सोमवार, ३ सप्टेंबर, २०१२

धार्मिक सलोख्याने सेक्युलरांचे पोट दुखते?


   चिथावणी किंवा फ़ुस लावणे म्हणजे काय असते? तुमच्या जखमेवर मीठ चोळले, मग तिच्यामुळे होणार्‍या वेदना आणखी दुखर्‍या व असह्य होतात. जशी जखम जुनी होत जाते तशा वेदना कमी होतात. म्हणजे प्रत्यक्षात वेदना कमी झालेल्या नसतात, पण तु्मची सोशिकता बळावलेली असते आणि तुम्हाला वेदनांचा विसर पडत चाललेला असतो. एका बाजूला जखम भरत असते आणि दुसर्‍या बाजूला वेदनांचा विसर पडत असतो. अशा वेळी तुम्हाला त्यातून बाहेर काढू बघणार्‍याने त्या वेदनांवर फ़ुंकर घालायची असते. आणि भरू लागलेल्या जखमेवर मलमपट्टी करायची असते. याच्या उलट कोणी त्या जखमेवर मीठ चोळू लागला किंवा त्या जखमेवरची खपली काढू लागला; तर तो तुमच्या वेदना वाढवू पहात असतो. तो तुम्हाला अधिक दु:खी करू बघत असतो. सेक्युलर म्हणुन मिरवणारी माणसे नेहमी असेच करतात. एकीकडे ते मुस्लिमांच्या जखमांवरची खपली काढून त्यांच्या जखमा भरू देत नाहीत आणि दुसरीकडे तेच सेक्युलर हिंदूपिडीतांच्या जखमेवर मुद्दाम मीठ चोळत असतात. याची शेकडो उदाहरणे मी देऊ शकतो. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे जिथे कुठे हिंदू-मुस्लिम एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतील व परस्पर विश्वास दाखवत असतील; तर असे सत्य जाणीवपुर्वक आपली सेक्युलर माध्यमे व पत्रकार ते लोकांपासून लपवून ठेवतात. त्याची दोन उदाहरणे इथे मी मुद्दाम देणार आहे. ती नवी नाहीत किंवा मी संशोधन करुन लावलेले शोधही नाहीत. तर ती माध्यमांनी लपवलेली सत्ये आहेत.

   कुठलीही चर्चा घ्या कायबीइन लोकमत किंवा अन्य कुठल्याही वाहिनीवर संघ परिवार मुस्लिमांचा द्वेष शिकवत असतो, असा आरोप अगत्याने केला जातो. निखिल वागळे तर तसा आरोप करण्याची संधीच शोधत असतो. पण या माणसाने किंवा कुठल्याही सेक्युलर पत्रकाराने संघाकडून मुस्लिमांच्या कल्याणासाठी झालेल्या प्रयत्नांना इवली तरी प्रसिद्धी दिली आहे काय? जेव्हा आपण गंभीर आरोप करतो आणि कुठलाही पुरावा नसताना एका संघटनेबद्दल ’माझ्याकडे पुरावे आहेत’ असा बेधडक खोटा दावा करतो; तेव्हा निदान त्यांच्या सत्कर्माचे जे पुरावे आहेत ते लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिकपणा तरी असायला हवा ना? निखिलने तो एकदा तरी दाखवला आहे काय? हिंदूत्ववादी असलेल्या संघाचा सेक्युलर मंडळी द्वेष करतात ते ठीक आहे. कारण तो त्यांचा राजकीय पवित्रा आहे. पण त्यासाठी सत्याची किती गळचेपी करणार? गुजरातच्या दंगलीबद्दल आजही अगत्याने सांगितले जाते. पण त्याच दंगल कालखंडात मदराशातील मुस्लिम तरूण आणि संघाचे हिंदू स्वयंसेवक मिळून डझनावारी लोकांचे जीव खांद्याला खांदा लावून वाचवत होते, ते अशा भडभुंज्या सेक्युलरांना ठाऊक तरी आहे काय? जे दोन समाज घटक गुजरातमध्ये एकमेकांच्या जीवावर उठल्यासारखे वागत होते; तेच तिथून हजार किलोमिटर्स अंतरावर उत्तर प्रदेशात त्याच कालखंडात एकत्र येऊन तिसर्‍या कुणाचे तरी प्राण वाचवण्यासाठी आटापिटा करत होते. पण ती बातमी कोणी आपल्यापर्यंत कधी पोहोचवली आहे काय? म्हटले तर असे इथे घडू शकते, हेच अनेकांना आश्चर्य वाटेल. पण ते निखळ सत्य आहे. आणि ती घटना १२ मे २००२ रोजीची आहे. जौनपुर जिल्ह्यातील एका खेड्यातली आहे.

   जौनपुर शहरापासून नजिकच तेव्हा भल्या पहाटे श्रमजीवी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी रुळावरून घसरली होती आणि तिचा थांगपत्ता कुठल्याही प्रशासनाला लागला नव्हता. तेव्हा घटनास्थळापासून नजिकच्या गा्वातल्या मदरशात मुस्लिम मुलांना धर्मशिक्षण देणार्‍या मौलवींनी तो अपघात सर्वात आधी बघितला. तात्काळ त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्याल वर्दी मिळेल अशी व्यवस्था केली आणि आपल्या मदरश्यातील विद्यार्थ्याना उठवून कामाला जुंपले. अपघातात सापडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे व मदत करण्याचे काम आरंभले. त्या घटनेची माहिती मि्ळताच आसपासच्या गावे शहरातले रा. स्व. संघाचे स्वयंसेवक तिथे येऊन धडकले. त्यांनीही त्या मदत कार्यात उडी घेतली. रेल्वे किंवा पोलिस वा प्रशासनाची फ़ौज इथे यायला कित्येक तासाचा विलंब झाला. आणि जेव्हा हे सरकारी पथक तिथे पोहोचले. तेव्हा त्यांच्यावर तोंडात बोट घालायची वेळ आली. कारण समोरचे दृष्य़ चकित करणारे होते. ज्यांच्यावर द्वेष पसरवण्याचा नेहमी आरोप होतो आणि धार्मिक हिंसाचाराचा आरोप होतो, त्याच दोन्ही संस्था संघटनांचे लोक एकत्रितपणे अपघातग्रस्तांचे जीव वाचवायला धडपडत होते. अगदी खांद्याला खांदा लावून झटत होते. मदरशाचे मौलाना खुर्शीद अहमद त्या दोन्ही गटांचे नेते म्हणुन कामावर देखरेख ठेवत होते. त्यांच्या म्होरकेपणाला संघाचे स्वयंसेवक झुगारू शकले नाहीत की खुर्शिद वा त्यांच्या मुस्लिम तरूणांना संघाचा सहवास नकोसा वाटला नाही. सरकारी मदत तिथे चौक गुरयानी गावात येण्यापुर्वी या दोन गटांनी आपल्या बळावर कित्येक प्रवाशांचे जीव वाचवले होते. किती चमत्कारिक वाटते ना हे वाचायला?

   कारण मदरसा म्हणजे तिथे गरीब घरच्या मुस्लिम मुलांना खाऊपिऊ घालून धर्मवेड व जिहाद शिकवला जातो, एवढेच आजवर आपण सेक्युलर माध्यमांकडून ऐकले किंवा वाचलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदू तरूणांना मुस्लिम ख्रिश्चनांचा द्वेष व त्यांच्या विरोधात दंगली करायलाच शिकवले जाते; असेच आपल्याला सतत सांगितले गेले आहे ना? मग अशा दोन संस्था संघटनेतले तरूण एकत्र येऊन कुणा अपघातग्रस्तांना मदत करतात यावर आपला विश्वास कसा बसायचा? आपल्याला तो चमत्कारच वाटणार. कारण जे स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेत असतात, ते नेहमी अशा दोन्ही बाजूंच्या दोषांनाच अधिक व ठळक प्रसिद्धी देत असतात. त्यांच्यातल्या मारामार्‍या किंवा आरोप प्रत्यारोपांना अवाढव्य प्रसिद्धी दिली जाते. पण त्यांच्यात सुसंवाद घडत असेल किंवा त्यांच्यात सलोख्याने काही झाले असेल; अशा बातम्या मात्र मुद्दाम लपवून ठेवल्या जातात किंवा दाबल्या जातात. त्यापैकीच ही एक बातमी आहे. म्हणुनच ही घट्ना घडली तेव्हा १२ मे २००२ रोजी तिथे जिल्ह्याधिकारी पोहोचले, तर कडवे मुस्लिम व कडवे हिंदू असे एकत्र बघून त्यांनाही तोंडात बोट घालायची वेळ आली. आणि त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलतानाही आपला अचंबा लपवला नाही.. दोन्ही गटांचे अभिनंदन करताना किंवा त्यांचे आभार मानताना त्यांनी ते दृष्य अविस्मरणिय असल्याचे सांगितले होते. १४ मे २००२ च्या टाईम्स ऑफ़ इंडियाच्या अंकात ही इवलीशी बातमी आतल्या कुठल्या तरी पानात झळकली होती. मुख्य वा पहिल्या पानावर येऊ नये याची काळजी घेण्यात आली होती. मात्र त्याच काळात गुजरातच्या दंगलीने व हिंसाचाराने देशातली सर्वच वृत्तपत्रे व वाहिन्या दुथडी भरून वहात होत्या.

   जिथे जिथे हिंदू, मुस्लिम वा ख्रिश्चन अशा भिन्न धर्मिय समाज गटांमध्ये संघर्षाची ठिणगी पडते व हिंसाचार होतो; तेव्हा त्याच्या भडक बातम्या देणारे किंवा त्यावरच भाष्य करणारे नेमके अशा सौहार्दाच्या घटना समोर येतात; तेव्हा का मुग गिळून गप्प रहातात? की त्यांना भिन्न समाज गटात नेहमी हिंसाचार होतो त्याचेच आकर्षण असते? असे भिन्न समाजगट गुण्यागोविंदाने नांदताना दिसले, मग जी सेक्युलर मंडळी आहेत त्यांना अन्न पचत नाही काय? तोंडाने बोलताना व जातिय सलोख्यावर पांडीत्य झाडताना, त्यांना सलोखा हवा असे दाखवले जाते, पण जिथे स्वयंभूपणे असे घडते, त्याचे स्वागत करताना ही मंडळी नेहमी अशी पळ काढतात. टाईम्सच्या त्या बातमीची सुरूवातही अशीच आश्चर्य व्यक्त करणारी आहे. तिची सुरूवात अशी आहे- " धार्मिक विभाजनाने गुजरातचा विनाश ओढवलेला असेल, पण उत्तरप्रदेशच्या एका गावात जिथे रेल्वे अपघात घडला, तिथे मात्र मुस्लिम धर्मशिक्षण देणार्‍या मदरशाच्या विद्यार्थ्यांनी आणि हिंदू राष्ट्रवादी संघाच्या स्वयंसेवकांनी एकत्र येऊन जखमीचे जीव वाचवले आहेत."

   दहा वर्षापुर्वी ही बातमी वाचली आणि जपुन ठेवली, तेव्हापासून मला एक प्रश्न सतावत होता. तो असा की गुजरातमध्ये जे दोन धार्मिक गट एकमेकांच्या जीवावर उठले आहेत, ते तिकडे उत्तरप्रदेशच्या एका गावात एकमेकांच्या सहकार्याने तिसर्‍या कुणाचा तरी जीव का वाचवतात? गुजरात व त्या इवल्या गावात काय मोठा फ़रक आहे? अनेक महिन्यांनंतर मला त्याचे उत्तर सापडले. गुजरातच्या दंगलीत व संघर्षात तेल ओतायला तिथे सेक्युलर पुढे सरसावले होते, जे दोन समाज घटकात वैमनस्याचे तेल ओतून आग भडकावत होते. नेमकी उलट परिस्थिती त्या उत्तरप्रदेशच्या गावात होती. तिथे दोन्ही बाजूचे धर्मनिष्ठ आमनेसामने असले; तरी त्यांच्यात वैमनस्याची आग लावायला व भडकवायला कोणी सेक्युलर तिथे उपस्थित नव्हता. हा एवढाच एक फ़रक आहे आणि तेवढ्या फ़रकाने परिणाम किती बदललेले दिसतात बघा. जिथे सेक्युलर थोतांड नाही, तिथे जातिय दंगा आढळून येत नाही आणि जिथे सेक्युलर थोतांड बोकाळले आहे, तिथेच असा जातिय हिंसाचार लोकांचे जीव घेताना दिसेल. हे एकच उदाहरण नाही. हिंदू मुस्लिम धर्मेप्रेमीच्या परस्पर सहकार्याचा आणखी एक हृदयस्पर्शी अनुभव आहे तो उद्या वाचू या.  (क्रमश:)
 भाग   ( २० ) ४/९/१२

६ टिप्पण्या:

 1. लेख आवडला... मात्र सेक्युलर शब्दाला शिवी बनवून ठेवू नका एवढीच एक विनंती. मुळात सेक्युलर शब्दाचा मूळ अर्थ, जो कि चांगला आहे, तो कधी बदलणारा नाही. दरम्यानच्या काळात "खऱ्या " अर्थाने जे सहिष्णू आहेत त्यांनासुद्धा आपण ऎन्सॆक्युअर करत राहू अशाने?! म्हणजे परत आपल्यातच, देशहितेषी लोकांतच फुट ! म्हणजे जरी अशी "खरी" सहिष्णुता "खऱ्या" अर्थाने एक दिवस जिंकली (सध्या तर अवघड दिसतंय, पण तरी...), तेव्हाही ह्या शब्दाला सध्या थोतांडपणाने वापरणारे लोक ह्याच शब्दाचा आधार घेत परत उफाळून येणार आहेत, हेच म्हणत कि आम्ही खरे सेक्युलर. विरोध हा "सेक्युलरीझम"ला नसावा, तर त्या शब्दाचा खोटेपणाने वापर करत, minority appeasing (which is in fact exactly opposite to principle of equality and secularism), त्या फूट पडणार्या प्रवृत्तीला असावा (जो कि बाकी तुम्ही छान मांडलाय :) )

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. तुमचा मुद्दा योग्य वाटला पण मुळात जे खऱ्या अर्थाने सहिष्णु आहेत त्यांना असल्या बाजार भूषणांची गरजच भासत नाही. त्यांना काहीही नावे ठेवा ते सत्कार्य करतच राहतात

   हटवा
 2. भाऊ, आपण अगदी खरे लिहले आहे. कधीकधी असे वाटते की या 'ढोंगी सेक्युलर' आणि मिडियाला हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या कोणत्याही गोष्टीत रस वाटत नाही. परवापरवा आयबीएन लोकमतवर एक बातमी होती. कोल्हापुर जवळच्या एका गावात मुस्लिम लोक गणपती बसवतात आणि हा उत्सव साजरा करतात. तेव्हढी बातमी सांगून आयबीएन गप्प बसले. त्याचा रिपोर्ताज नाही किंवा आणखी कुठे बातमी नाही. यांना जर खरेच हिंदू-मुस्लिम ऐक्य आणायचे असतेतर या बातमीकडे एवढे दुर्लक्ष झालेच नसते.

  उत्तर द्याहटवा
 3. माणुसकी हाच खरा धर्म , आज आम्ही आमचा धर्म व त्या धर्माची शिकवण देणारे मूळ ग्रंथ ( ज्या मध्ये नंतर बदल केले गेलेले नाही ) यांचा खुल्या मानाने अभ्यास केला तरी आपल्या पूर्णपणे धर्म काय हे लक्षात येते मग हे धर्म व धर्म ग्रंथाचा अभ्यास आम्हाला एकच सांगतो कि " आम्ही एक आहोत , आमचा ईश्वर एक आहे, आमचे रक्त एक आहे .... " हे ज्या वेळी चुकीच्या किंवा अज्ञानाने पडलेल्या व चालू असलेल्या रूढी परंपरा सोडून डोळे उघडून चालू त्यावेळी आपण मूळ धर्माकडे जाउ आणि धर्माच्या नावावर अवास्तव स्तोंब मांडणार्या मुल्ला, मौलवी, पंडित, पाद्री यांनी स्व: स्वार्था करिता पडलेली फूट व त्याचा स्वार्थी राजकारण्यांनी घेत असलेला ,घेतलेला फायदा व पुढे घेणारा फायदा हा आम्ही या खर्या बाबी सर्वाना समजावून मोडीत काढू शकतो.

  उत्तर द्याहटवा
 4. कोण आग लावते आहे हे शोधणे तसे सोपे आहे पण तसे करायचे आहे कि आहे तसेच चालु ठेवायचे हा लाख मोलाचा प्रश्र्न आहे

  उत्तर द्याहटवा
 5. जौनपुर सारख्या तत्सम घटनांचे चित्रीकरण करून जगभर दाखवणे हे एक या वर उत्तर होऊ शकेल.

  उत्तर द्याहटवा