ्वायची असते. शरद पवारांवरील हल्ल्याची बातमी तेवढी गंभीर नव्हती. ती प्रासंगीक घटना होती. पण त्याचे प्रसारण सतत होऊन ज्या प्रतिक्रियांचे माहोल उभे करण्यात आले. त्यातून जणू त्यांच्या अनुयायांना डिवचण्यात आलेले होते. त्या सततच्या बातम्या जणू त्या अनुयायांना हिणवत होत्या, ‘काय षंढ तुम्ही? तुमच्या नेत्याला हाणले आणि बसलाय गप्प?’ मग व्हायचे तेच झाले. अण्णा हजारे आज गांधीवादी मानले जात असले तरी तो एक सामान्य ग्रामिण गावकरी आहे व त्यांची वैचारिक कुवत खेडूतासारखीच असते. त्यांना कोणा वाहिनीच्या पत्रकाराने पवारांची ती बातमी सांगितली आणि प्रतिक्रिया विचारली. अण्णा सहजगत्या म्हणाले, ‘एकही मारा’. झाले मग त्यावर काहूर माजवण्यात आले. इथे अण्णांची विचारशक्ती वा आवाका विचारात घेतला; तर त्यांची पर्तिक्रिया खेडूताची होती, हे सहज लक्षात येते. पण जगातले तमाम लोक एकाच बुद्धीचे आहेत, असे गृहित धरून जर सर्वांना तेच सांगितले आणि भिन्न प्रतिक्रिया उमटल्या; तर दोष गृहित धरणार्‍यांचा असतो.

   म्हणूनच सर्वजीतच्या हल्ला व मृत्यूनंतर माध्यमांनी माजवलेले काहूर पुढल्या सर्वच उफ़राट्या प्रतिक्रियांना कारणीभूत होते. विविध कळपाच्या मनोवृत्तीचे गट समाजात एकत्र नांदत असतात. त्यांच्यात परस्परांतील विश्वासाचा अभाव असतो. आपला व परका अशी धारणा असतेच. कधी ती मराठी बिगरमराठी अशी, तर कधी हिंदू बिगर हिंदू अशी असते. कधी घाटी कोकणी अशीही असते. कधी उच्चभ्रू व सामान्य अशीही असते. त्यांच्यातल्या त्या धारणांना धक्का लागेल, अशी माहिती असली, मग जपून समोर आणावी लागते. त्यात एका गटाच्या हळवेपणाला धक्का लागत असेल व दुसर्‍या गटापैकी कोणी त्यामध्ये जबाबदार असेल; तर हळव्या भावनांचा कळप ताबडतोब दुसर्‍या कळपाच्या त्या आरोपी व्यक्तीपेक्षा, एकूणच त्याच्या कळपाला गुन्हेगार ठरवत असतो. त्यामुळे तसाच व्यक्त होत असतो. अशी कळपाची मानसिकता नसावी व सहिष्णूता असावी, हा आदर्श विचार आहे. पण एकूण समाज म्हणजे लोकसंख्या तशी वागत नसते वा जगत नसते. ती वेगवेगळ्या कळपांनी तह केल्याप्रमाणे एकमेकांशी सहकार्याने नांदत असते. ते सहकार्य अतिशय नाजूक असते. काचेच्या वस्तूला धक्का लागला तरी तिचे तुकडे होतात, तसेच समाज गटातील परस्पर विश्वासाचे असते. सर्वजीतचा पाकिस्तानी तुरूंगात पाक कैद्यांनी खात्मा केला म्हटल्यावर इथे पाकिस्तानी कैदी आपल्या मर्जीवर जगतो आणि त्याला मारूनच हिशोब चुकता केला पाहिजे; असा विचार सामान्य बुद्धीची माणसे करीत असतात. त्यांच्या लेखी प्रत्येक पाकिस्तानी सर्वजीतचा म्हणजे भारतीयाचा खुनीच असतो, म्हणून त्याला शिक्षा होणे अगत्याचे असते आणि आपण ती शिक्षा देणे म्हणजेच मोठे राष्ट्रकार्य, धर्मकार्य, पवित्र पुण्यकर्म अशी एक उर्मी जागी होते. तिथून गडबड होऊन जाते. ती होऊ नये याची काळजी म्हणूनच माध्यमातल्या शहाण्यांनी घ्यायची असते. ती काळजी सर्वजीतच्या घटनेनंतर घेतली गेली नाही आणि तितकाच बेजबाबदारपणा दहा वर्षापुर्वी गोध्राच्या घटनेनंतार झाला होता. गोध्रा रेल्वेस्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेस अडवून त्यात बसलेल्या कारसेवकांचाच डबा हजारोंच्या मुस्लिम जमावाने पेट्वून दिला; ही बातमी कोणत्या सौहार्दाच्या भावनांना प्रोत्साहन देणारी होती? की दोन सामाजिक मानसिकतांमध्ये परस्परांबद्दल द्वेष वाढवणारी होती?

   २७ फ़ेब्रूवारी २००२ रोजी गोध्राची घटना घडल्यावर वाहिन्यांनी जे चित्रण प्रसारित केले व जी माहिती लोकांपर्यंत अखंड पाठवली; ती चिथावणीखोर नव्हती काय? मुस्लिम जमावाने रेल्वेगाडीतून प्रवास करणार्‍या कारसेवकांना जिवंत जाळले, अशी बातमी कोणत्या भावना उत्पन्न करते व कशाला चिथावणी देत असते? शरद पवार यांना कोणा माथेफ़िरूने दिल्लीत थप्पड मारली; म्हणून पुण्यापासून ठाण्यापर्यंत त्यांचे चहाते रस्त्यावर उतरून जनजीवन विस्कळीत करतात. तर गोध्राच्या घटनेनंतर हिंदू म्हणून जगणार्‍यांना कुठल्या भितीने पछाडले असेल? त्या हिंदूंच्या मनात असा भयगंड मुस्लिमांविषयी वाढवण्याचे काम वाहिन्यांनी केले नव्हते काय? अशी बातमी मनाला व भावनांना जखम करणारी असते. पण ती सतत दाखवत राहिले; मग जखमा अधिक खोल होतात व भळभळा वाहू लागतात. त्यातून कोणती प्रतिक्रिया उमटू शकते? कुठल्याही वाहिनीच्या संपादक पत्रकाराला त्याचे भानच नव्हते काय? थोडक्यात ज्यांनी डोके ठिकाणावर ठेवून बातमीदारी व पत्रकारिता करावी, त्यांचेच भान सुटले होते. आणि अशा प्रसंगी ज्यांचे भान सुटण्याचा धोका असतो, नेमक्या त्या सामान्य माणसाचे डोके ठिकाणावर ठेवून वागावे; अशी अपेक्षा करता येईल काय? माध्यमांनी नुसती अशी आग पसरवली नाही, तर हिंदू व मुस्लिमांच्या मनातला संशय अधिकाधिक वाढेल, असेच काम त्यावेळी केले. लंका जाळणार्‍या मारुतीची शेपूट पेटलेली होती आणि तो जिथे जिथे उड्या मारत गेला तिथे तिथे आग पसरत गेली. नेमके तसे गुजरात पेटवण्याचे काम त्या काळात माध्यमे व वाहिन्यांनी केले. म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्री मोदी दंगल आवरत नाहीत असे बोलायचे आणि दुसरीकडे दंगल कुठे कुठे पसरत चालली आहे. कोण कोणावर हल्ले करतो आहे, त्या आगीत तेल ओतायचे काम माध्यमे तेव्हा करत होती. एकूणच गुजरात दंगलीचा घटनाक्रम आणि बारकावे तपासले, तर ही दंगल माध्यमांनी पेटवली व पसरवली; असे ठामपणे म्हणता येऊ शकते. जसे परवा सर्वजीतच्या बदल्याला कोट बहावल तुरूंगातल्या कैद्याला माध्यमांनी प्रवृत्त केले; तशीच गुजरातची दंगल माध्यमांनी घडवून आणली, असेही म्हणता येईल. मात्र ती आग हाताबाहेर गेल्यावर त्याचे खापर मुख्यमंत्र्याच्या डोक्यावर फ़ोडताना हीच मंडळी आघाडीवर होती. त्यानंतरही दहा वर्षे सेक्युलर माध्यमे, पक्ष व संस्था यांना हिंदू मुस्लिमांत हिंसा न उफ़ाळल्याची वेदना असावी. कारण सेक्युलर दुकान धंदा हिंसेवरच चालतो ना?              ( क्रमश:)
 भाग   ( १६२)    ७/५/१३

रविवार, ५ मे, २०१३

सनाउल्लाला मारायच्या चिथावण्या कोणी दिल्या?




  गुजरात दंगलीच्या तपशीलात शिरण्यापुर्वी ही दंगल का झाली वा कोणी पेटवली; त्याचेही विश्लेषण आवश्यक आहे. कारण सरसकट ती मोदी व संघ परिवाराने कारस्थान शिजवून अंमलात आणलेली दंगल आहे; असाच आरोप होत राहिला आहे. दिसणार्‍या व दाखवल्या जाणार्‍या गोष्टी सत्यशोधनात पुरेशा नसतात. कारण ज्याला काही मुद्द्दे सिद्ध करायचे असतात, तो त्याला पुरक ठरतील, अशाच गोष्टी आपल्या समोर आणत असतो आणि त्याला बाधक ठरतील, अशा गोष्टी म्हणजे वास्तव नेमके लपवून ठेवत असतो. २००२ च्या दंगलीचे खापर मोदी यांच्या डोक्यावर फ़ोडण्यासाठी असेच कारस्थान झाले काय? त्याचा शोध घ्यायचा असेल, तर अगदी ताज्या घटनेचे पोस्टमार्टेम करता येईल. कालपरवा पाकिस्तानात व भारतात घडलेल्या दोन अगदी समान घटना आहेत. पहिली घटना पाकिस्तानच्या कोट लखपत तुरूंगात घडलेली आहे. जिथे दोन पाकिस्तानी कैद्यांनी, तिथे असलेल्या सर्वजीत नामक भारतीय कैद्यावर प्राणघातक हल्ला चढवला आणि त्यात अखेर त्याचा करूणास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्य़ूनंतर नेमक्या चोविस तासाच्या फ़रकाने भारतामध्ये जम्मूच्या कोट बहावल तुरूंगामध्ये तशीच भीषण घटना घडली. लाहोरच्या विमानतळावरून सर्वजीतच मृ्तदेह घेऊन विमान भारतात येण्यासाठी उडाले, त्याच वेळी जम्मूच्या या तुरूंगात सनाउल्ला नामक पाक कैद्यावर तिथल्या भारतीय कैद्याने प्राणघातक हल्ला चढवला. आता तोही तसाच मरणासन्न अवस्थेत इस्पितळात पडला आहे. मग दोन्ही घटनांमध्ये फ़रक तो कुठला? आपण पाकिस्तानच्या तुरूंगात घडले, त्यासाठी पाकिस्तान सरकार व तिथल्या प्रशासनाला जबाबदार धरत असू; तर मग तितकेच भारत सरकार व जम्मू तुरूंगाचे प्रशासनही जबाबदार नाही काय? सर्वजीतच्या हत्येसाठी पाकिस्तानात कारस्थान शिजवले व अमलात आणले गेले म्हणायचे असेल; तर तशाच घटनाक्रमासाठी भारत सरकारवरही सनाउल्लाच्या हत्याकांडाचे कारस्थान शिजवल्याचा आरोप का होऊ शकत नाही? पाकिस्तानने तसा आरोप केला आहे. तो आरोप आपण कुठल्या तोंडाने फ़ेटाळत आहोत?

   तिथे पाकिस्तानी कैद्यांच्या गर्दीत सर्वजीत एकटाच होता. तसाच इथेही सनाउल्ला भारतीय कैद्यांच्या गर्दीत एकाकीच होता. तुरूंगाच्या आवारातच दोघांवर प्राणघातक हल्ले झालेत व दोघांची स्थिती तशीच मरणासन्न होती. पण तरीही पाक तुरूंगात झाले, त्याला आपण कारस्थान म्हणतो आणि भारतीय तुरूंगात झाले, त्याला मात्र योगायोग किंवा अपघात ठरवू बघतो. दोनचार दिवस त्यासाठी वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर किती मोठमोठे युक्तीवाद चालले होते. मग दोन्हीतले बारीकसारीक फ़रक व तपशील कथन केले जात होते. सर्वजीतला पहिल्यापासूनच खुनाच्या धमक्या दिल्या जात होत्या; तशा सनाउल्लाला कोणी धमक्या दिलेल्या नव्हत्या. धमक्यांची तक्रार केल्यावरही पाक तुरूंगात सर्वजीतला तिथल्या सरकारने संरक्षण दिले नव्हते. इथे भारत सरकारने आधीच असा धोका ओळखून देशभरच्या सर्वच तुरूंग प्रशासनांना पाक कैद्यांना खास संरक्षण देण्याचे आदेश जारी केले होते. पण जम्मूच्या कोट बहावल तुरूंगात त्याचे पालन झाले नाही. म्हणजेच आदेश दिले हे केवळ भारत सरकारचे नाटक होते; असेही पाकिस्तान म्हणू शकतो. कारण कागदावरील आदेश उपयोगाचा नाही; तर त्याची अंमलबजावणी महत्वाची असते. तो नुसता आदेश सनाउल्लाला वाचवू शकला नाही. मग सरकारने निव्वळ देखावा म्हणून आदेश काढले, पण सनाउल्लाच्या बाबतीत त्याचे पालन होणार नाही, असे कारस्थान केले; असेही पाकिस्तान म्हणू शकतो. पण हे सगळे युक्तीवाद कामाचे नाहीत. कारण भारत सरकारने परस्पर आदेश जारी केले होते आणि सरकारच्या उद्देशाबद्दल शंका घ्यायला जागा नाही. घडला तो स्थानिक अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा होता हेच सत्य आहे. पण सत्य स्विकारण्याची सक्ती आपण करू शकत नाही, कारण त्याचे परिणाम दिसलेले नाहीत. नेमके हेच कुठल्याही दंगल वा सार्वजनिक हिंसाचाराच्या बाबतीत म्हणता येईल. अगदी गुजरातच्या दंगलीबाबतही असेच म्हणता येईल. कारण २००२ च्याही अगोदर अनेक दंगली झाल्या होत्या आणि त्यातही निरपराधांचे हत्याकांड नेहमीच होत राहिले आहे. मग त्यावेळचे मुख्यमंत्री दोषी व गुन्हेगार नसतील; तर एकटा मोदीच कसा गुन्हेगार ठरवला जाऊ शकतो? गुजरातच नव्हेतर देशातील प्रत्येक दंगलीही तीच कहाणी आहे. पण त्यातले तपशील व मुद्दे गेली दहा वर्षे लपवले गेले आहेत.

   चित्र असे निर्माण करण्यात आले, की जणू देशातील त्यापुर्वीच्या व नंतरच्या प्रत्येक दंगलीत सरकार व पोलिस प्रशासनाने अत्यंत कर्तव्यकठोर भूमिका पार पाडलेली असावी; असाच एकूण गुजरात दंगलीबद्दल बोलणार्‍यांचा दावा असतो. पण प्रत्यक्षात गुजरातची दंगल आणि देशात झालेल्या आजवरच्या दंगली; यातल्या घटना व परिणाम थोडेही वेगळे नाहीत. दोनच फ़रक आहेत, एक म्हणजे दंगलीसाठी मुख्यमंत्र्याच्या, सत्ताधार्‍याच्या डोक्यावर खापर फ़ोडले गेले अशी एकमेव दंगल आहे ती गुजरातची आणि दुसरा फ़रक आहे तो दंगेखोरावरील कायदेशीर कारवाईचा. गुजरातच्या दंगलीसाठी जितक्या गुन्हेगारांना पकडले गेले व खटले भरले गेले; तेवढे अन्य कुठल्याही दंगलीत घडलेले नाही. म्हणजेच दंगल हाताळण्यापासून गुन्हेगारांना शिक्षा देण्यापर्यंत सर्वात उत्तम हाताळली गेलेली दंगल कुठली, हे तपशीलात जाऊन शोधले, तर ती एकमेव गुजरातची दंगल असेच म्हणता येईल, थोडक्यात दंगल या विषयात देशातल्या आजवरच्या सर्वच सत्ताधार्‍यांची तुलना करायची म्हटल्यास; नरेंद्र मोदी हाच एकमेव सत्ताधीश सर्वोत्तम ठरवण्याची पाळी येईल. आणि ते कोणी साक्ष देऊन सांगायची गरज नाही. आकडे व घटनाच त्याचे साक्षीदार आहेत. राहिला मुद्दा दंगल भडकवण्याचा व चिथावण्या देण्याचा. त्याचेही खापर मोदी यांच्याच नावे फ़ोडण्य़ात आलेले आहे. त्याचे काय? आपल्या हिंदूत्वासाठी मोदी यांनी अशी दंगल घडवून आणली होती काय? गोध्रा येथे जे साबरमती एक्सप्रेस पेटवायचे जळीतकांड घडले, त्यानंतर दंगल गुजरातमध्ये पेटवण्याचे श्रेय कोणाला द्यायचे? त्यावेळचे तपशील शोधण्यापेक्षा ताज्या घटनाक्रमाकडे बघा. सर्वजीतवरच्या हल्ल्यानंतर आणि त्याच्या मृत्यूनंतर भारत सरकारने अत्यंत शांततेने सर्वकाही पार पडावे व त्यातला भावनेचा आवेग सौम्य व्हावा; यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. थेट त्याचा देह इथे आणण्यासाठी खास विमान पाठवण्यापासून त्याला सरकारी सन्मानाने निरोप देण्यापर्यंत सर्वकाही उपाय सरकारने योजलेले होते. कारण सर्वजीतच्या हत्याकांडाने लोकमत बिथरलेले होते. प्रक्षुब्ध जनमानसाला चिरडून काढणे शक्य नव्हते, म्हणुन त्याला सौम्य करण्याचे सरकारने सर्व उपाय योजले होते. पण ते जनमानस प्रक्षुब्ध करण्याचे पाप कोणी केले होते?

   सर्वजीतवरच्या हल्ल्यानंतर सलग तीन दिवस वाहिन्यांवरून जो गदारोळ चालू होता; त्यातून लोकमत चिथावण्याचा प्रयास चालू नव्हता काय? सरकारने काही केले नाही, सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही करत नाही. त्याला मारण्यात भारत व पाकिस्तान सरकारचे संगनमत होते, इथपर्यंत प्रक्षोभक विधाने कोणी केली व देशातल्या सव्वाशे कोटी लोकांपर्यंत कोणी नेली? उत्तर भारतातल्या अनेक शहरात त्यातून लोक रस्त्यावर आले व पाकसह भारत सरकारचाही निषेध करू लागले. कोमात गेलेल्या भावाला सोडून माघारी परतलेल्या दलबीर कौर या सर्वजीतच्या बहीणीचे वाघा सरहद्दीवरचे बोलणे काळीज पिळवटून टाकणारे होते. त्याचे थेट प्रक्षेपण सरकारने केलेले नव्हते. टाहो फ़ोडून रडणार्‍या व ऊर बडवणार्‍या दलबीरच्या किंकाळ्या ऐकणार्‍या कुणाही भारतीयाचे मन इतके हेलावून जाऊ शकत होते, की बदल्यासाठी उठून कुणा पाकिस्तान्याचा मुडदा पाडावा, अशीच भावना शक्य होती. असे प्रत्येकाला वाटले, तरी प्रत्येक माणूस असे करतोच असे नाही. पण हजारात लाखात एखादा असा माथेफ़िरू असतो, ज्याला भगिनी दलबीरच्या आक्रोश व अश्रू पुसण्यासाठी हाती शस्त्र घेण्याचा मोह आवरत नाही. तो बेभान होऊन धाव घेतो. जम्मूच्या कोट बहावल तुरूंगात असाच एक कैदी होता, जो भारतीय सेनादलात सेवा केलेला माजी सैनिक होता. एका क्षणाच्या आवेशात त्याने संधी साधली आणि समोर असलेल्या पाकिस्तानी सनाउल्लावर प्राणघातक हल्ला चढवला. त्याचे सर्वजीतशी कुठले नाते नव्हते, की त्याचे सनाउल्लाशी कुठले भांडणही नव्हते. मग त्याने असे का करावे? त्याला अशा हत्याकांडाला प्रवृत्त कोणी केले? भारत सरकारने नक्कीच नाही. कारण सरकार व त्याची संपुर्ण यंत्रणा सर्वजीतचा मृतदेह मायभूमीत परत आणायच्या कामाला जुंपलेली होती. मग हे काम कोणाचे होते? त्या कोट बहावलच्या अधिकार्‍यांनी त्याला चिथावणी दिली होती काय? असे काही कोणी केल्यास आपल्यावरच निलंबनाची कारवाई होऊ शकते; असे माहित असलेला कुठला अधिकारी त्याप्रकारची चिथावणी देणार नाही. उलट नुसती शंका आली असती, तरी त्यांनी आधीच सनाउल्ला याला सुरक्षित जागी हलवले असते. त्याचवेळी हल्ला करू शकणार्‍या संशयिताला अन्य कोठडीत डांबले असते. पण कुठला तुरूंगाधिकारी हल्ल्याची चिथावणी देणेच श्कय नव्हते. आणि सनाउल्लाला मारणार्‍याने चिथावणी मिळाल्यानेच असा प्राणघातक हल्ला केलेला आहे. मग त्याला चिथावण्या दिल्या कोणी? ज्यांनी सनाउल्लावरच्या हल्ल्याला चिथावण्या दिल्या, त्यांनीच गुजरातच्या दंगलीला चिथावण्या दिल्या आणि भडकलेल्या दंगलीच्या आगीत तेल ओतले, हे विसरता कामा नये. हे गुन्हेगार कोण आहेत?     ( क्रमश:)
 भाग   ( १६१ )    ६/५/१३

शुक्रवार, ३ मे, २०१३

दंगलग्रस्तांना न्याय देणारा पहिला मुख्यमंत्री


   तास दीडतास जाफ़रभाई व त्याच्या सोबत भेटलेल्या मौलाना इसा मन्सुरी व तल्हा सरेशवाला यांच्या तक्रारी ऐकल्यावर मोदींनी आपली बाजू सांगायला सुरूवात केली. त्यांनी मुळात त्यांच्या कारकिर्दीत दंगल होऊन इतकी माणसे मारली गेली; हाच आपल्या राजकीय जीवनावरचा कलंक आहे, हे मान्य करून टाकले. तिथेच न थांबता कितीही प्रयत्न केले म्हणून हा कलंक धुतला जाऊ शकत नाही; असेही मोदींनी तिथल्या तिथे आरंभीच मान्य केले. त्यांच्या तक्रारीत असलेले तथ्य मान्य केले आणि त्यातली अतिशयोक्तीही कथन केली. पण पुढे जाण्यापुर्वी दंगल झाली, तेव्हा मोदी कुठे होते व कोणत्या परिस्थितीत होते, त्याची पार्श्वभूमीही त्यांनी मांडली. जाफ़रभाईला सर्वात आवडला तो कलंकाचा मुद्दा. तो म्हणतो, मोदींनी कधी दंगलीबद्दल माफ़ी मागितली नाही, असे सतत म्हटले व सांगितले जाते. कायद्याच्या भाषेत व न्यायाच्या भाषेत माफ़ीला काय अर्थ आहे? कोणी खुन करील, बलात्कार करील आणि नंतर माफ़ी मागू लागेल, तर त्याल माफ़ करायचे असते का? पण तिथे पहिल्या भेटीतच मोदींनी दंगल हा आपल्या राजकीय जीवनावरील कलंक असल्याचे मान्य केले होते. मग माफ़ी मागणे म्हणजे आणखी काय असते? समजा उद्या माया कोडनानी वा बाबू बजरंगी यांनी माफ़ी मागितली, तर त्यांना शिक्षा माफ़ करावी काय? नसेल तर ‘माफ़ी सुद्धा मागत नाही’ ही टकळी कशाला? हा जाफ़रभाईचा सवाल आहे. पण त्यापेक्षाही त्याला खरे बदलून टाकले ते मोदींच्या प्रारंभिक खुलाशाने. मोदी दंगल सुरू झाली, तेव्हा मोदी काय स्थितीत होते व काय करत होते? दंगल हाताळण्याच्या स्थितीत मोदी होते का?

   मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होऊन अवघे तीन महिने उलटले होते. हा माणूस भाजपामध्ये व त्याच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात चार दशके कार्यरत होता. पण त्याने पक्षासाठी दिर्घकाळ काम केले; तरी कधी साधी निवडणूक लढवली नव्हती. आमदार-मंत्री ही बाब सोडा, साधा नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली नव्हती किंवा कुठल्याही सार्वजनिक अधिकार पदावर बसून त्याने कारभार केलेला नव्हता. सरकार कसे चालवले जाते किंवा तिथली निर्णयप्रक्रिया कशी चालते; त्याचा पुसटसा अनुभव मोदींना मुख्यमंत्री होईपर्यंत नव्हता. १९९५ सालात प्रथम भाजपाने गुजरात विधानसभेत बहूमताने विजय मिळवल्यापासून सतत अस्थिरता होती. केशूभाई पटेल मुख्यमंत्री झाले, तरी शंकरसिंह वाघेला गट त्यांना काम करू देत नव्हता. पक्ष व सरकारमध्ये सतत गटबाजी चालू होती. वर्ष दिडवर्षांनी मुख्यमंत्री बदलले जात होते. शेवटी कुठल्याच गटातला नाही आणि गटबाजी बाहेरचा उमेदवार म्हणून मोदींवर दिल्लीच्या पक्ष श्रेष्ठींनी मुख्यमंत्री होण्य़ाची सक्ती केली. संघटनेत व विधीमंडळ पक्षात शिस्त लावण्याच्या तात्पुरत्या कामगिरीवर मोदींना सक्तीने पाठवण्यात आलेले होते. थोडक्यात कुठलाही सरकार व प्रशासनाचा अनुभव नसलेला माणूस मुख्यमंत्री पदावर आरुढ झाला होता. त्याला जी शासन यंत्रणा मिळाली होती, ती वर्षानुवर्षे मुस्लिमांना दंगलीत पक्षपाताने वागायला कॉग्रेस राज्यकर्त्यांनीच प्रशिक्षित केलेली होती. त्यामुळे त्यावर मांड ठोकून बसायचीही संधी मोदींना मिळालेली नव्हती. मुख्यमंत्री झालेले मोदी आयुष्यात प्रथमच विधानसभेची निवडणूक लढले. राजकोट येथून निवडणूक लढणारे मोदी मतमोजणी होऊन आमदार झाल्याची घोषणा कुठल्या दिवशी झाली होती?

   २६ फ़ेब्रुवारी २००२ रोजी मतमोजणी होऊन मोदींना निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. त्याच्या दुसर्‍या दिवशी तारीख होती २७ फ़ेब्रुवारी २००२. तो दिवस उजाडला तोच मुळी गोध्रा स्थानकावर कारसेवकांना रेल्वेडब्यात जिवंत जाळल्याच्या बातमीने. नवखा मुख्यमंत्री आणि अशी घटना. त्याचे चित्रण मग वाहिन्यांवरून थेट झळकू लागले. त्याला कुठले तारतम्य नव्हते. आज अशा घटना दाखवताना मुद्दाम ठराविक हिंसक दृष्य असेल तर धुरकट करतात. त्यात गुंतलेल्या जातीधर्माची नावे टाळली जातात. गेल्याच वर्षी वा गेल्या महिन्यात आसाममध्ये दंगली व हिंसाचार झालेला आहे. पण त्यात कोणी कोणत्या जातीधर्माच्या लोकांवर हल्ला केला, ते सांगत नाहीत. पण गोध्रा जळीतकांड झाले, तेव्हा त्यात कारसेवक बसलेल्या डब्यालाच नेमकी गाडी अडवून आग लावण्यात आली, त्यावर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. त्यात ६० कारसेवक होरपळून भस्मसात झाले. हजारोंच्या मुस्लिम जमावाने साबरमती एक्सप्रेस अडवून पेटवली, अशा एकूण बातम्या झळकत होत्या. तेवढ्यावर थांबले नाही. त्यावर ‘क्रिया झाली मग तेवढीच तीव्र प्रतिक्रिया उमटणारच’, असेही मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणाल्याचे वाहिन्यांवरून ओरडून ओरडून सांगितले जात होते. थोडक्यात माध्यमांनी व वाहिन्यांनी आगीत तेल ओतण्याचेच काम तेव्हा केले. अशा बातम्या म्हणजे आगीते तेल ओतणे व दंगलीला प्रोत्साहन आहे; असा इशारा प्रेस कौन्सिलने दिलेला होता. पण त्या संस्थेचा अधिकार वाहिन्यावर चालत नसल्याने लोकमत भडकवण्याचा सनसनाटी उद्योग जोरात चालू होता. आणि कॉग्रेसने पन्नास वर्षात प्रत्येक दंगलीत मुस्लिमांना सुरक्षा न देण्याचे प्रशिक्षण दिलेले प्रशासन होते. अशा पार्श्वभूमीवर मोदीसारखा नवखा मुख्यमंत्री काय करू शकणार होता? त्याला यातला काहीही अनुभव नव्हता. त्याने धावपळ करून शेजारच्या तीन कॉग्रेस प्रशासित राज्यांकडे अधिक पोलिस बळ पाठवण्यासाठी विनवण्या केल्या. केंद्राकडे लष्कर पाठवण्याची विनंती केली. आजवरच्या गुजरात दंगलीत असे कधीच झालेले नव्हते. काही दंगली महिनोन महिने चालायच्या. पण लष्कर कधी आणले जायचे नाही. मोदींनी चोविस तासात लष्कराला पाचारण केले होते.

   म्हणजेच नवखा असूनही हा मुख्यमंत्री दंगल थोपवण्याचे प्रयास करू लागला होता. गुजरातच्या प्रशासनाला व पोलिसांना हा नवाच अनुभव होता. त्यामुळे त्यांनी तिकडे दुर्लक्ष करून दंगली होऊ दिल्या व पसरू दिल्या. पण सुदैवाने दिल्लीत भाजपाचे सरकार होते आणि वाजपेयी यांचे संरक्षणमंत्री जॉर्ज फ़र्नांडीस यांनी स्वत: गुजरातला धाव घेतली आणि लष्कराच्या तुकड्या गुजरातला रवाना झाल्या. म्हणूनच अवघ्या तीन दिवसात आटोक्यात आलेली २००२ची ही पहिलीच दंगल होती. गुजरातच्या इतिहासात इतक्या लौकर कुठली दंगल आवरली गेली नाही. त्याचप्रमाणे इतक्या कमी प्रमाणात जीवितहानी झालेली नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केला; त्यात जवळपास मारले गेलेले सर्वच हिंदू आहेत. थोडक्यात गुजरातच्या इतिहासात इतक्या प्रमाणात दंगल रोखायचा व मुस्लिमांना संरक्षण देण्याचा प्रयास कुठल्याही मुख्यमंत्र्याने कधी केला नव्हता. आणि ते सुद्धा नवख्या मुख्यमंत्र्याने. पुढल्या दहा वर्षात मोदींच्य़ा कारकिर्दीमध्ये दुसरी दंगल का होऊ शकली नाही; त्याचे उत्तर त्या आरंभीच्या इच्छाशक्तीमध्ये सापडू शकते. जसजसा त्यांना प्रशासन व कारभाराचा अनुभव वाढत गेला; तसतशी त्यांनी सुरक्षितता बहाल केली व दंगल हा शब्दच गुजरातमध्ये इतिहासजमा होऊन गेला. दर दोनचार वर्षांनी दंगल व्हायचीच; असे जाफ़रभाई म्हणतो व नोंदलेल्या घटनाही त्याची साक्ष देतात. म्हणजेच मोदी नवखा मुख्यमंत्री नसता तर २००२ची दंगलही त्यांनी कठोरपणे हाताळली असती, पसरू दिली नसती. पण गंमत बघा, पहिल्यांदाच गुजरातला दंगल रोखू शकणारा मुख्यमंत्री व राज्यकर्ता मिळाला आणि तमाम सेक्युलर त्यालाच दंगलखोर मुख्यमंत्री म्हणून बदनाम करीत आहेत. याचे भान येत गेले, तसे गुजरातचे मुस्लिम जाफ़रभाईसारखे बदलत गेले आहेत.

   केवढा फ़रक आहे बघा. १९६९, १९८५, १९८७, १९९२ अशा कुठल्याही दंगलीत कुणाही मुख्यमंत्र्याने मुस्लिमांची बाजू ऐकून घेतल्याचा इतिहास नाही. कोणी दंगल रोखण्याचा प्रयास केल्याचा इतिहास नाही. आधीच्या त्या सर्व दंगलीत कधी कुणा दंगलखोरांवर गुन्हे दाखल करणे, खटले भरणे किंवा तपास करून त्यांना शिक्षापात्र ठरवण्याचे काम झालेले नाही. आणि हे सगळे मुख्यमंत्री कॉग्रेसचे आहेत. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये सतत मुस्लिमांना नुकसान सोसावे लागले आहे, न्याय मिळालेला नाही. आणि त्याला एकमेव अपवाद आहे तो नरेंद्र मोदी यांचा. त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अनेक दंगलखोर शिक्षेला पात्र ठरवले गेले आहेत. आणि त्यातले बहुतांश खटले गुजरात सरकारने भरलेले आहेत. अवघे सहा खटले बिगर सरकारी संस्थांच्या प्रयत्नामुळे झाले. पण बाकीचे गुन्हे नोंदण्यापासून गुन्हेगार शिक्षा भोगायला जाण्यापर्यंतचे कर्तृत्व मोदी सरकारचे आहे. आधीच्या अर्धा डझन दंगलीमध्ये असे कॉग्रेसच्या कुठल्या मुख्यमंत्र्याने करून दाखवले आहे? हिंतेंद्र देसाई यांच्यापासून अमरसिंह चौधरी असे अर्धा डझनहून अधिक मुख्यमंत्री गुजरातने पाहिले. त्यांनी सर्वांनी मिळून जितक्या दंगलखोरांना शिक्षापात्र ठरवण्याचे काम केले नाही, तेवढे मोदींच्या कारकिर्दीत झाले आहे. त्याच तपशील व आकड्यांनी जाफ़रभाईचे डोळे उघडले. त्यात नवे काहीच नव्हते. सर्व तपशील समोरच होता. पण त्याकडे लक्ष जाऊ नये म्हणुन सेक्युलर माध्यमे व संस्थासह राजकीय नेत्यांनी चालवलेला अपप्रचाराचा सेक्युलर गदारोळ त्याला कारणीभूत होता. आजही ज्यांना सत्य शोधायचे आहे, त्यांना सत्य बघणे शक्य आहे. गेल्या अर्धशतकात जितक्या दंगली झाल्या, त्या २००२ वगळता सर्व कॉग्रेसच्या राज्यात झाल्या आणि त्यात दंगलखोरांवर गुन्हे दाखल करण्यापासून त्यांच्यावर खटले चालवण्यापर्यंतचे काम कोणी धाडसाने व चिकाटीने केले; ते तपासून बघता येईल. त्यातूनच मुस्लिमांना किंवा दंगलग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी प्रयास केलेला एकमेव मुख्यमंत्री दिसून येईल आणि त्याचे नाव नरेंद्र मोदी असेच आहे. दहा वर्षात किती भीषण असत्य व खोटेपणा सेक्युलर माध्यमांनी लोकांच्या माथी मारला; तेही मग लक्षात येऊ शकेल. जाफ़रभाई जे सत्य बघू शकला ते इतरांना बघता येईल. समजून घेता येईल. तरच मग सेक्युलर लोकांना दंगल का हवी व त्यांचे पोटपणी दंगलीवरच कसे भरले जाते; त्याचे रहस्य उलगडू शकेल.     ( क्रमश:)
 भाग   ( १६० )    ४/५/१३

गुरुवार, २ मे, २०१३

सेक्युलर कॉग्रेस आणि मोदी यांच्यातला फ़रक




   भाजपाचा मुख्यमंत्री आणि ज्याच्या कारकिर्दीत दिड वर्षापुर्वी गुजरातमध्ये दंगल झाली होती; अशा नरेंद्र मोदी यांना जाफ़रभाई पहिल्यांदा भेटणार होता. कुठल्याही मंत्र्याला भेटण्याचा त्याचा मुस्लिम म्हणून अनुभव काय होता? जाफ़रभाईच नव्हेतर गुजरातच्या मुस्लिमांचा कॉग्रेस मुख्यमंत्र्य़ाचा अनुभव काय होता? १९६९ सालपासूनच्या दंगली बघत जाफ़रभाई मोठा झाला होता. कधी कुठल्या कॉग्रेसी मुख्यमंत्र्यानेही अगत्याने दंगलपिडीत मुस्लिमांना आस्थेने जवळ बसवून त्यांच्या वेदना व समस्या समजून घेतल्याचे त्याला आठवत नव्हते. आणि मोदी तर उघड शत्रूच होता. त्याच्याशी काय व कसे बोलायचे; अशी जाफ़रभाईला विवंचना होती. विशेषत: १९९२ च्या दंगलीनंतर जाफ़रभाई अशा गोष्टीत व्यक्तीगत भाग घेऊ लागला होता. तेव्हा बाबरी पाडली गेल्यावर उसळलेल्या दंगलीत उध्वस्त झालेल्या मुस्लिमांना न्याय मिळावा, म्हणून जे शिष्टमंडळ पंतप्रधान नरसिंहराव यांना भेटायला गेले; त्यात जाफ़रभाईचा चुलता सहभागी झाला होता. त्या शिष्टमंडळात गुजरातच्या मुस्लिम व्यापार्‍यातले दिग्गज समाविष्ट केलेले होते. आणि ती पंतप्रधानांची भेट कोणी ठरवली होती? ज्यांना जिवंत जाळले गेले म्हणून आजही कोर्टात चौथ्यांदा मोदी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आटापिटा चालू आहे; त्या कॉग्रेसचे माजी खासदार अहसान जाफ़री यांनी ही नरसिंहराव यांची वेळ घेतलेली होती. महिना रमझानचा म्हणजे मुस्लिमांच्या सार्वत्रिक उपास पाळण्याचा होता. पण ठरलेल्या दिवशी नरसिंहराव यांनी भेट दिली नाही आणि या गुजरातच्या (१९९२) दंगलपिडीत शिष्टमंडळाला ताटकळत ठेवले होते. तब्बल चार दिवस हे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून दिल्लीत प्रतिक्षा करीत बसले होते. पण कॉग्रेसच्या सर्वोच्च नेत्याला त्यांच्या वेदनेवर फ़ुंकर घालायला वेळ मिळत नव्हता. शेवटी त्या शिष्टमंडळात सहभागी असलेले जाफ़रभाईचे काकाही कंटाळून अहमदाबादला निघून आले. चौथ्या दिवशी त्यांना कॉग्रेस अध्यक्ष व पंतप्रधान नरसिंहराव यांनी कृपावंत होऊन भेट दिली. भेट म्हणजे काय? दोन मिनीटांसाठी नरसिंहराव भेटले, त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि त्यांच्या मागण्या व अर्ज असतील ते आपल्या सचिवाकडे द्यायचे सांगून शिष्टमंडळाला परत पाठवून दिले. चार दिवस प्रतिक्षा केल्यावर मुस्लिम दंगलपिडीतांना मिळाली होती अवघी दोन मिनीटे. असा अनुभव गाठीशी असल्यावर जाफ़रभाईने शत्रूवत असलेल्या व परदेश दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्र्याकडून किती वेळाची, म्हणजे किती मिनीटांची अपेक्षा करावी? पाचदहा मिनीटापेक्षा मोदी आपल्याला अधिक वेळ देणार नाहीत, असा त्याचा अंदाज होता. आणि त्यात गैर काहीच नव्हते. परदेशी दौर्‍यावर आलेला मुख्यमंत्री सेकंद मिनीटाचे गणित मांडूनच कार्यक्रम योजत असतो. वेळापत्रकाच्या बाहेर कुणाला किती वेळ द्यावा, याला मर्यादा असतातच ना? त्यामुळे मिळू शकतील त्या दहा मिनीटाची पंधरा वीस करून त्यात आपला मुद्दा मुख्यमंत्र्याच्या गळी कसा उतरवायचा, अशी विवंचना जाफ़रभाईला सतावत होती. कारण मोदी आपल्याला मुस्लिम म्हणून शत्रू मानतो आणि खटला केला म्हणून आपल्यावर रागावलेला असणार; हे जाफ़रभाईचे गृहीत होते.

   जेम्स कोर्ट या मोदींचा मुक्काम असलेल्या जागी जाफ़रभाई पोहोचला, तेव्हा असेच काहीसे विचार त्याच्या मनात घोळत होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला लाचार होऊन मोदींसमोर गयावया करायच्या नव्हत्या. हक्क व न्याय मागायचा होता. त्या भेटीला आपल्या इंग्लंडमधल्या घरातून निघण्यापुर्वीच भारतातून जाफ़रभाईला एक फ़ोन आलेला होता. महेश भट्ट यांनी शेवटच्या क्षणी फ़ोन करून त्याला बजावले, ‘मोदींच्या नजरेला नजर भिडवून न्यायाशिवाय शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे सांगण्याची हिंमत तुझ्यात नसेल, तर तू मोदीला भेटायचे अजून टाळू शकतोस’. त्यावर जाफ़रभाई उत्तरला, मोदी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या हाती सत्ता आहे. ते आम्हाला भेट म्हणून किती वेळ देतात, त्यावर सगळे अवलंबून आहे. दोन मिनीटेच मिळाली तर बोलणार काय आणि किती? भट्ट त्यावर म्हणाले, ‘तुम्हाला अधिक वेळ मिळो अशी आपण प्रार्थना करू.’ बस्स अशा प्रस्तावनेने जाफ़रभाई जेम्स कोर्ट येथे पोहोचला होता. जेव्हा त्या इमारतीच्या लिफ़्ट्मध्ये तो वर चालला होता, तेव्हा त्याच्या काळजात धडधड चालू होती. पुढे काय वाढून ठेवले आहे, त्याची फ़िकीर होती. पण लिफ़्ट थांबली आणि दरवाजा उघडला, तेव्हा जाफ़रभाई आश्चर्याने थक्क होऊन गेला. त्याच्या स्वागताला लिफ़्टसमोर गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साक्षात उभा होता. क्षणभर पाऊल बाहेर टाकावे, की नाही हे सुद्धा जाफ़रभाई विसरून गेला. ‘आवो यार’ अशा शब्दात त्याचे मोदींनी स्वागत केले. हात पुढे करून मोदींनी जाफ़रभाईशी हस्तांदोल्न केले व त्याला बाहेर घेतले. तो अशा स्वागताने अवाक झाला. शब्दही त्याला सुचेनात. तसाच त्याला हाताला धरून मोदी सर्वांना आपल्या खोलीत घेऊन आले. तिथे एक झोपाळा होता. त्यावर बसत त्यांनी जाफ़रभाईला आपल्या शेजारीच बसवून घेतले. सगळे अनपेक्षित व अघटित घडत होते. त्यामुळे जे काही जाफ़रभाई ठरवून आलेला होता, त्याची त्याला नव्याने जुळवाजुळव करावी लागत होती. कारण आपल्या डोक्यातली मोदींची प्रतिमा आणि प्रत्यक्षात समोर असलेला मोदी; यात प्रचंड तफ़ावत होती. पण आपला सर्व धीर व हिंमत गोळा करून जाफ़रभाईने मनातले बोलायला सुरूवात केली. त्याला कुठेही न अडवता मोदी शांतपणे त्याचे म्हणणे ऐकत होते. तितका त्याचा धीर वाढत गेला. त्याने मनातले सर्व फ़टाफ़टा बोलून घेतले. खोलीत आठदहा माणसे होती, त्यात इंडिया टिव्हीचा संपादक रजत शर्माही होता. जाफ़रभाई वेळ संपण्याच्या भयाने भराभरा बोलतच गेला.

     ‘मोदीसाहेब, तुम्ही इथे व्हायब्रंट गुजरातची कल्पना घेऊन आलेला आहात. त्यात गुजरातच्या आर्थिक विकासाचा मुद्दा आहे. पण न्यायाशिवाय आर्थिक विकास पोकळच कल्पना राहिल. पाश्चात्य देश जगावर राज्य करतात, कारण ते आपल्या नागरिकांना न्याय मिळेल याची खात्री करून घेतात. आपल्या देशात सगळा सावळा गोंधळ आहे आणि मी फ़क्त मुस्लिमांबद्दल बोलत नाही. सर्वांनाच भारतात अन्याय सोसावा लागतो. न्यायाशिवाय शांतता कशी प्रस्थापित होऊ शकेल? तुम्ही जेव्हा गुजरात अस्मितेची भाषणे करता आणि पाच कोटी गुजराती असे म्हणता; तेव्हा त्यात साठ लाख मुस्लिम असतात का? जर तुमचे उत्तर होय असे असेल; तरच आपण पुढे बोलण्यात अर्थ आहे. पण तुम्ही जर असे म्हणत असाल, की तुम्ही केवळ पाच कोटी गुजराती हिंदूंचे मुख्यमंत्री आहात, तर मग आम्हाला तुमच्याशी काही बोलण्यासारखे शिल्लक उरत नाही.’

   एका दमात जाफ़रभाईने मनातली जळजळ सांगून टाकली. मोदी शांतपणे त्याचे बोल ऐकत होते. याच दरम्यान तिथे बसलेले एक भारतीय उद्योजक सारखे घड्याळाकडे बघत होते. कारण ते मोदींच्या समवेत व्हायब्रंट गुजरातसाठी आलेले होते. ठरलेल्या कार्यक्रमाला हजर रहायला उशीर होतोय, हेच तो सुचवत होता आणि त्याची अस्वस्थता मोदींच्या लक्षात आलेली होती. त्याच्याकडे वळून मोदी त्याला म्हणाले, ‘घड्याळाकडे पुन्हा पुन्हा बघू नका. जितका वेळ ही मंडळी बोलणार आहेत, तितका वेळ मी इथेच थांबणार आहे.’ त्यामुळे जाफ़रभाई व त्याच्या सोबतच्या मौलाना इसा मसूरी यांना खुप धीर आला. जाफ़रभाई थांबला तिथून मौलानांनी सुरूवात केली. त्यांनी अत्यंत कठोर भाषेत न्याय व माणुसकीवर मोदींना प्रवचनच दिले. पण त्यांना कुठेही न थांबवता मोदी शांतपणे त्यांची बाजू ऐकत होते. तुम्हाला जे काही सांगायचे ते मनसोक्त बोला, असेच मोदींनी त्याना सांगितले होते. साधारण एक तास असा गेला. मग जाफ़रभाईने दंगलीचा विषय काढला. दंगल पेटली व हिंसा सुरू झाली; तेव्हा मोदी काय करत होते? पुढे आठ वर्षांनी सुप्रिम कोर्टाने नेमलेल्या एस आय टीने जे प्रश्न मोदींना विचारले, तेच प्रश्न २००३ साली इग्लंडच्या पहिल्या भेटीत जाफ़रभाईने अत्यंत बेदरकारपणे मोदींना विचारले. कदाचित दंगल झाल्यापासून मोदींना इतके थेट असे प्रश्न दुसर्‍या कोणी विचारले नव्हते. गोध्राची जळीत घटना घडल्यापासून हा माणूस मुख्यमंत्री म्हणून काय करीत होता? असे प्रश्न विचारून अनेक पत्रकार संपादकांनी स्वत:च त्याची उत्तरे दिली आहेत. पण कोणीही तेच प्रश्न मुख्यमंत्री म्हणून मोदी त्या काळात काय करत होते, त्याची उतरे मिळवली नव्हती. त्यापेक्षा त्याबद्दल आपल्याच मनातल्या गोष्टी सांगून गैरसमज मात्र निर्माण करून ठेवले आहेत. पण त्यामुळे प्रश्न सुटलेले नाहीत, राजकारण खुप खेळले गेले आहे. म्हणूनच त्याच जाफ़रभाईने त्याच प्रश्नांना थेट हात घातला होता. त्याला थेट मुख्यमंत्र्याकडून प्रश्नांची उत्तरे हवी होती. त्याच्या मनातले भय कुठल्या कुठे गायब झालेले होते.

   खरेच त्या दंगलीचे पहिले सात आठ दिवस मुख्यमंत्री म्हणून मोदी काय करत होते? रोम पेटले असताना नीरो फ़िडल वाजवत होता, असे म्हटले जाते. मोदी सुद्धा तेच करत होते अशी खुप टीका झालेली आहे. गुजरात व अहमदाबादसह अनेक शहरे धडधडा पेटत असताना राज्याचा मुख्यमंत्री काय करत होता? खरोखर तो निष्क्रिय बसला होता? की तोच दंगेखोरांना चिथावण्या व प्रोत्साहन देत होता? फ़िडल वाजवत ऐषाराम करत होता? मुख्यमंत्री मोदी त्या दिवसात कुठल्या अवस्थेत होता, कुठल्या परिस्थिती व मानसिक स्थितीत होता? कोणी तरी अशा प्रश्नांची उत्तरे शोधली वा मिळवली आहेत काय? काय करत होते मोदी दंगल पेटली तेव्हा? २७ फ़ेब्रूवारी २००२ रोजी सकाळी गोध्रा रेल्वेस्थानकावर साबरमती एक्सप्रेसचा डबा पेट्वून ५९ कारसेवकांची जाळून हत्या करण्यात आली, तेव्हा मोदी कुठल्या स्थितीत होते? दहा वर्षे त्या दंगलीवर सतत बातम्या रंगवणार्‍यांनी कधीतरी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत का? ( क्रमश:)
 भाग   ( १५९ )    ३/५/१३

मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

तो छुपा रुस्तुम महेश भट्ट होता



   जाफ़रभाई सरेशवाला नावाचा गुजराती मुस्लिम, ज्याने मोदींना थेट आंतराष्ट्रीय कोर्टात खेचायचे पाऊल उचलले होते; तो रातोरात सेक्युलर मंडळींचा  जगभर हिरो झाला होता. पण तितक्याच वेगाने तो रातोरात त्याच सेक्युलर महानाट्यातला खलनायकही होऊन गेला. कारण त्याने गुजरातच्या मुस्लिमांना व दंगलपिडीतांना न्याय मिळावा, म्हणून मुख्यमंत्री मोदींना भेटायचे ठरवले होते. त्यासाठी आधी त्याने आपल्या धर्माची म्हणजे इस्लामची त्याला मान्यता आहे किंवा नाही; याची इंग्लंडाम्ध्येच काही मौलवीकडून चाचपणी केली. तीन वेगवेगळ्या मौलवींना त्याने याबाबतीत विचारले. ज्याच्यावर मुस्लिमांना मारले किंवा छळ केल्याचा आरोप आहे; ज्याला मुस्लिमांचा शत्रू मानले जाते, त्याच्याशी संवाद करावा काय? त्या मौलवींनी जाफ़रभाईला होकारार्थी उत्तर दिले. तेवढेच नाही, तर त्यासाठी इस्लामिक धर्मग्रंथ कुराण व हादीसमधील उतारे व आयता काढून दिल्या. त्यांचे अर्थही सविस्तर समजावले. मात्र हे धर्ममार्तंडही सेक्युलर  दहशतीने किती भयभीत झालेले होते, ते बघण्यासारखे आहे. आज जगात सर्वात जिहादी व कडवे कट्टरपंथी म्हणून मुस्लिम मौलवींचा उल्लेख केला जातो. पण कुठल्याही कडव्या मुस्लिम मौलवी वा धर्मांध मुस्लिमापेक्षा सेक्युलर किती कट्टरपंथी ‘जिहादी’ आहेत; त्याचा हा जाफ़रभाईने घेतलेला अनुभव मोठा थरारक आहे. डोळ्यात अंजन घालणारा आहे. कारण शत्रूशीही संवाद करून उपाय मिळत असेल, तर त्याला प्राधान्य दिले पाहिजे व संवादच कुठल्याही विवादाचे उत्तर असते; असे मौलवी जाफ़रभाईला सांगत होते. सेक्युलर मात्र विसंवादच उत्तर असते; असा अट्टाहास धरून बसलेले होते. एका बाजूला संवाद व सहिष्णूतेची प्रवचने सेक्युलर देत असतात. पण संवाद किंवा विचारांनी प्रश्न सोडवण्यात, त्यांचीच कशी आडकाठी असते; त्याचा हा नमूना आहे. पण त्यांच्या विरोधाला जाफ़रभाई जुमानत नव्हता. त्याला हिंदू-मुस्लिम लढवायचे नव्हते; तर त्यांच्यात सलोखा निर्माण करायचा होता आणि त्यासाठी कोणाशीही संवाद करायची त्याने मनोमन तयारी केली होती. पण त्याचा सुगावा लागताच सर्वत्र जाफ़रभाईच्या विरोधात सेक्युलर काहूर माजवण्यात आले. त्यावर तो म्हणतो, ‘मी व्यावसायिक आहे. त्यामुळे कोणी आरोप केले वा संशय घेतला तरी सहन करू शकतो. पण इस्लामसाठी ज्यांनी आपले आयुष्य नि:स्वार्थीपणे खर्ची घातले, त्या तिघा मौलवींच्या विरोधात उठवण्यात आलेले काहूर संतापजनक होते.’

   त्याच दरम्यान गुजरातमध्ये परदेशी गुंतवणूकीसाठी परदेशी उद्योगपती व कंपन्यांच्या लोकाना भेटायला मोदी इंग्लंडला यायचे होते. तेव्हा दंगली संपुन दीड वर्षाचा कालावधी उलटलेला होता. ही माहिती मिळताच जाफ़रभाईने मोदींना तिथेच भेटायचे ठरवले. कारण मोदींना आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचायचे पाऊल उचलल्याने, त्याला परत गुजरातला यायची भिती वाटत होती. कारण उघड होते. गुजरातमध्ये कोणीही मुस्लिम सुरक्षित नाही, असा जगभर गवगवा करण्यात आला होता. कोर्टात मुस्लिमांना न्याय मिळू शकत नाहीत व गुजरातचे पोलिस मोदींचा इशार्‍यावर कोणालाही गठडी वळून गजाआड ढकलतात, ही समजूत पक्की तयार झाली होती. अशा पार्श्वभूमीवर मोदींना भेटायला भारतात येण्याची जाफ़रभाईमध्ये हिंमत नव्हती. सहाजिकच इग्लंडला येणार्‍या मोदींना तिथेच भेटून संवाद साधायचा विचार त्याने केला होता. याची खबर लागताच जगभरच्या तमाम सेक्युलर माध्यमात व टोळ्यांनी जाफ़रभाईवर गद्दार असल्याचा हल्ला चढवला. विकला गेल्यापासून विविध स्वरूपाचे आरोप सुरू झाले. त्याला खलनायक बनवण्याशी जणू स्पर्धाच लागली. पण त्याचा निश्चय पक्का होता आणि त्याने प्रयत्नही सुरू केले होते. मात्र मोदीपर्यंत पोहोचण्याचा कुठलाच मार्ग त्याला सापडत नव्हता. गुजरातच्या दंगलीनंतर जे सेक्युलर काहूर उठवले गेले होते, त्यातून गुजरात सरकारशी सामान्य मुस्लिमांचा संपुर्ण संपर्कच तोडण्यात आलेला होता. मुस्लिमांच्या विविध संस्था, शाळा, इस्पितळे वा इतर कुठल्याही गोष्टीसाठी सरकार दरबारी जायचे; तर मग सेक्युलर पक्ष वा संघटनांच्या मर्जीवर अवलंबून रहाण्याची वेळ आलेली होती. कारण मुख्यमंत्री मोदी वा अन्य कुणा भाजपावाल्याशी मुस्लिमांचा संपर्कच शिल्लक नव्हता. आणि भाजपाशी संपर्क म्हणजे गद्दारीचा आरोप. मग जाफ़रभाईने मोदींशी भेट घ्यायची तर ती निश्चित कोणी करून द्यायची? मोदींपर्यंत जायचे कसे? त्यात एक छुपा रुस्तुम निघाला. त्याचे नाव महेश भट्ट.

   मध्यस्थीला कुठलेच नाव सुचेना, तेव्हा जाफ़रभाईला अचानक चित्रपट निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांचे नाव आठवले. त्यांनी गुजरातच्या दंगली झाल्यापासून सतत मुस्लिमांच्या बाजूने आवाज उठवलेला होता. कदाचित महेश भट्ट त्यांचा कोणी परिचित आपली मदत करू शकेल, असे जाफ़रभाईला वाटले. त्यांनी महेश भटट यांच्याशी संपर्क साधला. पण तिथून नकारघंटाच ऐकू आली. मात्र काही दिवसांनी भट्ट यांनी स्वत: फ़ोन करून या कामी आपला मित्र इंडीया टीव्हीचा संपादक रजत शर्माचा मोदींशी संपर्क असल्याने त्यांच्या माध्यमातून मोदींपर्यत पोहोचता येईल असे सुचवले. मात्र त्यासाठी जाफ़रभाईने रजत शर्माला तशी इमेल पाठवावी असे सुचवले. त्याप्रमाणे जाफ़रभाईने इमेल पाठवली आणि शर्मा यांनी ती मोदींपर्यंत पोहोचती केली. हा जाफ़रभाईने मोदींशी साधलेला पहिला संपर्क होता. याच माणसाने आपल्याला आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचण्याचा उद्योग केला, याची मोदींना माहिती होती. पण त्याच्या अहमदाबाद येथील परिवाराची माहिती घेतल्यावर मोदींनी त्याला भेटायचे मान्य केले. पण अजून जाफ़रभाईच्या मनात अनिश्चितता होती. मोंदींच्या भेटप्रसंगी रजत शर्मा यांनीही हजर राहावे, असा आग्रह त्यांनी धरला. १७ ऑगस्ट २००३ या दिवशी मोदी इग्लंडला यायचे होते आणि जाफ़रभाईने आपल्या सल्लागार मौलवींसह त्यांची भेट घ्यायचे ठरवले होते. मात्र प्रत्यक्ष किती वेळ मिळणार याची काही खात्री नव्हती. आजवरचा जाफ़रभाईचा भारतीय मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचा अनुभव असा होता, की फ़ारतर पाचदहा मिनीटांचा अवधी मिळेल आणि तेवढ्या वेळात आपण मुस्लिमांच्या न्यायाबद्दल कितीसे गार्‍हाणे मांडणार; अशी खंत त्याला होती. पण त्याची फ़िकीर नव्हती. कुठेतरी सरकारशी संवाद चालू व्हावा आणि शासकीय यंत्रणेकडून मुस्लिमांच्या समस्या व न्यायाचे गाडे सुरू व्हावे अशी त्याची अपेक्षा होती. आणि लक्षात घ्या त्यासाठी त्याला मोदींपर्यंतचा रस्ता प्रशस्त करणारा माणूस महेश भट्ट होता.

   किती चमत्कारिक गोष्ट आहे ना? हाच माणुस नेहमी मोदींच्या विरोधात वाहिन्यांवर गरळ ओकताना दिसतो आणि कधीही त्याने खुलेपणाने जाफ़रभाई या मुस्लिमाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण मोदींकडे पाठवल्याची वाहिन्यांवर बोलताना कबुली दिलेली नाही. जितक्या आवेशात वाहिन्यांवरून खोट्या अफ़वांवर हा माणुस मोदींच्या विरोधात बोलतो, त्यातले दोन सेकंद वापरून मोदींचा हा चेहरा त्याने का दाखवू नये? यालाच सेक्युलर दहशत म्हणतात. सत्य बोलण्याची हिंमत दाखवली; मग सेक्युलर टोळी तुमचा मुडदा पाडायला मागेपुढे बघत नाही. आपण मोदींच्या चांगल्या गोष्टीबद्दल खुलेपणाने बोललो; तर विनाविलंब जातीयवादी व हिंदूत्ववादी ठरवले जाण्याची भिती ज्याच्या मनात पक्की असते, त्याला सेक्युलर म्हणतात. आणि महेश भट्ट हा तसाच सेक्युलर आहे. म्हणूनच खुल्या व्यासपीठावर तो मोदींना शिव्या घालतो, पण खाजगीत मात्र मोदींच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतो. जाफ़रभाई पुरताच मोदींचा असा अनुभव नाही. वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनांच्या बाबतीतला खुद्द महेश भट्ट यांचा अनुभवही तितकाच धक्कादायक आहे. पण ते कधी त्याची जाहिर वाच्यता करणार नाहीत. कारण अर्थात त्यांना आपला सेक्युलर मुखवटा जपायचा असतो. जाफ़रभाई सोडा, महेश भट्ट सुद्धा मोदींचा अनुभव घेऊन बसला आहे. पण कधीतरी त्याने सत्य बोलण्य़ाची हिंमत केली आहे काय? असो, तर अशा मार्गाने प्रथम जाफ़रभाईचा मोदींशी संपर्क झाला आणि त्यांना मोदींना भेटण्याची संधी मिळाली. अर्थात तेव्हा मोदी हा खुप बदनाम माणूस होता. त्याला भेटायला कुठली गर्दी नव्हती. उलट त्याला भेटणे म्हणजेच पाप मानले जात होते. तेव्हाची ही गोष्ट आहे. मोदींनी वेळ दिली होती आणि रजत शर्मा यांनी त्या बैठकीला हजर रहाण्याचे मान्य केले होते. अशा भेटीत काय होते, त्याचा जुना अनुभव जाफ़रभाईच्या गाठीशी होता, त्यामुळे कमीतकमी वेळात आपला विषय कसा मांडायचा याची फ़िकीर त्याला पडली होती. साधारणपणे मंत्री पाचदहा मिनीटे भेटतात. हस्तांदोलन, नावे विचारणे आणि मग अर्ज घेऊन निरोप. बाकी काही होत नाही. मोदी किती वेळ देणार, याची काही खात्री नव्हती. पण एकदा पाऊल उचलले तर माघार घेऊन चालणार नव्हते. जाफ़रभाईने आपल्या सोबत भाऊ तल्हा आणि एका वयोवृद्ध मौलवींना घेतले होते. आधी मोदींनी वेम्बली येथील एका हॉलमध्ये त्यांचा कार्यक्रम होता, तिथेच भेटायला बोलावले. पण खाजगीतच बोलायचे आहे असा आग्रह जाफ़रभाईने धरल्यावर, त्यांनी त्यांचा जिथे मुक्काम होता तिथे, म्हणजे जेम्स कोर्ट इथे बोलावले. संध्याकाळी पाच वाजताची वेळ दिलेली होती. अवघी पाचच मिनीटे आधी जाफ़रभाई तिथे जाऊन पोहोचले. पण तिथे त्यांना जो अनुभव आला, तो त्यांच्यात आमुलाग्र परिवर्तन घडवून गेला. यापुर्वी त्यांनी कॉग्रेसने बडे नेते व पंतप्रधान वा मंत्र्यांची भेट घेतली होती. पण त्या भेटी व मोदींची भेट, यातल्या फ़रकाने जाफ़रभाईला आपादमस्तक बदलून टाकले. काय असे घडले त्या भेटीत?   ( क्रमश:)
 भाग   ( १५८ )    १/५/१३

सोमवार, २९ एप्रिल, २०१३

पॅलेस्टाईनचा निर्वासित आणि गुजरातच दंगलपिडीत





   मोजके शब्द पण त्याचा विपरित अर्थ निघेल अशी रचना असली; मग किती गोंधळ उडवता येतो, त्याचा नमूना मी कालच्या लेखातून पेश केला. आणि नेमकी हीच गोष्ट गुजरातच्या दंगलीच्या बाबतीत झाली आहे. जे घडले त्याच्या नेमक्या उलट्या बाजूने लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यात सेक्युलर पक्ष, विचारवंत व माध्यमे यशस्वी होऊन गेली. पण म्हणतात ना? तुम्ही काही लोकांना सर्वकाळ फ़सवू शकता. सर्वांना काही काळ फ़सवू शकता. पण सर्वकाळ सर्वांना फ़सवू शकत नाही. गुजरात दंगली व नरेंद्र मोदींच्या बाबतीत आता तेच घडू लागले आहे. सतत सातत्याने पसरवलेल्या खोट्याचा मुखवटा फ़ाटत चालला आहे. सत्य क्रमाक्रमाने लोकांसमोर येत चालले आहे. आणि सत्य इतके भीषण आहे, की ज्याला सैतान म्हणून लोकांसमोर पेश केला; तोच लोकांना आवडू लागला आहे. त्याचे कारण खोटे बोलणार्‍या व पसरवणार्‍यांनी अतिरेक करायचा नसतो, याचा सेक्युलर मंडळींना विसर पडला होता आणि आता उघडे पडायची वेळ आल्यावर आपणच विणलेल्या जाळ्यातून कसे बाहेर पडावे, त्याचा मार्ग त्यांना सुचेनासा झाला आहे.

   गडबड कशी होते? तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी खोटे बोलत असता आणि खोटे बोलता, तेव्हा ते लक्षात पक्के ठेवावे लागते. उलट सत्य बोलत असता, तेव्हा लक्षात ठेवावे लागत नाही. अगदी झोपेतून उठवले, तरी तुमच्या तोंडून सत्य चटकन अनवधानानेही बाहेर पडते. पण खोट्याचे तसे नसते. अनवधानाने खोटे बोलता येत नाही. त्यामुळेच गुजरातविषयी जो खोटा प्रचार झाला, तो वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळा झाला. त्यात विरोधाभास होते आणि जेव्हा अशा थापा ऐकणारे वेगवेगळे लोक एकमेकांना भेटू लागले; तेव्हा त्यांनी ऐकलेल्या गोष्टी व तपशीलात फ़रक दिसू व जाणवू लागले. त्यातून काही मंडळी सत्याचा शोध घेऊ लागली आणि तसतसा सेक्युलर अपप्रचारातला खोटेपणा उघडा पडत गेला. आरंभीच्या खोटेपणात फ़सलेले अनेक लोक सत्य गवसल्यावर अधिक सत्य शोधून इतरांना समजावण्यात अगत्याने सहभागी होत गेले. त्यामुळे दहा वर्षांनंतर गुजरातच्या दंगलीचे सत्य समोर येऊ लागले आहे. जाफ़रभाई सरेशवाला त्यापैकी एक आहे, पण त्याच्याखेरीज मोदींविषयी सतत जहर ओकणारा चित्रपट निर्माता महेश भट्ट याचीही साक्ष धक्कादायक होऊ शकते. बेस्ट बेकरीची एकमेव साक्षीदार जाहिरा शेख हिने तीस्ताच्या खोटेपणाचा पर्दाफ़ाश केलेलाच आहे. पण त्याही प्रकरणात तीस्ताचा उजवा हात असलेला व अशा शेकडो दंगलपिडीतांना तीस्ताकडे न्यायासाठी घेऊन गेलेला रईसखान पठाणही; सत्याला सामोरा गेलेला आहे. अनेक अंगांनी सत्य समोर येत आहे. पण मी त्यांच्यापेक्षा जाफ़रभाईचा साक्षात्कार मोलाचा मानतो, कारण त्याने या विषयात खोल अभ्यास व तपशील समोर आणलेले आहेत. म्हणूनच मला त्याच्यातला बदल मोलाचा वाटतो.

   गुजरात फ़ेब्रुवारी २००२ मध्ये पेटला तेव्हा जाफ़रभाई दूर इंग्लंडमध्ये होता आणि ज्या बातम्या त्याच्यापर्यंत पोहोचल्या; त्याने तो विचलित झाला होता. पण जेव्हा त्याला नुसती तात्विक लढत व त्यात मुस्लिमांचे पिढ्यानुपिढ्या होणारे हाल यांची तुलना करावीशी वाटली; तिथून त्याने नवा विचार सुरू केला. मोदी किंवा जे कोणी अशा दंगलीला जबाबदार असतील, त्यांना कोर्टात खेचणे व शिक्षा देण्यापर्यंत घेऊन जाणे व्हायलाच हवे. पण तोपर्यंत दंगलीत उध्वस्त झालेले जे हजारो मुस्लिमांचे संसार आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचे काय? मोजक्या बड्या राजकीय नेत्यांना खटल्यात गोवण्याने मुद्दा गाजतो, पण शेकडो लोक त्यात उध्वस्त झालेत, त्यांना न्याय मिळण्याचे काय? खटले लांबवत नेण्यातून काय साधले जाते; असे अनेक प्रश्न स्वत:ला विचारताना जाफ़रभाईला एक पर्याय असा दिसला, की प्रत्येक न्याय हा कोर्टातच व्हायला हवा काय? आणि न्याय गुजरातच्या मुस्लिमांना मिळायला हवा असेल, तर तो त्यांनी स्वत: का मागायचा? गुजरात सरकार त्यांचे प्रतिनिधी आहे, तर सरकारने तो न्याय देण्यासाठी काही करायला नको काय? भले मोदीवर आरोप होत असतील. पण मुख्यमंत्री म्हणून आपल्याच मुस्लिम नागरिकांना, दंगलपिडीत असतील तर न्याय देणे ही मोदींची जबाबदारी नाही काय? हजारो दंगलपिडीत मुस्लिमांना कोर्टात जाणे शक्य नाही व स्वयंसेवी संस्था त्या प्रत्येकाचा खटला लढवू शकत नाहीत. मग त्यांच्या न्यायाचे काय? सरकारनेच ती जबाबदारी उचलायला हवी ना? म्हणजे पुन्हा मोदीनीच ते काम करायला हवे. पण ते व्हायचे कसे? मग न्यायासाठी मोदीलाच जाब का नाही विचारायचा? पण कसा विचारणार? जाफ़रभाईची मोदींशी ओळख नव्हती, की संपर्क नव्हता. पण असे करणे कितपत योग्य होते? जाफ़रभाई पक्का धर्मनिष्ठ होता व आहे. म्हणूनच आपला धर्म त्याबाबतीत काय सांगतो, त्याची माहिती घेण्याचा त्याने प्रयास केला. मोदी आपला व मुस्लिमांचा शत्रू असेल, तर त्याच्याशी संवाद करावा काय? तो धर्मद्रोह होईल काय? अशा प्रश्नांनी गडबडून गेलेल्या जाफ़रभाईने मग काही मौलानांशी चर्चा केली. त्याचेही कारण होते.

   त्याच दरम्यान पॅलेस्टाईन व इस्त्रायल यांच्यात अध्यक्ष बुश यांच्या पुढाकाराने वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. पाच दशके ज्यांनी एकमेकांवर रॉकेटने हल्ले केले, घातपात केले, हजारो माणसे मारली गेली आणि लाखो निर्वासित शिबीरात खितपत पडले आहेत, त्यांच्यात वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. त्यांचे निर्वासित छावण्यातील जीवन जाफ़रभाईने बघितले होते. मुंबईच्या कुठल्याही झोपडपट्टीतील बकाल वस्तीपेक्षा नरकवासाचे जीवन पॅलेस्टायनी निर्वासित जगत आहेत. पण त्यांचा लढा जागतिक व्यासपीठावर लढवणारे मात्र मौजमजेचे चैनीचे जीवन युरोपात जगत असतात. वाटाघाटी कितीही लांबल्या किंवा युद्धाचा भडका उडाला; म्हणून त्या नेत्यांच्या जगण्याला झळ पोहोचलेली नाही. मात्र ज्यांच्यासाठी ही ‘न्याय्य लढाई’ चालू आहे, ते प्रत्येक युद्धात उध्वस्त होतात व आणखीनच दुर्दैवी अवस्थेत जातात. मग या वाटाघाटी पाच दशके आधी सुरू झाल्या असत्या व तोडगा निघाला असता; तर आज पॅलेस्टायनी मुस्लिमांना असे भिकार्‍यासारखे जगावे लागले नसते. दोन तीन पिढ्यांमध्ये ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकले असते. युद्धाने वा तात्विक लढयाने त्यांना कुठलाही दिलासा व सुरक्षित जीवन दिलेले नाही. पण तरीही त्यांच्यात बोलणी होऊ शकतात, तर गुजरातचा मुस्लिम व मोदी यांच्यात संवाद का होऊ नये? शिवाय दंगलपिडीतांसाठी मदत गोळा करताना त्याला इंग्लंडमधल्या विविध देश व प्रांताच्या मुस्लिमांचा आलेला अनुभव धक्कादायक होता. दंगलपिडितांसाठी तोंडी सहानुभूती दाखवणारे व भाषणे देणारे आपल्या खिशातून काही मदत द्यायची वेळ आल्यावर तोंड लपवू लागले. गुजरातचा मुस्लिम भिकारी असल्यासारखी ही वागणुक जाफ़रभाईला हेलावून गेली. तिथेच कोर्ट व संघर्षाच्या पलिकडे जाऊन सरकारशी संवाद करण्याचा विचार बळावत गेला. आणि सरकार म्हणजे मोदी. शेवटी मोदी गुजराती मुस्लिमांचाही मुख्यमंत्री आहे. जाफ़रभाई आपल्या शंका घेऊन काही इस्लाम धर्मपंडितांना भेटला. त्यांच्याशी सल्लामसलत केली. त्यांनीही प्रोत्साहन दिले. इतकेच नाही तर अशा बोलण्यांसाठी धर्मतत्वांचा आधारही जाफ़रभाईला शोधून दिला.

   काम सोपे नव्हते. मोदीविषयी इतका अपप्रचार झालेला होता, की त्यांच्याशी मुस्लिमांचा प्रतिनिधी म्हणून बोलणे म्हणजेच मुस्लिमांशी गद्दारी; असा आरोप होऊ शकत होता. आणि असा इशारा त्याच मौलवींनी जाफ़रभाईला दिला. मात्र तसे करण्यात गैर काहीच नाही, असा निर्वाळाही दिला. आजही आपण वातावरण पाहिले तर कुठलाही मुस्लिम मोदीविषयी दोन शब्द चांगले बोलला, तर तो लगेच गद्दार ठरवला जातो. तो काय बोलतो किंवा त्यात सत्य-तथ्य किती; याची दखल घेतली जात नाही. मोदी म्हणजे शत्रू आणि सैतान. तो चांगला असूच शकत नाही व तो काही चांगले करूच शकत नाही, अशी एकूणच ठाम मानसिकता निर्माण करून ठेवण्यात आलेली आहे. सहाजिकच सत्य व तथ्य कोणतेही शोधण्याची गरजच नाही. मग ते भाऊ तोरसेकरने सांगितलेले असो किंवा जाफ़रभाईने घेतलेला अनुभव असो. तो तपासण्याची गरज नसते. मोदींवर कुठलाही आरोप करा, त्याच्या पुराव्याची गरज नाही आणि मोदीची कुठली सफ़ाई द्या, ती खोटीच असते, तपासण्याचे कारण नाही. अशी एक सेक्युलर दहशत निर्माण करण्यात आली आहे. आणि ती हिंदूंच्याच बाबतीतली नाही तर अगदी मुस्लिमांनाही तेवढीच असते. शाहीद सिद्दीकी व गुलाम वस्तानवी त्याचेच बळी झालेले आहेत. ही स्थिती आज इतक्या वर्षांनी असेल; तर २००३ म्हणजे दंगलीनंतर अवघ्या दिड वर्षांत किती दहशत असेल, त्याची नुसती कल्पना केलेली बरी. आपण मुस्लिम समाजातून बहिष्कृत होऊ आणि गद्दार ठरवले जाऊ, असा धोका जाफ़रभाईला उमगला होता. तात्काळ सेक्युलर माध्यमातून काहूर माजवले जाणार व आपल्या मुस्लिम असण्यावरच सवाल उभा केला जाणार, याची त्याला खात्री होती. पण त्याने तो धोका पत्करायचा निर्णय घेतला होता. बेकारी, गरीबी व उध्वस्तेतेचे बळी झालेल्या मुस्लिमांच्या यातना व दु:खाचे भांडवल करून व्यापार मांडणार्‍यांना आणि तोंडपाटिलकी करणार्‍याना शह देऊन गुजरातच्या दंगलपिडित मुस्लिमांना नव्याने आयुष्यात उभे करायचा निर्धार जाफ़रभाईने २००३ सालच्या उत्तरार्धात केला. तिथून त्याच्या धक्कादायक अनुभवाला सुरूवात झाली. कारण त्याच दरम्यान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी लंडनला यायचे होते. तिथेच जाफ़रभाईने मोदींची भेट घ्यायचे ठरवले. पण त्याला मोदींपर्यंत कोण घेऊन गेला? मोदींना भेटण्याचा जाफ़रभाईचा मार्ग कोणी प्रशस्त केला? ते नाव ऐकून वाचकाला व अनेक मुस्लिमांना धक्काच बसेल.    ( क्रमश:)
 भाग   ( १५७ )    ३०/४/१३

रविवार, २८ एप्रिल, २०१३

त्याने जन्मदात्या आईलाच जाळून टाकले


  असे शिर्षक वाचले, मग तुमच्या मनात काय काय कल्पना तयार होतात बघा. पहिली गोष्ट म्हणजे असे ज्याने कोणी केले असेल; त्याच्याविषयी तुमच्या मनात प्रचंड घृणा निर्माण होते. त्याचा तुम्हाला भयंकर राग येतो. असा पुत्र त्या माऊलीने कशाला जन्माला घातला, वगैरे वाटू लागते. मग हळूहळू त्याने असे राक्षसी कृत्य कशासाठी केले असेल, त्याच्या कल्पना तुमच्या डोक्यात येऊ लागतात. कारण जेवढे शब्द तुमच्या समोर आलेले वा मांडलेले आहेत, त्यातून एक ठराविक अर्थ तुम्हाला काढता येत असतो. बहुधा तो नशाबाज असेल, कसल्या तरी धुंदीत त्याच्याकडून असे घडले असेल. की त्याने मालमत्ता संपत्ती हडपण्यासाठी कुणाच्या नादाला लागून असे केले असेल? बहुधा त्याच्या लोभी पत्नीनेच त्याला असे करण्यासाठी फ़ुस लावली असेल. किती अगम्य कल्पना तुमच्या डोक्यात येतात ना? कारण समोर आलेल्या शब्दातून नुसतीच अमानुषता पोहोचत असते. शब्दांची ही इतकी भयंकर ताकद असते. शब्द असे मांडलेले व फ़ेकलेले असतात, की आणखी कुठली शक्यता असण्याचा विचारही तुमच्या मनाला शिवत नाही. कुठलाही विचार व तपास न करता; तुम्ही तात्काळ त्या जळलेल्या आईच्या मुलाला गुन्हेगार ठरवून मोकळे होता. इतका शब्दांना वेग व त्यांची ताकद असते. पण आईला मुलाने ‘जाळून टाकावे’ अशा इतरही शक्यता असू शकतात, याकडे आपली तर्कबुद्धी वळूनही बघायला तयार नसते. आता हेच घ्या की हेच शब्द माझ्याविषयी सुद्धा वापरले जाऊ शकतात. आणि असे कोणी वापरले तर तुम्ही म्हणाल, भाऊ तोरसेकर असे करू शकतो? काही क्षण तुम्ही विचारात पडाल. पण आज कोणीही माझ्याबद्दलही असेच म्हणू शकतो, आणि त्यात तसूभरही खोटे नाही, दिड महिन्यापुर्वी मी सुद्धा नेमके असेच कृत्य केलेले आहे. मला माझ्या आईला जाळावीच लागली. पण ते का करावे लागले? त्याखेरीज माझ्यासमोर अन्य पर्यायच नव्हता.

   ८ मार्च रोजी माझ्या आईचे देहावसान झाले. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार म्हणजेच अग्नीसंस्कार करणे मला भागच होते. पण साध्या शब्दात मी आईला जाळून टाकले, ही वस्तुस्थिती आहे. फ़रक किंचित आहे. मी आईला जाळले वा अग्नी दिला नाही, तर तिच्या पार्थिवाला अग्नीच्या स्वाधीन केले. म्हणूनच ‘भाऊ तोरसेकरने आपल्या जन्मदात्या आईला जाळून टाकले’, असे माझ्याविषयी कोणी विधान केले तर ते शब्दश: खोटे म्हणता येणार नाही. पण त्यातले दोन शब्द किंवा संदर्भ लपवले तर किती भयंकर वेगळा अर्थ निघतो ना? त्याला शब्दांची किमया म्हणतात. सत्य सांगितल्याचा आव आणायचा. पण शब्दांची मांडणी अशी करायची, की नेमका अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आईच्या मृतदेहाला अग्नी दिला आणि आईला जाळले, यात शब्दाने काही फ़रक पडत नसला, तरी जाळले तेव्हा ती मृतदेह होती आणि तो मृतदेह अग्नीच्या स्वाधीन करणे अपरिहार्य होते, हे वास्तव आहे. पण मृत आई असे सांगायचे टाळले तर किती भयंकर अनर्थ करता येतो ना? आजकाल अशा अनेक बातम्या तुम्ही आम्ही ऐकत असतो आणि त्या तिथेच न थांबता त्यावर रसभरीत चर्चा व विश्लेषणेही केली जात असतात. म्हणजे असे की भाऊसारखा इतका बुद्धीमान पत्रकार, त्याने असे करावे? त्यामागे त्याचा काय डाव असेल? त्याला कोणाची फ़ुस असेल? कोण त्याचा साथीदार असेल? त्याविषयी पोलिसांनी अजून दखल का घेतलेली नाही? अजून त्याला अटक कशी होत नाही? पुढले पुढले प्रश्न व त्यांचे मनोरे उभे केले जात असतात. पण त्यात भाऊची आई मरण पावली होती आणि म्हणुनच अग्नीसंस्कार म्हणुन तिला जाळण्यात आले, याचा उच्चारही होऊ दिला जात नाही. थोडक्यात तुमच्या मनात भाऊविषयी शंका व संशय निर्माण करून त्याच्याबद्दल तुमच्या मनात संताप निर्माण करण्याचाच हेतू नसतो काय?

   हे कसे चालते, त्याचे शेकडो दाखले देता येतील. गेली दहा वर्षे एक धडधडीत खोटे लोकांच्या गळी मारण्यात आलेले आहे आणि आजही चर्चा होतात, तेव्हा मोठमोठे पत्रकार, अभ्यासक त्याचा दाखला देत असतात. गुजरातची दंगल झाली, तेव्हा देशाचे पंतप्रधान असलेले वाजपेयी यांनी गुजरातला भेट दिली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री म्हणून मोदींनी राजधर्माचे पालन केले नाही.’ आजही तुम्ही हे वाक्य अनेकदा ऐकत असाल. पण हेच वाक्य मुळात धडधडीत खोटे आहे. वाजपेयी असे कधीच कुठेच बोलले नाहीत. त्यावेळी ते पत्रकारांना म्हणाले, ‘राजा असतो त्याने धर्म, पंथ संप्रदाय विसरून सर्वाना एक न्यायाने वागवले पाहिजे. त्याला राजधर्म म्हणतात व मोदींनी त्याचे पालन केले पाहिजे. आणि मला माहित आहे मोदी त्याचेच पालन करीत आहेत.’ वाजपेयी यांचे ते भाषण आजही जसेच्या तसे युट्युबवर उपलब्ध आहे. कोणीही ते ऐकू व बघू शकतो. पण सतत दहा वर्षे वाजपेयी न बोललेल्या वाक्याच्या बातम्या रंगवून मोदींनी राजधर्माचे पालन केले नाही, असे आपल्या कानीकपाळी ओरडून सांगण्यात आलेले आहे. यालाच बनवेगिरी म्हणतात आणि ती सातत्याने चाललेली आहे. आपण सगळेच त्या बनवेगिरीचे बळी असतो. वाजपेयी बोलले नाहीत ते त्यांच्या तोंडी घालून बातम्या द्यायच्या आणि मग त्यावर सातत्याने चर्चा रंगवायच्या. मग ते ऐकणारा प्रत्येक बाबतीत खरे खोटे तपासायला जात नाही. त्यामुळे अफ़वाच सत्य असे आपल्या गळी मारले जात असते. आणि ही एकच बाब नाही. मोदींच्या बाबतीत हे सातत्याने होत आलेले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वरूण गांधी यांनी आवेशात काही वाक्ये बोलले. तर त्यांनी जातीय द्वेष भडकवणारे भाषण केल्याचा माध्यमांनी इतका गदारोळ केला, की मुख्यमंत्री मायावतींनी त्याना अटकच केली होती. अटकेतल्या मुलाला भेटायला मनेका गांधी पोहोचल्या; तर त्यांना भेट नाकारण्यात आली. आणि अखेरीस त्यातून काय निष्पन्न झाले? वरूण गांधी यांच्या त्या भाषणात कुठलाही शब्द वा वाक्य चिथावणी देणारे नव्हते; असा निर्वाळा कोर्टाने दिलेला आहे. मग आधी त्यांना अटक तरी कशामुळे झाली? त्यांचे शब्द चिथावणीखोर असल्याचे कोणी ठरवले? माध्यमांनीच हा तमाशा व बनाव घडवूना आणलानव्हता काय?

   अगदी ताजी घटना घ्या गुरूवारी नरेंद्र मोदी हरीद्वार येथे बाबा रामदेव यांच्या पातंजली योगपीठ आश्रमात आचार्यकुलम या शाळेचे उदघाटन करायला गेलेले होते. तिथे भाषण करताना त्यांनी काही सांगितले त्याचाही असाच गैर अर्थ लावून गदारोळ करण्यात आला. मोदी म्हणाले, ‘२००२ची विधानसभा निवडणूक संपल्यावर केलेल्या पहिल्या भाषणात मी म्हणालो, ज्यांनी मला मते दिली वा नाही दिली, त्यांच्यासहीत ज्यांनी मतदानही केले नाही, अशा सर्वांचा आता मी मुख्यमंत्री आहे. कारण माझी परंपरा मला शिकवते, ‘सर्वसुखिना संतू’. यात सर्वे म्हणजे सगळे असा अर्थ आहे. फ़क्त हिंदू अशी शिकवण मला माझ्या परंपरेने दिलेली नाही. मी कधीच हिंदुंपुरता मुख्यमंत्री नव्हतो. आणि २००२ चे ते भाषण त्याचा पुरावा आहे.’ हे मोदींचे परवाचे भाषण आहे. त्यामध्ये त्यांनी आपण हिंदूंपुरते मुख्यमंत्री नाही, असे म्हटलेले नाही, तर दहा वर्षापुर्वीपासून आपली तीच भूमिका असल्याचा पुरावा दिलेला आहे. पण तमाम वाहिन्या व माध्यमांनी नेमके तेच वाक्य मोदी गुरूवारी प्रथम बोलले व आता पंतप्रधान व्हायचे आहे, म्हणून बोलले; असा कल्लोळ सुरू केला. यालाच शुद्ध बनवेगिरी म्हणतात. मोदी आपण हिंदूंचा नेता नाही, असे म्हणालेलेच नाहीत. आपण मुख्यमंत्री म्हणून कुठल्या एका पंथ धर्माचे नसतो, असे दहा वर्षेआधी त्यांनी म्हटलेले आहे. पण आजच ते तसे बोलले आणि पंतप्रधान होण्यासाठी बोलले, हीच मुळात फ़सवेगिरी आहे. आणि मग त्यावर तमाम जाणकार, अभ्यासक व राजकीय विश्लेषक राईचा पर्वत करण्यात रममाण झालेले होते. पण मुळात राई तरी कुठे आहे? निव्वळ फ़सवणूक नाही काय? माध्यमांची आजची स्थिती ही अशी अफ़वाबाज झालेली आहे. मात्र आता मोठ्या प्रमाणात इंटरनेट, फ़ेसबुक वा अन्य सोशल मीडिया विकसित झाल्याने वाहिन्यांसहित माध्यमांच्या खोटेपणाचा प्रभाव निरुपयोगी ठरू लागला आहे. मुख्य माध्यमातील सेक्युलर बनवेगिरी व फ़सवणुकीला मोदी यांनी सोशल मीडियाचा कुशलतेने वापर करून चांगलच शह दिला आहे. त्यामुळेच आता माध्यमांचा व त्यांचे बोलविते धनी असलेल्या सेक्युलर भामट्यांचा खोटेपणा चालेनासा झाला आहे. पण किती सहजगत्या शब्दाच्या मांडणीतून लोकांची दिशाभूल करता येते; त्याचा हा नमूना. मात्र दहा वर्षांनी आता त्या खोटेपणा्चा बुरखा फ़ाटत चालला आहे. गुजरात व एकूणच नरेंद्र मोदीविषयक खोटारडेपणा उघड होऊ लागल्याने मोदींना रोखणे सेक्युलर पक्ष, विचारवंत व माध्यमांना दिवसेदिवस अवघड होऊन बसले आहे. कारण आता लोक अन्य मार्गाने सत्य तपासू लागले आहेत व सत्य झाकून बसणार्‍या सेक्युलर माध्यमांना शह बसला आहे. त्यातूनच गुजरातचे सत्य लोकांपर्यंत जाऊ शकले आहे. सेक्युलर खोटेपणाचा हिडीस चेहरा लोकांसमोर येत चालला आहे.
( क्रमश:)
 भाग   ( १५६ )    २९/४/१३