शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२

देशातल्या कायद्यापेक्षा धर्मपालन श्रेष्ठ असते


   मुस्लिम असा का वागतो? बर्‍याच बाबतीत असा प्रश्न विचारला जातो. या लेखमालेच्या निमित्ताने अनेक वाचकांनी मुस्लिमांविषयीचे नेहमीचे आक्षेप मला फ़ोनवर ऐकवले किंवा इंतरनेटच्या माध्यमातून उपस्थित केले. पाकिस्तान मॅच जिंकला मग मुस्लिम फ़टाके का वाजवतात? मुस्लिमांच्या राष्ट्रभक्तीचा पुरावा काय? असे नेहमीचे ठाशीव प्रश्न आहेत. त्याची उत्तरे मिळत नाहीत याला मुस्लिमांपेक्षा आपली सेक्युलर माध्यमे जबाबदार आहेत. कारण माध्यमांनी कधीच अशा प्रश्नांची चर्चा होऊ दिली नाही किंवा लोकांच्या शंकानिरसनाचा प्रयास केलेला नाही. पण मुस्लिमांच्या ज्या अनेक प्रकाशन संस्था वा साधने आहेत; त्यातून अशा प्रश्नांना व शंकाना वेळोवेळी उत्तरे दिली गेली आहेत. स्पष्टीकरण आलेले आहे. पण खाजगी प्रकाशने व साधनांची मर्यादा असते. त्यामुळे अशी उत्तरे किंवा स्पष्टीकरणे सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि गैरसमज कायम रहातात, त्याबरोबरच शंका, संशय कायम रहातात. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी अशा विषयावर जाहिर व सविस्तर खुल्या चर्चा घडवल्या, तर त्या शंकासमधानाला प्रोत्साहन मिळू शकेल आणि प्रबोधनही होऊ शकेल. एक उदाहरण पुरेसे ठरावे. शेषराव मोरे या ख्यातनाम सावरकरनिष्ठ लेखकाने प्रयत्नपुर्वक इस्लामचा अभ्यास करून ‘मुस्लिम मनाचा शोध’ घ्यायचा प्रयत्न केला. त्याच नावाचे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. त्यांच्या त्या प्रयत्नांची मुस्लिम मौलवी व अभ्यासकांनीही पाठ थोपटली आहे. पण त्या अभ्यासपुर्ण पुस्तकामध्ये जी सविस्तर चर्चा झाली आहे, तशी माध्यमांनी कधीच का करू नये? त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यापुर्वी मोरे यांनी कच्ची प्रत काही मुस्लिम धर्मपंडीतांकडे अभिप्रायासाठी पाठवली होती. तिचा सांगोपांग परामर्श घेऊन सय्यद इफ़्तिकार अहमद या मुस्लिम धर्मपंडीतांनी प्रदीर्घ अभिप्राय पाठवला होता. त्यामध्ये उपरोक्त प्रश्नांसारख्या शेकडो शंकाची साफ़साफ़ उत्तरे आहेत. पण कधी त्यावर मुख्य प्रवाहातील माध्यमांनी चर्चा घडवली आहे काय? का नाही घडवली? की अशा चर्चेतून हिंदू मुस्लिमातील मतभेद दूर होतील. शंका संशय संपुष्टात येतील; अशी भिती आपल्या सेक्युलर माध्यमांना वाटते काय? नसेल तर अशी चर्चा का होत नाही?

   इस्लाम धर्म, त्याची जीवनशैली, त्याची राजकीय भूमिका, त्याच्या संदर्भात राष्ट्र व राष्ट्रवादाच्या संकल्पना, जिहाद इत्यादीबद्दल इफ़्तिकार यांनी सविस्तर विवरण दिले आहे. ते वाचले तर आपण बिनबुडाच्या गृहितावर मुस्लिमांना शंका विचारतो आणि अज्ञानाधिष्ठीत शंका काढतो, असेच आक्षेप घेणार्‍यांच्या लक्षात येईल. किंबहूना अनेक आक्षेप व संशय हे इस्लामविषयक अज्ञानातून आलेले आहेत, हे मान्यच करावे लागते. उदाहरणार्थ, राष्ट्रवादी, राष्ट्रभक्ती हे शब्द ज्या अर्थाने सामान्य नागरिक वापरत असतो; त्यापेक्षा त्याचे इस्लामच्या संबंधाने होणारे अर्थ अगदीच भिन्न आहेत. ज्यांना राष्ट्र ही संकल्पनाच भौगोलिक अर्थाने मान्य नसेल; तर त्या अर्थाने त्यांच्याकडून राष्ट्रभक्तीची अपेक्षा बाळगणे योग्य होईल का? सय्यद इफ़्तिकार यांनी अशा अनेक मुद्दे व आक्षेपांना त्या अभिप्रायातून सविस्तर उत्तरे दिली आहेत. उदाहरणार्थ इफ़्तिकार म्हणतात,

इस्लाम एक धर्म (रिलिजन) नसून ती परिपुर्ण सामाजिक, राजकीय आणि सर्वार्थाने सर्वसमावेशक जीवनव्यवस्था आहे. अल्लाहने प्रत्येक मुस्लिमावर त्या जीवनव्यवस्थेला आपल्या वैयक्तीक तसेच सामुहिक जीवनात स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत, प्रेषित मुहंमद (स.) यांनी आपल्या प्रेषितत्वाच्या कालावधीत ती व्यवस्था सर्वत्र रुजवली होती. ती कशा पद्धतीने स्थापन करायची याचेही मार्गदर्शन केले होते. त्यांच्या अनुयायांनी ती जबाबदारी पार पाडली. आपल्या जीवीत व वित्तहानीचा विचार न करता त्यांनी सर्वदूर त्या व्यवस्थेवर आधारीत राजसत्ता प्रस्थापित केली. प्रसंगी त्यांना युद्धालाही तोंड द्यावे लागले. ह्या सर्व प्रक्रियेला ‘जिहाद’ म्हणतात.  

   इथे इस्लामचे धर्म म्हणून पालन करणारा मुस्लिम आणि अन्य धर्मपालन करणारा वा धर्माव्यतिरिक्त जगणारा नागरिक; यातला फ़रक लक्षात यायला हरकत नसावी. तुम्ही आम्ही जेव्हा भारताचे नागरिक म्हणुन जगत असतो, तेव्हा भारतीय राज्यघटनेने जे नियम कायदे बनवले आहेत, त्यानुसार जगत असतो. त्यानुसारच जगणे भाग असते. त्या धर्मपालनात किंवा नागरी जीवनात राजकारण आणता येत नाही. पण ज्याला इस्लामचे कठोर पालन करायचे आहे, त्याला त्याचे धर्मशास्त्र तशी मुभा देते काय? जर सय्यद इफ़्तिकार म्हणतात, तसे काटेकोर इस्लामचे पालन करायचे असेल, तर मग त्या मुस्लिमाला भारताच्या राज्यघटनेचे पालन करता येणार नाही. राज्यघटना किंवा घटनाधिष्ठीत कायदे आहेत, ते काटेकोर इस्लाम पालनाच्या आडवे येत नाहीत, तोपर्यंतच त्याला राज्यघटना सोयीची असू शकते. पण जिथे स्थानिक कायदे हे इस्लामी नियम व कायद्यांना छेद देऊ लागतील, तिथे त्या निष्ठावान मुस्लिमाने काय करावे? राज्यघटना व देशातील कायदे पाळायला गेल्यास; त्याच्या धर्मपालनामध्ये अडथळा येऊ शकतो. मग त्या निष्ठावान मुस्लिमाने काय करावे? एक बाजू संभाळायची तर दुसरीकडे तोल जातो आणि तिकडचा तोल संभाळायचा तर इकडचा तोल जातो. असे म्हटले तर उदाहरणाशिवाय त्यातले रहस्य उलगडणारे नाही. म्हणून उदाहरण महत्वाचे ठरावे.

   राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना एक प्रकरण खुप गाजले होते. शहाबानू असे त्याचे नाव आहे. त्या प्रकरणात शहाबानु नाम तलाकपिडीत महिलेने खालच्या कोर्टापासून सुप्रिम कोर्टापर्यंत तीन दशकांचा लढा दिला आणि आपल्या घटस्फ़ोटित नवर्‍याकडून भारतिय कायद्यानुसार पोटगी मिळवली होती. त्यावर प्रचंड काहुर माजले. एका सामान्य मुस्लिम घटस्फ़ोटितेला न्यायालयाने पोटगी मिळवून दिली, तर त्याला धर्मातील अधिक्षेप ठरवून तमाम मुस्लिम संघटना व संस्था रस्त्यावर उतरल्या होत्या. मग तो न्यायालयाचा निर्णय रद्दबातल करण्यासाठी राजीव गांधी यांच्या पुढाकाराने नवा कायदा करण्यात आला. त्याची अंमलबजावणी पुर्वलक्ष्यी करण्यात आली आणि शहाबानूला कोर्टाने दिलेली पोटगी नाकारण्यात आली. इथे नेमके काय झाले? का झाले? काय सिद्ध झाले? इथला भारतीय नागरी कायदा मुस्लिमांसाठी लागू होत नाही, हेच तत्व मान्य झाले ना? त्यासाठी तमाम मुस्लिम संघटना रस्त्यावर का उतरल्या, त्याचे उत्तर आपल्याला सय्यद इफ़्तिकार देतात. इस्लाम हा नुसता धर्म नाही तर ती एक परिपुर्ण सामाजिक, राजकीय जीवनव्यवस्था आहे. आणि तिचे आपल्यापुरते व्यक्तीगत जीवनातच नव्हेतर, सामुहिक जीवनातही पालन करण्याचे आदेश मुस्लिमाला अल्लाहने दिलेले आहेत. मग त्याने कोणाच्या आदेशाचे पालन करायचे? कोर्टाच्या की अल्लाहच्या? त्यातून शहाबानू निवाड्याची समस्या निर्माण झाली होती. राज्यघटनेनुसार स्थापन झालेल्या कोर्टाचे आदेश पाळायचे, की अल्लाहचे आदेश पाळायचे?

   मग जेव्हा दोन्हीत संघर्ष निर्माण झाला; तेव्हा मुस्लिम संघटनांनी कोर्टाच्या न्यायाला आव्हान दिले आणि त्यापुढे शरणागत होऊन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कायदाच बदलून टाकला. मुस्लिमांचे धर्मपालन घटना व प्रस्थापित कायदे, याच्यापेक्षा महत्वाचे असल्याचेच त्यातून सिद्ध झाले. सवाल एका शहाबानूच्या पोटगीचा किंवा त्यातल्या रकमेचा नव्हता. भारतातील मुस्लिमांसाठी अंतिम कायदा व अधिकार कोणाचा चालतो, याचा निवाडा व्हायचा होता. भारतीय घटनात्मक जीवनपद्धती, की इस्लामप्रणित ईश्वरी जीवनपद्धती असा तो संघर्ष होता. त्यात इथल्या घटनाधिष्ठीत सत्तेने इस्लामचे धर्मपालन घटनात्मकतेपेक्षा महत्वाचे असल्याचा कृतीतून निर्वाळा दिला. त्याचा अर्थ सय्यद इफ़्तिकार यांच्या विवरणातून सापडतो. देशाची घटना काहीही असो, कायदे काहीही असोत, इथल्या मुस्लिमांनी आपल्या धर्माचे काटेकोर पालन करताना भारतामध्ये आपली इस्लामिक व्यवस्था प्रस्थापित करून दाखवली. इथे ही इस्लाम धर्मपालनाची वस्तुस्थिती समजून घेतली, मग मुस्लिमांचे एकूण वर्तन आपल्याला गैरलागू वाटणार नाही. आपण अन्य धर्माप्रमाणेच इस्लामी धर्मपालनात ढिलाई चालू शकते; असे जे गृहित धरतो, म्हणून आपली गल्लत होते. तुम्ही अन्य जे कोणी मुस्लिमेतर आहात, ते धर्माच्या काटेकोरपणाबद्द्ल आग्रही नसाल, म्हणून मुस्लिमानेही आग्रही असू नये; अशी जी तुमची समजूत असते, त्या समजूतीचे तुम्ही बळी आहात. कायद्याने मुस्लिमांना धर्मपालनाचे स्वातंत्र्य दिले आहे तर त्या धर्मपालनात स्थानिक कायद्याची अडचण आणून चालणार नाही. धर्मपालनासमोर अन्य कायदे आपोआप दुय्यम होतात, हे लक्षात घेतले तर मुस्लिमांच्या वर्तनाचा बोध होऊ शकतो.  ( क्रमश:)
भाग  ( ४५ )  २९/९/१२

३ टिप्पण्या:

  1. देशाच्या घटने पेक्षा धर्माला अधिक महत्व देण्याची खर्च गरज आहे का? वरील उदाहरणात दिलेल्या शःबनुचे पुढे काय झाले? तिला मुस्लीम न्याय प्रमाणे पोटगी मिळाली का? आणि जर इथले कायदे पाळायचे नसतील तर इथल्या देशातल्या सुविधांवर ज्या सामान्य माणसाच्या आय कारवार विक्री कारवार स्थापलेल्या आहेत त्याचा फायदा तरी त्यांनी का घ्यावा? आज वेळ आणि काल हा २०१२ आहे अजूनही ईश्वरीय प्रणालीतच राहायचे हा हत्ती पण का करत आहात? कुठला हि समाज हा सुधारित नसतो तर विचारवंत लोक त्याला सुधारतात काळाबरोबर नेतात. हिंदू समाज सुधा अशा परिवर्तनातून गेला आहे. मग यांना हि अडचण का तर विचारवंत लोक पुढे येत नाही म्हणून.

    उत्तर द्याहटवा
  2. मुसलमानांकडून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर सातत्याने आघात होणे, हे भारतात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याचे लक्षण आहे ! पोलीस, राज्यकर्ते आणि त्यापाठोपाठ आता न्यायालये यांनीही हिंदूंच्या धर्मभावनांकडे दुर्लक्ष केल्यास हिंदूंनी कायदा हातात घेतल्यास नवल ते काय ?

    उत्तर द्याहटवा