रविवार, २ सप्टेंबर, २०१२

नरेंद्र मोदींची लोकप्रियता हे सेक्युलर पाप



  माणुसकी हरवून बसलेली लोकसंख्या गुजरातभर धुडगुस घालू लागली. माणुसकीच रसातळाला गेली. याला कोण जबाबदार होता? सगळी माणसेच आपली माणूसकी गमावून बसली होती. त्यातली काही श्वापदे होती तर काही त्यांच्या तावडीत सापडलेली सावजे होती. त्या दिर्घकाळ चा्ललेल्या दंगलीत मुस्लिम मोठ्या संख्येने मारले गेले हे सत्यच आहे. पण कमी प्रमाणात का होईना, तिथे हिंदूही दंगलीत मुस्लिमांच्या हिंसेचे बळी झालेले आहेत. म्हणजे जिथे शक्य होते, तिथे मुस्लिमही हिंसाचार करत होते. एकू्णच सग्ळा गुजराती समाज माणु्सकी गमावून बसला होता. जंगलचा कायदा तिथे राज्य करीत होता. मग सरकार काय करीत होते? पोलिस काय करत होते? निरपराध मारले जात होते आणि सरकार काहीच करत नव्हते? निदान माध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा तर सरकार निष्क्रिय होते. म्हणजेच ज्यांना दंगल करायची होती किंवा हिंसाचार करायचा होता त्यांना नरेंद्र मोदी सरकारने मोकाट रान दिले होते. हा आजवर सतत झालेला आरोप आहे. पोलिसांना कारवाई व बंदोबस्त करण्यापासून रोखून मोदी यांनीच मुस्लिमांची कत्तल होऊ दिली, असा त्यांच्यावर सतत होत राहिलेला आरोप आहे. तो आरोप सातत्याने होत आलेला आहे. आणि नुसता राजकीय विरोधकांनी केलेला तो आरोप नाही, तर सेक्युलर माध्यमे तो आरोप गेली दहा वर्षे सातत्याने करत आहेत. वादासाठी तोच आरोप मान्य केला तर मग परवाच्या मुंबईतील दंगलीबद्दलही तेच म्हणत येईल ना? घटनास्थळी पोलिसांचा फ़ौजफ़ाटा हजर असतानाही त्यांनी दंगलखोरांना मोकाट हिंसाचार करू दिला आहे ना? एका वरिष्ठ अधिकार्‍याने एका दंगेखोराला पकडले असताना त्यालाच शिव्या हासडून पोलिस आयुक्त अरुप पटनाईक दंगेखोराला सोडून देण्यास फ़र्मावतात; असे कॅमेराने टिपलेले आहे. ज्याच्यासाठी २००२ मध्ये नरेंद्र मोदी आरोपी मानले जातात, तशाच वागण्यासाठी मुंबईतले पोलिस आयुक्त आणि इथले गृहमंत्री गुन्हेगार नाहीत काय? दोघांच्या वागण्यात फ़रक काय? एक इवलासा पण तेवढाच भयंकर फ़रक आहे. तिथे निदान पोलिसांवर हल्ला झालेला नव्हता. इथे मुंबईत पोलिसांवरच नव्हेतर महिला पोलिसांच्या अब्रुवर हल्ला झालेला आहे. तरीही पोलिस आयुक्तच त्या हल्लेखोरांना प्रोत्साहन देत आपल्या अधिकार्‍यांचे हात बांधून ठेवत असल्याचा पुरावा आहे. मग मोदी आणि महाराष्ट्रातले राज्यकर्ते यांच्यात फ़रक तो कुठला? की त्यांना महाराष्ट्रातही गुजरातसारख्या दंगली घडवायच्या होत्या?

   गुजरातमध्ये दंगली पेटल्या आणि त्यात पोलिसांनी दंगेखोरांना मोकाट रान दिले म्हणुन मोदी गुन्हेगार असतील तर तेवढेच गुन्हेगार मुंबईचे पोलिस व इथले सेक्युलर सरकारही गुन्हेगार नाही काय? मग सेक्युलर माध्यमे गप्प कशी? की त्यांच्या अपेक्षा होत्या तशा मुंबईत बेफ़ाम दंगली पेटल्या नाहीत; म्हणुन सेक्युलर माध्यमे गप्प आहेत? दोन ठिकाणी निकष वेगळे कसे लागतात? इथे पोलिसांनी तोंड दबून बुक्क्याचा मार खाल्ला तर तो संयम होता. जाळपोळ होताना पोलिस निमूट राहिले तर तो संयम असतो. महिला पोलिसांवर हात टाकला गेला तरी गप्प बसणे समजूतदारपणा असतो. पण गुजरातमध्ये तसेच पोलिस वागले तर तो गुन्हा का असतो आणि दंगलीला दिलेले प्रोत्साहन का असते? हा काय विरोधाभास आहे? की या देशात प्रत्येक राज्यासाठी व प्रत्येक पक्षाच्या सरकारसाठी वेगवेगळे कायदे व निकष आहेत? नसतील तर गेली दहा वर्षे मोदी यांच्यावर शरसंधान करणार्‍या सेक्युलर माध्यमांनी वाचा आताच का बसली आहे? त्यांनी अजून मोदी आणि आबा पाटिल वा सेक्युलर सरकार यांची तुलना का केलेली नाही? आबा पाटलांना मुंबईचे मोदी का म्हटलेले नाही?

   आणि मोदी यांच्यावरचा आरोप काय आहे? त्यांनी दंगलखोरांना मोकाट रान दिले. त्यांनी काय करायला हवे होते? दंगा किंवा हिंसा करतात, त्यांच्यावर गोळ्या झाडायला हव्या होत्या काय? तसे असेल तर मुंबईतही पोलिसांनी ११ ऑगस्ट रोजी तेच करायला हवे होते ना? पण दोघांनी नेमकी एकच गोष्ट केली आहे. त्यांनी हिंसा रोखण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. तसे केल्यास परिस्थिती हाताबाहेर गेली असती असे आता सांगितले जाते. गोळ्या झाडणे हा एकमेव पर्याय नसतो. परिस्थिति नाजूक असते तेव्हा संयमाने हाता्ळली पाहिजे, असाही् युक्तीवाद केला जातो. फ़क्त हे सेक्युलर शहाणपण मुंबईत दंगा झाल्यावर सुचलेले आहे. गुजरातमध्ये मात्र पोलिसांनी संयम दाखवला होता तो गुन्हा होता. मुंबईत त्याच गुन्ह्याला संयम असे सोज्वळ नाव दिले जाते. माझा मुद्दा तोसुद्धा नाही. माझा मुद्दा आहे तो यातली सेक्युलर माध्यमांची व सेक्युलर विचारवंतांची चिथावणीखोर भूमिका. एकीकडे हीच माध्यमे जमाव भयभीत होऊन आक्रमक व्हावा अशी परिस्थिती निर्माण करतात आणि दुसरीकडे ती दंगल माजल्यावर त्या आगीत तेलही ओतण्याचे काम करत असतात. हिंदू मुस्लिम समाजात तणाव आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी माध्यमे मुद्दाम प्रयत्नशील असतात; असा माझा उघड आरोप आहे. म्हणूनच त्यात वेळ आली मग गुलाम वस्तानवी किंवा जाहिरा शेख यांचाही बळी दिला जात असतो.

   सवाल आहे तो लोकांमध्ये भयगंड निर्माण करण्याचा. ते पाप मुळात सेक्युलर माध्यमेच करत असतात. माध्यमे जो भयगंड तयार करतात, त्यातून जी स्फ़ोटक मनस्थिती मुस्लिम समाजात तयार होते, त्याचा गैरफ़ायदा मग त्यांच्यातले माथेफ़िरू किंवा चिथावणीखोर घेतात. आणि म्हणूनच मी त्यांना दुय्यम गुन्हेगार मानतो. कारण स्फ़ोटक मनस्थिती नसेल तर कोणी चिथावणीखोर त्याचा लाभ उठवू शकत नाही. हिंदू समाज आपल्या धर्मभावनांविषयी जेवढा हळवा नाही, त्याच्या कित्येक पटीने मुस्लिम समाज आपल्या धर्मभावनांबद्दल नाजूक आहे. म्हणुनच किंचितही चिथवणी मिळाली तरी मुस्लिम रस्त्यावर येतात हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच समाजात शांतता नांदवायची असेल, तर मुस्लिमांच्या धर्मभावनांशी संबंध असलेली माहिती बातमी म्हणून देताना माध्यमांनी खुप काळजी घेतली पाहिजे. पण इथेच माध्यमे नेमकी उलटी भूमिका घेताना दिसतात. मुस्लिमांच्या भावनांना हात घालणार्‍या बातम्या ठळकपणे दिल्या जातात आणि हिंदूच्या धर्मभावना दुखावणार्‍या गोष्टी मात्र मुद्दाम लपवल्या जातात. परवाचीच गोष्ट घ्या. बाकी दंगलीच्या बातम्या देताना अमर जवान स्मारकाच्या विटंबनेची बातमी लपवण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला ना? भावना दुखावण्याची इतकीच माध्यमांना चिंता असेल तर त्यांनी मुस्लिमांच्या धर्मभावना भडकणार्‍या बातम्यांना वेसण घा्तली पाहिजे. पण तसे कधीच होणार नाही, होत नाही. कारण स्पष्ट आहे. सेक्युलर माध्यमे व सेक्युलर राजकारण हे मुस्लिमांना भयभित ठेवूनच चालु शकते. कारण भयभीत मुस्लिम एकजीव होतो आणि त्यातून मतांचा गठ्ठा तयार होत असतो. त्या गठ्ठ्याच्या बळावर मतांचे राजकारण करणे सोपे जाते. हिंदू आक्रमकतेची भिती दाखवली, मग मुस्लिमांची मते एक गठ्ठा मिळवता येत असतात.

   गुजरातमध्ये म्हणूनच मुस्लिमांना सातत्याने मोदींचे भय दाखवून बाजूला ठेवण्यात आले आहे. पण त्याचा आता विपरित परिणाम झाला आहे. मोदींना बदनाम करून मुस्लिमात भयगंड निर्माण करण्याच्या नादात गुजराती माणसालाच दंगेखोर वा खुनी ठरवला गेल्याने, मोदींनी त्यालाच गुजराती बदनामी म्हणत स्वत:भोवती गुजराती अस्मितेचे जाळे विणले आहे. तेवढेच नाही तर आता त्यातून हिंदूंचा एकमेव तारणहार; अशी एक प्रतिमा मोदींनी उभी करून घेतली आहे. परिणामी त्यांच्याकडे राष्ट्रीय पर्याय म्हणुन बघितले जाऊ लागले आहे. त्याचे श्रेय मोदी वा त्यांच्या समर्थकांनी भले आपल्या विकासकामाला देवो. पण वास्तवात मोदींच्या या नव्या भव्य प्रतिमेचे खरे श्रेय सेक्युलर माध्यमे व सेक्युलर मुर्खपणालाच द्यावे लागेल. कारण त्यांनी गेल्या दहा वर्षात जो भयगंद गुजरातमध्ये मुस्लिम लोकसंख्येत निर्माण केला, त्यातून तिथे कसली गडबड होऊ शकली नाही आणि त्याचे आयते श्रेय आज देशभरात मोदींना मिळते आहे. दुसरीकडे देशभरची अस्वस्थ हिंदू मानसिकता मोदींकडे आशेने बघू लागली आहे. देशात मुस्लिम जेवढे मोदी विरोधी होत जातील व भाजपावर जेवढे आरोप होतील, तेवढी अस्वस्थ हिंदू लोकसंख्या मोदींच्या भोवती जमा होत चालली आहे. त्याला मोदी हा मोठाच आक्रमक एकमेव हिंदू नेता असल्याचे वाटू लागले आहे. म्हणुनच आता २०१४ च्या निवडणुकीत मोदी हेच कॉग्रेस पुढले आव्हान असेल, असे उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. काही वाहिइन्या व नियतकालिकांनी घेतलेल्या चाचण्या तेच सांगता आहेत. काही प्रमाणात मुस्लिम आक्रमकतेच्या विरोधात हिंदूंच्या मनात जी असुरक्षेची भावना वाढीस लागली आहे, यांच्या मतांचा गठ्ठा मोदींच्या बाजूने उभा रहात चालला आहे. हे पाप असेल तर ते सेक्युलर शहाण्यांचे पाप आहे. आणि सामान्य मुस्लिमच त्या सेक्युलर मुर्खपणाचे बळी होत चालले आहेत असेच मी मानतो. ( क्रमश:)
भाग   ( १९ ) ३/९/१२



1 टिप्पणी:

  1. उत्तम आणि परखड विश्लेषण, आपण जर आजुबाजुला नजर टाकली तर हे नक्कीच लक्षात येते की मोदींचा हिंदू जनाधार वाढला आहे. त्याचे कारणच सेक्युलर माध्यमांचे बोंबलने आहे. यांच्या शिवाय मोदींना एवढी प्रसिद्धी मिळालीच नसती. विकासाची कामे करणारे बरेच मुख्यमंत्री मोदींच्या काळात होते, आहेत, परंतू त्यांची एवढी प्रशिद्धी झाली नाही. उदहारणच द्यायचे झालेतर शिवराज सिंग चव्हाण, नितीश कुमार यांचे देता येईल. मनोहर पार्रीकर हेही चांगले राज्य चालवत आहेत. मोदींचा करिश्मा हा विकासपुरष म्हणून नाही तर हिंदू ह्रदय राजा (सम्राट हा शब्द बाळासाहेबांसाठी राखीव आहे) असाच आहे. मोदींना गुजरात मधे किंवा भारतात जे यश मिळाले आहे ते माध्यमांनी तयार केलेल्या त्यांच्या हिंदूंचा रक्षणकर्ता या बिरुदावलीत सामावलेले आहे. ज्या दिवशी त्यांची ही प्रतिमा डागाळली जाईल, त्याच दिवसापासून त्यांच्या पतनाला सुरुवात झालेली असेल.

    उत्तर द्याहटवा