शनिवार, ४ जानेवारी, २०१४

दिल्लीतली ‘आप’त्ती


   आज जसा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या यशावर कौतुकाचा वर्षाव चालू आहे, तसाच अठ्ठावीस वर्षापुर्वी डॉ. दत्ता सामंत यांच्या कामगार आघाडी पक्षाचा मुंबईत कौतुक सोहळा चालू होता. त्यांच्या यशाची जी कारणे होती; त्याचा कोणी शोध घेतला नाही, की त्यांच्या संघटनात्मक बळाचा कोणी विचार करायला तयार नव्हते. तेव्हा वाहिन्यांचा सुळसुळाट आजच्यासारखा नव्हता. पण जी छापील माध्यमे होती, त्यांनी आजच्या केजरीवाल यांच्याप्रमाणेच सामंतांना डोक्यावर घेतलेले होते. त्याला अर्थातच सामंतांचे यश कारण नव्हते, किंवा त्यांनी ज्या कॉग्रेसप्रणीत राजीव लाटेला रोखले, त्यालाही महत्व नव्हते. पत्रकारांना भावले होते ते वेगळेच काही होते. सामंत यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या लागोपाठच्या निवडणूकीत शिवसेनेला तिच्या बालेकिल्ल्यातच गारद करून टाकले होते. त्यामुळेच तात्कालीन सेक्युलर पत्रकार माध्यमांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या होत्या. सामंतांच्या त्या झंजावातामध्ये शिवसेना कशी वाहून गेली, त्याचा आनंद त्या पत्रकार विश्लेषकांच्या पोटात मावत नव्हता. म्हणूनच तो वृत्तपत्रातून दुथडी भरून वाहत होता. ज्या गिरणगावात दोन दशकांपुर्वी शिवसेनेचा उदय झाला आणि पुढल्या काळात तिथून तथाकथित डाव्या विचारांच्या पक्षाचे उच्चाटन झाले. गिरणगाव शिवसेनेचा बालेकिल्ला झाला, त्याने विचलित झालेल्यांना तिथे तितक्याच हाणामारीची कुवत दाखवणार्‍या सामंतप्रणित कामगार आघाडीच्या विजयाने उकळ्या फ़ुटलेल्या होत्या. त्यात डिसेंबर १९८४ अखेरीस सामंतांनी मध्य दक्षीण मुंबई मतदारसंघातून लोकसभेपर्यंत मजल मारली होती आणि दोनच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्याच भागातून त्यांचे तीन आमदार विधानसभेत निवडून आलेले होते. शिवाय अनेक मतदारसंघात त्यांनी शिवसेनेला मागे टाकून दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवली होती. सहाजिकच शिवसेना संपली; याचाच माध्यमातील अनेकांना आनंद झालेला होता. थोडक्यात या पत्रकार विश्लेषकांचा आनंद वा त्यांचे मतप्रदर्शन वस्तुस्थितीचे वर्णन करणारे नव्हते, तर त्यांच्या आकसाचे प्रतिबिंब त्यात पडलेले होते. याचा साधा अर्थ इतकाच होता, की पत्रकार व सामंतांचे कौतुक करणारी माध्यमे तेव्हा मिमांसा करण्यापेक्षा दिशाभूल करीत होती. लागोपाठ दोन निवडणूकात शिवसेनेचा दारूण पराभव करून सामंतांच्या कामगार आघाडीने सेनेच्या बालेकिल्ल्यातच मोठे यश मिळवले असेल, तर त्याला दिशाभूल का म्हणायचे? हा पत्रकार विश्लेषकांवर अन्यायच नाही काय?

   आधी आपण त्या अठ्ठावीस वर्षापुर्वीच्या राजकीय विश्लेषणाचे तथ्य तपासून बघुया. तेव्हाची लोकसभा निवडणूक झाली, ती इंदिरा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर झाली होती. ३१ आक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांना त्यांच्या पंतप्रधान निवासातच त्यांच्याच दोन विश्वासू शीख अंगरक्षकांनी अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारलेले होते. त्या भयंकर घटनेने अवघा देश हबकला होता. सहाजिकच विनाविलंब त्यांच्या जागी त्यांचेच पुत्र राजीव गांधी यांना राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी शपथ देऊन पंतप्रधान पदावर बसवले होते. दिल्लीत तर भीषण दंगल उसळली होती. कॉग्रेसच्या नेत्यांच्याच पुढाकाराने वस्तीवस्तीत शीखांचा राजरोस नरसंहार सलग तीन दिवस चालू होता. राजीव गांधी त्यावर म्हणाले, की मोठा जुना वृक्ष उन्मळून पडला मग धरणीला हादरे बसतातच. पण त्यांच्या त्या भयंकर चिथावणीखोर विधानातील हिंसेचे प्रोत्साहन कोणाला दिसले नाही. त्यांनी तात्काळ लोकसभेच्या निवडणूकांची घोषणा केली आणि त्याच सहानुभूतीवर स्वार होऊन चारशे जागा जिंकल्या होत्या. पुढली निदान दोनचार वर्षे तरी कोणी त्या नरसंहार वा दंगलीबद्दल अवाक्षर काढले नाही. ती लाट तशीच महाराष्ट्रातही दिसली होती आणि त्यात सर्वच कॉग्रेस विरोधक वाहून गेलेले होते. पण त्याच लाटेवर मात करून मुंबईत दत्ता सामंत लोकसभेत निवडून आलेले होते. ४८ पैकी राज्यातल्या ४३ जागा कॉग्रेसने जिंकल्या होत्या. अपवाद होता मुंबईत डॉ. सामंत, कोकणात मधू दंडवते, बारामतीमध्ये शरद पवार आणि औरंगाबादेत डोणगावकर पाटिल इतकाच. एक जागी उमेदवाराच्या मृत्यूमुळे मतदान रोखले गेले होते. त्यापैकी सामंतांचे यश त्यांच्या दिर्घकालीन गिरणी संपाचे होते. १९८२ सालात त्यांनी आरंभलेल्या गिरणी संपाने अवघा गिरणगाव देशोधडीला लागला होता. त्याला कॉग्रेसचे सरकार जबाबदार असल्याच्या भावनेने इंदिरा हत्येनंतरही इथला मतदार सामंतांच्याच मागे राहिला आणि मुंबईच्या अन्य जागीही सामंतांचे उमेदवार चांगली टक्कर देऊ शकले. त्यांच्या तुलनेत अन्य विरोधी पक्ष खुपच मागे पडले होते. त्याच गिरणगावात असलेल्या मध्य दक्षीण व उत्तर अशा दोन्ही जागी भाजपाच्या मदतीने उभे असलेले शिवसेनेचे वामनराव महाडीक व मनोहर जोशी कुठल्या कुठे फ़ेकले गेले होते. त्यात दत्ता सामंत यांचे कर्तृत्व नगण्य आणि गिरणी कामगारांचा कॉग्रेसवरचा राग प्रभावी ठरला होता. शिवसेनेचा पारंपारिक मतदारही सामंतांच्या मागे गेला होता. कारण तेव्हा राजकीय भूमिका बाजूला पडून गिरणगावाच्या अस्मितेचा विषय पटलावर पुढे होता. मग दोनच महिन्यात विधानसभेची निवडणूक आली आणि तिथेही गिरणी कारगाराच्या न्याय हक्काची लढाई सुरू झाली. त्यात सामंतांकडे स्थानिक उमेदवारही नव्हते. त्यांना बाहेरचे उमेदवार आयात करून गिरणगावात उभे करावे लागले. कुर्ल्यातले शरद खातू व विक्रोळी घाटकोपरच्या कॉग्रेस नगरसेविका विनिता सामंत यांना परळ व वरळीतून कामगार आघाडीच्या उमेदवार म्हणून उभे करण्यात आले. शिवडी मतदारसंघात लालनिशाण पक्षाचे कार्यकर्ते दादू अत्याळकर आघाडीचे उमेदवार झाले आणि विधानसभेत जाऊन पोहोचले. ती सुद्धा राजकारणापेक्षा जनक्षोभाची किमया होती. पण या दोन्ही लढतीमध्ये तिथल्या पारंपारिक बालेकिल्ल्यात शिवसेना भूईसपाट झाली होती.

   लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गिरणगावात सामंतांनी घडवलेला चमत्कार स्थानिक उमेदवार नसतानाचा होता. त्याची मिमांसा म्हणूनच गिरणीसंपाच्या पार्श्वभूमीवर करण्याची गरज होती. तो शिवसेनेचा पराभव असण्यापेक्षा कॉग्रेसला धडा शिकवण्याच्या नादात व्यक्त झालेल्या प्रक्षोभाचे परिणाम होते. पण त्याची मिमांसा शिवसेना संपली, अशीच करण्यात आली. अशा प्रचाराला खुद्द सेनेतीलच काही जुनेजाणते कार्यकर्ते व दुय्यम नेतेही बळी पडले होते. त्यांनी आपल्या जागा व बालेकिल्ले जपण्य़ासाठी पक्षांतर करण्याची मजल मारली होती. १९६८च्या पहिल्या फ़ेरीतील सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक घाटकोपरचे पां. रा. कदम यांनी कॉग्रेसची वाट धरली; तर भांडुपचे नगरसेवक रा. वि. पडवळ यांनी सामंतांच्या आघाडीचा झेंडा खांद्यावर घेतला होता. सेनेचे बहुतांश नेतेही गडबडले होते. कारण पुढल्या दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणूका होऊ घातल्या होत्या. त्यात सेनेचा फ़ज्जा उडाला, तर सेना खरोखरच संपणार होती. पण १९७७च्या जनता लाटेला झेलूनही टिकलेल्या शिवसेनाप्रमुखांना सामंत लाटेची फ़िकीर नव्हती. सेनेच्या अनेक नेत्यांनी पालिकेसाठी अन्य पक्षांशी जागावाटपाचा प्रयास चालविला होता. अन्य पक्षांशी बोलणी करून बघितली होती. ती फ़िसकटली आणि अनेक सेनानेते अस्वस्थ होते. अशावेळी सेनाप्रमुखांनी पालिकेच्या सर्वच जागा स्वबळावर लढवायचा पवित्रा घेतला. प्रत्येक वॉर्डातले शाखाप्रमुख थेट उमेदवार म्हणून घोषित करून टाकले. दुसरीकडे गिरणी कामगारांच्या न्यायासाठी पालिका निवडणूकीत उडी घेतलेल्या सामंतांच्या कामगार आघाडीकडे अवघ्या मुंबईतून उमेदवारी मिळवण्यासाठी झुंबड उडाली होती. थोडक्यात सेना संपली याबद्दल कुणाही राजकीय अभ्यासक वा पत्रकारांच्या मनात शंका उरलेली नव्हती. सामंतांनी आपल्या दंडेलीने सेनेचा काटा काढल्याने सेनेचे छुपे शत्रू आणि विरोधक कमालीचे सुखावले होते. आज दिल्लीच्या निकालांनंतर जशी भाजपा मोदींच्या अपयशाची ग्वाही दिली जाते आहे, त्यापेक्षा तेव्हाचा गवगवा थोडाही वेगळा नव्हता. पण अवघ्या चार महिन्यात डॉ, दत्ता सामंतांच्या गिरणी कामगार न्यायाची हवा निघाली होती. कारण महापालिकेत गिरणीसंपाला न्याय कसा मिळू शकतो, असा प्रश्न कामगारांनाही पडू लागला होता. तितकेच नाही, इंदिरा हत्येची सहानुभूतीही संपली होती. तेव्हाचे मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी तर तमाम विरोधी पक्षांना कचरा कुंडीत फ़ेकून द्यायचे आवाहन मतदाराला करणारी पोस्टर्स, मुंबईभर लावली होती. पण प्रत्यक्षात त्याच महापालिका निवडणूकीने शिवसेनला राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. (अपुर्ण)

२ टिप्पण्या:

  1. म्हणजे आपही विरोधी पक्ष होणार?

    उत्तर द्याहटवा
  2. मला तरी असे वाटत आहे कि थोड्या महिन्यांनी आप चे ७ -- ८ आमदार फुटून भाजप मध्ये येतील व भाजप दिल्लीत सरकार बनवेल

    उत्तर द्याहटवा