शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१२

हे सर्व लिहिण्यामागचा माझा हेतू काय?


  एक मजेशीर गोष्ट आहे. एका बाजूला मला येणार्‍या वाचकांच्या प्रतिसाद म्हणजे फ़ोनमध्ये बहुतांश हिंदूंना नवीच माहिती मिळाल्याचे समाधान आहे. कारण यातील अनेक मुद्दे व घटना कानावरून किंवा वाचनात येऊन गेलेल्या असतात. पण तुटक बातम्या आणि अपुर्ण संदर्भ यामुळे त्यांचा नेमका खुलासा त्यांना ठाऊक नसतो. मग अशा बातम्या किंवा घटना कुठेतरी स्मरणात असल्या तरी त्यांचा अर्थच लागलेला नसतो. कारण आपली माध्यमे त्याबद्दल जाणीवपुर्वक मौन पाळतात. किंवा उगाच मुस्लिमांच्या भावना दुखावतील म्हणुन त्या वास्तवावर पडदा टाकण्यात धन्यता मानतात. पण म्हणूनच अशा बाबतीत मग शंकांचे थैमान सुरू होते. त्या शंका दुर व्हाव्यात आणि पर्यायाने विविध समाज घटकात अकारण जो संशयाचा धुरळा असतो तो खाली बसावा अशीच माझी इच्छा व हेतू आहे. त्यावर कोणी शंका घेतली मग मला आवडत नाही. पण आपल्याकडे सेक्युलर म्हणून जे पाखंड माजलेले आहे त्यानेच हा धुरळा अधिक निर्माण केला आहे व वाढवला आहे. आता उदाहरणच घ्या. अनेक हिंदी बोलणार्‍या मुस्लिमांचे मला फ़ोन आले त्यांनी आपण वाचक असल्याचा दावा केलेला असला तरी ते नक्कीच ‘पुण्यनगरी’चे नियमित वाचक नाहीत. पण मी मुस्लिमांच्या संदर्भात लिहितो आहे म्हणुनच त्यांनी वाचन करून माझ्याकडे फ़ोनवर शंका व्यक्त केल्या. दोनतीन मराठी बोलणारे सोडले तर बाकी बहुतेकांनी माझ्या लेखमालेचे स्वागत केले. पण ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांनी मुद्दाम वाचून फ़ोन करायचे आणि माझ्या लिखाणावर दोषारोप करायचे; यातला हेतूच शंकास्पद असतो. एकाने तर मला सांगितले, की हमे मराठीसे कुछ लेनादेना नही. असेच असेल तर त्याने मराठी वृत्तपत्रातील लेख वाचून प्रतिक्रिया द्यावीच कशाला? तिथेच त्याच्या हेतूची शंका येते. किंबहूना त्याने अबू आझमी यांनी विधानसभेत हिंदीत शपथ घेऊन राष्ट्रभाषेचा सन्मान कसा केला आणि म्हणूनच आझमी कसे राष्ट्रभक्त आहेत त्याचाही युक्तिवाद करण्याची धडपड केली.

   हीच खरी समस्या असते. मौलाना वहिउद्दीन तीच समस्या सांगतात. जहरुद्दीन शेख हा माझा मित्र किंवा माझे महिमानगडातले मुस्लिम सोबती मराठीतच शिकले, मराठीतच जगतात. अलिकडेच चहा पीत फ़ारुखच्या टपरीवर बसलो असताना दुष्काळी परिस्थितीवर आम्ही बोलत होतो, तर फ़ारूखने मला ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’ ही शाळकरी वयात शिकलेली कविता अस्खलीत म्हणुन दाखवली. त्याला जर मराठीचे वावडे नाही तर हा जो फ़ोन करणारा "मराठीसे लेना देना नही" म्हणतो, त्याच्यातला आडमुठेपणा लपून रहातो काय? तामीळनाडूचा मुस्लिम तामीळ बोलतो किंवा कर्नाटकातील मुस्लिम कानडी आत्मसात करतो; तर इथे महाराष्ट्रात येऊन मराठीशी कर्तव्य नाही, असे म्हणणार्‍याच्या स्वभावातील मस्तवालपणा लपून रहात नाही. आणि जर मराठी कळत नसेल, तर त्या भाषेत काय लिहिले आहे त्यावर हुज्जत कशाला करायची? तर मुद्दा इतकाच, की त्याला काय लिहिले आहे त्याच्याशी कर्तव्यच नव्हते. मुस्लिमांच्या बाबतीत काही दोषारोप आहेत, एवढेच त्यातुन त्याला कळले होते. आणि त्यासाठी त्याने फ़ोन केला होता. तुम्हाला आमच्या धर्मात लुडबुड करण्याचे कारण नाही, असा त्याचा दावा होता. मला तोही मान्य अहे. पण मग मुस्लिमांनीही इतरांच्या धर्मात लुडबुड करू नये, हे कोणी बघायचे? म्हणूनच त्याला मी विचारले, मी इस्लाम धर्माविषयी काहीच म्हटलेले नाही. पण धर्माचाच विषय असेल तर एम. एफ़. हुसेन यांनी हिंदू दैवतांचे विडंबन चित्रातून केले त्याला तुम्ही रोखणार काय? डॉ. झाकीर नाईक मोठमोठे मेळावे भरवून हिंदू ग्रंथपुराणे किंवा ख्रिश्चनांच्या धर्मग्रंथ बायबल संबंधाने विवेचन करतात; त्यांना रोखण्याचे काम तुम्हीही हाती घ्या. त्यावर उत्तर नाही. मग म्हणायचे झाकीरशी आमचा संबंध नाही. हुसेनची चुक आहे. पण अशा चुका सुधारायच्या कोणी?

   समस्या या अशा आगावू लोकांमुळे निर्माण होतात. आणि त्यातले एक गृहीत असते, की कुराण किंवा इस्लामच्या धार्मिक बाबतीत बाकीचे सर्व अडाणी आहेत. त्यांना काहीच ठाऊक नाही. निदान माझे तरी तसे नाही. मी गेली पाच वर्षे इस्लाम संबंधाने अधिकाधिक माहिती मिळवून वाचतो आहे आणि जगभर जी मुस्लिमांची एक आक्रमक प्रतिमा तयार झाली आहे, त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा एक गोष्ट माझ्या अगदी स्पष्टपणे लक्षात आली, की अशी जी आगावू बोलणारी व स्वत:ला धर्मनिष्ठ समजणारी मुठभर मुस्लिम मंडळी आहेत, त्यांनीच मुस्लिमांना अधिक शंकास्पद बनवून ठेवले आहे. कालपरवाचीच गोष्ट घ्या. प्रेषित महंमद यांच्या संबंधाने काही चित्रपट किंवा माहितीपट अमेरिकेत प्रदर्शित झाला, तर त्याला इस्लामची विटंबना किंवा अपमान ठरवून मोठेच काहुर माजलेले आहे. त्यासाठी लिबियातील अमेरिकन वकिलात उध्वस्त करण्यात आली. तिथल्या अमेरिकन मुत्सद्दी व कर्मचार्‍यांची हत्याही करण्यात आली. इजिप्तमध्येही अमेरिकन वकिलातीवर जमावाने हल्ले केले. इतक्या हळव्या व आक्रमक भावना धर्मासाठी असतात, हेसुद्धा मी मान्य करायला तयार आहे. पण सवाल तेवढ्याच धर्मनिंदेचा किंवा विटंबनेचा आहे काय? सवाल विटंबनेचा असला तर इस्लामचा गैर अर्थ कोणी लावत असेल तर तीसुद्धा विटंबनाच नाही काय? आणि अल कायदा किंवा ओसामा बिन लादेन याने जे काही कृत्य धर्माच्या नावाखाली चालवलेले होते, तेही इस्लामला मंजूर नसेल, तर ती सुद्धा धर्म विटंबनाच नाही काय? मग त्याच्या विरोधात आजवर कुठे कुठे जगाच्या पाठीवर मोर्चे व हिंसा झालेली आहे? की लादेन याने इस्लामचा गैर अर्थ लावला, तर माफ़ असतो काय? कुठेतरी गल्लत आहे ना? एका बाजूला इवल्या गोष्टीसाठी भडका उडतो आणि दुसर्‍या बाबतीत सार्वत्रिक मौन का दिसावे?

   कालच्या लेखात मी तोच मुद्दा उपस्थित केला होता. डारफ़ोर किंवा सिरियातील मुस्लिमांच्या हत्याकांडाबद्दल इथले मुस्लिम नेते गप्प असतील तर ते म्यानमार सारख्या परदेशातील हत्याकांडाबाबत इतके संवेदनाशील का होतात? आसामामधील हिंसेने विचलित होणारे मुस्लिम नेते; कास्मिरातील घातपातात मरणार्‍या मुस्लिमांबद्दल अलिप्त का असतात? पण तेच नेते कुठे लष्कर किंवा पोलिस कारवाईत मुस्लिम मारला गेला; मग रस्त्यावर येतात. ही तफ़ावत कशाला? मुस्लिम मारला गेल्याचे दु:ख जरूर असावे. पण मग कोणी मारला व कुठे मारला गेला, त्यानुसार तफ़ावत होण्याचे कारण नाही. काश्मिरात घातपात करणारे पाकधार्जिणे लोक जिहादी हिंसेत ज्यांचा बळी घेतात ते मुस्लिमच आहेत ना? मग त्यावर कधीच का आवाज उठत नाही? म्यानमारप्रमाणे सिरियामध्येही सत्तेनेच मुस्लिमांचे बळी घेतले आहेत. पण त्यात फ़रक एकमेव आहे. सिरियातला सत्ताधिश मुस्लिम आहे. काश्मिरातला घातपाती मुस्लिम आहे. म्हणजे मरणारा मुस्लिम असला तरी मारणाराही मुस्लिम आहे; म्हणुन त्याबद्दल इथले मुस्लिम नेते व मुस्लिम संघटना मौन धारण करतात काय? मग सवाल असा येतो, की दु:ख आहे ते निरपराध मुस्लिम मारला जाण्याचे आहे की कोणाकडून मारला गेला त्याचे आहे? सिरियाच्या बशीर अल असद याच्या सैनिकांनी निरपराध मुस्लिमांचा बळी घेतलेला चालतो. पण म्यानमारमध्ये बौद्ध बहुसंख्य असलेल्या देशात मुस्लिम लष्करशाही नाही म्हणुन तिथल्या मुस्लिम हत्याकांडाच्या विरोधात मोर्चा निघतो काय?

   सुदानच्या डारफ़ोर प्रांतामध्ये ज्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले, ते काळे मुस्लिम आहेत. तिथल्या पुरूषांची सरसकट हत्या करून महिलांवर बलात्कार करण्यात आले. हे सर्व अत्याचार करणारे मुस्लिमच सत्ताधारी वा सैनिक आहेत. त्याबद्दल मौन कसे धारण केले जाते? डारफ़ोर किंवा सिरियात मुले, महिला मारल्या जात आहेत, त्यांचा गुन्हा काय आहे? मग त्या निष्पाप मुस्लिमांच्या हत्याकांडाबद्दल इथल्या मुस्लिम संस्था संघटना गप्प कशा? खरे तर हा प्रश्न माध्यमाच्या मुखंडांनी विचारला पाहिजे. जे कोणी आसाम वा म्यानमारच्या अत्याचाराबद्दल बोलायला तावातावाने पुढे येतात, त्या मुस्लिम नेते व विचारवंतांना हा प्रश्न का विचारला जात नाही? मुस्लिम जगाच्या पाठीवर कुठेही असो, त्याने दुसर्‍या मुस्लिमाशी बंधूभाव दाखवला पाहिजे, असा दावा केला जातो. तीच धर्माची शिकवण आहे असेही ठासून सांगितले जाते. मी तो दावा मान्य करतो. पण मग तोच दावा सिरिया किंवा डारफ़ोरच्या बाबतीत शिथील का पडतो? मग त्याच्या पुढला प्रश्न असा, की त्या बाबतीतले मौन खोटे की आसाम म्यानमारच्या बाबतीतल्या भावना दिखावू असतात? अशा प्रश्नांची उत्तरे कोणी द्यायची? माध्यमांनी हे अडचणीचे प्रश्न विचारले नाहीत म्हणून ते संपत नसतात. एका बाबतीत भावनाशून्य आणि दुसर्‍या बाबतीत एकदम भावनाविवश, ही तफ़ावत का दिसते? ही गफ़लत समजून घेण्यासाठीच ही लेखमाला मी लिहितो आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे ज्यांचा आवाज माध्यमांपर्यंत पोहोचत नाही असे अनेक मुस्लिम फ़ोन करून मला दाद देत आहेत. इथे धर्माचा संबंधच नाही, तर वर्तनातल्या तफ़ावतीचा सवाल आहे. आणि त्याची उत्तरे शोधूनच मुस्लिमांना अधिक सुखीसमाधानी होता येईल.    ( क्रमश:)
भाग   ( ३१ )  १५/९/१२

1 टिप्पणी:

  1. ओसामा बिन लादेन याने जे काही कृत्य धर्माच्या नावाखाली चालवलेले होते, तेही इस्लामला मंजूरहोते व आहे , त्यांना येनकेन प्रकारेण जग इस्लाममय करायचे आहे

    उत्तर द्याहटवा