गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

सेक्युलॅरिझम म्हणजे नेमकी काय भानगड आहे?


   माझ्या लिखाणात सातत्याने सेक्युलर हा शब्द येतो आहे आणि आपल्या देशातले अनेक शहाणे त्या शब्दाचा सारखा वापर करत असतात. पण अर्ध्याहून अधिक भारतीय जनतेला त्या शब्दाचा अर्थच माहित नाही. किंबहूना तो शब्द जे सतत वापरतात, त्यांनाही त्याचा कितीसा अर्थ ठाऊक असतो याची शंका आहे. त्यामुळेच मग जो कोणी शिवसेना, भाजपा वा संघ परिवाराला शिव्या घालू शकतो वा विरोध करतो; तोच सेक्युलर अशी एक सार्वत्रिक समजूत तयार झाली आहे. पण वास्तवात सेक्युलर शब्दाचा अर्थ खुप चांगला आहे आणि त्याचा हेतूही अत्यंत समाजहिताचा आहे. मात्र आपल्या देशात त्याचे इतके कमालीचे विकृतीकरण होऊन गेले आहे, की हिंदूच्या विरोधात वागणे, हिंदूंच्या भावना दुखावणे म्हणजे सेक्युलर; अशी अनेकांची समजुत झाली आहे. त्यामुळे असेल, की जो कोणी हिंदू असतो, तो आपल्या धर्माविषयी आग्रही असायलाच घाबरत असतो. तेवढेही नाही. जर बिगर हिंदूंच्या वागण्याबद्दल शंका घेतली वा त्यातले दोष सांगितले, तर आपल्यावर हिंदू धर्मांध असा आरोप होऊ शकतो; अशा भितीने आजच्या बहुतेक पत्रकार व बुद्धीमंताना पछाडलेले आहे. त्यालाच मी सेक्युलर विकृती म्हणतो. कारण सेक्युलर असणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असणे होय. मग त्या विचारसरणी अनुसार काम करायचे असेल तर निर्णय घेताना कुठल्याही धर्माच्या निकषावर वागून चालत नाही. पण आपल्याकडे नेमके तेच होत असते आणि असे वागण्यालाच सेक्युलर असणे समजले जाते. म्हणूनच फ़रक बघा. राज ठाकरे यांनी हिंदी वाहिन्यांना ‘बघून घेईन’, असा नुसता आवाज दिला तर किती काहूर माजवले जाते. पण रझा अकादमीच्या गुंडांनी खरोखरच पत्रकारांना बडवले, मारले, त्याच्या ओबी व्हॅन जाळल्या; तरी कुठला सेक्युलर पत्रकार त्याबद्दल चकार शब्द बोलायची हिंमत करू शकला नाही. याला आपल्याकडे सेक्युलर धर्मनिरपेक्षता म्हणतात. पण वास्तवात तो सेक्युलॅरिझम नाही. गुंडगिरी मनसेची, संघाची वा रझा अकादमीच्या गुंडांची असो, हिंदू-मुस्लिम वा अन्य कुठल्याही धर्मिय अनुयायाची असो, त्याला समान नियम लावण्याला सेक्युलर म्हणतात. आपल्याकडे तेच होत नाही. आणि म्हणून मुस्लिमांचे लाड होतात, असा समज वाढीस लागला आहे. प्रत्यक्षात मुस्लिमांचे कुठलेही लाड होत नसतात. लाड होतात ते मुस्लिमातील आक्रमक माथेफ़िरू व गुंड प्रवृत्तीच्या मुठभरांचे. पण त्यामुळे समस्त मुस्लिमांचे खुप लाड होतात आणि हिंदूंना मात्र सावत्र वागणूक मिळते अशी भावना वाढीस लागली आहे.

   आता असे म्हटले मग लगेच माझ्यावरही हिंदूत्ववादी असल्याचा आरोप होणार यात शंका नाही. पण मी असल्या आरोपाची कधीच पर्वा केलेली नाही. कारण मी जे सांगतो त्यावर माझा पुर्ण विश्वास असतो आणि आपण सांगतो ते चुकीचे वा खोटे असू नये, तर समाजहिताचे असावे, याची मी सातत्याने काळजी घेत असतो. म्हणूनच मी नेहमी साक्षी व पुरावेही देत असतो. आपल्या देशातल्या विकृत सेक्युलर धोरणाबद्दल मीच शंका घेतलेली नाही किंवा सामान्य अडाणी जनतेच्या मनातला तो संशय नाही. स्वत:ला सेक्युलर म्हणून घेणार्‍या पण धर्मनिरपेक्षतेची सतत गळचेपी करणार्‍यांच्या या पापकर्मावर खुद्द देशाच्या सर्वोच्च न्यायायलानेही बोट ठेवले आहे. आणि ही खुप जुनी गोष्ट नाही. अवघ्या सहा महिन्यांपुर्वीची आहे. असो तो विषय कधीतरी मी सवडीने मांडणार आहे. आज सेक्युलर म्हणजे काय ते आधी वाचकांना स्पष्टपणे सांगणे मला अगत्याचे वाटते. शब्दकोशातील सेक्युलर शब्दाचा अर्थ शोधला तर काय आढळते? अन्य राजकीय व्याख्येत सेक्युलर म्हणजे काय सांगितले आहे? ब्रिटानिका हा जगभर मान्यता पावलेला शब्दकोश आहे, तो म्हणतो,

पारलौकिक, म्हणजे या जन्मातील वा जीवनानंतर जे जीवन आहे त्यासाठी काही करणे व देवाच्या इच्छा पुर्ण करणे अशी धर्म संकल्पना असते. तिच्या प्रभावाखाली असलेल्या लोकसंख्येवर धर्मपंडित राज्य करत होते. मग पुढील पारलौकीक जगातील सुखसमाधानासाठी आजचे हलाखीचे जीवन निमुटपणे जगण्याची शिकवण दिली जात होती. त्याच श्रद्धेच्या आधारे समाजावर हुकूमत चालवली जात होती. ती झुगारून आजच्या म्हणजे याच जन्म व जगातील मानवी जीवन सुखासमाधानाने व्यतित करण्याचा विचार हळुहळू पुढे आला आणि त्याने धर्ममार्तंडांचे वर्चस्व झुगारून लावले. त्या विचाराच्या आधारे मानवी जीवनाची प्रगती करण्याच्या चळवळी, आंदोलने उभी राहिली. त्यातून सामाजिक राजकीय बदल घडून आले. त्या बदलाच्या वैचारिक प्रक्रियेला सेक्युलर विचारसरणी म्हणतात. तिचा व्यवहारी अर्थ अगदी सोपा आहे. धर्म ही माणसाची व्यक्तीगत श्रद्धा असू शकते. पण त्या श्रद्धेच्या आधारे अन्य कुणी व्यक्ती वा  लोकसमुहावर हुकूमत गाजवली जाता कामा नये. थोडक्यात धर्मग्रंथ किंवा धर्मशास्त्राच्या आधारे लोकजीवन वा राष्ट्रजीवन नियंत्रित केले जाऊ नये, म्हणजे सेक्युलॅरिझम. म्हणजे असे, की जे कायद्याचे राज्य असते व सरकार कारभार करीत असते; त्याने घ्यायच्या निर्णयात वा अंमलबजावणीमध्ये धर्माचा हस्तक्षेप असता कामा नये. धर्मपंडित वा धर्मोपदेशकांनी राजकीय सामाजिक कारभारात व निर्णयात हस्तक्षेप करता कामा नये.

आपल्याकडे असे होते का? चालते का? इथे सेक्युलर विचारांची जपमाळ नित्यनेमाने ओढली जाते. म्हणून सरकारी कारभार धर्मनिरपेक्ष असतो का? तसे असते तर कुठल्याही धर्माचे लोक इथे एकत्रित गुण्यागोविंदाने नांदू शकले असते. तुझा धर्म तुझ्यासाठी, माझा माझ्यासाठी असे परस्पर सौख्याचे नाते विविध धर्मियात निर्माण होऊ शकले असते आणि त्यांच्यात एकमेकांबद्दल कुठलाही संशय निर्माण होऊ शकला नसता. तो निर्माण होतो कारण सरकार व इथली शासन यंत्रणा धर्मानुसार भेदभाव करते, अशी वाढत्या लोकसंख्येची धारणा होत चालली आहे. त्याचे एकच उदाहरण पुरे ठरावे. गुजरातच्या दंगलीत पोलिसांनी वे्ळीच गोळीबार करून कठोर उपाय योजून हिंसा करणार्‍यांना रोखले नाही ही तक्रार आहे आणि ती योग्यच आहे. पण नेमके तसेच इथे मुंबईत परवा गेल्या महिन्यात घडले ना? मग त्याबद्दल गुजरातचे टीकाकार तेवढ्य़ाच उत्साहात पुढे का आले नाहीत? हिंदू हिंसा करत असतील तर गोळ्या घातल्या पाहीजेत आणि मुस्लिम दंगा करत असतील तर संयम पाळला पाहिजे; याला धार्मिक भेदभाव म्हणतात, सेक्युलर विचार म्हणत नाहीत. त्याला धर्मनिरपेक्षता म्हणत नाहीत. शासन धर्मनिरपेक्ष असेल तर त्याने दंगेखोराचा धर्म बघता कामा नये. मग तो शासक नरेंद्र मोदी असो, की अन्य कोणी कॉग्रेसचा मुख्यामंत्री असो. आणि त्यासाठी गुजरातमुळे हळवे झालेल्या मुस्लिमांनी जास्त पुढाकार घ्यायला हवा. कारण दंगलीचे सर्वाधिक चटके त्यांनाच बसलेले आहेत. पण सहसा असे होत नाही. जिथे मुस्लिम दंगेखोर असतात, गुन्हेगार असतात, तिथे मुस्लिमांच्या संघटना मौन धारण करतात. ही वस्तुस्थिती नाकारता येईल काय? गुजरातच्या हिंसेत मुस्लिम संघटनांना सेक्युलर सुरक्षा कवच हवे असते. पण तेच कवच मुंबईत मुस्लिम गुंडांकडून भेदले गेले त्याची तक्रार का कुणा मुस्लिम संस्था संघटनेने केली नाही?

   सेक्युलॅरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता असेल तर ती सर्वांनाच सारखी लागू असली पाहिजे. आणि सर्वांच्या बाबतीत प्रत्येकाने त्यासाठी सारखेच आग्रही असायला हवे. गुजरातबद्दल जे कोणी कठोर कारवाईसाठी आग्रही असतात व आहेत; त्यांनी मुंबईच्या दंगलीनंतर कारवाईसाठी एकदा तरी आपले तोंड उघडले का? नसतील तर त्यांना सेक्युलर भूमिका सांगण्याचा अधिकारच उरत नाही. कारण मुस्लिम दंगेखोरांच्या बाबतीत गप्प बसणार्‍यांनी हिंदू गुंड वा दंगलखोरांच्या बाबतीतही गप्पच बसायला हवे. पण ते तसे करत नसतील तर त्यापैकी कोणालाही सेक्युलर असल्याची भाषा बोलण्य़ाचा आधिकार उरत नाही. कारण सेक्युलर असो, की धर्मांधता असो त्यात फ़ायदे असतात तसेच तोटे सुद्धा असतात. धर्मांधता एकाच धर्माच्या मुजोरांना सत्ता देऊन हुकूमत गाजवू देते, तेव्हा त्याच धर्मातल्यांनाही अन्यय निमूटपणे सोसावा लागत असतो. अन्य धर्मियांना न्याय मागताही येत नसतो. सेक्युलर धर्मनिरपेक्षता त्यातून सुटका करते. पण त्याचवेळी धर्मप्रेमाच्या अतिरेकाला किंवा भेदभावालाही संधी देत नसते. म्हणजेच गुजरातचा आवेशात निषेध करणार्‍यांना आझाद मैदानाच्या दंगलीचाही तेवढ्याच आवेशात निषेध करावा लागतो. तो झाला काय? सेक्युलर म्हणजे सर्व धर्मियांना समान वागणुक किंवा कायदा मोडणार्‍या्ला धर्माचे संरक्षण मिळता कामा नये. आपल्या देशात ते होते का? आपल्या देशात सेक्युलर कारभार चालतो का? जर त्याचे लाभ मुस्लिमांना घ्यायचे असतील तर त्यातले तोटेसुद्धा सहन करण्याची तयारी असायला हवी आहे. आणि निदान मुस्लिम म्हणुन पुढे पुढे करणार्‍या संघटना संस्था तरी त्यापासून पळ काढतात. म्हणुनच आपल्या देशातील सेक्युलर धर्मनिरपेक्षता हे एक थोतांड होऊन गेले आहे. तिचा आडोसा घेऊन माथेफ़िरू मुस्लिम संघटित होऊन मुस्लिम म्हणजे जिहादी अशी विकृत प्रतिमा उभी करू शकले आहेत. त्याचे दुष्परिणाम ९९ टक्के जे शांतताप्रिय मुस्लिम आहेत त्यांना भोगावे लागत आहेत. त्याचा विचार कधी होणार आहे?    ( क्रमश:)
  भाग  ( २३ )   ७/९/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा