सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

मुस्लिमांचा कर्दनकाळ ही प्रतिमाच उलटते आहे


   भारतामध्ये हिंदू म्हणून जो समाज आहे, तो संघटित धर्म म्हणुन काम करत नाही, की वागत नाही. पण एखाद्या क्षणी संयम सुटला, मग त्याची झुंड तयार होते. तेव्हा त्यांच्याकडे दंगलखोर म्हणुन बघितले जाते. पण अन्य वेळी तो कायम शांत व आपल्या व्यक्तीगत जीवनात रममाण झालेला असतो. त्याला धर्माच्या नावाने रस्त्यावर आणणे सहजशक्य नसते. याची कल्पना असल्यानेच इमाम बुखारी देशात टिकून राहिलेल्या धर्मनिरपेक्षतेचे श्रेय इथल्या हिंदू लोकसंख्येला देतात. मग त्यापैकीच वाढती लोकसंख्या मोदी या नावाला भुलू लागली असेल, तर तो गंभीर विषय नाही काय? मागल्या एका वर्षात अनेक वाहिन्या व वृत्तपत्रांनी ज्या देशव्यापी मतचाचण्य़ा घेतल्या त्यातून समोर आलेले आकडे काही सांगत आहेत. हे आकडे जसेच्या तसे खरे नसतील. पण ते दिशा दाखवणारे आहेत, हे विसरता कामा नये. त्यातले अनेक आकडे एकमेकांना छेदणारे आहेत. परस्पर विरोधी वाटणारे आहेत. पण त्या सर्वच मतचाचण्यांमध्ये एक समान घटक सातत्याने पुढे येतो आहे, त्याचे नाव आहे नरेंद्र मोदी. कुठल्याही वाहिनी वा वृत्तपत्राने घेतलेल्या मतचाचणीमध्ये सतत मोदींच्या लोकप्रियतेची कमान चढती दिसत आहे. देशातल्या मुस्लिमांना सतत मोदी या नावाचे भय घातले जात असताना, त्याचीच देशातील वाढती लोकप्रियता गंभीर विषय नाही काय? मग त्याचा विचार कोणी करायचा? त्यामागची कारणमिमांसा मात्र कुठलेच वृत्तपत्र वा वाहिनी करत नाही. त्याचे कारण त्यांना एकतर त्याचे गांभिर्य कळत नसावे किंवा सत्य सांगण्याचीच भिती वाटत असावी.

   आपल्या देशातले सेक्युलर राजकारण मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याभोवती भरकटत असते. तसेच आता हिंदूंच्या गठ्ठा मतांचे समिकरण बनू लागले आहे काय? एबीपी न्यूज या वाहिनीने केलेल्या मतचाचणीमध्ये ४२ टक्के लोकांनी मोदी यांना पंतप्रधान म्हणुन कौल दिला आहे तर अवघ्या २६ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना कौल दिला आहे. ज्या राहुलचा भावी पंतप्रधान म्हणून मागली चार वर्षे अखंड प्रचार चालू आहे, त्याला मोदींनी मागे टाकून मारलेली मुसंडी मोठी नाही काय? अवघ्या एका वर्षापुर्वी आणखी एका मतचाचाणीमध्ये मोदी व राहुल जवळपास सारख्या मतांवर दिसत होते. त्यातही राहुल आघाडीवर होते. पण अवघ्या वर्षभरात राहुलच्या मतांमध्ये पाचसहा टक्के घट झाली आहे, तर मोदी यांची लोकप्रियता दुपटीने वाढल्याचे आढळून आले आहे. अशा मतचाचण्या शेवटी लोकमताचे नेमके गणित सांगत नाहीत, असाही दावा असतो. पण ज्यांना लोकमताची नस कळली आहे असा दावा आहे, त्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही मोदींच्या बाबतीत बोलक्या आहेत. कालपरवाच दिल्लीच्या सरकारला असलेला पाठींबा ममता बानर्जी यांनी काढून घेतला, तेव्हा हे सरकार टिकणार की नाही असा प्रश्न विचारला जाता होता. तेव्हा मुलायम सिंग यांनी बिनशर्त मनमोहन सरकारला पाठींबा दिला. रस्त्यावर उतरून त्यांच्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महागाई, दरवाढीच्या विरोधात निदर्शने केली. पण सरकारला पाठींबा देताना त्यांचे बंधू व समाजावादी पक्षाचे प्रवक्ते रामगोपाल यादव काय म्हणाले? जातियवादी नरेंद्र मोदी यांना आजच निवडणुका झाल्यास लाभ मिळू शकतो. त्यापासून देशाला वाचवण्यासाठी आम्ही सरकार पडू देणार नाही. असे फ़क्त मुलायमच्या पक्षाचेच म्हणणे नाही.

   भाजपाचे सहकारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारही पुर्वाश्रमीचे समाजवादी आहेत. त्यांनाही पुढल्या वेळी मोदीच पंतप्रधान होण्याचा धोका दिसू लागला आहे. म्हणुन त्यांनी त्या नावाला आतापासूनच विरोध सुरू केला आहे. खुद्द कॉग्रेसही मोदीच पुढला भाजपाचा उमेदवार असेल असे वारंवार बोलतो आहे. याचा अर्थ इतकाच, की मतचाचण्यांचे जे आकडे समोर येत आहेत, त्यात खुपच तथ्य असले पाहिजे. म्हणूनच गुजरातबाहेर देशाच्या अन्य राज्यात मोदी यांची वाढती लोकप्रियता ही दखल घेण्यासारखी बाब आहे. मग असा सवाल निर्माण होतो, की अशी लोकप्रियता वाढण्याचे कारणच काय आहे? अजून तरी भाजपाने मोदी यांना आपल्या पक्षाचे किंवा आघाडीचे-एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केलेले नाही. स्वत: मोदी यांनीही आपल्याला पंतप्रधान व्हायचे आहे, असे जाहिरपणे बोलून दाखवलेले नाही. मग गुजरात बाहेरच्या लोकांचा त्यांच्याकडे ओढा कशाला आहे? हा ओढा अर्थातच हिंदू किंवा मुस्लिमेतर लोकांचा आहे, हे नाकरण्यात अर्थ नाही. देशातल्या मुस्लिमांमध्ये मोदीविषयी कमालीचा क्षोभ आहे. म्हणजेच मोदी यांची वाढती लोकप्रियता प्रामुख्याने हिंदू समाजात आहे, हे नाकारता येणार नाही. पण तिचे कारण काय? हिंदू समाजाला मोदी यांच्यासारखा नेता आवडावा असे कोणते गुण त्या माणसाकडे आहेत? त्याने असे काय मोठे कर्तृत्व गाजवलेले आहे? आणि समजा गाजवलेले असेल तरी त्याची माहिती या गुजरात बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचली तरी कशी? एका राज्याचा विकास व प्रगती करू शकणारा कर्तबगार मुख्यमंत्री देशाचा कारभार उत्तम चालवू शकेल, असे लोकांना का वाटावे? लोकांच्या अपेक्षा तरी काय असतात? एखाद्या नेत्याविषयी जनमानसात अशी लोकप्रियता कशामुळे निर्माण होते?

   इथे एक आणखी विरोधाभास लक्षात घेण्याची गरज आहे. देशातल्या संपुर्ण माध्यमांनी मोदी यांची विकृत प्रतिमाच गेल्या दहा वर्षात सातत्याने रंगवलेली आहे. तशीच लालूप्रसाद किंवा मुलायम, मायावती यांचीही काहीकाळ विकृत प्रतिमा रंगवण्यात आलेली होती. पण त्यात त्यांचा बळी पडला. मात्र मोदींना बदनाम करणे माध्यमांना शक्य झाले असले तरी त्यांची लोकप्रियता याच बदनामीने वाढवली आहे. ज्याचे इतके विकृत चित्र इतकी वर्षे रंगवले, तो बदनाम होण्याऐवजी अधिकच लोकप्रिय का व्हावा? की ज्याला माध्यमे गैरकृत्य म्हणून रंगवत होते, ते अन्य राज्यातील लोकांना गैरकृत्य वाटत नव्हते आणि म्हणूनच त्याच बदनामीने मोदी यांना लोकप्रिय बनवले आहे? आज माध्यमांनी मोदींचा जो चेहरा रंगवला आहे, तो मुस्लिमांचा कर्दनकाळ असाच आहे ना? आणि तोच गुजरातमध्ये बहुसंख्य लोकांना भावला होता, तसाच गुजरात बाहेरील हिंदू बहुसंख्य लोकांना भावतो आहे काय? त्याच भावण्याचे प्रतिबिंब मतचाचण्यांपधून पडत असेल का? विकास, उत्तम कारभार किंवा प्रगतीचा मोठा वेग; अशा कारणासाठी एखादा नेता मुख्यमंत्री लोकप्रिय होत असेल तर तो चिंतेचा विषय नाही. पण तो नेता कुणा एका समाज घटकाचा कर्दनकाळ म्हणून दुसर्‍या समाज घटकात लोकप्रियता संपादन करत असेल; तर ती नक्कीच चिंतनिय बाब आहे. त्याचाकडे केवळ निवडणुकीचे राजकारण किंवा निवडणुकीतले आकडे म्हणून बघणे मुर्खपणाचे आहे. ती सामाजिक चिंतेची बाब असते. आणि म्हणूनच विविध मतचाचण्यांमध्ये आढळणारी मोदी यांच्या लोकप्रियतेची बाब गंभीरपणे मिमांसा करण्यासारखी आहे, असे मी मानतो. दुर्दैव असे की नेमक्या त्याच गोष्टीवर कुठल्या वाहिनी वा माध्यमांनी चर्चाच करण्याचे टाळले आहे.  

   सेक्युलर माध्यमे किंवा विचारवंत त्याकडे भाजपाला सत्ता मिळणार, की सत्तेपासून भाजपा वंचित राहिल एवढ्य़ाच संकुचित नजरेने बघत असल्याचा तो परिणाम आहे. वास्तव तसे नाही. त्यापेक्षा ही गंभीर बाब आहे. गुजरात बाहेरील मोदींची वाढती लोकप्रियता त्यांच्याकडे विकासपुरूष किंवा उत्तम प्रशासक म्हणुन बघत असती तर तो राजकीय विषय असतो. पण त्या वाढत्या लोकप्रियतेचे मोठे प्रमाण मुस्लिमांचा कर्दनकाळ म्हणुन बघायचे असेल, तर तीच लोकप्रियता सामाजिक सहिष्णूतेचा गुंतागुंतीचा विषय होऊन जातो. अशी लोकप्रियता ही शांत व सोशिक वाटणार्‍या बहुसंख्य हिंदू समाजात कट्टरतेचे प्रमाण वाढत असल्याचे द्योतक असते. ज्याला शाही इमाम बुखारी सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचा रखवालदार म्हणतात; त्या हिंदूंच्या सोशिकतेला खिंडार पडत असल्याचे ते लक्षण आहे. सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद, संघ परिवार किंवा भाजपा व शिवसेना अशा हिंदूत्ववाद्यांकडे ज्या हिंदू समाजातील लोकांचा ओढा दिसत नाही, ते मोदींकडे वळत आहेत; असा त्याचा अर्थ होतो आणि त्याचा आणखी एक अर्थ असा, की ज्यांच्यावर सतत हिंदूत्वाचा आरोप होत आलेला आहे, त्यांच्यापेक्षा जहा्ल व आक्रमक अशा माणसाकडे या लोकप्रियतेचा ओढा दिसतो आहे. त्यांना अन्य हिंदूत्ववादी सौम्य किंवा निरुपद्रवी वाटतात आणि नरेंद्र मोदी खरे आक्रमक हिंदू वाटतात, असा त्याचा अर्थ आहे. मतचाचण्यांमध्ये वाढणारी मोदींची लोकप्रियता म्हणूनच अत्यंत गंभीर बाब आहे असेच मी मानतो. आणि त्याचा विचार मुस्लिमातील विवेकी व समजदार मंडळींनी करण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे संख्येची लोकशाही आहे आणि ज्या डावपेचांनी मुस्लिमांच्या मतांचे राजकारण खेळले जाते, त्याच डावपेचांनी मोदी संख्येचा पर्याय उभा करू बघत आसावेत. ही संख्येची लोकशाही सेक्युलर राज्यघटनेच्या आधारे काय काय चमत्कार घडवू शकते त्याची कल्पना कोणी केली आहे काय?    ( क्रमश:)
भाग   ( ४१ )      २५/९/१२

३ टिप्पण्या:

  1. mala ek sangayache aahe bhausaheb ki jar muslimani kahi kele tari chalte pan hinduni kahi kele tar to sahishnutecha bhang kasa hoto.......ani sarv channel vale faqt godhra hatyakandache boltat apanhi bolta pan koni vikas kelela nahi sangat mag parva zaleli dangal (Assam chi) kon kahich ka nahi bolat,malegaon la bombsfot zala ajun sadhvi pragnya sing doshi nahi tari jy prakare channel vale cover kartat ti batami ani MUMBAI,AHMEDABAD,etc ashi kititari cities aahet jithe bhartiy muslimancha hat aahe tynchya navane koni oradat nahi....faqt nishedh......ka?
    hinduni kay faqt sosayache Sorry te shakya nahi ani jar koni neta amhala jar guide karat asel tar amhi nakki jau.....kasabch kay,afjal guruch kay,faqt te terroristch aahet mhanun gappa basanar koni ka evdhy tidine lihit nahi tyanchyvar........karan to muslim.......thu aslya rajkarnavar ani patrakaritevar.

    उत्तर द्याहटवा
  2. pan ya lekha madhe Naredra Modi yanchya lokpriyateche karan spastha kele nahi ahe, mhanaje bhausaheb mhantat tya pramane muslim kardankaal mhanun te prasidha ahet ka vikas purush mhanun? mazya mate vikas purush, ek nirnay ghenara manus mhanun te jast prasidh ahet. ekhada nirnay ghetala ki tyachi poorna javabdari te ghetat.. mag bhale to nirnay chukicha ka ase na..
    aaj khare tar aaplyakade nirnay ghyayalach sagale ghabartat aani tyatun bhrashtacharyacha udgam hoto, aani Gujrat ni kami karun dakhavale ahe.
    hech tyanchya lokpriyateche karan.

    उत्तर द्याहटवा
  3. फाळणीच्या वेळीच जर आंबेडकर व सावरकर सांगत होते तशी लोकसंख्येची अदलाबदल करून मुस्लीम पाकिस्तानात पाठवले असते तर हि समस्या आज आली नसती . मोहनदास गांधींच्या भम्पक हट्टामुळे (हिंदू व मुस्लीम दोघांचाही नेता बनण्याच्या ) मुस्लीम देशात राहिले आणि भरपूर मुले जन्माला घालून त्यांची % वारी वाढवली

    उत्तर द्याहटवा