गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१२

म्यानमार आणि सिरियातील मुस्लिमात फ़रक काय?


   माझ्या लिखाणाच्या दरम्यान मी गुजरातच्या दंगलीचा उल्लेख केला होता. नेहमी गुजरातच्या दंगलीचा उल्लेख असाच येतो, की ऐकणार्‍याचा तिथे फ़क्त मुस्लिमच मारले गेले असा समज व्हावा. पण ती वस्तुस्थिती नाही. तिथे पावणे तिनशे हिंदूही बळी गेले आहेत. म्हणजेच जिथे कुठे मुस्लिम बहुसंख्य होते तिथे हिंदूंनाही दंगलीचे बळी व्हावे लागले; एवढाच मुद्दा मला समोर आणायचा होता. ते वाचून एका हिंदीत बोलणार्‍या मुस्लिम वाचकाचा मला उपरोधिक फ़ोन आला होता. आजवर सव्वाशे दिडशे मुस्लिम वाचकांनी मला फ़ोनवर प्रतिक्रिया दिल्या. त्यापैकी हा एकच असा होता, की त्याने माझ्या लिहिण्याच्या हेतूवर शंका घेतली. मला तिथे हिंदू मारले गेले याचे दु:ख होते आहे, पण मुस्लिम मारले गेले याचे दु:ख नाही, असे त्याला सुचवायचे होते. त्यातून मी हिंदूंचेच दु:ख मांडतो आहे असेही त्याला सुचवायचे होते. असे काही एकतर्फ़ी किंवा पक्षपाती आपल्याकडून लिहिले जाऊ नये, याची मी आजवर नेहमी काळजी घेतली आहे. त्यामूळेच मी त्या मुस्लिम वाचकाशी जास्त वेळ संवाद करून चर्चा केली. त्यालाही अनेक प्रश्न केले आणि त्याच्याकडे माझ्या शंकांची उत्तरे मागितली. त्याचे प्रश्न किंवा त्याने माझ्याबद्दल घेतलेली शंका, हाच आजचा माझ्या लेखाचा विषय आहे. त्याने अशी शंका माझ्यावर घेताना किंवा तसे बोलताना काही लबाडी केली, असे मी म्हणणार नाही. अत्यंत निरागसपणे त्याने आक्षेप घेतले आहेत, याची मला खात्री आहे. कारण रस्त्यावर येणार्‍या बहुतांश मुस्लिमांची आज तीच मानसिकता झाली आहे. त्यात त्यांचा दोष नसून इथल्या पाखंडी सेक्युलर राजकारणाचा दोष अधिक आहे. सेक्युलर भारतात मुस्लिमांच्या वर्तनाबद्दल किंवा आक्षेपार्ह कृतीबद्दल प्रश्न विचारले जात नाहीत, त्यातून निर्माण झालेली ती मानसिकता आहे. त्यामुळेच एका कुठल्या वृत्तपत्रात किंवा लेखामध्ये असे प्रश्न विच्रारले गेल्यास, सामान्य मुस्लिम चकित किंवा विचलित झाल्यास नवल नाही. धार्मिक विषयावर लिहिले व बोलले जाते, तेव्हा केवळ हिंदू समाज किंवा त्यांच्या धर्मश्रद्धा यावरच टिकात्मक बोलावे, पण सेक्युलर देशात मुस्लिमांच्या चुका व गैरवर्तन याबद्दल बोलायचेच नसते, अशी जी समजूत सेक्युलर पाखंडाने तयार केली आहे, त्याचे बळी मुस्लिमसुद्धा आहेत. म्हणुनच मी इथे जे प्रश्न उपस्थित करतो, तेव्हा मुस्लिम बांधव विचलित होणे स्वाभाविक आहे. पण दोष त्यांचा नसून त्यांच्यात अशी समजूत निर्माण करणार्‍यांचा तो दोष आहे.

   ११ ऑगस्टचीच गोष्ट घ्या. माध्यमांच्या तीन ओबी व्हॅन मुस्लिम गुंडांनी जाळल्या होत्या. पण त्याला माध्यमांवरचा हल्ला म्हणून कुणी त्यावर काहूर माजवले नाही. शिवसेना, छगन भुजबळ किंवा अन्य कुठल्या राजकीय कार्यकर्त्यांनी थोडीशी तोडफ़ोड केल्यास किंवा कठोर भाषा वापरल्यास, आपल्या देशातील माध्यमे रान उठवतात. तीच माध्यमे त्यांच्यावरच हिंसक हल्ला होऊनही मुस्लिम मोर्चा व गुंडगिरी यांच्याबद्दल गप्प बसली ना? मग ती गुंडगिरी करणार्‍या किंवा त्यांच्याविषयी सहानुभूती असणार्‍यांना काय वाटेल? आपण मनमानी करणे हाच आपला विशेषाधिकार आहे, असेच मुस्लिमांना वाटणार ना? आपल्याला पोलिस रोखू शकत नाहीत, की कोणी आपल्यावर टिका करू शकत नाहीत; अशी त्यांची समजूत झाली, तर त्यांना दोष देता येणार नाही. मग एके दिवशी त्यांना होणारी चुक दाखवली तर ते चकित होणारच ना? म्हणूनच ज्याने मला अशी शंका विचारली, त्याला मी दोषी मानत नाही. मग मी त्याला काही प्रश्न विचारले, तेव्हा तो बिचारा निरुत्तर झाला. आज त्यातलाच एक प्रश्न मी इथे विचारणार आहे. आझाद मैदानावरील मोर्चा आसाममधील मुस्लिमांवर झालेल्या अन्यायासंबंधीचा होता, तसाच तो म्यानमार येथील मुस्लिम हत्याकांडाबद्दल होता. मुस्लिमांना अन्य प्रांतातील किंवा अन्य देशातील आपल्या मुस्लिम बांधवांवर अन्याय होत असेल तर त्याविषयी सहानूभूती असण्यात मला काही गैर वाटत नाही. तसे हिंदू किंवा ख्रिश्चन समाजात दिसत नसले म्हणून मुस्लिमांनीही आपल्या भावनांना मुरड घालावी असा माझा अजिबात आग्रह नाही. पण त्यात निवडक प्रवृत्ती असायचे कारण नाही. त्यात पक्षपात असू नये. म्हणजे असे, की जेवढे अगत्य मुस्लिम संस्था व संघटना म्यानमार किंवा आसामविषयी किंवा तिथल्या मुस्लिम बांधवांविषयी दाखवतात, तेवढेच त्यांनी अन्य देशातल्या किंवा काश्मिरातल्या मुस्लिम बांधवाबद्दल दाखवायला नको का?

   याचा अर्थ इतकाच, की म्यानमारमध्ये मुस्लिमांच्या वस्त्या जाळल्या किंवा मारहाण होत असेल म्हणून भावना दुखावत असतील; तर तेवढ्य़ाच हळव्या भावना सिरिया किंवा सुदान डारफ़ोर येथील मुस्लिमांवरील अत्याचारासाठी हळव्या व्हायला हव्या ना? की म्यानमार आणि डारफ़ोर-सिरियातील मुस्लिमांत काही फ़रक आहे? आज घडीला काश्मिरातून साडेचार लाख हिंदू पळून आल्याने जवळपास काश्मिरच्या खोर्‍यात सर्वच लोकसंख्या मुस्लिमांची उरली आहे. त्यामुळे तिथे जे घातपात होतात, त्यात मारले जाणारे सर्वच बळी मुस्लिमांचेच आहेत. मग त्या हत्याकांड व आसामच्या हत्याकांडात काय नेमका फ़रक आहे? ज्यांना आसामच्या मुस्लिम बांधवांचा कळवळा आहे, त्याच मुस्लिम नेते व संघटनांना काश्मिरी मुस्लिमांच्या घातपातातील मृत्यूबद्दल काडीमात्र दु:ख कसे होत नाही? म्यानमार प्रमाणेच सिरिया सुद्धा परदेशच आहे. सिरियातही सरकारी अत्याचारात मुस्लिमांचाच बळी पडत आहे. मग त्याबद्दल रझा अकादमी किंवा तत्सम संघटनांनी कधी मोर्चा काढला आहे काय? किंबहूना सिरियात जेवढे मुस्लिम बांधवाचे बळी पडले आहेत, त्याच्या तुलनेत म्यानमार मधील मुस्लिमांच्या बळीची संख्या कमीच असेल. पण इथे उमटणार्‍या मुस्लिम संघटनांच्या वा समाजाच्या प्रतिक्रिया भिन्न आहेत. म्यानमारबद्दल रस्त्यावर उतरून जाळपोळ हिंसाचारापर्यंत मजल मारणार्‍या मुस्लिम संघटना; सिरियाबद्दल निषेधाचा साधा सुरही काढत नाहीत. मग हकनाक मरणार्‍या वा मारल्या जाणार्‍या मुस्लिम बांधवांसाठी आम्ही रस्त्यावर आलो; हा त्यांचा दावा कितपत खरा मानायचा? म्यानमार व सिरियातील मुस्लिमात कोणता फ़रक आहे ते तरी सांगावे. की सिरियातील मरणारे मुस्लिम बांधव गुन्हेगार आहेत आणि त्यांना तिथल्या सत्तेने ठार मारणे योग्यच आहे; असे मुस्लिम संघटनांना म्हणायचे आहे काय? काश्मिरमध्ये घातपातात मरतात ते मुस्लिम गुन्हेगारच आहेत आणि म्हणुनच आसामप्रमाणे त्यांच्यासाठी मोर्चा वगैरे काढायची मुस्लिम नेते संघटनांना गरज वाटत नाही, असे समजायचे काय?

   खरे तर इथल्या माध्यमांनी असे प्रश्न रझा अकादमी किंवा मुस्लिम नेते, विचारवंतांना विचारले पाहिजेत. पण इथली माध्यमे कुठलेही मुस्लिम संबंधातले प्रश्न विचारायला घाबरतात असेच म्हणायला हवे. कुणा हिंदूत्ववादी संस्था संघटनेच्या नेत्याला दमात घेताना पुरूषार्थ दाखवणारे निखिल वागळे किंवा प्रकाश बाळ यांच्यासारखे अतिशहाणे, कधी हा प्रश्न मुस्लिम नेत्यांना का विचारत नाहीत? शाहिद सिद्दीकीसारख्या सेक्युलर मुखवटा पांघरलेल्या पत्रकार संपादकाला हा प्रश्न किंवा हा फ़रक, का विचारला जात नाही? मुस्लिमांच्या बंधूभावाची तीव्र भावना खरी असेल तर तीच भावना सिरिया किंवा डारफ़ोर येथील मुस्लिमांवरील अत्याचाराच्या वेळी का थंड पडते? त्याचा उल्लेखही मुस्लिमांच्या आवेशात का दिसत नाही? पॅलेस्टाईन किंवा इस्त्रायलमधील सरकारी अत्याचाराबद्दल तावातावाने बोलणारे भारतीय मुस्लिम नेते, सिरीयातील सरकारच्या मुस्लिमांवरील अत्याचारबद्दल मुग गिळून गप्प का बसतात? त्याची कारणे सांगितली जात नसतील किंवा त्याबद्दल मौन पाळले जात असेल, तर मग त्यांच्याच म्यानमार संबंधातील भावना तरी खर्‍या कशाला मानायच्या? एका भावावरील ह्ल्ल्याने विचलित होणारा दुसर्‍या भावाच्या अत्याचाराविषयी अगदी शांत रहातो; तेव्हा त्याच्या बंधूभाव व भावनांविषयी शंका वाटणारच ना? अर्थात सामान्य भारतीय नागरिकाला त्याबद्दल काही फ़ारसे ठाऊक नसते. पण जे वाहिन्यांवर चर्चा करायला बसतात, किंवा लेखणी घेऊन विद्वत्ता पाजळतात, त्यांना यातले सर्व ठाऊक असते. मग त्यांनी हे प्रश्न विचारायला नको का? उठसुट महाराष्ट्राला हे समजले पाहिजे, असे पोकळ दावे करणार्‍या निखिलने हे प्रश्न मुस्लिम नेत्यांना का विचारलेले नाहीत? सिरिया व म्यानमार अशा दोन्ही परदेशात मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत व मुस्लिमच मारले जात आहेत. मग रझा अकादमी वा अन्य मुस्लिम नेत्यांच्या त्या दोन घटनांवरील प्रतिक्रियेमध्ये का फ़रक असतो? दोन्हीकडे हिंसाच चालू आहे आणि दोन्हीकडे मुस्लिमच बळी आहेत. मग त्या हिंसेतला फ़रक कोणता आहे? मोठाच रहस्यमय प्रश्न आहे ना? त्याने उत्तर मुस्लिम नेते देत नसतील तर ते आपण शोधले पाहिजे. कारण त्याच नेत्यांनी भडकवलेल्या भावनांचे परिणाम इथे आपल्याला आझाद मैदान परिसरात भोगावे लागत असतात. त्या रहस्याला उद्या हात घालू.  ( क्रमश:)
  भाग  ( ३० )   १४/९/१२

1 टिप्पणी:

  1. You are absolutely right. Secular faundamentalists need to be exposed continuously till they stop their communal propoganda.
    Then only Hindu and Muslim communities can live peacefully in this nation.

    उत्तर द्याहटवा