बुधवार, २२ जानेवारी, २०१४

दिल्लीतल्या लंकादहनाची गोष्ट




  जगातल्या कुठल्याही देशात वा समाजात, युगात गेलात, तरी तिथे घडलेल्या वा घडणार्‍या घटनांमध्ये प्रत्येकजण आपापला मतलब शोधत असतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव स्वार्थीच असतो. त्यामुळे ज्या घटना प्रसंग समोर येतात; त्यामध्ये आपापला स्वार्थ शोधणे सर्वांसाठी स्वाभाविक कृती असते. त्याचाच परिणाम मग भिन्न भिन्न स्वरूपाच्या प्रतिक्रियांमध्ये दिसत असतो. वास्तविक घडलेली घटना वा कृती एकच असते. मग लोक असे भिन्न अर्थाने तिथे का बघतात? किंवा अशा भिन्न प्रतिक्रिया कशाला देतात; असा प्रश्न त्यापासून अलिप्त असलेल्या इतरांच्या मनात उभा रहातो. असा प्रश्न आपल्याही मनात उभा राहतो. कारण आपण त्या घटनेपासून स्वत:ला अलिप्त ठेवत असतो. पण जर का त्याच घटनेत आपला स्वार्थ असेल वा आपण तसा विचार जरी करू लागलो, तर आपणही तात्काळ त्यापैकी एका बाजूचे समर्थन वा विरोध सुरू करतो. याचा अर्थ आपण त्या व्यक्ती वा कृतीचे समर्थक असतोच असे नाही. अनेकदा आपल्याला त्या घटना वा कृती व्यक्तीशी काडीमात्र कर्तव्यही नसते. कारण त्यात आपल्याला सुखावणारेही काहीच नसते. पण त्याचवेळी जर त्यात आपला ज्याच्यावर राग आहे, तो दुखावत असेल; तरी आपण त्या कृती, घटनेचे समर्थक होऊन जातो. कारण आपल्या शत्रू वा विरोधकाच्या वेदनेत आपण आपला आनंद शोधत असतो. जगातल्या बहुतांश घटनांचे कृतीचे असेच समर्थन वा विरोध होत असतात. फ़ार थोडे लोक प्रामाणिक राहून अलिप्तपणे त्याकडे बघू शकत असतात. त्यामुळेच मग समोर घडणार्‍या घटनांचा नेमका अर्थ वा परिणाम सांगू शकत असतात. उलट दुसरीकडे आपापले मतलब शोधून त्याबद्दल भूमिका घेणार्‍यांची पुढल्या परिणामांतून तारांबळ उडत असते. कधीकधी अशा समर्थक विरोधकांनाच अकारण तोंडघशी पडायची वेळ येत असते. नुकत्याच संपलेल्या चार विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यापासून त्याचाच अनुभव राजकीय विश्लेषणाच्या बाबतीत येतो आहे.

   मागल्या वर्षाच्या अखेरीस देशात पाच विधानसभांच्या निवडणूकांची रणधुमाळी माजलेली होती. त्यात ईशान्येकडील नागालॅन्ड राज्याचे राजकारण राजधानी दिल्लीला प्रभावित करणारे नसल्याने त्याची फ़ारशी दखल घेतली जात नाही. पण उर्वरित चार राज्यांचे निकाल लागल्यावर त्यात तीन विधानसभा निर्णायक व प्रचंड बहूमताने भाजपाने जिंकल्या होत्या. पण पुढल्या दीड महिन्यात माध्यमे व राजकीय क्षेत्रातील प्रतिक्रिया बघितल्या, तर दिल्ली वगळता राजस्थान, मध्यप्रदेश वा छत्तीसगड राज्यात निवडणूका झाल्या होत्या किंवा नाही; अशी शंका येऊ शकेल. या तीन राज्यात कोण मुक्यमंत्री झाला, त्याचे मंत्रीमंडळ कसे आहे किंवा त्यांचा शपथविधी तरी झाला काय? असेल, तर त्याविषयीच्या बातम्या सुद्धा कशाला येऊ नयेत? दिल्लीत विधानसभा त्रिशंकू झाली आणि तिथे तीन आठवडे नवे सरकार सत्तेवर येऊ शकले नाही; तरी तिथल्याच राजकीय घडामोडींनी माध्यमांना व्यापून टाकलेले होते. कारण तिथे आम आदमी पक्ष नावाच्या नव्या पक्ष व नेतृत्वाचा उदय झालेला होता. मग त्याचा इतका गाजावाजा चालू होता, की जणू अन्य कुठे निवडणूका झाल्या नाहीत की नवी सरकारे आलीच नाहीत. या गदारोळाचा मग परिणामही दिसू लागला. दिल्लीत दुसर्‍या क्रमांकाची मते व जागा जिंकून अल्पमताचे सरकार कॉग्रेसच्या पाठींब्याने बनवणार्‍या मुख्यमंत्री केजरीवाल यांना अकस्मात देशाच्या भावी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आणले गेले. त्यांच्यासह त्यांच्या पक्षानेही ती बाब गंभीरपणे मनावर घेतली आणि विनाविलंब अखिल भारतीय पक्ष होण्याची मोहिम आरंभली. देशातले एकाहून एक मान्यवर आणि आपापल्या क्षेत्रातील यशस्वी लोक कामधंदा सोडून त्या पक्षात दाखल होऊ लागले. महिनाभरात पन्नास लाखाच्या आसपास लोक त्या पक्षात सदस्य होऊन गेले. नेत्यांनीही अनुयायांसाठी सदस्यत्वाचा मार्ग सोपा करून टाकला. मोबाईल फ़ोनवर संदेश पाठवून किंवा नुसताच मिसकॉल देऊन कोणीही तात्काळ त्या पक्षात परस्पर दाखल होऊ लागला. भ्रष्ट व्यवस्थेतून मुक्त करणारा नवा प्रेषित देशाला लाभला होता.

   हा सगळा गदारोळ म्हणजे प्रचार चालू असताना कोणाला वास्तवाकडे बघायची गरजही वाटली नव्हती. राजकीय पक्षाची संघटना अशी उभी राहू शकते काय? इतक्या वेगाने उभी राहिलेली फ़ोनवरची संघटना देशव्यापी निवडणूका लढवू शकते काय? आणि नुसते उमेदवार उभे केले, म्हणून त्यांना निवडून आणू शकते काय? असले कुठलेही प्रश्न विचारायची कुणाची बिशाद नव्हती. कारण अशा शंका काढणाराच गुन्हेगार, बेईमान वा भ्रष्ट ठरण्याचे भय होते. अशी काय जादू त्या पक्षापाशी वा त्याच्या नेत्यांपाशी होती? आणि असेल तर मग मतमोजणी संपेपर्यंत तिचा साक्षात्कार देशातल्या माध्यमांना व सर्व राजकीय अभ्यासकांना कशाला घडला नव्हता? तीन राज्ये मोठ्या ताकदीने जिंकणार्‍या भाजपा किंवा नरेंद्र मोदींचे अफ़ाट यश दिल्लीत दुय्यम जागा मिळवणार्‍या केजरीवाल यांच्यापेक्षा मोठे कशामुळे होते? त्याचे उत्तर आपल्याला ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीमध्ये सापडू शकते. मागल्या दोन वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी ताज्या निवडणूकीत आघाडीवर राहून प्रचार केला, तर त्यांना यश मिळू शकत नाही, असा बहुतेक जाणकार अभ्यासकांचा दावा होता. पण घडले उलटेच. तीन राज्यात भाजपाने अभूतपुर्व यश संपादन केले. तर त्यामुळे सर्वच राजकीय अभ्यासक तोंडघशी पडले होते. मग आपले फ़सलेले अंदाज झाकण्यासाठी दिल्लीतील भाजपाच्या हुकलेल्या बहूमताचा बागुलबुवा करण्यात आला आणि त्यासाठीच केजरीवालांचे दुय्यम यश हे मोदी व भाजपाला रोखणारे असल्याचा सिद्धांत उभा करण्यात आला. मोदींची लोकप्रियता अफ़ाट असेल तर दिल्लीत भाजपा बहूमत कशाला मिळवू शकला नाही? कारण केजरीवाल यांच्या लोकप्रियतेने मोदींचा विजयरथ रोखला. एकदा असा सिद्धांत मांडला गेला, मग दिल्लीचीच पुनरावृत्ती देशात सर्वत्र होणार, हा पुढला सिद्धांत सोपा होऊन जातो. ज्यांना मोदी जिंकले नाहीत हा आपला ‘मतलब’ साधायचा होता, त्यांनी केजरीवाल यांचा फ़ुगा फ़ुगवण्य़ाचा उद्योग अहोरात्र हाती घेतला. त्यातून मग दिल्लीत एक अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली. मुठभर नवख्या कार्यकर्त्यांची हुकूमी झुंड हाताशी असलेले आम आदमी पक्षाचे नेते मोकाट होऊन गेले.

   प्रथम लोकसभा निवडणूकीवर डोळा असलेला कॉग्रेस पक्ष असल्या सिद्धांताला बळी पडला आणि त्याने भाजपाला सत्तेबाहेर ठेवायचा अट्टाहास करीत ‘आप’ला बिनशर्त पाठींबा देऊन टाकला. मग केजरीवाल यांनी सरकार बनवण्यापासून शपथविधीपर्यंत अनेक बाबतीत प्रचलीत राजकीय संकेतांना धक्के द्यायचे तंत्र अवलंबले. व्यवहारी बाबतीत तो निव्वळ पोरकटपणा होता. पण मोदींना झाकण्य़ाच्या हव्यासाने अशा प्रत्येक पोरकटपणाला परिवर्तन व क्रांती ठरवण्याची कसरत सुरू झाली होती. केजरीवाल वा त्यांचे सहकारी जे काही करीत होते, त्याची वास्तव मिमांसा होत नसल्याने त्यांनाही आपण परिवर्तनच घडवतो; अशी नशा चढली तर नवल नव्हते. त्यामुळेच त्यांच्याकडून अधिकाधिक अतिरेक होणे अपरिहार्य होते. प्रस्थापित संकेत, प्रथा, परंपरा, नियम कायदे यांना अर्थच उरला नाही. आपण करू तो कायदा व आपण ठरवू तेच सत्य; अशा मानसिकतेला जोजवले गेल्यावर यापेक्षा दुसरे काही अपेक्षितच नव्हते. आपणच जगातले एकमेव इमानदार व पवित्र पुण्यवंत आहोत आणि अन्य अवघे जग पापात बुडाले आहे; अशी धारणा झाली मग प्रेषित असल्याप्रमाणे जग शुचिर्भूत करण्याचा मोह संपत नाही. पुर्वापार होत आलेले सर्वकाही पाप वाटू लागते. केजरीवाल यांची तीच अवस्था झाली. लाडावलेले शेफ़ारलेले पोर जसे वागते, त्यापेक्षा राजकारणासह सार्वजनिक जीवनातील त्यांचे वर्तन वेगळे नव्हते. कारण लाडावलेल्या पोराच्या पालकाप्रमाणे त्यांचे बुद्धीवादी कौतुक चालूच होते. दुसर्‍याच्या घरात धिंगाणा करणार्‍या पोराचे कौतुक त्याचे परिणाम आपल्या वाट्याला आल्यावर संपते. मागल्या दिड महिन्यात असेच केजरीवालांचे कौतुक चालले होते. कारण त्याचे परिणाम ‘शेजार्‍याला’ भोगावे लागत होते. गेल्या आठवड्यात या लाडावलेल्या पोराने ‘घरातच’ धुमाकुळ व धुडगुस घालायला आरंभ केला. आजवर शिवसेना, मनसे, अन्य कोणा संस्था संघटनांच्या आक्रमकतेला झुंडशाही संबोधणार्‍यांनी त्याच दिशेने वाटचाल करणार्‍या आम आदमी पक्षाला क्रांतीकरक म्हणून मांडीवर घेतले होते. आता तेच पोर मांडीवरून उतरून घरभर आणि रस्त्यावर येऊन धिंगाणा करू लागले. तिथून मग पळापळ सुरू झाली. कालपर्यंत कौतुक करणारे गडबडून गेले.

   पण हेच व्हायचे होते. पहिल्या दिवसापासून त्याची लक्षणे दिसत होती. कॉग्रेसच्या पाठींब्याने बहूमत होत असताना आणि त्या पक्षाने बिनशर्त पाठींबा दिला असताना; गल्लीबोळात जनमत आजमावण्याच्या नाटकाची गरज नव्हती. लालबत्तीच्या गाड्य़ा वा सरकारी बंगले नाकारण्यात कुठला पुरूषार्थ नव्हता. अशा सर्व गोष्टी निव्वळ दिखावू व नाटकी होत्या. पण त्यालाच परिवर्तनाची वस्त्रे चढवित कौतुकाच्या आरत्या ओवाळायला सुरूवात झाल्यावर केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांची जनहिताच्या कामापेक्षा असली नाटके करणे म्हणजेच राजकारण असल्याची समजूत झाली तर दोष देता येईल काय? नित्यनेमाने टिव्हीच्या कॅमेरासमोर वा वृत्तपत्राच्या मथळ्यात रहाण्याला कार्य समजले, मग त्याच दिशेने वाटचाल सुरू होते. ‘आप’ची स्थिती तशीच झाली. पण पुन्हा पुन्हा त्याच नाटकाने मजा येत नाही म्हटल्यावर नवनवे खेळ व प्रयोग करावे लागतात. लोकांना थक्क करून टाकण्यासाठीच आपला अवतार झालेला आहे, असाही भ्रम होतो. त्याचेच परिणाम मागल्या आठवड्यात समोर आलेले आहेत. मात्र जेव्हा कौतुक करणारेही संशयाने बघू लागले व शंका विचारू लागले, तेव्हा हे शेफ़ारलेले पोर बिथरले. त्याने त्याच माध्यमांवर उलटे बेईमानीचे आरोप करायला मागेपुढे बघितले नाही. अर्धी माध्यमे मोदींना विकली गेलीत आणि अर्धे पत्रकार कॉग्रेसचे दलाल आहेत; असे म्हणण्यापर्यंत केजरीवाल यांची मजल गेली. त्यांच्या अनुयायांनी दिल्लीत झुंडशाही करण्याला कोणाची आडकाठी असता कामा नये आणि जो कोणी आडकाठी करील, तो भ्रष्टाचार व गुन्हेगारीला संरक्षण देणारा; अशी सोपी सरळ व्याख्या तयार झाली. परिवर्तनाची चळवळ बाजूला राहिली आणि केजरीवाल यांनी व्याख्या व शब्दार्थांच्या परिवर्तनाचे काम हाती घेतले. त्यांच्यावर अराजक माजवल्याचा आक्षेप घेतला गेला, तर ते अराजक म्हणजेच खरी लोकशाही असल्याचा मोलाचा साक्षात्कारी संदेश त्यांनी जनतेला देऊन टाकला. थोडक्यात जे कोणी विद्वान बुद्धीमंत परिवर्तनाची यात्रा म्हणून या प्रेषिताचे कौतुक करण्यात दंग झालेले होते, त्यांनाच केजरीवालांनी सणसणित चपराक हाणली. तेव्हा कुठे सहा सात दिवसांपुर्वी या मंडळींना जाग आलेली आहे. त्यातून मग दिल्लीत चालू असलेला धुडगुस व धिंगाणा समोर येऊ लागला आहे.

   त्याचा तपशील आता हळूहळू समोर येत आहे. धरण्यामुळे मोडले गेलेले संकेत, परंपरा व कायदे बाजूला ठेवा. या साधूपुरूषाच्या धरण्यात सहभागी झालेल्या क्रांतिकारी झुंडीने तिथे मद्यप्राशन करून टाकलेल्या बाटल्या किंवा महिलांशी केलेल्या अश्लिल वर्तनाचे चित्रित पुरावे समोर येत आहेत. पावित्र्याच्या नावावर कसले प्रकार चालतात, किंवा आम आदमी पक्षाच्या मुख्यालयाच्या परिसरात वास्तव्य करणार्‍या नागरिकांनी कथन केलेले अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. सवाल इतकाच, की यातले काहीही आजवर वाहिन्यांनी कशाला दाखवले नव्हते वा सांगितले नव्हते? याच केजरीवाल सरकारकडून आश्वासन पुर्तीसाठी धरणे धरून बसलेल्या हजारभर हंगामी शिक्षकांना साधे भेटायला कोणी ‘आप’नेता वा मंत्री फ़िरकलेला नाही. त्या धरणेकर्‍यांकडे कुठल्या वाहिनी वा वृत्तपत्राचा बातमीदार कशाला फ़िरकलेला नाही? त्या शिक्षकांना कॉग्रेस-भाजपाचे नेते जाऊन भेटतात, पण सत्तेवर येताच ‘आप’ने तिकडे पाठ फ़िरवली, तर त्यांच्यात व जुन्या पक्षांच्या वर्तनात किंचित तरी फ़रक आहे काय? नसेल तर मग कसले परिवर्तन आणि कुठली क्रांती? चालले आहे तो निव्वळ बिगबॉस सारखा एक टिव्हीवरला रियालिटी शो नाही काय? पण हे सत्य बोलायचे कोणी? कालपर्यंत आपणच क्रांतीचे कौतुक केले मग आज त्यालाच राजकीय झुंडशाही म्हणायचे कसे? या समस्येने बुद्धीमान वर्गाला ग्रासले. त्यामुळेच केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांच्या उचापतींवर पांघरूण घालण्यात धन्यता मानली गेली. पण गेल्या आठवड्यात त्याच कौतुककर्त्यांच्या नाकातोंडात पाणी जायची वेळ आली. घटनाक्रमातला ‘मतलब’ संपला आणि तोंडघशी पडायची पाळी आली, तेव्हा आम आदमी पक्षाचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. आपापले स्वार्थ व मतलब शोधून प्रतिक्रिया देण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळेच अशी दारूण परिस्थिती माध्यमे व बुद्धीजिवी वर्गावर आलेली आहे. मात्र त्याची मिमांसा कुठेही होत नाही की होणार नाही.

   दिल्लीत ‘आप’चे यश हे लोकपाल वा भ्रष्टाचाराच्या विरोधामुळे मिळालेले नव्हते. सहाशे लिटर मोफ़त पाणी, विजेचे दर निम्मे करणे आणि साडेतीन लाख हंगामी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी नोकरी, या आश्वासनांना भुलून दिल्लीकर या पक्षामागे धावला होता. सत्ता मिळणार नाही, म्हणून केजरीवाल यांनी अशी खोटी आश्वासने दिली होती. पण पुर्तता करण्याची जबाबदारी आल्यावर त्यांना घाम फ़ुटला आहे. त्यामुळेच स्थापनेआधीपासून त्यांनी आपले सरकार पाडले जावे, यासाठी आटापिटा चालविला आहे. राजकीय डावपेचातून फ़ोडाफ़ोडी करून भाजपा पाडणार नसेल, तर वैतागून कॉग्रेसने ‘आप’ सरकार पाडावे यासाठी केजरीवाल उतावळे झाले आहेत. कारण तसे झाल्यास आपल्याला काम करू दिले नाही, आश्वासने पुर्ण करू दिली नाहीत असे खापर त्यांना प्रस्थापित पक्ष व राजकारणावर फ़ोडून हुतात्मा व्हायचे आहे. पण कॉग्रेस वा भाजपा त्यांना तशी संधी द्यायला राजी नाहीत. त्यातूनच मग बेभान होऊन केजरीवाल यांनी केंद्राने घटनात्मक बडगा उचलावा, अशा कारवाया सुरू केल्या आहेत. सामान्य माणसाला कायद्याची गुंतागुंत कळत नाही. त्यामुळेच घटनात्मक कारणासाठी सरकार बरखास्त केले तरी कांगावा करून हौतात्म्य मिळवता येईल असा डाव होता. गेल्या आठवडाभरातल्या केजरीवाल यांच्या सर्व माकडचेष्टा त्यातूनच उदभवल्या आहेत. पण आता त्याचे चटके त्यांना ‘प्रायोजित’ करणार्‍या बुद्धीवादी वर्गाला बसू लागल्याने आणि त्याच वर्गाच्या प्रस्थापित संकल्पनांना हादरे बसू लागल्याने वास्तव समोर आणायची अपरिहार्यता निर्माण झाली आहे. रेलभवन समोरचे धरणे किंवा त्यातून उभे राहिलेले अराजक त्याचाच परिणाम आहे. पण पहिल्यापासून केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी चालवलेल्या पोरकटपणाचे अवास्तव कौतुक झालेच नसते, तर त्यांना इतके मोकाट रान मिळाले नसते. म्हणूनच घडले त्याला राजकीय पक्षांपासून बुद्धीजिवी वर्गाचा मतलबी स्वार्थही तितकाच जबाबदार आहे.

   भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा अवास्तव अट्टाहास कॉग्रेसला अगतिक बनवून पाठींब्यापर्यंत घेऊन गेला. त्यामुळे तोच पक्ष दोन्हीकडून फ़सला आहे. तर भाजपाने सत्ता हुकल्यामुळे निराशाग्रस्त होऊन पहिल्या दिवसापासून केलेल्या तक्रारींमुळे त्यांच्या विरोधकांना ‘आप’च्या चुकांचे समर्थन करण्याची वेळ आली. बाकी मोदी विरोधक व तथाकथित सेक्युलर यांच्या दिशाहिन भूमिकेने केजरीवाल व त्यांच्या झुंडीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे पाप केले. त्यातला प्रत्येकजण आजच्या परिस्थितीला सारखाच जबाबदार आहे. दया येते, ती अकारण केजरीवाल व त्यांच्या नाटकाचे उथळ समर्थन करायला धावलेल्या माध्यमे व जाणत्या अभ्यासकांची. कारण त्यांनीच उभ्या केलेल्या या भुतावळीपासून सुटका करून घेण्य़ाची दयनीय बौद्धीक कसरत आता या मंडळींना करावी लागते आहे. या गडबडीत गेला महिनाभर ‘आप’कडे धावत सुटलेल्या लोकांना मात्र आता जाग आली आहे. कारण महिन्याभरात चाळीस पन्नास लाख नवे सदस्य पक्षाला मिळाले, असा दावा करणार्‍यांकडे धावणार्‍या अनेक नामवंतांनी आता त्यापासून काढता पाय घेतल्या्चे दिसते आहे. काही असे नवसदस्य नामवंत त्या झुंडशाहीवर सवालही विचारू लागले आहेत. वादळ जितक्या वेगाने येते तितक्याच वेगाने विरूनही जाते. वादळ हा तात्कालीत उलथापालथीचा मामला असतो. केजरीवाल व त्यांचे दिल्लीतील यश तसेच आहे. त्यातून कुणा राजकीय पक्षाचे कमीअधिक नुकसान होईल. वादळे काही नवी उभारणी करीत नसतात, हे विसरता कामा नये. मग वादळ नैसर्गिक असो किंवा राजकीय असो. एक पुराणकथा सांगून विषय संपवतो.

   सीतामातेला श्रीरामाचा संदेश द्यायला गेलेल्या पवनपुत्र हनुनामाला पकडून त्याच्या शेपटीला चिंध्या लपेटून पेटवणार्‍यांना परिणामांचे भान उरलेले नव्हते. मग हनुमान सोन्याच्या लंकेत एका इमारतीवरून दुसर्‍या इमारतीवर उड्या मारत बागडला आणि अवघी लंकाच पेटली. तेव्हा त्याची शेपटी पेटवणार्‍यांनाच पळता भूई थोडी झालेली होती. केजरीवाल किंवा त्यांच्या आम आदमी पक्षाच्या दिल्लीपुरत्या यशाचे शेपूट पेटवून त्याचीच देशव्यापी क्रांतीची मशाल बनवायचा उद्योग करणार्‍यांची अवस्था आज किंचितभर तरी वेगळी आहे काय? ‘आप’च्या यशानंतर कॉग्रेस व भाजपा खिजवण्य़ात धन्यता मानणार्‍यांनीच या माकडाच्या शेपटीला आग लावून दिल्लीत हा वणवा पेटवलेला नव्हता काय? मग आज लोकशाहीच जळून खाक होते अशी बोंब ठोकणार्‍यांची बुद्धी तेव्हा कुठे झोपा काढत होती? रामलिला मैदानावर तीन वर्षापुर्वी सुरू झालेला खेळ आणि रामलिलेतला लंकादहनाचा अध्याय यात कितीसा फ़रक होता?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा