गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२

धर्मप्रेमाचा राजकीय हेतूसाठी होणारा वापर


   मंगळवारची गोष्ट आहे. रोज अनेक फ़ोन येतात तसेच त्याही दिवशी वाचकांचे फ़ोन आले. त्यात एक शाळकरी वयातल्या मुलाचा फ़ोन होता. आपण काय बोलतोय तेही त्याला कळत नसावे. पण तो बोलत होता आणि मागून कोणीतरी त्याला ‘पढवत’ होते. ‘कुराणके बारेमे उलटसुलटा लिखनेवाले आपही है क्या’ असे त्याने विचारले. तेव्हा मी त्याला म्हटले मागून जो कोणी बोलतोय त्याला फ़ोन दे. तर त्या मुलाने आपणच बोलतोय असे ठामपणे सांगितले. पण मागे कुजबुज ऐकू येत होती. मग त्याला विचारले तु किती कुराण वाचले आहेस? तर त्या मुलाकडे उत्तर नव्हते. असे अनेकजण असतात. लातुरहुन एकाचा फ़ोन आला. तो नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याचा आरोप करून मला सेक्युलर पत्रकारिता करा म्हणून शिकवू लागला. मग सेक्युलर पत्रकारिता म्हणजे काय, असे त्याला विचारावे लागले. तर मोदींवर टिका म्हणजे सेक्युलर टिका, असा एकूण त्याचा सुर होता. पण असे लोक कुठल्या भ्रमात वावरतात त्याचा तो उत्तम नमूना होता. अमेरिकेने तीनदा मोदींना व्हिसा नाकारला आणि तरी मी मोदींवर अकारण टिका करत नाही; याचे त्याला दु:ख झालेले होते. काय गंमत आहे बघा. सेक्युलॅरिझमची व्याख्या अशी क्षुल्लक होऊन गेली आहे. नरेंद्र मोदींना शिव्याशाप दिले, संघावर अवास्तव टिका केली; म्हणजे माणुस सेक्युलर होत असतो. मला त्या वादात पडायचे नव्हते. म्हणून त्या लातुरकराला म्हटले, अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला म्हणून तुम्ही त्या देशाला न्यायनिष्ठ समजता का? तर त्याने लगेच होकारार्थी उत्तर दिले. मग त्याला म्हटले, की सध्या अमेरिकेत जो एक वादग्रस्त चित्रपट निर्माण झाल्याने वादळ उठले आहे, तोही न्याय्यच असेल ना? तिथे त्याची पुरती गडबड उडाली. त्यावर नकारार्थी उत्तर आले. मग त्याची न्यायाची वा सेक्युलर असण्याची संकल्पना काय आहे? त्याचे नियम व निकष काय असतात?

   नरेंद्र मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला, म्हणून त्याला अमेरिकेचा गौरव वाटत होता. तिथे त्याला अमेरिकन न्याय व नियम कायदे योग्य वाटत होते. पण त्याच अमेरिकेतले तेच कायदे व धोरण अविष्कार स्वातंत्र्य म्हणुन प्रेषिताच्या बदनामीचा चित्रपट काढू वा प्रकाशित करू देते; तेव्हा तीच अमेरिका त्या वाचकाना जुलमी सत्ता वाटते. हा वाचक मुस्लिम होता हे वेगळे सांगायला नको. पण असा एखाददुसराच असतो. त्यांच्या अनेकपटीने माझे अभिनंदन करणारे मुस्लिमांचेही फ़ोन मला रोज येत असतात. फ़ार कशाला हा जो अमेरिकन न्याय शिकवणारा फ़ोन लातूरहून आलेला होता, त्याच्या अवघा एक मिनीट आधी लातुरहूनच सय्यद यांचाही फ़ोन आलेला होता. त्यांनी तोंड भरून माझ्या लिखाणाचे कौतुक केले. म्हणजेच मुद्दा असा, की ज्याच्या मनात जशा भावना असतात, तसाच तो समोरच्या घटनेचा वा विषयाचा अर्थ लावत असतो. त्याच्या सोयीचे असेल तसे त्यातून शोधत असतो. पण त्याचवेळी जगात खुप अशी विवेकी समजूतदार माणसे (त्यात मुस्लिमही आलेच) असतात, की जी योग्य असेल ते समजून घ्यायला उत्सुक असतात. आणि अशी कित्येक मुस्लिम माणसे आहेत ज्यांनी माझ्याशी फ़ोनवर संपर्क साधला आहे. मजा कशी बघा. मी कुठल्याही लेखात कुराणाच्या आयत वा सुरहचा अजून उल्लेख केलेला नाही. किंवा कुराण वा हदिस अशा मुस्लिम धर्मग्रंथाच्या संदर्भाने उहापोह केलेला नाही. पण एक शाळकरी मुस्लिम मुलगा मला फ़ोन करून कुराणाबद्दल उलटेसुलटे काही लिहितोस काय, म्हणून जाब विचारतो. त्यातला त्याचा उर्मटपणा बाजूला ठेवा आणि त्यातली अडाणी बेफ़िकीरी बघा. त्या मुलाला असे काही सुचलेले नाही, तर कोणीतरी त्याला ते बोलायला लावले हे मलाही कळते. पण मुद्दा आहे तो त्या मुलाच्या मानसिकतेचा. त्या मुलाला असे वागवण्यातून कोणते संस्कार दिले जात असतात? धर्माच्या नावाने त्याच्या मनात कोणत्या भावना रुजवल्या जात असतात?  

   ‘इस्लाम खतरेमे’ किंवा धर्मसंकट म्हटले मग नेमके काय संकट आहे किंवा त्याचे स्वरूप काय आहे; अथवा खरेच संकट आहे काय, तेही बघायची गरज नाही. थेट चाल करून जायचे, अशी ती मानसिकता आहे. जिथे अशी मानसिकता रुजवली जाते; तिथून खरी समस्या सुरू होत असते. मी कुराणाबद्दल किंवा त्यातल्या कुठल्याही सुरह-आयतीबद्दल काहीही लिहिले नसताना, त्या मुलाने मला असा फ़ोन करून जाब विचारला, तर त्याला मी बालिश म्हणुन सोडून देईन. पण तो बालिशपणा मोठ्यांमध्ये आढळत नाही काय? जे लिहिलेच नाही त्याबद्दल जाब विचारणे म्हणजे अफ़वेच्याच आहारी जाणे नाही काय? आणि हीच जगभरच्या मुस्लिम समाजाची कायमची समस्या राहिलेली आहे. अन्य धर्मियात जशी आपापल्या धर्मावि्षयीची अपुरी माहिती असते; तसेच मुस्लिम समाजातील लोकसंख्येचेही आहे. किती टक्के मुस्लिम लोकसंख्येने कुराण वा हदिस या धर्मग्रंथांचे पठण व अभ्यास खरोखर केला आहे, त्याची शंकाच आहे. पण मग त्यामुळेच अमुकतमुक कुराणात वा हदिसमध्ये आहे, असे बेधडक सांगून त्यांना भडकावणेही सोपे जात असते. एकोणिसाव्या शतकातील एका क्रांतिकारकाचे बोल मोठे सूचक आहेत. पण आधी तो क्रांतिकारक कोण ते समजून घ्यायला हवे.

   इराण म्हणजे त्याकाळातील पर्शियामधला एक धाडसी शिया मुस्लिम जमालुद्दीन अस्सदाबादी याने मुस्लिम जगतामध्ये आपले प्रभूत्व सिद्ध करण्यासाठी आपला शिया पंथ लपवून अफ़गाण रुप धारण केले. तो इजिप्तला गेला आणि सुन्नी म्हणून वावरू लागला. धर्मशास्त्राचा अभ्यास करून त्याने धर्मशास्त्र्याचे रुप धारण केले. आर्मेनियाचा मिर्झा मा्ल्कम खान त्याला येऊन मिळाला. तो होता आर्मेनियन. त्यांनी नव्या स्वरूपात इस्लामी साम्राज्य उभे करण्याचा विडा उचलला होता. आणि काही प्रमाणात त्यांना यशही मिळू शकले होते. त्यातला मिर्झा माल्कम खान खरेच धर्मांतर करून मुस्लिम झाला होता की नाही; याबद्दल शंका आहेत. पण राजकारणासाठी मुस्लिम समाजाला लढायला सिद्ध करण्याची सोपी युक्ती त्याने सांगितली आहे. ते त्याचे प्रसिद्ध वाक्यच आहे. मिर्झा माल्कम खान म्हणतो. "मुस्लिमांना नुसते सांगा अमूक हे कुराणामध्ये आहे आणि ते तुमच्यासाठी मरायला सज्ज असतात." याचा साधासरळ अर्थ इतकाच, की बहूतेक मुस्लिमांना खरेच धर्मग्रंथाविषयी फ़ारसे ज्ञान नसते आणि त्याचा गैरफ़ायदा घेणारे अनेकजण त्यांच्यात सराईतपणे वावरत असतात. भोळ्याभाबड्या सामान्य मुस्लिमाच्या धर्मवेडाचा असे लोक आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी बेधडक उपयोग करून घेत असतात. मग एका बाजूला पाकिस्तानचा एक मंत्री अमेरिकेतील त्या चित्रपट निर्मात्याच्या खुनाचा फ़तवा काढून खुन्याला एक कोटी डॉलर्स बक्षिस देण्याची घोषणा करतो आणि दुसरीकडे त्याच पाक सरकारचे अन्य मंत्री व राजकारणी त्याला मुर्खही ठरवत असतात. आपल्याकडेही सहा वर्षापुर्वी उत्तरप्रदेशचे मुलायमसिंग मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अन्सारी नावाच्या मुस्लिम नेत्याने प्रेषिताची व्यंगचित्रे काढणार्‍याला ठार मारण्यासाठी जाहिर सुपारी दिलेली होतीच की.

   असे काही घडते तेव्हा मध्यममार्गी मुस्लिम नेते लगेच तो एखादा मुर्ख असतो असे सांगून त्यावर पांघरूण घालतात. पण अशी प्रवृत्ती मुस्लिम समाजात कुठून आली व का बळावते आहे, त्याचे विश्लेषण करताना दिसत नाहीत. सहाजिकच मग सर्वसामान्य मुस्लिम त्याच गोंधळात भरकटत जातो. दुसरीकडे इतर जे मुस्लिमेतर आहेत, त्यांच्याही लेखी मग सगळे मुस्लिम सारखेच भासू लागतात. तो गोंधळ दूर करण्याची गरज नाही का? इतकी वर्षे लोटली, शतके लोटली तरी मुस्लिम समाजाचे धर्माच्या नावाने वापरले जाणे थांबलेले दिसत नाही. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात गेलात तरी मुस्लिम लोकसंख्येला नेहमी धर्माच्या नावाने वापरले जाते असेच दिसेल. मग पाकिस्तान असो की इराक-इराण असो. त्यात ज्यांचे बळी पडतात, त्याचीही कोणाला फ़िकीर नसते. गेल्या आठवड्यात पाकिस्तानात अमेरिकन चित्रपटाच्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली; त्यात अनेकांचा हकनाक बळी गेला आहे. त्या निदर्शनामुळे अमेरिकेचे कोणतेच नुकसान झाले नाही, की त्या चित्रपटावर बंदी आलेली नाही. मग पाकिस्तानात ज्यांचे बळी गेले त्यांचे काय? धर्मासाठी शहिद झाले आणि ते जन्नतमध्ये गेले; अशी मनाची समजूत घातली जाते. मुद्दा तो नाही, तर अशा धर्मवेडाचा व त्याचा होणार्‍या राजकीय वापराचा आहे. खरेच आपण धर्मपालनासाठी त्याग करतो का? आपले कृत्य धर्माचे उत्थान करण्यासाठी कारणी लागते काय? आपल्याला होणारी हानी व्यक्तिगत लाभाची नसेल, पण धर्मकार्यासाठी तरी पोषक आहे काय? असा विचार यापैकी कोणाच्या तरी मनाला शिवतो का? नसेल तर असेच वारंवार का घडत रहाते? दुसर्‍या कुणाच्या तरी राजकीय मतलबासाठी आपले धर्मप्रेम वस्तुप्रमाणे वापरले जाते; याची जाणिव कशी व कधी निर्माण होणार? आणि ते होणार नसेल तर मुस्लिम समाजाचे उत्थान कसे शक्य आहे?  ( क्रमश:)
भाग  ( ४४ )  २८/९/१२

1 टिप्पणी: