सोमवार, ६ जानेवारी, २०१४

आपापले स्वार्थ आणि हितसंबंध

  १९८५च्या त्याच मुंबई महापालिका निवडणूकीतले काही किस्से इथे मुद्दाम सांगायला हवे. आपल्या सर्वच शाखाप्रमुखांना उमेदवार करायच्या बाळासाहेब ठाकरेंच्या हट्टाबद्दल त्यांचेच नेते साशंक होते, तसेच अनेक शाखाप्रमुखही साशंक होते. दादर प्रभादेवीचा शाखाप्रमुख आपल्याला उमेदवारी अर्ज भरावा लागू नये, म्हणून गायब झाला होता. तर तिथे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या मोतीराम तांडेल नावाच्या जुन्या वयस्क शिवसैनिकाला अर्ज भरायची मुदत संपल्यावर शोधून सेनेचा उमेदवार घोषित करण्यात आले. पुढे तो निवडून आल्यावर हा शाखाप्रमुख पाच वर्षे आपल्या नशीबाला दोष देत होता. चोवीस वर्षानंतर २००९ सालात त्यानेच आमदारकी टिकवण्यासाठी कॉग्रेसची उमेदवारी मिळवताना पक्षांतर केले होते. दुसरा किस्सा सांताक्रुज विमानतळ परिसरातला आहे. तिथे शाखाप्रमुखासह उपशाखाप्रमुखही उमेदवार व्हायला राजी नव्हते, तेव्हा लेऑफ़मुळे बेकार असलेला एक गटप्रमुख आपले डिपॉझीट कोणी भरणार असेल, तर निवडणूक लढवायला सिद्ध झाला. वर्गणी काढून त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आणि तोही निवडून आलेला होता. मुद्दा इतकाच, की चार महिन्यापुर्वी जी सेना आपल्या गिरणगावाच्या बालेकिल्ल्यातून संपली म्हणून माध्यमातले सेक्युलर आनंदोत्सव करीत होते; त्यांना थक्क करीत १९८५ सालच्या मे महिन्यात सेनेने मुंबई महापालिकेवर प्रथमच स्वबळाने भगवा फ़डकवला. तिथून मग सेनेची महाराष्ट्रात धोडदौड सुरू झाली. नंतर अवघ्या पाच वर्षात दत्ता सामंत व कामगार आघाडी इतिहासजमा होऊन गेले होते. हा सगळा इतिहास एवढ्यासाठी कथन करायचा, की तेव्हा मी सुद्धा डॉ. दत्ता सामंतांच्या यशाने भारावून गेलो होतो आणि आता शिवसेनेचे दिवस संपले, असे मानू लागलो होतो. योगायोगाने त्याच कालखंडात शिवसेनाप्रमुखांनी सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे पुनरुज्जीवन करून नव्या स्वरूपात त्याचे प्रकाशन सुरू करण्याचे योजले होते. त्याची जबाबदारी व्यावसायिक पत्रकार म्हणून माझ्याकडे आली. त्याच्या धोरणात्मक बाजूचा उहापोह करण्यासाठी बाळासाहेबांशी माझा सतत संपर्क येऊ लागला होता. पक्षाचे मुखपत्र हे अनुयायांना मार्गदर्शक व अन्य पक्षांसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट करणारे असते. त्यामुळेच ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध करायच्या मजकुराची दिशा ठरवण्यासाठी बाळासाहेबांशी मी अनेक मुद्दे व विषयांवर चर्चा करीत असे. आरंभी माझ्या राजकीय आकलनानुसार सेनेसमोर दत्ता सामंत व त्यांची कामगार आघाडी हेच स्थानिक व प्रभावी आव्हान आहे; अशी माझी ठाम समजूत होती. पण त्याविषयी साहेब अजिबात गंभीर नव्हते. वारंवार त्याबद्दल मी बोलत असे, त्यामुळे एके दिवशी त्यांनी मला सामंत हा कसा तात्कालीन बुडबुडा आहे आणि त्याची दखल घेण्य़ात आपली शक्ती खर्च करू नये, याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिले. अर्थात तेव्हा मला ते पुर्णपणे पटलेले नव्हते. पण १९८९ सालात डॉ. सामंत त्याच गिरणगावात चारीमुंड्या चित झाले; तेव्हाच मला साहेबांचे भाकित पटले. कारण त्यानंतर कामगार आघाडी व सामंत यांचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही.

   राजकारणातील घडामोडींचे आकलन होण्यासाठी व वस्तुनिष्ठ मिमांसा करण्यासाठी किती वास्तववादी असावे लागते; त्याचे धडे अशा विविध अनुभवातून मला गिरवता आलेले आहेत. अनेकदा आपण घडणार्‍या घडामोडी व घटनांकडे आपापल्या स्वार्थ व हितसंबंधांच्या चष्म्यातून बघत असतो. त्यामुळेच आपले स्वार्थ व समजूती वास्तवाचे चित्रच विकृत करतात. सहाजिकच आपल्या हाती आलेली वा उमगलेली माहितीच नासलेली असते. मग त्यावर आधारीत केलेली मिमांसा वा त्यानुसारचे आकलन वास्तववादी कसे असेल? आपण प्रत्येक घटना वा गोष्टीकडे आपल्या आवडीनिवडीनुसारच बघत असतो आणि हवे असलेले अर्थच त्यातून शोधायचा प्रयास करीत असतो. त्यामुळेच समान माहिती वा तपशील समोर असूनही भिन्न व्यक्ती, वेगवेगळे निष्कर्ष काढत असतात. राजू श्रीवास्तव नावाचा एक नकलाकार आहे. त्याने टिव्हीवर रंगवलेली एक नक्कल आठवते. त्याने कथन केलेल्या त्या विनोदातून राजकीय मिमांसेत येणारा फ़रक स्पष्ट होऊ शकेल. उत्तरप्रदेशात तेव्हाच्या सरकारने प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचे धोरण आखले होते आणि त्यावर जोरदार चर्चा चालू होत्या. त्याच संदर्भात राजूने मोठा मस्त किस्सा तयार केला व रंगवला होता.

   एका गावात चौकात गोळा झालेल्या डझनभर कुत्र्यांमध्ये चर्चा चालू असते. आपल्याही गावात वीज येणार म्हणून कुत्रे सुखावलेले असतात आणि कधी वीज येणार यापेक्षा रस्त्यावर खांब टाकले कधी जाणार, यावर तावातावाने बकवास चालू असते. त्यातला एक अतिउत्साही कुत्रा वीज कधी यायची ती येवो, आणि खांबावर दिवे लागायचे तेव्हा लागोत; पण निदान ताबडतोब गावागावात दिव्याचे खांव तर विनाविलंब उभारले गेलेच पाहिजेत, असे ठासून सांगत असतो. तितकेच नाही, तर काही कुत्रे त्यासाठी सभा मोर्चे काढायचीही भाषा अगत्याने बोलत असतात. तेव्हा इतका वेळ गप्प बसलेला एक तुलनेने अननुभवी कुत्रा शंका विचारतो, तुम्हाला कशाला या गावोगावी येऊ घातलेल्या वीजपुरवठ्याची पंचाईत? तुम्ही टिव्ही बघणार आहात, की कॉम्प्युटर चालवणार आहात? नसेल तर असल्या बाष्कळ चर्चा हव्यात कशाला? बाकीचेही त्या प्रश्नाने वरमतात. पण मग त्यातला वयोवृद्ध कुत्रा पुढाकार घेतो आणि त्या चिकित्सक कुत्र्याला म्हणतो, ‘इथे कोणाला वीज येण्याची चिंता आहे? आपल्याला गावात वीज येण्याशी कर्तव्य नाही बाबा. आपला स्वार्थ फ़क्त वीजेच्या खांबाशी आहे, गावोगाव चौकाचौकात खांब असले, मग आपली टांग वर करण्याची सोय होते ना? ते खांब प्रत्येक ठिकाणी नसले, मग आपली किती गैरसोय होते? वीजेच्या निमित्ताने असे अधिक खांब लागले, तर केवढी मोठी समस्या निकालात निघेल त्याचा विचार कर.’ तात्काळ तोही कुत्रा विनाविलंब वीजेचे खांब घालण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन टाकतो.

   यातला विनोद बाजूला ठेवला, तर घटना व गोष्टीकडे आपापल्या मतलबानुसार कसे बघितले जाते, त्याचे उत्तर मिळते. दिल्लीच्या मतदाराने केजरीवाल वा त्यांच्या पक्षाला आपल्या हेतूने मतदान केले असेल, कोणी पाणी, वीजेच्या दरात कपात किंवा कोणी झोपडीला मान्यता, नोकरीत कायम होण्याच्या आशेवर ‘आप’ला मतदान केले असेल. रिक्षावाल्यांनी आपली अरेरावी कायम रहावी आणि वाहतुक पोलिसांचा ससेमिरा संपावा, म्हणून मते दिली असतील तर कोणी भ्रष्टाचारातून मुक्ती म्हणून कौल दिला असेल. पण निकालानंतर त्याची मिमांसा करणारे आपापल्या स्वार्थानुसार त्याचा अर्थ लावत नाहीत काय? देशातून भ्रष्टाचार हटावा म्हणून, किंवा भाजपासह नरेंद्र मोदींचा विजयरथ रोखला जावा म्हणून, दिल्लीकरांनी केजरीवाल यांना कौल दिला आहे काय? नसेल तर मग त्याचा तसा अर्थ लावणारे आणि राजू श्रीवास्तवच्या विनोदातील खांबासाठी आग्रही असलेले कुत्रे; यांच्यात नेमका किती फ़रक मानायचा? कुणाला दिल्लीच्या निकालाचा अर्थ लावणार्‍यांची कुत्रा म्हणून केलेली ही अवहेलना वाटेल. पण तसा अजिबात हेतू नाही. पण दोन्हीकडल्या हेतूतले साम्य अधिक ठळकपणे समोर यावे; म्हणून काहीसा भडक वाटणारा हा किस्सा इथे मांडला. तितके नेमक्या शब्दात या दोन्हीतले साम्य दाखवणारे दुसरे उदाहरण नाही. केजरीवाल यांचे दिल्लीच्या निकालानंतरचे अवास्तव कौतुक आणि अतिशयोक्ती मांडण्यासाठी हा थोडा जुना इतिहास व तुलना केली इतकेच. कारण त्याच निकालाचा आधार घेऊन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीचे आडाखे बांधण्याचा उद्योग सुरू झालेला आहे. एकूण दिल्लीच्या निकालाची मिमांसा नेमकी करण्यापेक्षा तिचा विपरित अर्थ लावला जात आहे. त्यातला विपर्यास व दिशाभूल करण्याचा हेतू स्पष्ट व्हावा, म्हणुनच हा विषय इतका सविस्तर मांडला आहे. तसे निवडणूक इतिहासाचे कित्येक दाखले देता येतील, केजरीवाल यांच्या यशासारखे हंगामी, तात्कालीन व प्रासंगिक यश अनेकांनी अनेकदा संपादन केलेले आहे. मात्र नंतरच्या राजकारणात त्यांचा मागमूसही शिल्लक उरलेला नाही. पण तात्कालीन राजकारणाला व घटनाक्रमाला कलाटणी देण्यासाठी अशा घटनांचा कसा विपर्यास केला जातो, त्याचे आधीच स्पष्टीकरण व्हावे म्हणून हा सगळा उहापोह.

   मुद्दा इतकाच, की केजरीवाल यांच्या यशाचा देशव्यापी मोठाच परिणाम होईल अशी जी हवा निर्माण केली जाते आहे; त्यातले सत्य समोर यावे आणि डोळसपणे उपांत्य फ़ेरी मानल्या गेलेल्या ताज्या विधानसभा निवडणूकांच्या निकालाची वास्तववादी कारणमिमांसा करता यावी. जितका हा झंजावात देशभर पसरण्याचा गाजावाजा चालू आहे, तितका तो झंजावात नसून दिल्लीपुरता त्याचा प्रभाव असेल. उलट दिल्लीपलिकडे असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या निकालांनी लोकसभेच्या निवडणूकीबद्दल बरेच काही सांगून ठेवले आहे. ते काय आहे हे तपासण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आजवरच्या निवडणूकीच्या ऐतिहासिक निकालांच्या कसोटीवर हे ताजे निकाल तपासून बघण्याची गरज आहे. लोक मते देतात म्हणजे काय? लोकांचे मत मुळात तयार कसे होते? लोक मते बनवतात कसे? कुठलाही परस्पर संपर्क वा बौद्धिक देवाणघेवाण होत नसताना जनमत वळण घेतेच कसे? त्याचे निकष काय असतात? वेळोवेळी निकष कसे बदलतात? पक्ष, उमेदवार, परिस्थिती, अपेक्षा, गरजा, समस्या यानुसार मत कसे घडत जाते? हे मत सार्वत्रिक कशामुळे होते? कुणाच्या बाजूने वा विरोधात झुकाव उदयास कसा येतो? असे अनेक मुद्दे तपासावे लागतात. तेव्हाच येऊ घातलेल्या निवडणूकीविषयी नेमके अंदाज बांधणे शक्य असते. यापैकी काहीही न करता आपापल्या मतलबाचे युक्तीवाद सिद्ध करण्यासाठी सोयीस्कर मुद्दे व तपशील वापरले; मग दिशाभूल करता येते. पण अंदाज मात्र पुरते फ़सतात. तोच धोका टाळण्यासाठी आधी नमनाला घडाभर तेल म्हणतात, तशी ही प्रदिर्घ प्रस्तावना करावी लागली. आगामी निवडणूकीत नरेंद्र मोदी हे कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे व ऐतिहासिक आव्हान असल्याचे त्याच पक्षाचे बुद्धीमान नेते जयराम रमेश का म्हणतात, तेच कोडे उलगडण्याचा हा एकूण प्रयास आहे. (अपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा