बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२

इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी


   उत्तर प्रदेशचेच राजकारण घ्या. तिथे मंडल शिफ़ारशीच्या बळावर मुलायम यादव यांनी समाजवादी पक्षाची उभारणी केली. त्यांचा पक्ष डॉ. लोहियांच्या विचारसरणीची पोपटपंची करीत असला तरी त्याचे सर्व राजकारण व डावपेच यादव-मुस्लिम यांच्या मतांच्या संख्येवर मांडले जात असतात. लालूंनी तिकडे बिहारमध्ये तेच गणीत मांडले होते. मायावतींनी दलित पिछडा अधिक मुस्लिम असे समिकरण मांडून मुलायमना शह दिला तर बिहारमध्ये इतर मागास जातींना सोबत घेऊन नितीशकुमार यांनी मुस्लिमांच्याच आधाराने आपले बस्तान बसवले आहे. अगदी भाजपासोबत असूनही. बंगालमध्ये ममतांनी मुस्लिमांना हाताशी शरून डाव्यांचे डाव उधळून लावले. या सर्व समिकरणाला शह देण्याचे डावपेच १९८९ नंतर भाजपाचे जहाल नेता म्हणुन ओळखले जाणारे लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केले होते. त्यातूनच तेव्हापासून भाजपाची ताकद वाढत गेली. पण १९९६ सालात लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष झालेल्या भाजपाला सत्तेचे वेड लागले आणि त्यांनी हिंदूत्वाची जहाल भूमिका सोडून दिली, तसा त्यांचा आक्रमक हिंदू चेहरा गमावला होता. तिथेच त्यांची पिछेहाट सुरू झाली. हिंदू मतांचा गठ्ठा तयार होण्याची प्रक्रिया तिथेच खुंटली होती. त्याचे परिणाम मग निवडणूक निकालातही दिसू लागले. आधी दोन निवडणूका भाजपाच्या जा्गा वाढायचे थांबले आणि मग त्याची घसरण सुरू झाली. गेल्या आठदहा वर्षात थांबलेल्या त्याच प्रक्रियेला आता मोदी यांच्या नावाने वेग मिळू लागला असे दिसते आहे. मायावती, मुलायम, पासवान, नितीशकुमार अशा सर्वांचे राजकारण मुस्लिम मतांचा गठ्ठा अधिक त्यांच्या जातीसमुहाचे गठ्ठे धरून मांडलेले गणित आहे. पण त्याला तत्पुर्वीच्या अडवाणी यांच्या हिंदूत्वाने शह दिला होता. पण मध्येच अडवाणी हिंदूत्व सोडुन सत्तेच्या गणिताकडे वळले, तिथे ती प्रक्रिया थांबली होती. त्याचीही कारणे महत्वाची आहेत.

   सत्ता व त्यासाठी झटपट उसनी मते मिळवण्याच्या घाईत अडवाणी व अन्य भाजपा नेतृत्वाने भल्याबुर्‍या लोकांसाठी पक्षाची दारे खुली केली. काल कुठल्याही पक्षात असलेला नेता आज भाजपामध्ये दिसू लागला. आपला मतदार गोळा करण्याचे कष्ट सोडून भाजपा निवडून येणार्‍या नेत्यांच्या मागे धावू लागला व त्यासाठी त्याने हिंदूत्वाची कास सोडली आणि भाजपा विस्ताराची प्रक्रिया थंडावली. अशा खोगीरभरतीने भ्रष्टाचारही भाजपामध्ये बोकाळला. त्यातूनच भाजपाची पत संपली. त्याला कॉग्रेस होता आले नाही, की हिंदूत्ववादीही रहाता आले नाही. ते चक्र मोदींनी उलटे करून दाखवले आहे. गुजरातमध्ये त्यांनी दंगलीचा कलंक अंगावर घेतला, तरी बदनामीच्या दबावाखाली न येता उत्तम कारभार करून दाखवला. त्यांच्यावर अन्य कुठलेही आरोप होऊ शकले तरी भ्रष्टाचाराचा आरोप होऊ शकत नाही. दुसरीकडे त्यांनी उत्तम कारभारही करून दाखवला आहे. म्हणजेच १९९८ सालात देशाची सत्ता मिळवताना वेगळा पक्ष (Party with Differance ) असे भाजपाने सांगितले होते, ते गुजरातमध्ये मोदींनी करून दाखवले. देशातला सर्वात यशस्वी मुख्यमंत्री ही त्यांची प्रतिमा आहे. त्यात माध्यमांनी त्यांचा आक्रमक हिंदू चेहरा देशासमोर सतत मांडल्याने त्यांचे काम सोपे होऊन गेले आहे. आज जेव्हा अवघा देश महागाई, दरवाढ व भ्रष्टाचाराच्या गर्तेत लोळतो आहे; तेव्हा त्यातून देशाची प्रशासन व्यवस्था बाहेर काढण्याची क्षमता आलेला एकमेव नेता अशी स्वत:ची प्रतिमा मोदी यांनी बनवली आहे. तशा नेत्याचा देशाला शोध आहे. त्यात पुन्हा हिंदूत्वाचा आक्रमक चेहरा असेल तर तो अडवाणींनी वार्‍यावर सोडून दिलेला देशभरचा हिंदू मतदार मोदींच्या मागे अगत्याने उभा रहायला उत्सुक आहे. हा नुसता तर्क आहे काय? त्याचा पुरावा काय?

   १९९१ पासून १९९९ पर्यंत उत्तरप्रदेश हा भाजपाला सर्वाधिक खासदार देणारा प्रांत होता. त्यात तीनदा पन्नासहून अधिक भाजपाचे लोकसभा सदस्य एकट्या उत्तरप्रदेशातुन निवडून आले होते. जिथे सत्तेसाठी हिंदूत्व गुंडाळले, तिथून त्याची घसरण सुरू झाली. तोच मतदार मग अन्य पक्षांकडे अन्य कारणासाठी वळला. आता मोदींच्या आक्रमकतेमु्ळे तो पुन्हा हिंदूत्वाकडे येऊ शकतो आणि चाचण्य़ांनी त्याचीच चाहुल दिली आहे. मोदी यांची चाचण्यांमध्ये दिसणारी लोकप्रियता त्याचीच साक्ष असू शकते. इथे मोदी यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी करता येईल. १९६९ आणि १९७९ अशा दोन वेळी इंदिरा गांधी यांनी स्वत:चा पक्ष व त्यातले प्रमुख नेते विरोधात गेले असतानाही प्रचंड यश मिळवले होते. दोन्ही प्रसंगी माध्यमातले विद्वानही त्यांच्या विरोधात गेले होते. पण देशात एकूणच जे राजकीय, प्रशासकीय व आर्थिक अराजक माजले होते, त्यावर उपाय म्हणून खंबीर नेता समजून इंदिरा गांधी यांची भुरळ लोकांना पडली होती. कठोर निर्णय घेण्याची कुवत व धाडसी कारभार करण्याची क्षमता या गुणांनी इंदिरा गांधींना मोठे यश मिळवून दिले होते. त्यांच्या तेवढ्या मोठ्या यशाची अपेक्षा कोणीच केली नव्हती. मोदींनी आज तसाच नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच त्यांच्या पक्षाची आजची लोकप्रियता किती व त्या पक्षाला लोकांचा मिळणारा कौल किती, याला फ़ारसा अर्थ नाही. भाजपा अधिक मोदी अशी चाचणी घेतली तर त्याचे थोडेफ़ार योग्य उत्तर मिळू शकते. पण त्याची गरज नाही. आजही भाजपाचा प्रमुख नेता असलेल्या अडवाणी यांची लोकप्रियता मोदींच्या तुलनेत खुप मागे पडली आहे.

   मग असा प्रश्न पडतो, की मोदी हे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर मुस्लिमांची भूमिका काय असणार आहे? अगदी आक्रमक जहाल मुस्लिम नेत्यांपासून सामान्य मुस्लिमापर्यंत प्रत्येकाला या शक्यतेचा विचार करण्याची गरज आहे. त्यांना सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या पक्षांच्या राजकारणातले प्यादे म्हणून बळी जायचे आहे, की भारताचे समहक्क नागरिक म्हणुन विकासाचे भागिदार म्हणून जगायचे आहे? तशा शक्यतेचा विचार करायचा, तर मग मोदी का जिंकू शकतात आणि त्यामागे हिंदू मानसिकता का उभी रहाते आहे; याकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. त्याचे दोन भाग होतात. हिंदू मा्नसिकतेला मोदींच्या आहारी जाण्यापासून रोखणे आणि दुसरी मोदी यशस्वी होणार असतील, तर त्यांच्या कारकिर्दीत मुस्लिमांना काय स्थान असेल, त्यासाठी तयारी करणे. तुम्ही ज्याला आधीच आपला शत्रू मानले आहे असा माणुस सत्ताधीश होणार असेल तर एक भूमिका घ्यावी लागते. आणि शत्रू म्हणुन त्याला सत्तेवरच येऊ द्यायचे नाही, ही दुसरी भूमिका असू शकते. या दुसर्‍या भूमिकेमध्ये हिंदू मानसिकतेला मोदी नावाच्या भुरळीमधून बाहेर काढणे अगत्याचे आहे. आणि त्यासाठी मुस्लिमांनी अधिकाधिक हिंदू समाज घटकांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे असू शकते. त्यात मग मुंबईतल्या दंगलीसारख्या घटनांना स्थान असू शकत नाही. म्हणजे शाही इमाम म्हणतात, तसे हिंदूंना सेक्युलर धर्मनिरपेक्ष व संयमी ठेवणे आवश्यक आहे. हिंदू समाज घटकांचा संयम व सोशिकता संपणार नाही एवढ्य़ावरच मुस्लिमांच्या धार्मिक आक्रमकतेचा आग्रह थांबला पाहिजे. त्याची चिन्हे कुठे दिसत आहेत का?

   ही चिन्हे भारतात दिसत नाहीत तशीच ती जगभरच्या मुस्लिम समाजामध्ये दिसत नाहीत. म्हणुनच मला ही लेखमाला लिहिण्याची पाळी आलेली आहे. ती सर्व मुस्लिमांना आवडणारी असेलच असे नाही. पण नावडती असली म्हणुन त्यातले तथ्य संपत नाही. कुराणाच्या एका आयतीमध्ये साक्षात ईश्वरच म्हणतो, की अनेकदा तुम्हाला न आवडणार्‍या गोष्टीही तुमच्या भल्यासाठी आवश्यक म्हणुन ठरवून दिलेल्या असतात. मुस्लिमांनी तो बोध वाढत्या मोदी लोकप्रियतेपासून घेतला, तर देशाच्या भावी राजकारणाला मोठीच कलाटणी मिळू शकेल. मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याचे जे राजकारण चालू आहे त्याला शह म्हणून हिंदूंच्या मतांचा अवघा २०-२५ टक्के मतांचा गठ्ठाही मोठीच उलथापालथ घडवू शकतो. लक्षात ठेवा १९७१ असो की १९८० असो; इंदिरा गांधींनी अवघ्या ३५-३७ टक्के मतांवर लोकसभेच्या दोन तृतियांश जागा जिंकल्या होत्या. तेवढ्या जागा घटनादुरुस्ती करायला पुरेशा असतात. इंदिराजींनी त्याच बळावर या देशातील घटना व लोकशाहीचाच गळा घोटला होता. मग मोदींना मि्ळणारी लोकप्रियता आक्रमक मुस्लिमांसाठी किती घातक असू शकते त्याचा अंदाज केला तरी पुरे ठरेल. इतके बहूमत पाठीशी असेल तर मोदींसारखा जहाल नेता गुजरातप्रमाणेच देशाचा कारभार चालवू शकेल ना? मग  मतचाचण्य़ांमध्ये मोदीची लोकप्रियता ४२ टक्के दिसते त्यातला धोका काय इशारा देतो आहे, ते वेगळे समजावून देण्याची गरज आहे काय? एकच उदाहरण पुरेसे ठरावे. मुंबईच्या दंगलीत दुखावले गेलेले पोलिस दल मोदींचे स्वागत करील, की नाही; ते प्रत्येक मुस्लिमाने मनाशी विचार करून ठरवावे. मग चाचण्यातले ४२ टक्के कुठून त्यांना मिळू शकतात त्याचा घरबसल्या अंदाज येऊ शकतो.   ( क्रमश:)
भाग  ( ४३ )  २७/९/१२

1 टिप्पणी:

  1. yes Modi will be PM @ 2014 election's, changla lekh aahe. Mi babri padtana ayodhyet karsevak mhanun hoto pn atalbiharinche sarkar aalyavar tyanni hindutv sodlyane mihi bjp sodli. AAta aivdhya varshani modinchya rupat nava aashecha kiran disu lagla aahe. Arun Ramtirthkar yanchi aathvan yete tumche lekh vachun.

    उत्तर द्याहटवा