बुधवार, ५ सप्टेंबर, २०१२

मुस्लिम समाजातले दोष दाखवायचे कुणी?


   गेले काही दिवस मी ही लेखमाला लिहितो आहे त्याला खुपच चांगला प्रतिसाद मला वाचकांकडून मिळाला आहे. जमेल तसे मी वाचकांचे फ़ोन घेत असतो. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण लिहिणे आणि अन्य व्याप त्यामुळे काही वेळ फ़ोन बंद ठेवावा लागतो. असे असूनही २० दिवसात किमान हजारापेक्षा अधिक वाचकांशी मी बोललो आहे. त्यात शंभराहून अधिक मुस्लिम वाचक होते, याचा मला खास आनंद झाला. त्यातही निदान दहा बारा हिंदीच बोलू शकणारे होते. त्यांचे मला विशेष कौतु्क करावेसे वाटते. कारण त्यांनी मराठी भाषेतील लेख वाचून प्रतिक्रिया द्याव्यात हे त्यांच्या अगत्याचे लक्षण आहे. ज्या भाषेत बोलणे जमत नाही, त्या भाषेतला लेख वाचून मतप्रदर्शन करणे हे अगत्यच असते. बहुतेकांनी माझे या विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन केले. पण तीनच असे निघाले, की त्यांना माझ्यात हिंदूत्व दिसले. तर त्या निमित्ताने काही खुलासा करणे मला आवश्यक वाटते. कारण हा एक प्रघात आपल्याकडल्या भोंगळ सेक्युलर प्रभावाचा परिणाम आहे. हिंदूंच्या अन्यायाबद्दल किंवा मुस्लिमांच्या चुकांबद्दल बोलले, की हिंदूत्वाचा आरोप होत असतो. त्यामुळे मुस्लिमांच्या चुकांवर बोट ठेवायलाही आजचे सेक्युलर पत्रकार व माध्यमे घाबरत असतात. आणि घाबरलेले मोठ्या आवेशात अविष्कार स्वातंत्र्याचे योद्धे म्हणून नाटक करतात. म्हणूनच परवाच्या आझाद मैदानच्या दंगलीत मुस्लिम गुंडांनी धुडगुस घातला तर मार खाऊनही कुणा पत्रकार वा माध्यमांना मुस्लिम गुंडगिरीचा निषेध करण्याची हिंमत केली नाही. पण ‘बिहारींना घुसखोर म्हणून हुसकावून लावू’ असे राज ठाकरे यांच्या बोलण्यात येताच गुंडगिरीचा आरोप करू लागले; त्यांना रझा अकादमीच्या गुंडांनी प्रत्यक्षात चोपून काढल्यावर का बोलता येत नव्हते? ज्यांनी मारले ते मुस्लिम गुंड होते, म्हणुन त्या अविष्कार स्वातंत्र्यवाद्यांची वाचा बसली होती काय? राज ठाकरेच्या नुसत्या शब्दांनी ज्यांना जखमा होतात, त्यांना त्यांच्याच ओबीव्ही गाड्या जाळल्यानंतर साधे चटके बसल्याचीही तक्रार का नव्हती? मारणारे गुंड मुस्लिम होते आणि राज ठाकरे मुस्लिम नाहीत, एवढाच तर फ़रक आहे ना?

   सेक्युलॅरिझमची समस्या तिथूनच सुरू होते. आणि हिंदू मुस्लिम समस्याही तिथूनच सुरू होते. अशा वागण्यातून आपण मुस्लिमांना समजून घेतो असे माध्यमे किंवा सेक्युलर मंडळी दाखवत असली; तरी सामान्य माणसाच्या नजरेत सेक्युलर लोक मुस्लिम गुंडगिरी पाठीशी घालतात, असेच मत बनत असते. पण त्या मताचा दुसरा अत्यंत विकृत भाग असा, की अशी समजूत झालेल्या त्या माणसाला सगळेच मुस्लिम तसे वाटू लागतात. आणि अशी लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच आहे. परिणामी मग दुसरीकडे मुस्लिम समाजातही अनेक लोकांच्या डोक्यात तोच भ्रम पसरू लागला आहे. त्यांच्या लेखी सेक्युलर म्हणजे मुस्लिम गुंडगिरी किंवा मुस्लिम आक्रमकता असेच मत भिनू लागले आहे. मग कोणी मुस्लिम चुकांबद्दल लिहिले किंवा बोलले, तर त्याच्याकडे शंकेने बघितले जाते आहे. मलाही काही दोनतीन मुस्लिमांचे तसेच फ़ोन आले. मी अर्थात त्यांच्याशी अत्यंत स्पष्टपणे बोललो. पण इथेही जाहिरपणे काही भूमिका स्पष्ट करणे मला अगत्याचे वाटते. मी धर्म वगैरे काही मानत नाही किंवा माझ्या घरात देवधर्म होत नाही. मी कुठल्या देवस्थानाला भेट द्यायला जात नाही. पण जे कोणी मित्र परिचित असा उद्योग करतात, त्यांची्ही मी हेटाळणीही करत नाही. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा व विवेकबुद्धीचा मामला आहे असे मी मानतो. एकाने आपल्या श्रद्धा दुसर्‍यावर लादणे जेवढे अयोग्य; तेवढेच कोणी आपली नास्तिकता दुसर्‍याच्या आस्तिकते विरुद्ध उभी करणेही अयोग्य असे मी मानतो. दंगल किंवा धार्मिक तेढ ही एकाने दुसर्‍यावर आपल्या श्रद्धा किंवा आग्रह लादण्या्च्या विवाद व संघर्षातून सुरू होत असते. म्हणूनच मी हिंदु वा मुस्लिम धर्मांधतेचा समर्थक नाही आणि म्हणूनच कुठल्याही धर्मांधतेच्या चुका बेधडकपणे मांडू शकतो. पण बाकी स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणारे कितीजण तेवढ्या तटस्थतेने असे प्रश्न विचारू शकतात? शकत असते तर त्यांनी परवाच्या दंगलीबद्दल तेवढ्य़ाच तटस्थतेने मुस्लिम गुंडांची निंदा करायला पुढे यायला हवे होते. पण तसे घडले नाही. तर का घडले नाही, याही प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल.

   जेव्हा जेव्हा अशा नाजूक विषयाची चर्चा होते, तेव्हा हिंदूत्ववादी असेल त्याला सेक्युलर पत्रकार धारेवर धरतात, पण जो कोणी मुस्लिम नेता वा कडवा असेल त्याला जाब विचारतात काय? तो जाब सेक्युलर पत्रकर नाही, पण आता मुस्लिम मध्यममार्गीच विचारू लागले आहेत. मौलाना वहिउद्दीन खान यांच्यासारख्याने मुंबईतील दंगलीनंतर उपस्थित केलेले प्रश्न एकही सेक्युलर अभ्यासक वा पत्रकार कुणा मुस्लिम नेत्यांना का विचारू शकला नाही? जे मोठी छाती फ़ुगवून भाजपा किंवा संघाच्या नेत्यांना सवाल करतात; त्यांची तीच हिंमत मुस्लिम नेत्यांना सवाल विचारताना कुठे शेपूट घालून बसते? मौलाना वहिउद्दीन काय म्हणतात बघा, म्हणजे माझा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.

"मुस्लिम स्थलांतरितांनी स्थानिक लोकांशी जुळवून घेतले पाहिजे. मुस्लिम जातात तेथे त्यांना सांस्कृतिक ओळख कायम ठेवायची असते. हे काही योग्य नाही. युरोपातही ते बुरख्याचा आग्रह धरतात. माझ्या मते स्थलांतरित मुस्लिमांपुढे दोन पर्याय आहेत. एकतर त्यांनी पुन्हा आपल्या मूळ प्रदेशात परतावे. अन्यथा आसामातील स्थानिक जनतेशी जुळवून घ्यावे. सतत आपल्या सांस्कृतिक ओळखीवर भर देणे, हा काही इस्लाम नाही."

   स्वत: मुस्लिम धर्मोपदेशक असूनही मौलाना जेवढे स्पष्ट शब्दात बोलतात, तेवढा कोणी सेक्युलर पत्रकार, अभ्यासक, पुढारी कधी बोलतो का? मुंबई दंगलीनंतर ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये वहिउद्दीन खान यांनी मुस्लिमांच्या या दोषावर नेमके बोट ठेवले आहे. पण तेवढी हिंमत कुणा मुस्लिम पत्रकार वा सेक्युलर पत्रकाराने दाखवली आहे काय? नसेल तर त्यांनी स्वत:च्या छातीवर सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष असल्याचा बिल्ला लावण्याची गरज आहे काय? असल्या घटना घडल्यावर कारण नसताना हिंदूत्ववादी संस्था संघटनांवर खापर फ़ोडण्याची स्पर्धाच चालू होते. त्यामुळे हिंदू मानसिकता विचलित होत असते. जे वहिउद्दीन इथे म्हणत आहेत, त्यातला एक तरी आक्षेप सेक्युलर विचारवंतांना का आढळत नाही? वहिउद्दीन यांनी कुठेही हिंदू संघटनांच्या धर्मांधतेवर बोट ठेवलेले नाही. उलट मुस्लिमातील दोष ठळकपणे समोर आणला आहे. सेक्युलर असेल त्याला जसा हिंदूंचा दोष दिसतो, तसाच मुस्लिमांचा दोष दिसला पाहिजे आणि तो ठामपणे सांगता आला पाहिजे. (नुसतीच ‘ठाम मत’ अशी जाहिरात करून भागत नाही). पण इथे नेहमी उलटे घडताना दिसेल. सेक्युलर असतात, ते मुस्लिम चुकांवर पाघरूण घालताना दिसतील. तेवढेच नाही तर जे मुस्लिम धर्मांधतेचे म्होरके आहेत, त्याच्या समर्थनाला सेक्युलर पुढे सरसावताना दिसतील. तिथेच सगळी गडबड होते आहे. मग सेक्युलॅरिझम म्हणजे मुस्लिमांची धर्मांधता असाच अर्थ मुस्लिमांनी वा त्यांच्यातल्या माथेफ़िरूंनी लावला, तर त्यांना दोष देता येईल काय? तेवढेच नाही. जेव्हा सेक्युलर असे वागतात तेव्हा मग हिंदु धर्माविषयी जो कोणी थोडा हळवा असतो, पण धर्मांध नसतो; त्याच्या मनात सेक्युलॅरिझमबद्दल तिरस्कार निर्माण होत असतो, शंका निर्माण होत असतात. आणि जेवढ्या या शंका व तिरस्कार निर्मांण होतात, तेवढा तो हिंदूत्वाचा किंवा नरेंद्र मोदीचा समर्थक होत असतो. त्याने कधी मोदींना बघितलेले नसते किंवा त्यांचे भाषणही ऐकलेले नसते. पण सेक्युलर तिटकार्‍यातून त्याला मोदींचे एक अनाकलनिय आकर्षण वाटु लागते.

   मुस्लिम आक्रमकता आणि तिचे सेक्युलर मंडळींकडुन होणारे चोचले, यातून मोठ्या प्रमाणात हिंदू समाजामध्ये मोदी हे आकर्षण होत चालले आहे. किंबहूना मुस्लिम आक्रमकतेपेक्षा सेक्युलर थोतांडाने ही स्थिती निर्माण केली म्हणायला हरकत नाही. कारण आता सेक्युलर म्हणजे जिहाद किंवा दहशतवादाचा पोशिंदा; अशीच एक प्रतिमा तयार होत चालली आहे. वहिउद्दीन यांनी ज्या दुखण्यावर बोट ठेवले आहे, त्याची कधीतरी माध्यमांमध्ये चर्चा होते काय? जेव्हा जेव्हा दंगल किंवा मुस्लिम आक्रमकतेचा विषय चर्चेला येतो, तेव्हा त्याच मुद्द्याची चर्चा होण्याची गरज आहे. कारण तिथूनच समस्येला सुरूवात होते, असे मौलाना वहिउद्दीन यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. आणि एकदा त्याचा उद्भव झाला, मग पुढे होतात ते निव्वळ परिणाम असतात. मग आपल्याकडे परिणामांवर चर्चा होते, पण मुळाला हात घातला जात नाही. उलट त्याला तोंड फ़ोडायचा प्रयास झाला, तरी सेक्युलर म्हणून पत्रकार व माध्यमे त्या विषयाची वा चर्चेची गळचेपी व मुस्कटदाबी करत असतात. वहिउद्दीन नेमके काय सांगत आहेत त्याचा उहापोह उद्याच्या अंकात करू या.    ( क्रमश:)
  भाग   ( २२ )  ६/९/१२

२ टिप्पण्या:

  1. Sir,
    Tumhi mhanatay te ekdam barobar ahe pan Patrakaar mandalina paisa ani nete lokanna Satta pahije. Asha paristitit samanya lok mag te kontyapan jaati dharmache asot, tyacha tras hyach samanya lokanna honar..

    उत्तर द्याहटवा
  2. सर तुम्ही ज्या पत्रकार किंवा नेत्यांचा इथे उल्लेख करताय, ते सरकारी कुत्रे आहेत त्यांना ठराविक सेकुलर पक्षांनी आपल्याच नुज चानेल वर नोकरीला ठेवले आहे. त्यामुळे पोटासाठी त्यांना मालक सांगतील त्यांच्यावरच भून्कावे लागते. आपल्या देशात लोकशाही नसून भांडवलशाही आहे व राजकारणी लोक भांडवलदार बनल्यामुळे त्यांचे नोकर असेच वागणार. IBN लोकमत कोन्ग्रेस, सकाळ -राष्ट्रवादी इ.
    मुस्लिमांना दुखावले तर मत देणार नाहीत म्हणून षंढ बनून त्यांची मस्ती सहन करणे हि सवय वाईट आहे.

    उत्तर द्याहटवा