शनिवार, २५ जानेवारी, २०१४

सोशल मीडियाचे आजारपण  केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर हे आधीपासूनच सोशल मीडियामुळे वादात फ़सलेले राजकारणी होते. एकप्रकारे आपण असेही म्हणू शकतो, की आज दिल्लीत जो राजकारणाचा तमाशा मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरिवाल सादर करीत आहेत, त्याची नांदी सर्वप्रथम थरूर यांनीच केली होती. देशाचा एक जबाबदार मंत्री असताना त्यांनी आपले मनोगत जाहिरपणे मांडण्यावर मर्यादा येतात, याचे भान ठेवले नव्हते. सोशल मीडिया म्हणून मागल्या काही वर्षात इंटरनेटच्या माध्यमातून ज्या विविध सुविधा लोकांना उपलब्ध झाल्या आहेत, त्यातून समाजजीवनात नवनव्या समस्या उभ्या रहात आहेत. पण दुसरीकडे याच माध्यमात कुणाचे किती अनुयायी; अशीही स्पर्धा सुरू झालेली आहे. मग या माध्यमांचा वापर करणार्‍यांना आपण त्यावर काय भूमिका मांडतो वा काय काय जाहिर करतो, त्याचेही ताळतंत्र राहिलेले नाही. आपोआपच त्याचे बरेवाईट व्हायचे ते परिणाम होतच असतात. अशाच एका प्रकरणात थरूर यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. कारण त्यांच्याच एका विधानाचा खुप गवगवा झाला आणि त्यांनी आपल्या अधिकार पदाचा आयपीएल या स्पर्धेत गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. तेवढेच नाही तर त्यांचे व्यक्तीगत खाजगी जीवन त्यातून चव्हाट्यावर आलेले होते. मग त्यातूनच त्यांच्या छुप्या प्रेमसंबंधांना व्यवहारी स्वरूप देण्याची पाळी त्यांच्यावर आलेली होती. तरीही हा माणूस शहाणा झालेला नव्हता. उलट आपल्या प्रेयसीवर आपण दहा मंत्रीपदे ओवाळून टाकतो, अशी दर्पोक्ती त्यांनी केलेली होती आणि ती सुद्धा त्याच सोशल मीडियातून केली होती. योगायोग बघा, आता त्यांच्या त्याच प्रेमसंबंध व खाजगी जीवनाची लक्तरे त्याच माध्यमाच्या वेशीवर टांगली गेली आहेत. पण त्यातून या नव्या मुक्त अनिर्बंध माध्यमाचा सामाजिक व खाजगी जीवनावर होणारा परिणाम गंभीर विषय असल्याकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. 

   शशी थरूर व त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर हे जोडपे तसे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले आहे. किंबहूना त्यांना त्याचा हव्यासच होता म्हणायला हरकत नाही. पार्ट्या वा समारंभात जाऊन लोकांचे लक्ष वेधून घेताना आपल्या खाजगी आयुष्यावर अनेक मर्यादा येतात आणि त्यात डोकावण्याची इतरांना मुभा मिळते; याचेही भान त्यांना नव्हते. त्यामुळेच मग नुसत्या प्रसार माध्यमांच्याच नव्हेतर सोशल मीडियाच्याही मंचावर हे दोघे आपले मनोगत मोकळेपणाने मांडून त्याबद्दलच्या चर्चेला जणू प्रोत्साहनच देत होते. सहाजिकच त्यांनीच आपले खाजगी जीवन व त्यातल्या नाजूक गोष्टींना सार्वजनिक विषय बनवून टाकले होते. कारण काय जाहिर बोलावे किंवा टाळावे, याचा धरबंद त्यांनाच उरलेला नव्हता. म्हणूनच मग त्यांच्यातला विसंवाद, धुसफ़ुस त्यांनी उघडपणे कुठे सांगितली नाही, तरी अशा माध्यमातून कुजबुज करण्याचे निमित्त म्हणून त्यांनीच चव्हाट्यावर आणली होती. पण त्याची परिणती सुनंदाच्या मृत्यूमध्ये होईल; अशी कोणीच अपेक्षा केलेली नव्हती. तसे झाले आणि हा विषय एकदम ऐरणीवर आला. दोघांमध्ये धुसफ़ुस चालू असल्याची कुजबुज त्यांच्या अत्यंत निकटवर्ती वर्तुळात चालू होती. पण कोणी उघड बोलत नव्हता. मग एके दिवशी सुनंदा यांनीच आपल्या ट्विटरवर त्याची वाच्यता केली. पण त्यातून त्यांनी अत्यंत गंभीर राजकीय, राष्ट्रीय विषयाला तोंड फ़ोडले होते. त्यांनी पतीविषयी मतप्रदर्शन केलेले असले, तरी त्यांचा पती कोणी सामान्य नागरिक नाही की त्यासंबंधात आरोप केलेली महिला सामान्य नव्हती. 

   मेहर तर्रार नावाची पाकिस्तानी महिला लाहोर येथे इंग्रजी वृत्तपत्रातली मान्यवर स्तंभलेखिका आहे. ती आपल्या पतीभोवती प्रेमाचे जाळे विणत असून शशी थरूर यांच्यावर पाकिस्तानी हेरसंस्थेने सोडलेला हा हस्तक आह; असा गौप्यस्फ़ोट सुनंदा यांनी केला होता. मेहर यांनी तात्काळ त्याचा इन्कार केला आणि थरूर यांनीही सुनंदाला विश्वासात घेऊन त्यावर पांघरूण घालण्याचा खटाटोप पुन्हा खुल्या माध्यमातून केला. सुनंदाने दरम्यान एका वृत्तपत्राला मुलाखत देऊन आणखी काही गंभीर आरोप पतीवर केले. यावर मग उघड कुजबुज सुरू झाली आणि त्याची गंमत लोक अनुभवत असताना अकस्मात राजधानीच्या एका पंचतारांकित हॉटेलात सुनंदाचा मृतदेह आढळल्याच्या बातमीने खळबळ उडवून दिली. त्या दिवशी कॉग्रेस महासमितीचे अधिवेशन दिल्लीत चालू होते आणि थरूर तिथेच दिवसभर होते. संध्याकाळी ते हॉटेलवर परतले, तर हा प्रकार घडलेला. आता ती आत्महत्या नसून विषप्रयोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा तपास चालू आहे. तो यथावकाश पुर्ण होईल. त्यातून हत्येविषयीचे रहस्य उलगडू शकेल किंवा नाही, त्याबद्दल शंकाच आहे. पण या निमित्ताने सोशल मीडियाच्या खाजगी जीवनावरील आक्रमणाचे गांभीर्य समोर आलेले आहे. आधुनिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेले मोबाईल, संपर्कसाधने, यांनी माणसाच्या जीवनातील एकांत संपुष्टात आणला आहे, की माणसाला घोळक्यात असतानाही एकांतिक आत्मकेंद्री बनवले आहे? यासारखा प्रश्न मोलाचा बनवला आहे. एका आभासी जगात माणसाला पुरता गुरफ़टून टाकले आहे काय? मग अशा माणसाला वास्तव जग आणि आभासी जग यातला फ़रक समजेनासा झाला आहे काय? त्यातून होणारी ओढाताण अशा घटनांचे कारण होत असावी काय, इत्यादी प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण सुनंदा पुष्कर यांनी पतीवर जे काही आरोप केलेत वा शंका घेतल्यात; त्याला वास्तव जीवनातले कुठले आधार नाहीत. कारण ज्या महिलेविषयी त्यांनी शंकासंशय घेतला, ती वास्तविक जगात असली तरी तिचा थरूर यांच्याशी असलेला वा येणारा संबंध सोशल मीडियाच्या आभासी जगातला होता. मग सुनंदा यांनी त्या आभासाला वास्तविक जगातला समजून किती मनाला लावून घ्यावे? 

   हा विषय केवळ याच एका जोडप्या पुरता नाही. मध्यंतरी त्याच दरम्यान गुजरातच्या एका तरूण मुलीचाही असाच मामला पुढे आलेला होता. याच माध्यमात मैत्री झालेल्या कुणा तरूणाला भेटण्यासाठी ही मुलगी खोटा पासपोर्ट घेऊन थेट दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचली आणि तिथल्या विमानतळावर योग्य कागदपत्रे नसल्याने तिला माघारी पाठवून देण्यात आले. मुद्दा इतकाच, की एकाकी वा आत्मकेंद्री व्यक्तीला समाजापासून तोडण्याच्या प्रक्रियेला अशी माध्यमे हातभार लावत आहेत काय? वास्तव जीवनात व्यक्तीगत मैत्री साधता येत नाही, अशी माणसे या आभासी माध्यमातून संगतीत येणार्‍या काल्पनिक लोकांच्या आहारी जाऊन आपले एकाकी जीवन विसरू बघतात. त्यातून अशा समस्या उभ्या रहात आहेत काय? ज्या गोष्टी आमनेसामने बोलायचे धाडस नाही, त्या बेधडक करण्याची हिंमत या माध्यमाने निर्माण केल्याने हे प्रकार घडत असतील काय? संपर्कसाधने वेगाने वाढली आणि विस्तारली, त्यातून जग खुप जवळ आले, असे म्हटले जाते. पण वास्तवात त्याच जगातली माणसे किती एकमेकांपासून दूर गेली; त्याचा कधी विचार तरी होतो आहे काय? नेहमी भेटणारे मित्र, मनसोक्त गप्पा छाटण्यात काही काळ रमणारे सगेसोयरे; आता अशा माध्यमातून संदेश सोडतात. फ़ारच असेल तर फ़ोनवर बोलतात. पण प्रत्यक्षात व्यक्तीगत पातळीवर भेटगाठ संपर्क किती घटला आहे? त्यातून मग निव्वळ आवाज किंवा याप्रकारे संदेशाची होणारी देवाणघेवाण; यावरच नाती विसंबून राहू लागली आहेत. एकीकडे व्यक्तीगत संपर्कातून होणारी जवळीक मागे पडून, निव्वळ संदेश वा आवडणार्‍या शब्दाच्या पुरवठ्यातून येणारी जवळीक नात्याचे रूप घेऊ लागली आहे. परिणामी जितक्या लौकर अशी मैत्री आकार घेते; तितक्याच वेगाने ती तुटण्य़ाचेही प्रमाण भयंकर आहे. एकूणच वास्तवापासून माणूस या साधनांनी दूर नेला आहे. वास्तवातल्या मित्राची, मैत्रीणीची जागा हळुहळू काल्पनिक वा आभासी व्यक्ती घेत चालल्या आहेत आणि वास्तवात अशी माणसे समोर आल्यावर होणारा भ्रमनिरास नैराश्याचे, वैफ़ल्याचे कारण होऊ लागला आहे. 

   माणूस ही एक भावनांची असाध्य गुंतागुंत असते. त्यामुळेच एकच व्यक्ती प्रत्येक परिचितासाठी भिन्न भिन्न असते. एकासाठी तो जिव्हाळ्याचा मित्र असतो, तर दुसर्‍यासाठी निव्वळ व्यवहारी परिचित असतो. कुणासाठी आप्तस्वकी्य इतका निकटवर्ती असतो, तर आणखी कोणासाठी केवळ मौजमजेचा विषय असू शकतो. अशा सर्वांना आपण व्यक्तीगत जीवनात त्या त्या अंतरावरून हाताळत असतो. त्या सर्वांसाठी समान वागणूक नसते. पण आभासी जगातल्या मित्र यादीत जाणारा संदेश सर्वांसाठी समानच असतो. मात्र त्याचा संभवणारा परिणाम समान असू श्कत नाही. तुम्ही जे शब्द वापरता आणि ज्या अर्थाने वापरता; तेच अर्थ वा हेतू समोर पोहोचतील अशी कोणी हमी देऊ शकत नाही. त्यामुळे कोणासाठी तुमचा संदेश मजेशीर वा गमतीचा असू शकतो. तर अन्य कुणासाठी तोच संदेश इजा पोहोचवणारा असू शकतो. त्यामुळेच सर्वच संदेश वा शब्द सर्वाना समान हेतूने पाठवण्यात धोका असतो आणि अशा माध्यमात आपण बिनधास्त वावरत असलो, तर आपण तोच धोका पत्करत असतो. मग अशा संदेशाचे परिणाम भोगण्याचीही क्षमता आपल्यात असली पाहिजे. त्याचे परिणाम मनाला लावून घेण्य़ाइतके संवेदनाशील असता कामा नये. पण सर्वच माणसे इतकी प्रगल्भ किंवा धाडसाची नसतात. मग त्यांच्यावर दुखावण्य़ाची वेळ येते. अनेकदा तर आपण पाठवतो, त्या संदेशाचे आपल्यालाच दुष्परिणाम भोगावे लागतील याचेही भान उरत नाही. आजकालची तरूण पिढी अशा माध्यमांच्या इतकी आहारी गेलेली आहे, की या माध्यमांचा बेभान व बेताल सरसकट वापर होत चालला आहे. त्यातून मग नवनव्या समस्या समोर येऊ लागल्या आहेत. सुनंदा पुष्कर त्याचे एक विदारक उदाहरण आहे. जितक्या सहजपणे त्यांनी आपल्या खाजगी जीवनातील गोष्टी अशा चव्हाट्यावर मांडल्या, तितक्या सहजपण त्यांनी व्यक्तीगत जीवनातील कुणा मित्रमैत्रीणीकडे मांडल्या नव्हत्या, हे विसरता कामा नये. 

   आता ही भीषण घटना घडून गेल्यावर त्या संशयास्पद मृत्यूचे धागेदोरे शोधून काढताना पोलिसांना सुनंदाच्या परिचितांना शोधावे लागत आहे. पण त्यापैकी कोणीही अशा गंभीर विषयावर नेमका प्रकाश पाडू शकलेला नाही. याचा अर्थ इतकाच, की शेकडो जीवाभावाचे मित्र व मैत्रीणी असूनही सुनंदा हिने आपल्या जीवनातली दुखरी वेदना त्यापैकी कोणाकडेही मनमोकळेपणाने मांडायचा प्रयत्नही केला नव्हता. कोणाकडे मन मोकळे करून मनसोक्त रडले तरीही अशा वेदनेतून मुक्ती मिळवता येईल, असे तिच्या मनाला शिवलेही नाही. ह्याला काय म्हणायचे? खर्‍या वास्तविक जीवनातील जित्याजागत्या शुभेच्छूकांकडे मन व्यक्त करायला टाळणारी ही महिला, त्या आभासी जगातल्या मित्रांकडे मात्र बिनधास्त मन खुले करीत होती. या मृत्यूकांडानंतर तिच्या आठवणी सांगत नलिनी सिंग यांच्यासारखी संवेदनशील पत्रकार महिलाही डोळे ओले करून बोलत होती. याचा अर्थच सुनंदाची ती जीवाभावाची मैत्रीण होती, मग आपल्या मनातली यातना तिच्याकडे व्यक्त करायची मोकळीक सुनंदाला होती. नव्हे तशा मैत्रीणी त्यासाठीच असतात, याचेही भान या महिलेला उरले नाही. याचा अर्थच तिची वा तिच्यासारख्या लोकांची मानसिकता आजारी झालेली नाही काय? सोशल मीडियाच्या आहारी गेल्यावर वास्तवाचे भान किती सुटते त्याचा यापेक्षा दुसरा मोठा पुरावा देण्याची गरज आहे काय? एक प्रकारचा हा म्हणूनच मनोरोगच म्हणायला हवा. ज्याच्या बाधेने वास्तव जगाशी असलेले नाते तुटत जाते आणि पुढे तर त्या़च आभासाला वास्तव समजून माणूस भरकटत जातो, असेच म्हणावे लागेल. हे मोठे मान्यवर जगातले व प्रसिद्धीच्या झोतातले प्रकरण असल्याने त्याची इतकी चर्चा होते आहे. पण अशी शेकडो प्रकरणे बारीक बातम्या होऊन काळाच्या पडद्याआड गडप होऊन जातात. त्याची कुठे गंभीर दखलही घेतली जात नाही. त्यामुळेच एक सुविधा व साधन म्हणून हाती आलेल्या तंत्रज्ञान व उपकरणाने आज गंभीर आजाराचे रौद्ररूप धारण केले असावे, असेच वाटू लागते. त्याचे निराकरण कायद्याने वा प्रतिबंध घालून होणार नाही. कारण ती सामाजिक, मानसिक व सांस्कृतिक समस्या आहे आणि त्याबद्दलचे उपाय त्याच मार्गाने शोधावे लागतील. आपल्या वेगाने बदलत्या जीवनशैलीतून उलगडावे लागतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा