सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

गुजरात दंगलीची वास्तव मिमांसा कधी होणार?


   डॉ. झाकीर नाईक अन्य धर्मांचे ज्या प्रकारचे तार्किक विवेचन करत असतात, तसेच काहीसे इस्लामविषयक सलमान रश्दी यांनी जे काही लिहिले. मग त्यावर इतका राग कशाला? तर्कानेच एखाद्या धर्मापेक्षा दुसर्‍या धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची मुभा घ्यायची म्हटली, तर तो अधिकार एकट्या मुस्लिमांना असू शकत नाही. त्याचे लाभ झाकीर नाईकसारखे मुस्लिम उठवत असतील, तर तशीच इस्लामची मिमांसा अन्य मुस्लिम वा बिगर मुस्लिमही करू शकतात. त्याबाबत मुस्लिमांना संयम राखता आला पाहिजे. नाहीतर झाकीर नाईक यांना आवरले तरी पाहिजे. पण तसे सहसा होत नाही. मग सगळी गडबड सुरू होते. कारण मुस्लिम समाज आपल्या धर्माच्या श्रेष्ठत्वाबद्दल खुप आग्रही असतो, पण अन्य धर्माविषयी तो तेवढा सहिष्णू आढळत नाहीत. त्याला अनेक अपवाद आहेत. जसे माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. किंबहूना नव्वद नव्हे तर नव्याण्णव टक्के मुस्लिम तसे आग्रही नसतात. त्यातले एक टक्का फ़ार तर तसे अत्याग्रही आढळतील. पण जेव्हा मुस्लिम समुह तयार होतो, तेव्हा त्यांच्यातला हा संयम कमी होतो. कारण आक्रमक मुठभर लोक संयमी मुस्लिमांना फ़रफ़टत घेऊन जातात. त्याचाच फ़ायदा झाकीर नाईकसारखे लोक घेत असतात. आपल्या धर्माची थोरवी ऐकायला माणसाला आवडत असते. आणि हे फ़क्त मुस्लिम धर्माच्या बाबतीतच खरे मानायचे कारण नाही. धर्मापुरताच हा विषय नसतो. कधी तो जातीविषयक आग्रह वा अभिमान असतो, तर कधी प्रांत, वंश किंवा भाषा, वर्ण यांच्याबद्दलही आग्रही श्रेष्ठत्वाचा गंड असतो. मग असे लोक एकत्र येतात, तेव्हा त्यांना आपल्या श्रेष्ठत्वाचे गुणगान ऐकायला खुप आवडत असते. त्यात ते रममाण होतात. तो मानवी स्वभावाचा एक उपजत गुण किंवा दुर्गुण आहे.

   सध्या अमेरिकन अवकाश स्थानकात वास्तव्य असलेली सुनिता विल्यम्स ही महिलाच घ्या. ती अमेरिकन आहे आणि मिश्रवंशिय आहे. तिचे वडील भारतीय वंशाचे तर आई अमेरिकन गौरवर्णिय आहे. त्यामुळे तिच्या नावातही भारतीयत्व आहे. पण तिने ख्रिश्चन अमेरिकनाशी विवाह केला असून तिचे नागरिकत्वही अमेरिकन आहे. पण तिने अंतराळात सर्वाधिक वास्तव्य करण्याचा विक्रम केला, त्याचे तिच्या जन्मभूमीला नाही इतके भारतीयांना कौतुक आहे. मग ती अंतराळात जाताना समोसा, गणेशाची मुर्ती आणि भगवत गीतेची प्रत घेऊन गेल्याचा करोडो भारतीयांना अभिमान वाटण्याचे कारण काय? अमेरिकेचे नागरिकत्व पत्करलेल्या कल्पना चावलाचेही तेच. आणि ही मानसिकता केवळ सामान्य अजाण भारतीयाची आहे, असेही मानायचे कारण नाही. बहुतेक वाहिन्यांवर या विषयाचे अवास्तव कौतुक चालू असते. त्याचे कारण काय असते? तर त्याचा दुरान्वये संबंध आपल्याशी जोडून अशी मंडळी आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायला धडपडत असतात. त्यामागची चालना अनेकदा सामुहिक मानसिकता असते. कुठल्या तरी अभिमानाला धरून माणुस आपले दु:ख मागासलेपण, वेदना, यातना, दैन्य यावर मात करायला धडपडत असतो, त्याचाच हा अविष्कार असतो. खरे म्हणजे त्यामागचा आग्रह ही दुबळे वास्तव नाकारण्याची केविलवाणी धडपड असते. इतरेजन आपल्याला जितका कमी लेखतात, तसे आपण नगण्य नाही; हे सिद्ध करण्याचा तो प्रयास असतो. त्यातूनच हटवाद किंवा आग्रह प्रभावी होत असतो. पण तो मानवी स्वभावधर्म आहे. आपण सगळेच त्याचे कमीअधिक बळी असतो. प्रत्येकामधली ही वृत्ती कुठल्या मार्गाने डोके वर काढील याचा नेम नाही.

   सचिन तेंडूलकर याचे विक्रम झाल्यावर फ़टाके उडवणार्‍यात फ़क्त श्रीमंतच पुढे नसतात. अगदी गरीब वस्तीतही पोटाला चिमटा घेऊन काही उत्साही लोक फ़टाके फ़ोडतात. त्या विक्रमाने त्यांच्या दैन्यावस्थेमध्ये कुठलाही फ़रक पडणार नसतो. पण काही क्षण ती दयनिय अवस्था विसरण्याला तो उन्माद उपयोगी असतो. आपले कमीपण किंवा दु:ख विसरण्याची ती एक नशाच असते म्हणायला हरकत नाही. कधी ती धर्माचा मुखवटा लावून समोर येते, तर कधी राष्ट्रवाद म्हणून पुढे येते. आणि असे केवळ अडाणी अशिक्षित गरीबच करतात, असेही मानायचे कारण ना्ही. अत्यंत सुशिक्षित वा सुखवस्तू लोकही त्याच भावनेचे बळी झालेले दाखवता येतील. मात्र जोवर त्याला सामुहिक आक्रमक स्वरूप नसते, तोवर ती समस्या नसते. पण जेव्हा अशी मनोवृत्ती सामुहिक रुप धारण करून दुसर्‍या कुणावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू लागते; तेव्हा समस्या सुरू होते. कारण ती सामुहिक वृत्ती दुसर्‍या समुहाला आव्हान देऊ लागते. आणि दुसर्‍या समुहाच्या सहनशक्ती किंवा संयमाच्या मर्यादा टिकण्य़ापर्यंतच गंभीर प्रसंग ओढवत नसतो. मुंबईत ११ ऑगस्ट रोजी जे झाले; त्यात दुसर्‍या समुहाच्या संयमाचा अंत बघितला गेला. तरी संयम टिकला म्हणूनच परिस्थिती आटोक्यात राहिली. पण झाले त्याच्या विरोधात मग राज ठाकरे यांना मिळालेला मोर्चारुप प्रतिसाद, दुसर्‍या समुहाची सावध प्रतिक्रिया होती. आपल्या आग्रही भूमिका किंवा श्रेष्ठत्वाच्या नादात आपण अन्य कुणाला दुखावतो आहोत, याचे भान राखले तर गडबड होत नाही. आणि त्याचे भान सुटले, मग परिस्थिती बिघडत असते. आपल्या देशातील वा अन्य देशात मुस्लिम मुस्लिमेतर यांच्यातल्या वाढत्या बेबनावाची म्हणूनच कारणमिमांसा होण्याची मला गरज वाटते. कारण जगभर हे प्रकार वाढत आहेत. आणि त्याला जर मुस्लिम आणि बिगर मुस्लिम असेच स्वरुप येत असेल, तर तो गंभीर विषय आहे. कारण जेव्हा त्याचे उलटे पडसाद उमटू लागतात, तेव्हा मग प्रत्येकाकडे संशयाने बघितले जात असते. असे संशयाने बघितले जाते म्हणून चीड येत असेल तर चुक नाही. पण असा संशय कुठून निर्माण होतो आणि त्याची कारणे तपासणेही अगत्याचे आहे. आणि ज्यांना परिणाम भोगावे लागतात, त्यांनी ते अगत्य अधिक दाखवलेच पाहिजे.

   एक धोका मोठा आहे आणि त्याची कोणी जाणिव करून देत नाही. तो धोका म्हणजे मुस्लिम एकाकी पडण्याचा. मुंबईतल्याच घटनेचे उदाहरण घ्या. त्याचे कोणते गांभिर्य आहे? इथे पोलिसांवरच हल्ला झालेला आहे. त्यातही महिला पोलिसांवर हल्ला झालेला आहे. त्यामुळे पोलिसांच्या मानसिकतेमध्ये कोणता फ़रक पडलेला असू शकतो; याचा कोणी तरी विचार केला आहे काय? जे काही त्या दिवशी झाले, त्यानंतर राजकीय सारवासारव झाली असली, तरी प्रत्यक्ष पोलिसकाम करणारा जो कर्मचारी आहे, त्याच्या भावना कोणी जाणून घेतल्या आहेत काय? आज त्या सामान्य पोलिसाच्या मनात मुस्लिमांबद्दल कोणत्या भावना आहेत, याची साधी चाचपणी तरी चर्चा रंगवणार्‍यांनी केली आहे काय? तो सामान्य पोलिस आता मुस्लिमांकडे कोणत्या नजरेने बघणार आहे? उघड कोणीही पोलिस बोलणार नाही, पण त्याच्या मनात अढी तयार झालेली नाही, असे कोणी म्हणू शकेल काय? प्रमोद तावडे नावाच्या शिपायाने राज ठाकरे यांच्या मोर्चानंतर व्यासपीठावर जाऊन त्यांना गुलाब पुष्प दिले, तो वैयक्तिक मामला होता, असेच म्हणायचे असेल तर गोष्टच वेगळी. रस्त्यावरच्या पोलिसाशी गप्पा मारता मारता विषय काढा, त्याला त्या तावडेचे कौतुक आहे. आणि असा एखाददुसरा पोलिस नाही. मग जेव्हा कधी भयंकर प्रसंग ओढवेल, तेव्हा तेच पोलिस खाते तटस्थपणे नि:पक्षपाती बंदोबस्त करू शकणार आहे काय?

   अगदी पत्रकार घ्या. वाहिन्यांच्या गाड्या जाळल्यावर आपला सेक्युलर मुखवटा टिकवण्यासाठी कोणी उघड टिप्पणी केली नाही. पण मी ही लेखमाला लिहितो आहे, त्या दरम्यान ज्या पत्रकारांनी माझ्याशी संपर्क साधला आणि प्रतिक्रिया दिल्या, त्या धक्कादायक आहेत. मी मुस्लिमांच्या विरोधात लिहितो आहे, अशा समजूतीने अनेकांनी माझे अभिनंदन केले, त्याचे मला आश्चर्य वाटले. कारण मी विरोधात लिहित नसून लपवले जाणारे दोष तेवढे दाखवतो आहे आणि ते दूर करावेत व त्याद्वारे दोन्ही समाजातले शंका-संशयाचे वातावरण निवळावे; अशीच माझी इच्छा आहे. आणि हे जेव्हा मी अशा सेक्युलर मुखवटे लावलेल्यांना सांगतो, तेव्हा ते चकीतच होतात. पण तो मुद्दा महत्वाचा नाही. अगदी सेक्युलर मुखवटा लावून वावरणारे आजचे बहुतांश लोकही ११ ऑगस्टच्या हरकतीने कमालीचे विचलित झालेले आहेत. म्हणजेच न बोलून दाखवलेली पोलिसांची जी मानसिकता आहे, तशीच बहुतांश पत्रकार व समाजाची आहे. आणि ती मानसिकताच मुस्लिमांसाठी मला मोठा धोका वाटतो. आणि त्या धोक्याचा विचार करायचा तर आपली अशी सामुहिक प्रतिमा कशामुळे तयार झाली आहे, त्याचा विचार मुस्लिम समाजात होण्याची गरज आहे. कारण कायदे-नियम कागदावर असतात. जेव्हा सामुहिक उन्माद उफ़ाळतो; तेव्हा कागदावरचे कायदे सुरक्षा द्यायला निकामी असतात. गुजरातमध्ये तेच झाले, हे विसरून चालणार नाही. मोदी यांच्या विरोधात राजकीय प्रचाराच्या मोहिमा चालवून ते संकट संपवता येणार नाही. कारण त्याच टाळाटाळीने मोदींना हवी तशी सामुहिक मानसिकता देशभरच्या बहुसंख्य हिंदूमध्ये निर्माण होत चालली आहे. दहा वर्षे उलटून गेल्यावरही गुजरातमध्ये ती मनोवृत्ती ओसरताना दिसत नाही.   ( क्रमश:)
भाग  ( ३४ )  १८/९/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा